माझी आई माझ्यासाठी सूर्यासारखी आहे. प्रत्येक सकाळी सूर्य जसा एक आशेचा किरण घेऊन येतो. माझी आई ती आशा आहे. माझी आई माझ्यासाठी वडील नसतानासुद्धा तिने कधी वडिलांची कमी वाटू दिली नाही. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दु:खाच्या वाटेवर तिने ठामपणे माझा हात धरला.
माझ्या आईने कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत धीर सोडला नाही. मला अजूनही आठवते, जेव्हा मी एक वर्षांची होते. मला पोलिओ झाला. तेव्हापासून आईच्या डोळ्यातले पाणी व दु:ख कधी सरले नाही. पण तिने त्यावेळी मला इतके प्रेम दिले की, तेच माझ्याोगण्याचे कारण बनले. तिने माझ्या पायासाठी मुंबईला नेऊन उपचार केले, पण त्याचा फार उपयोग झाला नाही. माझी आई जेवढी कष्टाळू आहे तेवढीच ती जिद्दी आहे. कारण आयुष्यात करावे लागणारे संघर्ष व दु:ख या सर्वास ती थकून थांबली नाही. कारण आम्हा सर्वाची जबाबदारी तिच्यावर होती. तिने तिचे दु:ख कुठेतरी कोंडून ठेवले व आयुष्यातले सर्व क्षण आमच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यात घालवले. आई सकाळी पाच वाजता उठून सर्व काम करून जाते. घरी संध्याकाळी आल्यावर जेवण बनवून झाल्यावर उरलेल्या वेळात आमच्या सोबत मस्ती करते व तिच्या आठवणी सांगते. तिने तिच्या इच्छा मनातल्या एका दरवाज्यात कायमच्या बंद केलेल्या आहेत, पण मला वाटते की तिने थोडा वेळ काढून स्वत:साठी जगावे. मी शाळेत जाऊ लागले. कारण आईची इच्छा आहे की, मी शिकून स्वत:च्या पायावर उभे राहावे. आई कामातून थोडा वेळ काढून मला शाळेत सोडायला येत असे. माझ्या शिक्षणासाठी तिने पैसा खर्च केला. घरात एकटी कमवणारी असूनसुद्धा मला क्लासेस लावले. कधी मी कोणत्या विषयात नापास झाले व मी रडले की ती मला समजून सांगते की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. म्हणून उद्याची सकाळ यशाची असेल.
मी देवाला कधी पाहिले नाही, पण मला आता कळते की देव एकटा या जगाला सांभाळू शकत नाही. म्हणून देवाने आई निर्माण केली. मला माझ्या आईने घडविले. म्हणून माझी आई सर्व काही आहे.
मला माझ्या आईची एक सवय आवडत नाही. ती कधी कधी माझी अति काळजी करते. जर मी न सांगता कुठे गेले की ती इकडे-तिकडे मला शोधत राहते. मला ओरडते. पण तिच्या डोळ्यातली काळजी माझ्यासाठी माझी हिम्मत आहे.
माझ्या आयुष्यातला एक अनुभव मला जगणं शिकवतो. शाळेत लहानपणी माझ्याबरोबर मुली जास्त बोलत नसायच्या. त्याचं कधीकधी मला खूप वाईट वाटायचे. एका रात्री मला ताप आला. आई रात्रभर झोपली नाही. माझे डोके मांडीवर घेऊन रात्रभर माझ्या डोक्यावरून हात फिरवत राहिली. तेव्हा मला कळले जे माझ्याकडे आहे ते फार कमी लोकांकडे असते. कितीतरी अनाथ मुले आहेत ज्यांच्याकडे आई-वडील नाहीत. पण देवाने मला खूप चांगली आई दिली. तेव्हापासून मी कधीही मला एकटी समजत नाही. माझ्या आईने मला कसे जगायचे हे शिकवले. कोणत्याही परिस्थितीत मागे वळून बघायचे नाही असे शिकवले. अशी आहे माझी गोड आई!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा