संकेत पै
आयुष्यात अनेक संघर्षाचे प्रसंग येतच असतात. अशा वेळी आपल्याला नेमकं काय हवंय याचा पाठपुरावा करताना आत्मविश्वास आणि आत्मसन्मान कायम ठेवणं म्हणजे स्वत:चं स्वत:शी नातं जोपासणं. ही भावना इतरांबरोबर आपली तुलना, ईर्षा, स्पर्धा करणं टाळते आणि आपल्याला समाधानी आयुष्य देते. सजगतेनं, जागरूक राहून जगणं, ही संकल्पना उलगडताना आपण नातेसंबंधांचं आयुष्यात काय महत्त्व आहे ते पाहिलं. त्याच्यापुढचा महत्त्वाचा प्रश्न हा, की आपलं स्वत:शीही सुदृढ नातं आहे का?… स्वत:शी असं सशक्त नातं निर्माण करण्याच्या प्रयत्नात आपल्या अंगभूत गुणांचा शोध लागतो आणि स्वत:त चांगले बदल घडवणं त्यामुळेच शक्य होतं.

स्वत:शी घट्ट, आपुलकीचं नातं निर्माण केल्यास मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारतंच, पण इतरांशी होणारा संवादही अर्थपूर्ण होऊ लागतो. स्वत:बरोबरचंच नातं दृढ नसेल, त्यात सारखी टीका, स्वत:लाच फटके मारणं, स्वत:कडे दुर्लक्ष, याचाच समावेश असेल, तर त्यामुळे नकारात्मक विचारसरणी बळावते. अशा माणसाचा आत्मसन्मान डळमळीत होतोच, पण त्याचा त्याच्या आरोग्यावरसुद्धा परिणाम होतो.

Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
mazhi maitrin
माझी मैत्रीण : …आणि मैत्रीचे बंध दृढ झाले
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

माया कॉर्पोरेट क्षेत्रात काम करते. अतिशय संवेदनशील आणि मेहनती, पण रूढ अर्थानं यश मिळूनही सारखी स्वत:ची उपेक्षा करणारी, मनात असंतोषाचीच भावना ठेवून जगणारी. बरं, आंतरिक उद्विग्नता असतानाही वरवर मात्र ती आपण फार सक्षम आहोत, असंच दाखवायची. दररोज ती प्रत्येक बाबतीत स्वत:वर टीका करायची. जहरी टीका! त्यात तिचं जे मूळचं व्यक्तिमत्त्व होतं, त्याच्या अगदी ठिकऱ्या उडाल्या. खऱ्या भावना लपवायच्या, सारखी स्वत:वर शंका घ्यायची, यात असुरक्षिततेची भावना कायमची डोक्यावर येऊन बसली. मी जशी आहे तशी जगतच नाहीये, खोटा मुखवटा पांघरून जगतेय याची खंत होतीच. या नकारात्मक संवादाला अंत नव्हता.

हेही वाचा : शिल्पकर्ती!

हळूहळू तिच्या रोजच्या जगण्यावर आणि आरोग्यावर त्याचे परिणाम दिसू लागले. कामात आणि वैयक्तिक आयुष्यात शांतता, स्वस्थता मिळत नव्हती. मग स्वत:ला बरं वाटावं यासाठी म्हणून तिचं खाणं वाढलं. पण भावनांचा निचरा होत नसे. मग त्यासाठीही खाणं आणि आपण किती खातोय याकडे लक्षच न राहणं सुरू झालं. वजन वेगानं वाढू लागलं. स्वत:ला दोष देणं, शंका घेत राहणं, याच्या जोडीला आता स्वत:च्या शरीराबद्दलची नकारात्मक भावना बळावली होती. आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता कमी झाली. चिंता, एकाकीपणा वाढला. कोणत्याही गोष्टीवर मन एकाग्र करणं कठीण जाऊ लागलं. तिच्या कामावर अर्थातच या सगळ्याचा परिणाम होत होता. व्यावसायिक जीवनात एक यशस्वी स्त्री म्हणून असलेली प्रतिमा अबाधित राखण्यासाठी ती प्रयत्नांची शर्थ करत होती, पण प्रत्यक्षात कामं लक्षपूर्वक आणि वेळेत पुरी करणं फार अवघड जात होतं. मनात वेगळेच आणि नकारात्मक विचार व्यापून राहिल्यामुळे व्यावसायिक गोष्टींमध्येही काही नवीन, चांगलं करण्यासाठी विचार करता येत नव्हता.

हे सर्व तिच्या वरिष्ठांच्या लक्षात येत होतं, कारण तिच्या कामाची गुणवत्ता ढासळत चालली होती. कंपनीच्या भाषेत सांगायचं, तर आता तिची त्यांच्यासाठी असलेली उपयुक्तता कमी झाली होती. त्यामुळे तिला या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलं. आपण कमी पडतोय, याची मायाला प्रचंड लाज वाटत होती. त्यामुळे आपली समस्या योग्य शब्दांत तिला वरिष्ठांसमोर मांडताच आली नाही. मुळात स्वत:बद्दल असलेल्या शंका आणि त्यात ‘आपली किंमत शून्य आहे,’ या भावनेची भर! आपण वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीयोत, म्हणून माया स्वत:ला आणखीनच दोष देऊ लागली. नैराश्यात गेली. लोकांशी संवाद टाळू लागली. मित्रमैत्रिणी, कुटुंबातली मंडळी खरं तर तिला आधार देऊ शकली असती. पण त्यांच्यापासून तिनंच स्वत:ला दूर केलं. ‘मी एक हरलेली व्यक्ती आहे’, ‘माझं कधीच पुन्हा चांगलं होऊ शकणार नाही’, ‘मी कधीच पुन्हा यशस्वी होऊ शकणार नाही,’ हेच ती सतत स्वत:शी बोलायची. हे ओझं दिवसेंदिवस असह्य होऊ लागलं आणि नैराश्याचा विकार आणखीनच बळावला. तेव्हा मात्र तिला दीर्घकाळ वैद्याकीय उपचार घेणं भाग पडलं. स्वत:शी असलेल्या नात्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम मायाच्या आयुष्यात पुरेपूर दिसतात.

हेही वाचा : सांधा बदलताना : सोबतीचे बळ!

स्वत:शी सुदृढ नातं निर्माण करताना आपल्या गरजा, मूल्यं आणि सीमारेषाही व्यक्तीला ओळखाव्या लागतात. मग त्यांचा आदर करणं आणि त्याला प्राधान्य देणं, हे अभिप्रेत आहे. या सीमारेषा केवळ आपल्याला माहीत असूनही पुरत नाही, तर इतरांनाही त्या माहीत करून द्याव्या लागतात. चांगलं जगण्यासाठी, जीवनात अधिकाधिक परिपूर्ण अनुभव घेण्यासाठी हे आवश्यक आहे. दुसऱ्याकडून आपल्याला अपेक्षित असलेलं वागणं, त्यांच्याशी होणारा संवाद, या गोष्टींना या मर्यादांमुळे एक आकार येतो. खरी आपुलकीची, परस्पर सामंजस्याची नाती यातून आकाराला येऊ शकतात. शिवाय शोषण, फसवणूक आणि भावनिकदृष्ट्या दुखावलं जाणं, यांविरोधात हे ढालीसारखं काम करतं. त्यामुळे स्वत:ची काळजी घेणं, स्वाभिमान जपणं आणि त्याबरोबर आणखी सक्षम होणं हा प्रवास चांगल्या प्रकारे करता येतो. सकारात्मक आणि खरं आत्मपरीक्षण, स्व-संवादाला चालना मिळते. मग आपली मूल्यं आणि आपल्याला आयुष्यात काय मिळवायचंय, हे अधिक स्पष्ट व्हायला लागतं. भावनांचा समतोल राखणं चांगलं जमू लागतं. इतरांच्या मागण्या आणि अपेक्षा यांखाली दबून जाण्यापासून यामुळे संरक्षणच मिळतं.

पूर्वी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचं बोलावणं आलं, की आपण जायलाच पाहिजे असं मला वाटत असे. मग अगदी इच्छा नसली किंवा बरं वाटत नसलं, तरी ती जणू सक्तीच आहे, असं मनानं घेतलं होतं. मग तिथं गेल्यानंतर फार कुचंबणा होत असे. उगाच आलो, असं वाटून मनस्ताप होत असे. नंतर मात्र स्वत:ला अशी शिक्षा करून घेण्यापेक्षा सामाजिक जबाबदाऱ्यांना काही सीमारेषा घालून घ्यायचं मी ठरवलं. माझ्या मूल्यांशी आणि आवडींशी काय जुळतंय, अशाच गोष्टींना प्राधान्य द्यायचं ठरवलं. सुरुवातीला ते आव्हानात्मक वाटत होतं, पण माझ्या मर्यादा निश्चित केल्यामुळे माझा स्वाभिमान, स्वत:शी असलेलं नातं चांगलं विकसित झालं.

हेही वाचा : ‘एका’ मनात होती : ‘फोमो’चं उत्तर ‘जोमो’?

थोडक्यात काय, तर इतरांशी असलेल्या वागण्याच्या बाबतीतल्या निश्चित सीमारेषा, हा स्वत:शी असलेल्या सुदृढ नात्याचा पाया म्हणता येईल. त्यामुळे आपल्याला काय हवंय त्याचा पाठपुरावा करणं, स्व-जागृती आणि त्याच वेळी आत्मसन्मानही जोपासणं जमू लागतं. ही भावना माणसाला ऊर्जा देणारी असते. स्वत:ची काळजी घेणं, ही संकल्पना १९५० मध्ये अमेरिकेत वैद्याकीय क्षेत्रात मांडली गेली. पण सर्वत्र तिचा स्वीकार झाला तो विशेषत: करोनाच्या काळात. गेल्या पाच वर्षांत ‘स्वत:ची काळजी कशी घ्यावी,’ याविषयीचा ऑनलाइन सर्च २०० टक्क्यांनी वाढला आहे, असं एक संशोधन सांगतं. एका ऑनलाइन सर्वेक्षणानुसार २०२४ मधील जगातले आरोग्यविषयक जे सर्वोच्च सात ‘ट्रेंड्स’ आहेत, त्यात स्वत:ची काळजी घेणं आघाडीवर आहे.

स्वत:ची काळजी घेण्याची कल्पना वरवर उपभोगवादी वाटते. पण फक्त बबल बाथ, फेस मास्क आणि मसाज एवढी ती मर्यादित नाहीये! त्यात आपलं शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य विचारात घेऊन आचरण करणं आणि तशी सजग जीवनपद्धती स्वीकारणं अपेक्षित आहे. स्वत:चा खोलवर शोध घेणं, ही त्याची सुरुवात. आपले विचार आणि भावना, यांच्याशी समरस होण्यासाठी दिला जाणारा वेळ स्वत:शी तयार होणाऱ्या अत्यंत सुदृढ नात्याचा पाया असतो. स्वत:ला वेळ देणं आणि त्यातून स्वत:शी असलेलं नातं जपणं आपण यात शिकतो. म्हणजे केवळ इतरांशीच नव्हे, तर आधी स्वत:शी तुमचं नातं कसं आहे, हे संपूर्ण आयुष्यात महत्त्वाचं ठरतं. त्यावर तुम्ही जितकं काम कराल, तितका आजूबाजूच्या जगात घडणाऱ्या गोष्टींमुळे तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. सतत तुलना, ईर्ष्या, स्पर्धा, यांमुळे माणूस अस्वस्थ होत असेल, तर त्याचं स्वत:शी फारसं चांगलं नातं निर्माण झालेलं नाही, असं म्हणावं लागेल. त्यामुळे या नात्याचा आजवर जर विचार केलेला नसेल, तर ते हेतूपूर्वक जोपासा, सहृदयतेनं फुलवा…

हेही वाचा : स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?

अब्राहम लिंकन यांचं एक प्रसिद्ध वचन आहे- ‘I am not bound to win, but I am bound to be true. I am not bound to succeed, but I am bound to live by the light that I have.’ या सुंदर विचाराची सुरुवात आपलं स्वत:शी असलेलं नातं आपण किती समृद्ध करता, यापासूनच होते.
sanket@sanketpai.com