अतिनिद्रेची अनेक कारणे असतात. एक आहे, अपघातानंतर उद्भवणारी अतिनिद्रा. काही अपघातांनंतर डोक्याला मुका मार बसतो, अशा व्यक्तींना काही दिवसांनंतर अथवा कधीकधी तीन ते चार महिन्यांनी अतिनिद्रा येऊ लागते. त्या अतिनिद्रेविषयी आजच्या दुसऱ्या भागात.
मा गच्या लेखामध्ये (२२ नोव्हेंबर) भावेशची कहाणी आपण बघितली. भावेशला नार्कोलेप्सी नावाचा विकार अतिनिद्रा आणत होता. दिवसा एकाच वेळेला जागृत करणारी केंद्रे आणि निद्राकेंद्रे दोघेही कार्यरत झाल्याने एका भावेशमध्ये दोन व्यक्तीमत्त्व असल्यागत होती. एका भावेशला प्रगती करावी, लक्ष्य ठरवावे असे वाटे तर त्यातल्याच दुसऱ्या भावेशला काही करू नये, डोळे मिटून पडून राहावे अशी इच्छा होत असे. अतिनिद्रेने पीडित असलेल्या अनेक रुग्णांनी मला नेमके हेच सांगितले आहे. हे निदान झाल्यावरदेखील काही नातेवाइकांचा आणि संबंधितांचा या बाबींवर विश्वास बसत नाही की हा एक विकार आहे. याने पीडित झालेले लोक मुद्दामहून आळशीपणा अथवा टंगळमंगळ करत नाहीत. हे वेळीच ओळखून इलाज झाला तर एखाद्याचे आयुष्य बदलून जाऊ शकते. एक सत्य घटना सांगतो. चार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. अभिषेक जॉईसी (त्याची आणि पालकांची पूर्व अनुमती घेऊन नाव बदललेले नाही) हा त्यावेळी नुकताच दहावी उतीर्ण झालेला होता. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा, कर्नाटकामध्ये शिमोगा या शहरात राहणारे कुटुंब, वडील सरकारी नोकरीत वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. आई गृहिणी. सांपत्तिक स्थिती उत्तम आणि अभिषेकनेदेखील दहावीत बऱ्यापकी गुण मिळवले होते. वडिलांप्रमाणे अभियंता होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. पण हळुहळू त्याचे अभ्यासात लक्ष कमी झाले आहे असे पालकांना वाटू लागले. सकाळी उठायला कुरकुर करणे किंवा क्लासला सकाळी दांडी मारून झोपणे. अकरावीच्या सहामाहीत फिजिक्समध्ये कमी मार्क पडले. अभिषेकने वडिलांना भिऊन खोटी मार्कशीट केली. खाडाखोड दिसल्याने, वडिलांनी कॉलेजमधल्या ओळखीच्या प्रोफेसरला ती दाखवल्यावर प्रकार उघडकीस आला. घरामध्ये वातावरण तंग झाले. अभिषेकचे झोपाळूपण दिवसेंदिवस वाढतच होते आणि त्याबरोबरच वडिलांचा पारादेखील. एक दिवस तो असाच पुस्तक वाचता वाचता, डुलक्या घेताना बघून संतापलेल्या वडिलांनी श्रीमुखात भडकावली. झाले, अभिषेक घर सोडून हेबळ्ळीला श्री दत्तण्णा रामदासी (गोंदवलेकर महाराजांचे शिष्य) यांचा आश्रम आहे तिथे आला. दत्तण्णा हे आमच्या संस्थेमध्ये भेट देऊन गेले होते आणि एकंदरीत निद्राविकार आणि अध्यात्म यावर आमचा बऱ्यापकी संवाद झाला होता. त्यांनी या कुटुंबाचे सगळे ऐकून घेऊन त्यांना हा निद्राविकार असावा असे सांगितले आणि ताबडतोब संस्थेचा पत्ता दिला. अभिषेकच्या रात्रचाचणी आणि दिवसाच्या एम.एस.एल.टी. नंतर त्यालादेखील नार्कोलेप्सी हा अतिनिद्रेचा विकार आहे असे आढळले. त्याच्या उपचारयोजनेमध्ये ‘मोडॅफिनिल’ नावाच्या औषधाचा अंतर्भाव, काही विशिष्ट अन्नपदार्थ आणि व्यायामाची नियमितता यावर भर होता. तसेच विशिष्ट वेळेला पॉवरनॅप्स आणि रात्री अतिरिक्त जागरणाची बंदी होती. अभिषेकच्या पालकांना (जसे भावेशच्या कुटुंबीयांना लागले होते) तसे फार पटवून द्यावे लागले नाही. कारण अगोदरच दत्तण्णांनी हा विकार असल्याचे सांगितले होते. भारतीयांची श्रद्धा अगाध असते आणि योग्य रीतीने वापरल्यास खूपच कामास येते.  या उपचारानंतर मात्र अभिषेकमध्ये आमूलाग्र बदल झाला, त्याच्या मते वर्गामध्ये विशेषत फिजीक्सच्या तासाला त्याचे लक्ष (जे पूर्वी सतत विचलित व्हायचे) लागू लागले, अभ्यासात रस वाटू लागला, सतत झोपाळूपणा न दिसल्याने वडीलदेखील खूश होते. सर्वात आनंदाची बाब म्हणजे बारावीत उत्तम मार्क पडून अभिषेकने इंजिनीयिरगला प्रवेश मिळवला. यावर अनेक वाचक हा प्रश्न करतील की काय हो, डायरेक्ट ट्रीटमेंट का नाही चालू करायची? मध्येच तुमच्या चाचण्या कशाला? याचे कारण मागच्या लेखात स्पष्ट केले आहे ते असे की ७० टक्के लोकांमध्ये झोपाळूपणाचे मूळ त्यांच्या रात्रीच्या झोपेत असते आणि ते नाही हे सिद्ध झाल्यावर मगच दिवसाची चाचणी करायची असते.
या अतिनिद्रेची अनेक कारणे असतात. नार्कोलेप्सीशिवाय दुसरेही विकार आहेत. त्यातील एक आहे पोस्टटॉमॅटिक हायपरसोम्नोलेन्स – अपघातानंतर उद्भवणारी अतिनिद्रा. काही अपघातानंतर डोक्याला मुका मार बसतो अथवा मान जोरात पुढे मागे (व्हीपलॅश) होते. अशा व्यक्तींना काही दिवसानंतर अथवा कधीकधी तीन ते चार महिन्यांनी अतिनिद्रा येऊ लागते. मेंदूतील जागृतीच्या केंद्रांना या अपघातात इजा पोहोचली असते. (इतकी नाजूक इजा सिटी स्कॅन अथवा एम.आर.आय.मध्ये दिसतेच असे नाही.) काही लोकांना व्हायरल इन्फेक्शन (मोनोन्युईकली ओसीस) नंतर पुढच्या दोन तीन महिन्यात प्रचंड झोप येऊ लागते. मध्य आफ्रिकेत तर एक  ट्रीपनोसोमियासिस नावाच्या डासांमुळे फैलणारा परजीवी (पॅरसाइट) संसर्ग झाला, तर त्या माणसाला सतत झोप येऊ लागते. अर्थात ही अपवादाने आढळणारी कारणे ठरतात. बहुतांश वेळेला काहीच कारण आढळले नाही तर यास इडियोपाथिक हायपरसोम्नीया असेही म्हणतात. या अतिनिद्रेमध्ये जशी दिवसामध्ये झोप येणे हे महत्त्वाचे लक्षण असले तरी क्वचित इतरही लक्षणे असतात. झोप लागत असताना काहीतरी भास होणे, दारामध्ये कुणीतरी उभे आहे असे दिसणे. झोपेतून जाग आल्यावर काही वेळ शरिरातील त्राण गेल्याने हालचाल करू न शकणे (स्लीप पॅरॅलिसिस) या शिवाय काही लोकांना उत्कट भावना (इमोशनल एक्साईटमेंट) झाली असताना  अचानक पायातले त्राण जाऊन जमिनीवर कोसळणे, जबडा खालती पडणे, हातातील वस्तू खाली पडणे इत्यादी विचित्र गोष्टी घडतात. बघणाऱ्या माणसाला हे वेंधळेपण वाटू शकते. याला वैद्यकीय भाषेत ‘कॅटेफ्लेक्सी’ असे अवघड नाव आहे. ही कॅटॅप्लेक्सी अतिनिद्रेने ग्रासलेल्या सगळ्यांमध्ये दिसते असे नाही किंबहुना दहा टक्क्यांपेक्षाही कमी असे प्रमाण आहे. पण ज्यांच्यामध्ये हे लक्षण असते त्यांची अवस्था बिकट असते. एक तर लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागते, दुसरे म्हणजे ही वैद्यकीय बाब आहे हेच समजत नाही.  मुख्य म्हणजे सर्वच डॉक्टर्सना हे माहिती नसल्याने निदान लवकर होत नाही.
 १९७४ साली स्टॅनफर्ड विद्यापीठाने केलेल्या पाहणीत अगदी अमेरिकेतदेखील या लक्षणाने पीडित असलेल्यांची सरासरी सात तज्ज्ञांचे मत घेतल्यावरच निदान झाले होते. स्नायूंमधील त्राण अचानक निघून का जाते यावर सगळ्यात जास्त संशोधन स्टॅनफर्डमध्येच झाले आहे. त्यात असे निष्पन्न झाले की भावनेच्या धक्क्यामुळे मेंदूमधील ‘रेम’ झोप आणणारी केंद्र उद्दिपित होतात. रेम झोपेचे एक वैशिष्टय़ म्हणजे स्नायू शिथिलीकरण (पॅरॅलिसिस)! अशा रीतीने या व्यक्तीमध्ये एकाच वेळेला जागेपण आणि रेम झोप असे मिश्रण होते आणि वरील वर्णन केलेले विचित्र प्रकार घडतात. गंमत म्हणजे हा प्रकार मानसिक नसून शारीरिक मेंदूतील भागांमुळे घडतो, हे समजून घेणं गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा