– भारती महाजन-रायबागकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्गदर्शनाच्या नावाखाली ‘पंचतारांकित पर्यटन’ करण्याचे प्रमाण हल्ली वाढत आहे. यासाठी झाडं तोडून, सिमेंटची जंगलं उभारून, अनियोजित बांधकामं केल्यामुळे निसर्गाची हानी होत आहे. प्रलय, महापूर, भूस्खलन यांसारख्या विनाशातून निसर्ग मानवाला सूचना देत आहे. नुकतेच केरळमधील वायनाड येथे भूस्खलन होऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले, हे त्याचेच एक उदाहरण आहे. आपण सावध कधी होणार हा खरा प्रश्न आहे.

मागच्या वर्षी दिवाळीच्या दिवसांत वायनाडला गेलो होतो. केरळचा तो भाग पाहायचा राहिला होता, म्हणून जरा उत्सुकता होती. अर्थात कुठलीही निसर्गरम्य ठिकाणं पाहायला जायचं म्हणजे हिरवीगार झाडी, नद्या, धबधबे, डोंगर, दऱ्या इत्यादी इत्यादी. फक्त झाडांचे प्रकार वेगळे, नद्यांची नावं वेगळी, धबधब्यांची उंची, रुंदी आणि पाण्याच्या प्रवाहाची गती वेगवेगळी, डोंगरदऱ्या कमी-जास्त प्रमाणात उंच आणि खोल हे गृहीतच धरावं लागतं. शिवाय बंजी जम्पिंग, रोप लाइनिंग, ट्रेकिंग, बोटिंग, इत्यादी अ‍ॅडव्हेंचर गेम्स सगळीकडे असणं अनिवार्यच झालं आहे. अर्थात यात आक्षेपार्ह असं काहीच नाही. पण आपणच तयार केलेल्या सिमेंटच्या जंगलातून काही दिवस तरी सुटका व्हावी, डोळ्यांना हिरवाई दिसावी म्हणून लांब वीकेंडला किंवा मोठ्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांनी अशा स्थळांवर गर्दी करणं हा अलिखित नियम होऊ पाहत आहे. त्यालाही कोणाची हरकत असायची गरज नव्हती. पण पर्यटकांना स्वत:च्या घरातही नसतील अशा पंचतारांकित भौतिक सोयी निसर्गाच्या सान्निध्यात हव्या असतात. वास्तविक दिवसभर ‘साइट सीइंग’ करून रात्री दमूनभागून मुक्कामाला आल्यावर पाठ टेकली की, कशाही परिस्थितीत गाढ झोप लागायला हवी खरं तर. ऋतुमानाप्रमाणे खोलीत एखादा पंखा किंवा पांघरायला जाड ब्लँकेट, बस्स. एक स्वच्छसं टॉयलेट, बाथरूम, एखादा आरसा, टीपॉय, दोन खुर्च्या बस. मोठमोठी दारं असलेली वॉर्डरोब्स यांची फारशी गरजच नसते, पण आपल्याला सुसज्ज अशाच ए.सी. रूम्स हव्या असतात. त्यासाठी एका दिवसाचे चार-पाच आकडी भाडे भरायलाही आपण तयार असतो. आणि मग सुरू होतो मागणी तसा पुरवठा. त्यासाठी मोठमोठी झाडं तोडली जातात, डोंगर तासले जातात आणि वरून लाल कौलं घातलेली, उतरत्या छपरांची ‘कॉटेजेस’ असं गोंडस नाव दिलेल्या पंचतारांकित सुविधांच्या आलिशान रूम्स पर्यटकांच्या सेवेस सादर केल्या जातात. काही ठिकाणी तर खोल्यांना जोडूनच असणारे स्विमिंग पूल किंवा जकुझी स्नानाचीही व्यवस्था असते. अर्थात त्याचं भाडं भरभक्कम असलं, तरीही ते देण्याची अनेक पर्यटकांची तयारी असते.

हेही वाचा – दु:ख ‘एकुलत्या एक’ मुलांचं!

या पर्यटकांकडून मिळणाऱ्या छनछनाटाची मोहिनी आता तिथल्या स्थानिक रहिवाशांनाही पडली आहे. त्यासाठी ज्या निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचा जन्म झाला, ज्या निसर्गाने त्यांचे संगोपन केले त्याच्याच मुळावर उठण्याचीही त्यांची तयारी आहे. डोळे असून आंधळे अशी त्यांची गत झाली आहे. श्रमप्रतिष्ठा जपणाऱ्या माणसांना आता या कमी श्रमात मिळणाऱ्या पैशांची भूल पडली आहे. त्यासाठी मग जिथे शक्य आहे तिथे ते डोंगर तासत असतात आणि त्या मुद्दाम सपाटीकरण केलेल्या जागेच्या क्षेत्रफळाप्रमाणे एखादी चहाची टपरी, छोटेखानी हॉटेल किंवा मध्यम आकाराचे रेस्टॉरंट आणि जरा मोठी जागा मिळाली, तर रिसॉर्ट अशी बांधकामं सुरू करतात. लहान बांधकामासाठी क्वचित तिथलीच साधन संपत्ती वापरली जाते, तर मोठ्या बांधकामासाठी मात्र सिमेंट काँक्रीटशिवाय पर्यायच नसतो.

आधीही नैसर्गिक संकटं येत असतीलच, कारण प्रत्येक ठिकाणच्या जमिनीचा पोत वेगळा आणि पर्वतीय प्रदेशाच्या ठिसूळतेत आणि घट्टपणात वैविध्य असणं स्वाभाविकच असतं. शिवाय प्रत्येक प्रदेशानुसार तेथील डोंगराळ किंवा सपाट प्रदेशाच्या अंतर्गत भागात नैसर्गिक हालचाली होतच असतात. त्यामुळेच भूकंप, भूस्खलन किंवा दरडी कोसळण्यासारखे प्रकार घडत असतात. त्यांच्या हालचालीनुसार त्याची तीव्रताही कमी जास्त असू शकते. त्यावेळी ती नैसर्गिक आपत्ती म्हणून आपल्याला स्वीकारावीच लागते. पण या मानवनिर्मित बांधकामांसाठी पोकलेनसारख्या जड यंत्राच्या माऱ्याने डोंगराचा ठिसूळ भाग आणखीच सैल होत जातो. झाडंच कापून टाकल्यामुळे मुळांना मातीही धरून राहत नाही. जोरदार पावसाच्या प्रवाहाला अडवण्यासाठी किंवा त्याचा वेग कमी करण्यासाठी काहीच साधन उरत नाही. यामुळे डोंगरकडे कोसळतात, जिकडेतिकडे पाणीच पाणी होते. आणि ‘ओल्याबरोबर सुकंही जळतं’ याप्रमाणे कच्ची घरं तर केव्हाच जमीनदोस्त होतात. मोठमोठे बंगलेही निसर्गापुढे शरणागती पत्करतात. अर्थातच हवामान, त्या भूभागाला न पेलवणारं विविध प्रकारचं यांत्रिकीकरण, विकासाची चुकीची समीकरणं इत्यादी कारणंही प्रलयाला आमंत्रण देतात. वायनाडला मागच्या वर्षी हेच दृश्य दिसलं होतं आणि या वर्षी ही अस्वस्थ करणारी प्रलयाची बातमी. अर्थात त्यापूर्वीही अशा प्रलयाच्या बातम्या कुठून ना कुठून आल्याच होत्या. प्रत्येक वर्षी त्या येतच असतात, पण खंत एवढीच वाटते की, तज्ज्ञांनी वारंवार दिलेल्या इशाऱ्यानंतही आपण त्या विसरून पुन्हा आपल्या मागास दिसणाऱ्या भागाला तथाकथित विकासाचा आभासी मुलामा देऊन त्याला भकास करण्याचे कार्य अविरत चालू ठेवले आहे. पुढच्यास ठेच लागली तर मागच्यानं शहाणं व्हावं असं म्हणतात. पण आपल्याला तर स्वत:लाच ठेच लागलीआहे तरीही शहाणं व्हायचंच नाही असं आपण ठरवलंच असेल तर मग निसर्ग काय करणार!

या वर्षी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात मेघालयला गेलो होतो. चेरापुंजी हे सर्वात जास्त पाऊस पडण्याचं ठिकाण तिथेच आहे. आसामची हद्द संपून मेघालयची सुरू झाली आणि दोन्ही बाजूंनी हिरव्यागार उंच उंच झाडांची श्रीमंती नजरेस पडली. वळणा- वळणाच्या रस्त्याच्या एका बाजूला उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी हे पर्वतीय प्रदेशातील नेहमीचे दृश्य येथेही होते, पण रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडीमुळे दरीची भीषणता अजिबात दृष्टीस पडत नव्हती. पुढे मेघालयातील आठ दिवसांच्या मुक्कामात सृष्टीसौंदर्याबरोबरच नजरेस पडले ते त्या सौंदर्याला ओहोटी लावणारे जोरदार प्रयत्न. जिकडे जावे तिकडे कापलेली झाडं आणि डोंगर तासून उभारत असलेली छोटी-मोठी बांधकामं. एकमजली आणि बहुमजलीसुद्धा. भरपूर पावसामुळे झाडं उंच उंच वाढलेली होती, पण ती कापल्यावर तेथील प्रदेश मात्र उजाड झालेला दिसत होता. नवीन वृक्ष लागवड कोठेही दिसली नाही. वाहन चालकाला विचारल्यावर तो खेदाने म्हणाला ‘‘क्या करे, पुरे दुनियाभरसे इतने लोग आते है, तो यहांके लोगोंको पैसे का लालच लग गया है। आगे पता नही, ‘मेघालय’ सिर्फ नामकाही रह जाएगा। ’’ किती खरं बोलत होता तो!

पूर्वी हे निसर्गपुत्र एखाद्या अनाघ्रात कळीप्रमाणे असलेल्या आपल्या हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात कमीत कमी गरजा पूर्ण झाल्या की, संतोषाने आणि समाधानाने राहत होते. पण शहरवासीयांनी तिथे शिरकाव केला आणि तिथल्या दुर्दशेला प्रारंभ झाला. कहर म्हणजे मेघालयातले डोंगर सुरुंगाने मुद्दाम फोडून किंवा लँड स्लाइडने आपोआप कोसळलेले डोंगराचे दगड तुलनेने सपाट असलेल्या प्रदेशात इमारती बांधण्यासाठी पाठवले जातात. असे दगड भरलेले शेकडो ट्रक आपला नंबर येण्याची वाट पाहत उभे असलेले आम्हाला या प्रवासात दिसले होते. आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याचाच हा प्रकार नाही का ?

याच्या जोडीला पर्यटकांनी आणलेला किंवा पर्यटकांसाठी आणलेल्या खाद्यापेयांच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा कचरा तर वर्षांनुवर्षे न थांबणारी तीव्र डोकेदुखी आहे. प्रत्येक प्रेक्षणीय स्थळाजवळ कचराकुंडी असली, तरीही रस्त्यालगत इतस्तत: कचरा फेकलेला असतोच. शिवाय मद्यापानाविना तर आपलं निसर्गदर्शन पूर्ण होऊच शकत नाही, असा अलिखित नियमच असावा अशी शंका येण्याइतपत प्रत्येक ठिकाणी मद्यापान सुरू असतं. प्लास्टिकच्या जोडीला काचेच्या रिकाम्या बाटल्या असणं ओघानं आलंच. वास्तविक निसर्गाचं नुसत्या नजरेनं पिऊन घ्यावं, भान हरपून मनात साठवावं, असं अलौकिक रूप आपल्या देशात ठायी ठायी असताना दुसऱ्या नशेची गरज भासावी, हा त्या स्थळांचा खरं तर अपमानच!

केदारनाथ, बद्रीनाथ, हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तरांचल, अरुणाचल, अगदी आपलं कोकण…किती नावं घ्यावीत! निसर्गाच्या स्वरूपात थोडा-फार बदल होईल, पण मानवाचं वागणं मात्र प्रत्येक ठिकाणी अगदी एकसारखंच. पण त्यामुळे निसर्गाच्या सहनशक्तीचाही अंत होतो. तो वाचाळ नाही, पण कृतिशील मात्र नक्कीच आहे. मग कधी वायनाड, कधी केदारनाथ… कुणी जात्यात असतात तर उरलेले सुपात.

याबाबतीत आपल्या शेजारच्या भूतान देशाचा आदर्श घ्यावा असं वाटतं. भारताखेरीज इतर देशांच्या पर्यटकांना दर दिवशी डॉलरमध्ये फी भरावी लागते आणि भारतीयांना ती रुपयांमध्ये भरावी लागते. पर्यटकांची संख्याही साहजिकच मर्यादित राहात असावी. त्यामुळेच असेल कदाचित भारत आणि भूतानच्या सीमेवरील अगदीच शेजारी-शेजारी असलेल्या गावातील स्वच्छता आणि शिस्तीमधील फरक ठळकपणे लक्षात येण्यासारखा आहे. त्यांचा आदर्शआपण कधी घेणार ?

हेही वाचा – मासिक पाळीतील मानसिक आरोग्य

आधीच निसर्गाला ओरबाडून, झाडं तोडून, शेतीचा नायनाट करून सिमेंटची जंगलं उभारून, अनियोजित बांधकामं करून शहराची वाट लावल्यामुळे प्रलय पाहायला मिळतोच आहे आणि आता थोडाफार निसर्ग जिथे कुठे शिल्लक आहे तिथे निसर्गदर्शनाच्या नावाखाली जाऊन त्याचाही सत्यानाश करण्याचा प्रयत्न ‘पंचतारांकित पर्यटना’च्या निमित्ताने सुरू आहे. ‘सावध ऐका पुढल्या हाका’ असं हा मूक निसर्ग त्याच्या सौम्य, सूचक भाषेत सांगून पाहतो आहे. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कितीही आश्चर्यकारक शोध लावले, कितीही प्रगती केली, कितीही सुखसोयी निर्माण केल्या आणि निसर्गाला नमविण्याच्या कितीही वल्गना केल्या तरीही निसर्ग मानवाच्या वरचढच राहील ही काळ्या दगडावरची रेघ.

काही शतकांनंतर प्रलय येणार, असं भविष्य सांगितलं जातं. आपल्या अविचारी कृतीने मानव तो अलीकडे घेऊन येतोय की काय अशी शंका यावी, असं सध्याचं वर्तमान तरी सांगतंय.

bharati. raibagkar@gmail. com