प्रतिभा वाघ

पोटापाण्यासाठी दगड फोडणारे, लाकूड तोडणारे, गवत कापणारे, महुआ (मोहाची फुलं-फळं) गोळा करणारे हात हे एका चित्रकर्तीचे आहेत हे ओळखणारे गुरुजी एका आदिवासी स्त्रीला वयाच्या ६७ व्या वर्षी भेटतात. ते तिला चित्रकलेचे धडे देतात, तिच्याकडून सतत दहा वर्ष अविरत कलासाधना करवून घेऊन तिला जागतिक कीर्ती मिळवून देण्याच्या कामी साहाय्यभूत होतात. या वर्षी ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरवली जाणारी तीच बैगा आदिवासी ८४ वर्षांची आजीबाई म्हणजे जुधईयाबाई बैगा.

Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
sonam wangchuck marathi news,
जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे नागपुरात “हेरिटेज ट्री वॉक”
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
cm devendra fadnavis loksatta news
आमच्या कुटुंबात ‘तिच’ सर्वाधिक प्रगल्भ, फडणवीस कोणाबाबत बोलले?
Rescuer brother runs away by leaving mentally ill sister but nandadeep foundation save her life
रक्षणकर्ता भाऊ मनोरुग्ण बहिणीला बेवारस सोडून पळाला… नंददीप फाऊंडेशनने मात्र…
Sudhir Mungantiwar Devendra Fadnavis (1)
निमंत्रण पत्रिकेत शेवटी नाव, मुनगंटीवार नाराज? फडणवीस खुलासा करत म्हणाले, “आम्ही वाघ व वारांचा…”

मध्य प्रदेशातल्या उमरिया जिल्ह्यात लोढा गावात राहणाऱ्या जुधईयाबाईंशी मी बोलले होते, तेव्हा ‘आपण कधी चित्र काढू शकू हे स्वप्नातही वाटलं नव्हतं,’ असं त्या प्रांजळपणे म्हणाल्या होत्या. त्यांच्याहून २२ वर्षांनी लहान असणाऱ्या आशीष स्वामी या गुरुजींबद्दल त्यांना नितांत आदर आहे. जुधईयाबाईंना जागतिक स्तरावर नेण्याचं, तसंच त्यांना ‘पद्मश्री’ मिळावी असं स्वप्न पाहाणारे त्यांचे हे शिक्षक. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, की आशीष स्वामी गुरुजी हा सोहळा पाहण्यापूर्वीच करोनाचे बळी ठरले.

‘जन गण तस्वीरखाना – कला और कलाकारों का घर’ हे नाव आहे लोढा गावात आशीष स्वामी यांनी सुरू केलेल्या कलाशाळेचं. ते स्वत: गुरुवर्य रवीन्द्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनचे विद्यार्थी. मुंबईत चित्रकार म्हणून काम करताना मन रमलं नाही म्हणून उमरिया या आपल्या मूळ गावी परत जाऊन बैगा आदिवासींची उच्च प्रतीची सांस्कृतिक परंपरा जपण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला.

बैगा आदिवासी ही एक आद्य जमात. ते स्वत:ला ‘भूमीजन’ म्हणवतात. ‘बैद्य’ या हिंदूी शब्दावरून ‘बैगा’ हा शब्द आला असं म्हटलं जातं. बैगांना आयुर्वेदाचं उत्तम ज्ञान. संगीत आणि नृत्य हा तर त्यांच्या जीवनाचा भागच. शूर, निर्भीड, कष्टाळू असणाऱ्या बैगांच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान म्हणजे मनसोक्त आयुष्य जगणं! अशा वातावरणात जुधईयाबाई वयाच्या चौदाव्या वर्षी विवाह होऊन सासरी गेल्या आणि दोन मुलं आणि सहा महिन्यांची गर्भवती असताना, पतीचं निधन झाल्यामुळे वयाच्या तिसाव्या वर्षी माहेरी परत आल्या. कष्ट करू लागल्या. २००८ मध्ये एका घटनेनं त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि ‘चित्रकर्ती’ म्हणून त्यांचा जणू नव्यानं जन्म झाला. त्या वेळी त्यांचं वय होतं जवळजवळ सत्तर वर्षांचं!

आशीष गुरुजींच्या स्टुडिओचं बांधकाम सुरू होतं आणि इतर बायकांबरोबर जुधईयाबाई जमीन सारवणं, भिंती लिंपणं, त्यावर उठावची चित्रं काढणं अशी कामं करत होत्या. आशीष गुरुजींच्या नजरेतून जुधईयाबाईंचं कलाकौशल्य सुटलं नाही. त्यांनी कागद, रंग, ब्रश दिले आणि जुधईयाबाईंना चित्र काढण्यास सांगितलं. अक्षरओळख नसलेल्या आणि आयुष्यात पेन्सिलही न धरलेल्या त्यांनी सत्तराव्या वर्षी कुंचला हाती धरला. त्यांनी जे चित्र काढलं त्यातली प्रतिभा, रंगज्ञान, रेखाटनातली सहजता पाहून गुरुजींनी त्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. पुढील दहा वर्ष त्यांनी सातत्यानं चित्रं काढली. त्या सांगतात, ‘ज्या वेळी मी कागदावर चित्र काढायला सुरुवात करत असे, तेव्हा मला पक्ष्यासारखं मुक्त उडत असल्यागत वाटायचं!’ त्यांच्या कलासाधनेचं फळ म्हणजे २०१९ मध्ये इटलीत मिलान इथे ‘कोरोसा डी पार्टा व्हिजेंटिना’ इथे त्यांची चित्रं जगातल्या प्रसिद्ध चित्रकारांच्या बरोबरीनं प्रदर्शित झाली. विशेष म्हणजे प्रदर्शनाच्या आमंत्रणपत्रिकेसाठी जुधईयाबाईंच्या चित्राची निवड झाली. त्यांच्या चित्रातल्या मनुष्याकृती भौमितिक आकाराच्या असून बालचित्रकलेशी साम्य दर्शवतात. चित्राचं खास वैशिष्टय़ म्हणजे लाल आणि गुलाबी रंगाचा वापर; जे रंग हाताळणं जिकिरीचं आहे, असं यशस्वी मान्यवर चित्रकारही मान्य करतात. ही चित्रं उत्तम कल्पनाशक्तीचा आविष्कार दाखवणारी आहेत. भोलेनाथ आणि बाघासूर (वाघाच्या रूपातला देव) हे त्यांचे आवडते विषय. अनेक लुप्त होणारी झाडं, रीतिरिवाज, लोककथा, प्रसंग आपल्या चित्रांद्वारे त्या जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत. ढगांमधली निर्मलता, निसर्गातली लय, पक्षी, प्राणी यांचं सहजीवन त्या लीलया रंगवतात. पर्यावरणाचा संदेश चित्रांतून देऊन लयाला चाललेल्या बैगा चित्रकारीच्या पुनरुज्जीवनाला त्या हातभार लावत आहेत.

भारतात दिल्ली, भोपाळ, खुजराहो, उज्जैन अशा ठिकाणी त्यांची चित्रं प्रदर्शित झाली आहेत. त्या सांगतात, ‘‘परदेशी लोक माझी चित्रं खूप वेळ न्याहाळतात आणि विकतही घेतात. परिपूर्णता ही कलेत केवळ अशक्य आहे, कारण नवनिर्मितीमध्ये नेहमीच सुधारणा आणि प्रगती होत असते.’’
आशीष गुरुजींच्या अकाली मृत्यूमुळे जुधईयाबाईंचा काही काळ खूप अस्वस्थतेत गेला. पण गुरुजींचे उद्गार त्यांच्या मनात घर करून आहेत. ‘मिलानचं चित्रप्रदर्शन ही आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची घटना असली तरी एवढय़ावर थांबून चालणार नाही, पुढे जायलाच हवं,’ असं गुरुजी म्हणत. तशाच जुधईयाबाई पुढे पुढे जात आहेत. त्यांना भोपाळमधल्या जनजातीय कलासंग्रहालयात एक मोठी भिंत खास बांधून मिळाली आहे आणि त्यावर त्यांनी सुंदर चित्रनिर्मिती केली आहे. पण या गुणी, वृद्ध चित्रकर्तीकडे अजूनही स्वत:च्या मालकीचं पक्कं घर नाही. ते त्यांना लवकर मिळावं ही यानिमित्तानं इच्छा.

आपल्या कलेच्या वारशाबद्दल त्या सांगतात, ‘परदेशात चित्रप्रदर्शन झाल्यावर आनंद झालाच, पण त्याहीपेक्षा जास्त आनंद माझी सून चित्रकलेत रस घेऊ लागल्यावर झाला.’ त्यांचे दोन मुलगे, सुना, नातवंडं- अमर, रिंकू, रूपा कलेचा वारसा पुढे नेत आहेत. कोणत्याही वयात सुरुवात करून आपली मूळ आवड वृद्धिंगत करणं, त्यातून इतरांना आनंद देणं शक्य आहे, ही प्रेरणा देणाऱ्या जुधईयाबाईंना सलाम!

plwagh55 @gmail.com

Story img Loader