रेणू दांडेकर

‘मरुदम फार्म स्कूल’च्या इमारतीमधल्या वर्गात बसलंच पाहिजे, असं बंधन इथल्या मुलांवर नाही. मुलं बऱ्याचदा शिकायला बाहेर गटात बसतात. वर्गाना दारं नाहीत. प्रवेशद्वारं गोलाकार आहेत नि वर्गही गोलाकार आहेत. मुलांना वर्गातल्या जागेत अवकाश मिळतो, मोकळी जागा मिळते. इमारतीबाहेर मुलांना काम करण्यासाठी शेत आहे, पोहायचा तलाव आहे, ‘हिल ऑफ विस्डम’ म्हटलं जाणारी जंगलसफारी आहे. इथल्या मुलांचं निसर्गाशी इतकं घट्ट नातं जोडलं गेलंय की, त्याची जाणीव, अभिमान नि आनंद मुलांच्या वागण्याबोलण्यात दिसतो. तमिळनाडूमधील ‘मरुदम फार्म स्कूल’विषयी..

pune metropolis have lack of basic facilities and infrastructure
बकालीकरणाकडे…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta lokrang Birth centenary year of Dr Wankhade pioneer of Dalit literary movement
दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

‘मरुदम’ ही आहे तमिळनाडू राज्यातली शाळा. का नाव दिलंय हे या शाळेला? याचं सोपं उत्तर आहे, ही शाळा एका शेतात आहे. पण अधिक माहिती घ्यायची तर सांगता येईल की, ही शाळा निसर्ग-पर्यावरण जीवनशैलीचं प्रतिनिधित्व करते. या शब्दाचा तमिळ साहित्यातला अर्थ पाहणेही आवश्यक ठरते, कारण तो अर्थ खूपसा या शाळेच्या विचारप्रणालीत आणि कार्यप्रणालीत उतरला आहे.

तमिळ साहित्यातील ‘संगम’ हे लोककाव्य आहे. त्यात कवी निसर्ग, प्रेम, शौर्य आणि लोकजीवन याबद्दल गाणी लिहितात-गातात. ही गाणी दोन विभागांत आहेत. यात पहिला भाग आहे, ‘आगम’ काव्याचा. आगम म्हणजे अंतर्मन, स्व आणि घर. आगम कविता निसर्गाबद्दल, निसर्गातील व्यक्तिजीवनावर आहेत. तर दुसऱ्या भागात, लोकजीवन, लोकांचे शौर्य, दातृत्व, राजेरजवाडे यांचे वर्णन आहे. या काव्यांतून लोकांचे प्रेम, त्यांची जीवनशैली तेथील जमिनीच्या स्वरूपावर अवलंबून असल्याचं लक्षात येतं. यातून हेही जाणवतं की, हे लोक निसर्गाच्या खूप जवळ आहेत. म्हणूनच या आगम कविता पाच प्रकारच्या भूस्वरूपात विभागल्या गेल्या आहेत. याला ‘पंच थिनाई’ म्हणतात. याला तमिळ भाषेत पाच नावं आहेत. कुरिन्जी (kurinji). ही जमीन पर्वत-डोंगर यांची असते. मुलूलई (kurinji) जंगलांची असते. निथाल (Neithal) म्हणजे समुद्रभूमी. पाललई (paalai) यात जमिनीला स्वतंत्र आकार नसतो आणि मरुदम (marutham) म्हणजे सपाट जमीन, शेतजमीन. मरुदमचा अर्थ धनधान्य देणारी जमीन. मरुदमचा देव कोण? तर इंद. इथले रहिवासी उल्लवर (Ullavar), वेलन्मदर (Velanmadar) टोलूव्हर (toluver) आणि कदिटय़ुर (kadaiyur) होते. या सर्वाचा शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय होते. या पाच प्रकारच्या जमिनींची विभागणी निवासासाठीची जमीन, शेतजमीन, परिवहनासाठीची जमीन, व्यवसायांसाठीची जमीन आणि इतर जमीन अशा प्रकारे होते. शेतीच्या बांधावरील फुललेलं झाड असाही या मरुदम या शब्दांचा अर्थ होतो.

एवढा सारा अर्थ आपण अशासाठी पाहिला की, हे सारे नैसर्गिक संदर्भ या शाळेशी जोडलेले आहेत. ही शाळा स्थापन करणाऱ्यांपैकी एक आहेत पौर्णिमा. त्या विसाव्या वर्षांपर्यंत मुंबईस्थित होत्या. त्यांनी पदार्थविज्ञानात पदवी मिळवली असून नंतर धारावी झोपडपट्टीत स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे. रस्त्यावरच्या मुलांना त्या शिकवायच्या. यात झोपडपट्टीतली मुलं होती आणि कामगारांचीही. ही मुलं शाळेत जात नव्हतीच साहजिकच लिहिणं वाचणं तर दूरच होतं. त्यांच्या हे लक्षात आलं की, जरी मुलांना उच्च वर्गातल्या वा समाजातल्या इतर मुलांसारखं वाचता लिहिता येत नसलं तरी खूप गोष्टी माहीत आहेत, ही मुलं चुणचुणीत आहेत. या मुलांबरोबर काम करतानाच त्यांचं विचारचक्र सुरू झालं, कसं असावं यांचं शिक्षण? या मुलांसाठी वेगळा अभ्यासक्रम कसा असावा? त्यानंतर त्या मुंबईहून चेन्नईला आल्या आणि अ‍ॅनी बेझंट यांनी सुरू केलेल्या एका मिशनरी शाळेत रुजू झाल्या. तिथे त्यांनी तेरा वर्ष शिकवलं. दरम्यान एम.एससी. पूर्ण केलं.

‘मरुदम’चे दुसरे शिलेदार अरुण, हे चेन्नईचे अभियंते. एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होते. पण त्या कामात त्यांना रस वाटेना. शेवटी नोकरीचा राजिनामा दिला आणि जे. कृष्णमूर्तीच्या शाळेत बागकाम आणि पर्यावरण विषय शिकवू लागले. इथेच पौर्णिमा आणि अरुण भेटले. विचार जुळले आणि मित्र झाले. विचारविनिमयातून  शाळा स्थापण्याचा निर्णय झाला. तिथेच ‘मरुदम’चा जन्म झाला. ते वर्ष होतं २००९! आज ही शाळा १९ वर्षांची झालीय. त्यांच्या जोडीला पाँडेचरी येथील रमण महर्षीच्या आश्रमात समर्पित जीवन जगणारे लीला (या इस्रायलच्या आहेत) – गोविंद (हे ब्रिटिश आहेत.) जोडले गेले. दोनाचे चार झाले. त्यांनी घेतलेल्या टेकडीवरील जमिनीवर झाडं लावायला सुरुवात केली. चार लोकांच्या एका समूहाने वेगळा विचार करून मुलं आणि शिकणं यांचं घट्ट नातं निर्माण करणारी ‘मरुदम’ सुरू केलीय.

आता प्रत्यक्ष शाळेविषयी जाणून घेऊ या. नेहमीचे प्रश्न -इथली पुस्तके कशी आहेत? अभ्यासक्रम कसा आहे? रचना कशी असते? शाळेसाठी आवश्यक आर्थिक व्यवस्थेचं काय? इत्यादी. ही शाळा तमिळनाडू सरकारची पुस्तकेही वापरते आणि स्वत: निवड केलेली पुस्तकेही वापरते. मात्र अध्यापन पद्धती निसर्गाशी नाळ जुळवणारी, नातं घट्ट करणारी अशी आहे. त्यामागे ‘मरुदम’चा स्वत:चा असा विचार आहे. त्यांच्या अभ्यासक्रमाची सात क्षेत्रं आहेत. ती जाणून घेण्याआधी शाळेत येणारी मुले कोण आहेत हेही समजून घ्यायला हवं. या शाळेत येणारी मुले ही वेगवेगळ्या पाश्र्वभूमीची आहेत. शेतावर राहणाऱ्या शेतमजुरांची जशी मुले आहेत तशी तिरुअन्नमलाई शहरातली मुलंही आहेत, जवळच्या खेडय़ातली मुलं आहेतच, पण काही तर परदेशातील मुलेही आहेत. त्यांच्या बाबतीत यांना असं जाणवलं की, या मुलांना जैवविविधतेत रस आहे. मुलांमध्ये असणारी उपजत कौशल्यं, बुद्धिमत्ता, भाषा आणि दृष्टिकोन याबाबत इथे काम होतं. काही मुलं प्रतिकूल परिस्थितीतील आहेत. काही मुलं अनुकूल परिस्थितीतील आहेत. याचा वेगळा परिणाम होतो. दोघांना एकमेकांच्या परिस्थितीची जाणीव होते. ही जाणीव मुलांमधली सामाजिक, आर्थिक दरी दूर करते. सर्व प्रकारच्या मुलांना प्रवेश हे या शाळेचं वैशिष्टय़ म्हणावं लागेल. जे देऊ शकतात त्यांच्याकडून शुल्क घेतलं जातं. प्रवेशासाठी फॉम्र्स भरून घेतले जातात. या फॉम्र्सना ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ फॉम्र्स म्हटलं आहे. हे फॉर्म डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात भरल्यावर मग पालकांच्या मुलाखती फेब्रुवारी आणि मार्चच्या सुरुवातीला होतात. यात पालकांना शाळेच्या भूमिका सांगितल्यावर पालकांचा दृष्टिकोन पाहिला जातो. ज्यांना इथल्या कामाची पद्धत मान्य आहे. त्यांनाच प्रवेश दिला जातो. शहरातून येणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी हे आवश्यक वाटतं. पाया पक्का होणं, शाळेची भूमिका समजणं हे महत्त्वाचं मानलं जातं.

‘मरुदम’ला तमिळनाडू राज्याकडून प्राथमिक वर्ग चालवण्याची मंजुरी मिळाली आहे. शिवाय तिथल्या नियमानुसारही (स्वच्छतागृह, कचरा व्यवस्थापन, वर्ग खोल्या,  प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी) सर्व मान्यता सरकारने दिल्या आहेत.

मुलांसाठी अभ्यासाला बसायची व्यवस्था काय आहे? तर शाळेच्या इमारतीतल्या वर्गात बसलंच पाहिजे, असं बंधन नाही. वर्गाच्या बाहेरही ही मुलं गटात शिकायला बसतात. वर्गाना दारं नाहीत. प्रवेशद्वारं गोलाकार आहेत नि वर्गही गोलाकार आहेत. मुलांना वर्गातल्या जागेत अवकाश मिळतो, मोकळी जागा मिळते. हा अवकाश मुलांच्या शरीरासाठीही आवश्यक आहे. गोलाकार रचना मुलांना वेगळा आनंद देते. इमारतीबाहेर मुलांना काम करण्यासाठी शेत आहे, पोहायचा तलाव आहे, जंगलसफारी आहे. इथल्या जंगलसफारीला ‘हिल ऑफ विस्डम’ म्हटलं जातं. इथे मुलं दर आठवडय़ाला येतात. या जंगलाचेही प्रश्न होतेच, पण शाळेने संघर्ष केला नि प्रश्न संपू लागले. वणवा, जंगलतोड यामुळे दाट जंगल होत नव्हतं. पण आता इथल्या झाडांची संख्या वाढतेय. इथे जवळजवळ १०० प्रकारच्या वनस्पती आहेत.

हा प्रयोग पाहायला देशी विदेशी पाहुणे येतात नि इथले होऊन जातात. कुणी फ्रेंच अ‍ॅनिमेटर येतो नि इथली मुलं त्याला त्याची फिल्म बनवायला मदत करतात. चित्रीकरण करण्यात त्याच्याबरोबर दंग होतात. तर कुणी संगीतकार येतो. तयार होणाऱ्या फिल्मचा साऊंड ट्रॅक पूर्ण करण्यासाठी मुलं त्याला मदत करतात. हा अनुभव मुलांना खूप काही शिकवून जातो. असं मानलं जाऊ लागलंय की, ‘मरुदम’ ही शाळा ग्रामीण भारतासाठी एक आदर्श नमुना आहे.

या सगळ्याचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण या मुलांमध्ये धीटपणा, उत्सुकता, मोकळेपणा, चांगुलपणाचं वलय जाणवतं. मुलामुलांत असणारे संबंध केवळ ‘एकत्र आलो आहोत तर राहू एकत्र,’ असे नाहीत, तर परस्परात नातं आहे. हे नातं समजूतदार आहे. इथे मुलांना असणाऱ्या ज्ञानात विविधता आहे. विशेष जाणवलं म्हणजे शाळानिर्मितीमागे दूरदृष्टी असणारी माणसं आहेत. इथल्या मुलांचं निसर्गाशी इतकं घट्ट नातं जोडलं गेलंय की, त्याची जाणीव, अभिमान नि आनंद मुलांत आहे. शाळा अगदीच तरुण आहे. कधी कधी भविष्याबद्दल काही प्रश्नही उभे राहतात, पण अशा वेळी शाळा पालक, पाहुणे, विचारी माणसं यांची मतंही विचारात घेते. मुलांना शाळेत सुरक्षितताही आहे नि निर्भयताही आहे.

निसर्गात, निसर्गाबरोबर नि निसर्गासाठी काम करणारी ‘मरुदम फार्म स्कूल’मधली मुलं आणि शिक्षक कसं काम करतात? याविषयी जाणून घेऊ या पुढच्या, ३० नोव्हेंबरच्या अंकात.

शाळेचा पत्ता : मरुदम फार्म स्कूल.

पूर्णिमा अक्का आणि अरुण अण्णा, लीला आणि गोविंदा / कनथंबपुडी गाव/ सथनुर डॅम रोड जवळ/ तिरुअन्नमलाई/ तमिळनाडू (६०६६०१).

ईमेल आयडी  – http://www.maruthamfarmschool.com

aruntree@gmail.com

renudandekar@gmail.com

chaturang@expressindia.com