‘‘प्रथम तुज पाहता’, ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘साद देती हिमशिखरे’, ‘गुंतता हृदय हे’ आणि ‘नको विसरू संकेत मीलनाचा’ एकापेक्षा एक गाणी.. गाणं माझ्या रक्तात, श्वासात, कणाकणात भिनलंय. आजही मी गाणं जपतोय. १९९६ मध्ये चेहऱ्यावरचा रंग उतरवलाय, पण मनातला नाटय़रंग ताजाच आहे. रोज दोन तास रियाज करतो. क्षणाक्षणात, रंध्रारंध्रात गाणं भरून राहिलंय. आज आयुष्याच्या या वळणावर पोहोचल्यावर जगलेल्या प्रत्येक वळणाकडे पाहताना मन कृतार्थ शुभ्रतेने भरून आलंय..’’

कोणतीही वाट ही वळणावळणाची असली की ती साजून दिसते. सगळ्यांच्याच जीवनाच्या वाटा वळणा-वळणांनी सजतात. माझ्याही छोटय़ाशा जीवनवाटेवर अनेक वळणं आली, त्यांनी माझं आयुष्य सजून गेलं. गेल्या ७८ वर्षांत काही वळणं अभावितपणे आली तर काहींना मी माझ्या वाटेकडे वळविण्याचा प्रयत्न केला. आज या निमित्ताने त्या वळणवाटांचा धांडोळा घेतोय..
लहानपणापासूनच मी रंगमंचावर गातोय. वयाच्या सातव्या वर्षी, गावातल्या एका हौशी नाटकात बाळराजांचा जिरेटोप घालून रंगमंचावर प्रवेश केला. तेव्हा जी रंगाची ओढ मनाला लागली ती आजही टिकून आहे. आता रंगमंचावर प्रत्यक्ष काम करत नाही मी, पण गाण्याच्या मफिली करतो, त्या वेळी माझ्या तोंडावर रंग नसतो, पण मन मात्र नाटकात रंगलेलं असतं. गाणं माझ्या रक्तातच आहे. माझी आई मथुरा ही नेवरेकरांची मुलगी व वडील शांताराम, हे त्यांचे भाचे! दोघंही सूरात गात असत. पण त्या काळातल्या बंधनांमुळे दोघांचंही औपचारिकरीत्या गाण्याचं शिक्षण झालं नव्हतं. आईचं स्वयंपाक करताना, पाटय़ावर बसल्यावर गाणं, स्तोत्र म्हणणं सुरू असायचं. आजही ‘तो’ सूर माझ्या कानात आहे. वडील दत्ताच्या पालखीत ‘पेणे’ म्हणायचे. ‘पेणे’ म्हणजे पालखीचे थांबणे. पालखी थांबल्या वेळी जी दत्तपदे गायली जायची त्यांनाही ‘पेणे’ म्हणत असत. वडील नाटय़पदे गायचे. दत्ताच्या पदांना नाटय़गीतांच्या चाली लावून गायचे. आम्ही पाच भावंडं, उपेंद्र, दुर्गा, जयश्री, गोकुळदास आणि मी. मी शेंडेफळ. घरात दारिद्रय़ंही मोठं होतं.  तरीही आम्ही आनंदी होतो, ओढाताण होती, परंतु सुख होतं. कारण आम्ही ‘गाण्यात’ होतो.
मला शिक्षणासाठी, आजोळी, पणजीत ठेवलं होतं. तिथल्या शाळेत शिकायचो. मोठा भाऊ उपेंद्र, भाई मुंबईत होता. तो नवरंग मास्तरांकडे गाणं शिकायचा. मला दुर्दैवाने त्यांची तालीम मिळाली नाही. पण भाई माझा गुरू झाला. आमच्या शाळेच्या  मास्तरांनी मी गातो हे पाहून एक कविता दिली व म्हणाले, ‘‘चाल बांध’’. ‘गाई घराकडे आल्या’, ही ती कविता. मी आठ वर्षांचा होतो. त्या कवितेत एक ओळ होती, ‘कोणीकडे साद घाली गोिवदा’ मी मास्तरांना ‘साद’ या शब्दाचा अर्थ विचारला व चालीमध्ये सादेचा प्रत्यय गोिवदा या शब्दाला देण्याचा प्रयत्न केला. चाल मला आपोआप सुचत गेली. तो क्षण आजही माझ्या ध्यानी आहे.
आम्ही पाचही भावंडं संगीताचे वेडे होतो. एकदा आमच्या गावात पूर आला, त्यात आमच्या गावचं वाचनालय वाहून गेलं. त्या वाचनालयाच्या मदतीसाठी ‘बेबंदशाही’ करायचं ठरलं. ते गद्य नाटक, परंतु, सखाराम बर्वे या पेटीमास्तरांनी काही पदं रचली, मी बाळराजाच्या भूमिकेत होतो. पहाटे दोन वाजता माझा प्रवेश होता. तोपर्यंत मी जागा होतो, व तलवारीवर हात ठेवून ऐटीत फिरत होतो. प्रवेश आल्यावर झोकात दोन गाणीही म्हटली. हे सारं तळकोकणात सुरू होतं. पुढे शिक्षणासाठी भाईजवळ मुंबईत आलो, विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे भारतीय विद्या भवनाच्या स्पध्रेसाठी नाटकाची तयारी सुरू होती. सुटाबुटातल्या बो लावलेल्या दाजी भाटवडेकरांनी निवड चाचणी घेतली. माझे उच्चार कोकणी पद्धतीचे, हेलवाले. त्यांनी मला नाकारलं. फार वाईट वाटलं. माझा एक कुळकर्णी नावाचा मित्र  होता. त्याचे मामा, प्रा. वा. ल. कुळकर्णी, हे मराठीचे प्राध्यापक होते. मी त्याला विचारले की, ‘ते मला त्यांच्या तासांना बसू देतील का, की त्यामुळे माझे मराठी व मराठी उच्चार सुधारतील.’ वा. ल. सरांनी माझी विनंती मोठय़ा उदार अंत:करणाने मान्य केली. पुढचं वर्षभर मी भाईकडे गाणं आणि वा. लं.कडे मराठी शिकत होतो. काळाच्या ओघात, तीस वर्षांनी एकदा औरंगाबादला ‘धन्य ते गायनी कळा’चा प्रयोग होता. पहिला प्रवेश झाल्यावर काही मंडळी आत भेटायला आली, त्यात वा. ल. कुलकर्णी सर होते. मी पुढे होऊन खाली वाकून नमस्कार केला. ते एकदम वळले व निघून गेले. दुसरा प्रवेश झाल्यावर ते परत आले. त्या वेळी मी त्यांना म्हटलं, ‘‘सर, मला ओळखलं का? माझं मराठी सुधारण्यासाठी मी तुमची व्याख्यानं ऐकायचो.’’ मध्ये तीन दशकं लोटली होती. सर म्हणाले, ‘‘तुम्हाला आशीर्वाद द्यायलाच आलो.’’ दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं.
नंतरच्या वर्षी, विल्सनने आचार्य अत्र्यांचं ‘मी उभा आहे’ हे नाटक स्पध्रेसाठी निवडलं. मधू वगळ आमचे दिग्दर्शक होते. माझी निवड झाली. भाईनं गाणी शिकवली. मी गायलोही दणक्यात. पण प्रेक्षकवर्ग गुजराती होता. त्यांनी आरडा ओरडा केला. पण शिक्षकांनी आमची समजूत काढली. नायिका माझ्यापेक्षा दीड इंच उंच होती. प्रेमाचे संवादही मी तिच्यापासून दूर उभा राहून म्हटल्याचं आठवतय.
१९५३ मध्ये मी अकाऊंटंट जनरलच्या कार्यालयात नोकरीला लागलो. तिथेच चौथ्या मजल्यावर ऑल इंडिया रेडिओचं कार्यालय होतं. कलावंतांची मांदियाळीच. बा. सी. मर्ढेकर, मंगेश पाडगावकर, राजा बढे, यशवंत देव असे सारे! तिथे माझी ये-जा असायची. बढय़ांना माझं गाणं आवडायचं. एका महिन्यात त्यांनी मला पाच काँट्रॅक्ट्स दिली होती. आमच्या ए. जी.च्या कार्यालयातल्या सांगीतिक उपक्रमांमध्ये मी भाग घ्यायचो. १९५६ मध्ये धी गोवा िहदू असोसिएशनने ‘सं. संशयकल्लोळ’ करायचं ठरवलं व मला बोलावलं. मला वाटलं,अश्विनशेठची भूमिका करायची. पण दिग्दर्शक गोपीनाथ सावकारांनी साधूच्या भूमिकेसाठी विचारलं. मी हिरमुसलो. ‘उद्या सांगतो,’ असं म्हणून परतलो. भाई म्हणाला, ‘‘भूमिका छोटी की मोठी याला महत्त्व नाही. तू ती कशी करतोस हे महत्त्वाचं.’’ दिग्दर्शकांनी मला तीन मिनिटे गायची अट घातली. मी प्राथमिक फेरीत असा दणकून गायलो, की त्यांनी अंतिम फेरीत अश्विनशेटचा वेळ कमी करून मला पाच मिनिटे गायला सांगितले. १९५८ साली धी गोवा िहदू असोसिएशनने ‘सं. शारदा’ केलं. त्यात मला कोदंडाची भूमिका दिली. रघुवीर नेवरेकर फाल्गुनराव व आशालता वाबगावकर शारदा! या भूमिकेकरिता मला संगीतासाठीचं पारितोषिक मिळालं. यापूर्वी असं कोणतंही पारितोषिक संगीतासाठी नव्हतं, पण माझं नाव खास सुचविण्यात आलं. तेव्हापासून ते पारितोषिक सुरू झालं.
१९६४ मध्ये ‘मत्स्यगंधा’ आलं. मराठीच नव्हे तर भारतीय संगीत नाटकातील तो अद्भुत प्रयोग होता. पं. जितेंद्र अभिषेकीबुवांच्या सांगीतिक प्रतिभेचा तो नावीन्यपूर्ण आविष्कार होता. पहिले ३८ प्रयोग हे नाटक चाललंच नाही. असोसिएशननं ते नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यानच्या काळात, मी एअर इंडियात रुजू झालो होतो. आमचं कार्यालय तेव्हा ‘बँक ऑफ इंडिया’च्या इमारतीत होतं. जवळच एच्. एम्. व्ही.ची इमारत होती. खालच्या मजल्यावर मला ओळखणारे रोहिदास पैंगणकर बसायचे. त्यांना माझं गायन आवडायचं. मला म्हणाले, तू चांगलं गातोस. मी लगेच म्हणालो, ‘‘मग माझी रेकॉर्ड काढा.’’  ते, ‘‘बघू’’ म्हणाले. मग काय, रोज माझ्या रस्त्याचं वळण  एच्. एम्. व्ही.वरून जाऊ लागलं. एक दिवस त्यांनी मला ट्रायल द्यायला बोलावलं. वसंतराव कामेरकर होते, रेकॉìडगला माडगावकर होते, आणखीही काही होते.काही दिवस गेले. पैंगणकरांनी पुन्हा बोलावलं व गाण्याची उभं राहून ट्रायल द्यायला सांगितली. तीही दिली. परत एकदा पैंगणकरांनी संवाद म्हणून ट्रायल द्यायला सांगितली. तीसुद्धा देऊन झाली. काही दिवस गेले. पैंगणकरांनी परत एकदा ‘ट्रायल देशील का?’ म्हणून विचारले. मग मात्र मी चक्क नकार दिला. एच्. एम्. व्ही.कडं बघायचंही मी सोडलं, अन् एक दिवस पैंगणकरांनी हाक मारली व सांगितलं की, ‘‘तुझी रेकॉर्ड काढायची आहे.’’ मी आनंदलो. अभिषेकी बुवांना सांगितलं, धी गोवा िहदू असोसिएशनला सांगितलं. सुरेख रेकॉìडग झालं. पेटीवर कल्याणचे वझेबुवा होते, तबल्यावर शशिकांत (नाना) मुळे आणि ऑर्गनवर प्रभाकर पेडणेकर! दुसराच टेक पसंत पडला. बुवांना मात्र तो आवडला नव्हता. माडगावकरांनी मात्र, ‘‘हा टेक सुंदर झालाय, तोच ठेवू या,’’ असं सांगितलं. त्या एका दिवसात ‘देवाघरचे ज्ञात कुणाला’, ‘साद देती हिमशिखरे’, ‘गुंतता हृदय हे’ आणि ‘नको विसरू संकेत मीलनाचा’ अशी चार पदं रेकॉर्ड झाली. एक दिवस पैंगणकरांनी हाक मारली आणि माझ्या हातात रेकॉर्ड ठेवली. खूश होऊन, ती रेकॉर्ड घेऊन मी धावत ऑल इंडिया रेडिओवर गेलो. तिथे लायब्ररीत शरद जांभेकर होता. माझा छान मित्र. त्याच्या हातात ती ठेवली. त्या काळात रेडिओवर गाणं गाजलं की बस! शरदनं तीन दिवसांत ती चारही गाणी महिला मंडळ, कामगार सभा आदी लोकप्रिय कार्यक्रमांत वाजवून दणाणून सोडली. हा घटनाक्रम ऑक्टोबरदरम्यानचा. असोसिएशनने ‘मत्स्यगंधा’ बंद करण्याचं ठरवलं होतं आणि ३९ व्या प्रयोगाला नाटकानं रेडिओवरच्या प्रसिद्धीमुळे उसळी घेतली. ती कायम टिकली.
ही गाणी ऐकून वीणा चिटकोंनी मला बोलावलं. त्या मास्तर कृष्णरावांच्या कन्या, अत्यंत प्रतिभाशाली संगीतकार, पण त्यांच्याकडे एक स्त्री म्हणून समाजानं दुर्लक्ष केलं. त्यांना माझ्याकडून भावगीतं हवी होती. मी तर नाटय़संगीत गाणारा, पण त्या म्हणाल्या, ‘‘आवाज थोडा मृदू करून गा.’’ त्यांच्याकडे ‘मयूरा रे’, ‘पूर्वेच्या देवा’सारखी भावगीतं गायलो. तोवर यशवंत देवांनी बोलावलं. म्हणाले, ‘‘अभंग करू या.’’ त्यातून ‘निर्गुणाचे भेटी’सारखे अभंग जन्मले. एच्. एम्. व्ही.चं खुलं निमंत्रण होतं. एका पाठोपाठ एक रेकॉर्ड आल्या, पण पाय जमिनीवर ठेवले.
एक दिवस बाबूजींचा- सुधीर फडके यांचा फोन आला. तो शुक्रवार होता. मला म्हणाले, ‘‘रामदास, एक गाणं गायचंय. रविवारी रेकॉìडग आहे.’’  मी हादरलो. कारण शनिवारी मी बार्शीला कार्यक्रम घेतला होता. त्यात बाबूजींची गाणी गाण्याचा माझा स्वर नव्हता. ते म्हणाले, ‘‘मी नाटय़गीतासारखंच बांधलंय व तुम्हीच गायचंय.’’ आता काय करणार? मी निमूटपणे त्यांच्या घरी शुक्रवारी संध्याकाळी तालमीला गेलो. रात्री तेथूनच सोलापूरची गाडी पकडली. टॅक्सी करून बार्शीला गेलो. दणकून गाणं झालं. बारा वाजता कार्यक्रम संपवला. कसाबसा मी सोलापूरला रात्री अडीच वाजताची गाडी पकडू शकलो. त्यात रात्रभर पुण्यापर्यंत उभ्याने प्रवास केला. दुपारी मुंबईत पोहोचलो. सरळ बॉम्बे स्टुडिओत रेकॉìडगला गेलो. एवढय़ा सगळ्या धावपळीनंतर आवाज लागेना, बेसुरा व्हायला लागलो. बाबूजी सौजन्यमूर्ती. पं. रामनारायण सारंगीला व वसंतराव आचरेकर तबल्याला होते. बाबूजी त्यांनाच ओरडू लागले, ‘‘अहो, सारंगी नीट लावा, तबला सुरात घ्या’’ वगरे. मला म्हणाले, ‘‘रामदास, आवाज मोकळा सोडून गा, आरडा ओरडा करा जरा.’’ आणि कसंबसं रेकॉìडग झालं. आजही ‘‘प्रथम तुज पाहता’’ ऐकताना त्यातील त्रुटी मला जाणवतात. पण गंमत म्हणजे या गाण्याला खूप लोकप्रियता मिळाली. मी चित्रपटासाठी फारसा गायलो नाही. कारण तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता. नोकरी सांभाळून हे सारे करायचे होते.
एअर इंडियातली नोकरी मोठी होती. मी गाणं आणि नोकरी यांत अंतर ठेवलं. नोकरीवर मी नाटक, गाणं बाजूला ठेवायचो. नाटक हा माझा धर्म होता व नाटकात काम करणं हे माझं व्रत होतं. हे व्रत सांभाळताना माझ्या आईचा मृत्यू झाल्यानंतरच्या तिसऱ्या दिवशी मला प्रयोग करावा लागला होता. ‘मीरा-मधुरा’ नाटकाचे शुभारंभाचे तीन प्रयोग लागले होते. पहिले दोन प्रयोग एकाच दिवशी पाठोपाठ होते. पहिल्या प्रयोगाच्या वेळी वडील आजारी पडले. दोन प्रयोग झाल्यावर त्यांना बघायला गेलो. पण दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. जून २०१४ च्या ‘मत्स्यगंधा’च्या महोत्सवी कार्यक्रमाच्या वेळी मी स्वत:च आजारी होतो, रुग्णालयातून थेट रंगमंचावर गेलो. अहो, रंगमंच ही साधना आहे आणि ते साध्यही आहे. कलाकारानं साधनेसाठी वेळ मिळत नाही असं म्हणून चालणारच नाही.
‘धन्य ते गायनी कळा’च्या वेळी दिवसभर नोकरी करून झाल्यावर मी डेक्कन क्विनने पुण्याला पं. भीमसेन जोशींकडे तालमीला जायचो, साडेआठला त्यांच्याकडे पोचायचो, बुवा वाट पाहत असायचे, तालमीच्या वेळी चिवडय़ाची ताटं भरलेली असायची. रात्री बारा वाजता बुवांच्या घरून स्टेशनवर यायचं, मिळेल त्या गाडीनं मुंबई गाठायची, तासभर विश्रांती घेऊन पुन्हा कामावर जायचं. त्यात खंड पडला  नाही. १९७७ ते १९८० मी दुबईत बदलून गेलो होतो. लोक मला विसरले असतील असं मला वाटत होतं. पण आल्या आल्या दाजींनी मला ‘होनाजी-बाळा’ करायला बोलावलं. सुरेश हळदणकरांनी गाजवलेली भूमिका करायची होती, ‘श्रीरंगा कमलाकांता’सारखी गाणी गायची होती. मी अण्णा पेंढारकरांना विचारलं, ‘‘ही भूमिका मी कशी करू?’’ अण्णा म्हणाले, ‘‘सुरेश यांच्यासारख्या ताना न मारता तू भाव लक्षात ठेवून गा.’’ मी तसंच केलं. ती भूमिका व पुनरागमन गाजलं.
माझं आवडतं नाटक म्हणजे ‘ययाति-देवयानी.’ काय जबरदस्त भाषा आहे शिरवाडकरांची! अभिषेकीबुवांनी सुंदर चाली दिल्या आहेत. ते बायजीकडे राहायचे. बायजी म्हणजे केसरबाई. मी व बुवा वयाने बरोबरीचे. गायक म्हणून ते खूप मोठे. ते खूप कमी बोलायचे. मी त्यांना ‘अहो, जाहो’ करायचो व ते मला, ‘अरे, तुरे’. जिव्हाळा होता आमच्यात. त्यांनी ‘ययाति-देवयानी’मधलं ‘प्रेमवरदान’ बांधलं. सुंदर चाल होती. पण मी गप्प राहिलो.
‘‘अरे बोल की रे,’’ बुवा म्हणाले.
मी धीर करून बोललो, ‘‘बुवा चाल बदलायला लागेल.’’ ‘‘का? ‘‘ ते गुरगुरले.
‘‘प्रसंगाला जुळत नाही.’’ ते भडकलेच. मला हाकलून दिले नाही एवढेच. थोडय़ा वेळाने ते शांतावले. ‘‘का रे, असं का म्हणतोस?’’
मी तुम्हाला संवाद म्हणून दाखवतो. मग मी घरी परतलो.  दुसऱ्या दिवशी तालमीच्या ठिकाणी साक्षात बुवा हजर. मला दिग्दर्शक सावकार म्हणाले, ‘‘प्रवेश बोलून दाखव.’’
बुवांनी चाल ऐकवली व म्हणाले, ‘‘मी चाल नाही, ताल बदललाय.’’ त्यांनी त्रितालाऐवजी झपताल वापरला होता. प्रसंगानुरूप चाल बनली होती. मी स्वत:ला फार जाणता समजत नाही. पण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. ते माझ्यात उपजतच आहे. भाई, गोपीनाथ सावकार, पं. अभिषेकीबुवांनी त्याला पलू पाडले. अभिषेकीबुवांनी नाटय़संगीताचा ढाचा बदलला. त्या बदलातील मी एक पाईक होतो. त्यांनी नाटय़संगीताला सामान्य रसिकाच्या अधिक जवळ नेले. त्यातला साचलेपणा दूर केला. त्यांनी थोडासा बदल केला, पण तो सार्वकालिक ठरला. अभिषेकीबुवांनी नाटय़गीतांना शास्त्रीय संगीताची डूब तर दिलीच, पण नाटय़पदे गुणगुणण्यायोग्य केली. मीही माझ्या वकुबाप्रमाणे हे बदल आत्मसात केले, माझ्यात मुरवून घेतले व रसिकांपर्यंत पोहोचवले. माझ्या गाण्यावर छोटा गंधर्वाचाही प्रभाव आहे. मी त्यांच्याप्रमाणेच एक ओळ वेगवेगळ्या पद्धतींनी गाण्याचा प्रयत्न करतो.
गाणं माझ्या रक्तात, श्वासात, कणाकणात भिनलंय. या गाण्याच्या प्रवासात, वयाच्या तिशीपासून आत्ता-आत्तापर्यंत माझी पत्नी वसुधा सोबत होती. लग्नाच्या ४८ वर्षांनंतर एका वळणावर मला ती सोडून गेली. माझा मुलगा, डॉ. कौस्तुभ पेडिअ‍ॅट्रिक सर्जन आहे, तर सूनबाई डॉ. संध्या     के. ई. एम्.मध्ये फार्माकॉलॉजीची प्राध्यापक आहे. नातू, अनिकेत, लॉस एंजल्सला शिकतोय.
आजही मी गाणं जपतोय. १९९६ मध्ये चेहऱ्यावरचा रंग उतरवलाय, पण मनातला नाटय़रंग ताजाच आहे. संध्याकाळी फिरायला जातो, आल्यावर दोन तास रियाज करतो. खाण्याची बंधने नाहीत. क्षणाक्षणात, रंध्रारंध्रात गाणं भरून राहिलंय. आज आयुष्याच्या या वळणावर पोहोचल्यावर जगलेल्या प्रत्येक वळणाकडे पाहताना मन कृतार्थ शुभ्रतेने भरून आलंय.    
रामदास कामत
शब्दांकन -प्रा. नीतिन आरेकर -nitinarekar@yahoo.co.in

ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
leopard and deer Viral Video
‘नशीब प्रत्येक वेळी साथ देत नाही…’ हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्या वेगाने धावला; पण पुढे जे घडलं… VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…
comet Temple Tuttle, meteor shower, sky
आकाशात उल्‍कावर्षावाचे मनोहारी दृश्‍य; सज्‍ज व्‍हा…
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला