ठरवून केलेल्या लग्नातील जोडीदाराची निवड योग्य ठरेल का, ही धाकधूक असते. तीच धाकधूक प्रेमात आकंठ बुडून नंतर एकमेकांतल्या खटकणाऱ्या गोष्टी जाणवू लागलेल्यांच्याही मनात असते. ‘लग्न हा एक जुगार!’ वगैरे मतं आजूबाजूची मंडळी व्यक्त करताना लग्न करू इच्छिणाऱ्यांनी जोडीदारात नेमकं काय शोधावं?… काय पाहिलं म्हणजे लग्न टिकण्याची हमखास खात्री मिळेल?… की लग्न हे ‘फायनल डेस्टिनेशन’ नसून केवळ एक पडाव आहे?…
‘दीपा, आठवडाभरासाठी घरी आलेय मी. तुझ्याशी सीरियसली काही बोलायचंय, कधी भेटतेस?’ आभाच्या मेसेजचं दीपिकाला नवल वाटलं.
पूर्वी एकाच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या या दोघी जुन्या मैत्रिणी. आठवीत असताना वर्गातल्या अथर्वबरोबर झालेल्या आभाच्या कोवळ्या प्रेमप्रकरणापासून कॉलेजमधल्या एका रिलेशनशिप आणि ब्रेकअपपर्यंतची दीपिका साक्षीदार होती. नंतर आभाच्या घरच्यांच्या ‘लग्न कर’च्या आग्रहाला आभानं ‘प्लीज घाई नको… आधी करिअर,’ म्हणत निग्रहानं थांबवलेलंही तिला माहीत होतं. आता आभाचं ऑफिस बंगळूरुला होतं, पण तिच्या देशभरच्या फिरतीमधला एखादा स्टॉप घरी असायचाच.
हेही वाचा…भरकटलेली ‘लेकरे’?
दीपिकाची कहाणी थोडी वेगळी होती. समोरच्या गल्लीतला राकेश अकरावीपासून तिच्या मागे होता. खूप गोड वागायचा. तिनं होकार दिल्यानंतर मात्र त्याची दादागिरी वाढत गेली. ती इतर मुलांशी बोलली की संशय, शक्यतो सगळीकडे सोबत जाणं, तिनं कुठले कपडे घालायचे, इथपासून त्याचा पहारा असे. त्यावरून भांडणं व्हायचीच, पण त्यांच्या अगणित भांडणांना दीपिकाचंच ‘चुकीचं वागणं’ कारणीभूत आहे, हे तो वारंवार बिंबवायचा. कधी कधी हातही उचलायचा. त्यातून तिचा आत्मविश्वास संपला होता. भोळी, प्रामाणिक दीपिका सगळं सहन करायची. तेव्हा तिला समजावून आभा थकली होती. त्यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहीत झाल्यामुळेही असेल, पण प्रेमापेक्षा भीतीमुळेच दीपिका राकेशबरोबर होती. त्यांच्यातल्या एका भांडणानंतर, सोसायटीच्या गच्चीच्या कोपऱ्यात हमसून हमसून रडणाऱ्या दीपिकाला अनुपनं पाहिलं. त्यांची तोंडओळख होती. त्यानं न राहवून तिची चौकशी केली. त्या हळव्या क्षणाला दीपिकानं राकेशचं वागणं, त्याच्याबरोबर पटणार नाही हे कळूनही शब्द मोडता येत नाहीये… सर्व काही भडाभडा सांगितलं. तिच्या मनावरचा प्रचंड ताण पाहून अनुपनं तिला समुपदेशन घेण्याविषयी सुचवलं. समुपदेशकाशी बोलल्यानंतर दीपिकाला राकेशच्या वागण्यातला दुटप्पीपणा लक्षात आला. ‘प्रेम म्हणजे अधिकार आणि संशय नव्हे, तर सन्मान आणि विश्वास,’ हे स्पष्ट झाल्यानंतर राकेशबद्दलच्या विचारांच्या घोळातून ती बाहेर आली. पण या सगळ्या काळात तिची अनुपशी मैत्री वाढली. यथावकाश दोघांनी प्रेमात पडून लग्न केलं.
‘‘इतकं काय बोलायचंय गं?’’ आभा भेटल्यावर दीपिकानं विचारलं.
‘‘तुझा सल्ला हवाय. आता लग्न करण्याचा विचार करतेय.’’
‘‘मस्तच. कोण आहे तो? कुठे भेटला?’’ दीपिकानं उत्सुकतेनं विचारलं.
‘‘अजून कोणी भेटला नाहीये, म्हणून तर तुझ्याशी बोलायचंय. तेव्हा माझी लग्नाची तयारी नव्हती. शिवाय स्वकमाईचे पैसे, आवडीचं काम, निर्णयाचं स्वातंत्र्य आणि भरपूर फिरणं अनुभवायचं होतं. आई-बाबा बऱ्यापैकी पुढारलेले असले, तरी त्यांना समाजाची भीती होतीच. पण माझ्या नोकरीमुळे मी स्वातंत्र्य घेऊ शकले. कामानिमित्तानं फिरणं, अनेक ओळखी झाल्या. काही मुलांना डेटही केलं, काहींशी छान मैत्री झाली. ओळख वाढल्यावर काही मुलं बालिश, बोअरिंग वाटली, तर काही स्वत:भोवतीच फिरणारी, पुरुषी अहंकारवाली वाटली. शिवाय लग्न झालेल्या मित्रमंडळींच्या एकेक तऱ्हा पाहिल्या. थोडक्यात, नात्यांबाबत बरीच मुशाफिरी केली! नोकरी आवडते आहे, भटकंती झालीय, आता सुखदु:ख शेअर करणारा जोडीदार हवा आहे. त्यामुळे कुठे तरी नाव नोंदवावं म्हणतेय…’’ आभानं स्पष्ट केलं.
हेही वाचा…माझी मैत्रीण: ‘या, स्वागत हैं, वेलकम!’
‘‘मग तुला माझा सल्ला नेमका कशासाठी हवाय?’’ दीपिकाला काही कळेना.
‘‘निर्णय घ्यायची वेळ आली की असंख्य प्रश्नांमध्ये मी गरगरते, गोंधळते. तू आणि अनुप मला ‘आदर्श जोडी’ वाटता. लग्न करताना तुम्ही एकमेकांमधलं काय बघितलंत? काय आवडलं? ते सांग ना मला…’’
‘‘जोडीदार आवडण्याची कारणं तशी वैयक्तिकच असतात गं. पण आता दीर्घकाळच्या सहवासानंतर आमच्या नात्यातलं छान काय आहे आणि कुठे संवाद करून जुळवून घेतलं ते सांगू शकते.’’ दीपिका म्हणाली.
‘‘पाहताक्षणी प्रेम, कानात घंटांची किणकिण असं काही झालं?…’’ आभानं उत्सुकतेनं विचारलं.
‘‘नाही गं! असलं सगळं सिनेमात घडतं. प्रत्यक्षात एखाद्या जोडप्याचं तसं होत असेलही. पण तुला शाळेतला गोंडस अथर्व किंवा मला आधी देखणा राकेश आवडला होता- ते आकर्षणापोटीच ‘घडून गेलं’ नव्हतं का? आता समंजसपणे ‘निवड’ करताना जोडीदाराकडून आपल्या नेमक्या अपेक्षा काय आहेत? त्यातल्या ‘अनिवार्य अपेक्षा’ कोणत्या आणि ‘तडजोड होण्यासारख्या’ कोणत्या? हे प्रश्न महत्त्वाचे.’’ यावर आभा विचारात पडली.
‘‘राकेशबरोबर असताना माझ्या प्रेमाबद्दलच्या कल्पना बालिश आणि माझ्याच बांधिलकीशी जोडलेल्या होत्या. आता माहितेय, की लग्नासाठी दोन्ही बाजूंनी बांधिलकी हवी. परस्परांचा सन्मान आणि विश्वास हवा. विश्वासामुळे अनुपबरोबर मला सुरक्षित वाटतं. राकेशबरोबर बहुतेकदा दडपणच असायचं. समुपदेशनामुळे समजलं, की कुठल्याही माणसाच्या बोलण्यापेक्षा त्याची कृती, वागणं महत्त्वाचं. अनुप बोलतो तसा वागतो का? हा प्रश्न घेऊन मी डेटा तपासला. उत्तर ‘हो’ आलं. ‘हेल्दी’ नात्यासाठी या गोष्टी मला अनिवार्य वाटतात.’’
‘‘अगदी नेमक्या शब्दांत मांडलंस तू!’’ आभाला पटलंच.
‘‘एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी संवाद हवाच. पण एकमेकांच्या मते प्रेम म्हणजे काय? समजून घ्यावं म्हणजे जोडीदारानं नेमकं काय करायचं? हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. त्याबद्दल एकमेकांशी बोलायला हवं.’’
‘‘समजून घेणं म्हणजे काय? हा विचार हवाच. प्रेमाच्या माणसानं कायम आपल्या मनातलं ओळखावं, असं बऱ्याचदा गृहीत धरलं जातं नाही का?’’ आभा म्हणाली.
‘‘हो ना, तिथेच तर गडबड होते! आपण सांगितल्याशिवाय कोणताही माणूस आपल्या मनात काय चाललंय ते कसं काय ओळखणार? पण बहुतेकदा दोघांचीही तशीच अपेक्षा असते. भरपूर सिनेमे पाहिल्याचा परिणाम! आणि हो, सोशल मीडियावरच्या पोस्ट बघून आपल्या अपेक्षा ठरत असतील, त्या रोज बदलणार असतील, मग ‘कमिटमेंट इश्यू’ होणारच.’’ यावर एकमेकींना टाळी देत दोघी हसल्या.
हेही वाचा…जिंकावे नि जागावेही: ‘सजग’ जगण्यासाठी आहार!
‘‘आभा, हातातला मोकळा वेळ दोघांना कशा पद्धतीनं घालवायला आवडतो? हा प्रश्नही महत्त्वाचा असतो. म्हणजे समज, मला रविवारी ट्रेकिंगला जायला आवडतं आणि अनुपला घरातच बसायचंय, तर? दर रविवारी जोडीदाराकडून अपेक्षाभंग झाल्यावर वाद, नाराजी होणारच. आधीच आपल्याकडे रोजचे काही तास आणि शनिवार-रविवार एवढाच वेळ असतो. त्यात खरेदी, नातेवाईक- मित्रमैत्रिणी यांच्या भेटीगाठी, मुलांचा अभ्यास, प्रपंच, आपले छंद, या सगळ्यांमध्ये ‘फक्त एकमेकांसाठी’ काही तासच उरतात. तेही असे गेले तर ‘सोबत’ निरर्थक वाटते. म्हणून त्याबद्दल जाणीवपूर्वक बोलून तिढा सोडवायला हवा.’’
‘‘खरंय. आणखी काही?’’
‘‘माझं आणि अनुपचं काही अनिवार्य बाबतींत- म्हणजे एकमेकांचे स्वभाव, विश्वास, सन्मान, बांधिलकी इथे तर जुळलं, तरीही भांडणं व्हायची. शेवटी आम्ही समुपदेशकाला भेटलो. त्यांनी आम्हाला दोघांना एक प्रश्नावली सोडवायला दिली. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला १ ते ५ ची श्रेणी होती. उदा. समज, माझ्या जोडीदाराची देवावर श्रद्धा असलीच पाहिजे, असा एक प्रश्न आहे. त्याबरोबर १. अत्यावश्यक, २. थोडं आवश्यक, ३ कसंही, ४ आवश्यक नाही, ५. मुळीच आवश्यक नाही. असे उत्तराचे पर्याय असायचे. माझं उत्तर जर ‘अत्यावश्यक’ असेल आणि अनुपचं ‘मुळीच आवश्यक नाही’ असं असेल, तर याचा अर्थ, आमचे या विषयावर टोकाचे मतभेद होणार. मग तिथे किती तडजोड शक्य आहे, याबद्दल आम्ही चर्चेतून मधले मार्ग शोधले.’’
‘‘असे तडजोडवाले विषय साधारण काय होते?’’ आभानं उत्सुकतेनं विचारलं.
‘‘एकमेकांबद्दलच्या अपेक्षा, संसारातलं आर्थिक नियोजन, देशात/ परदेशात करिअर, जबाबदाऱ्यांची वाटणी, मुलं हवीत की नकोत? असल्यास कधी? एकत्र हवं की विभक्त कुटुंब हवं? जवळच्या नातलगांचा प्रभाव, पूर्वायुष्याबद्दल एकमेकांना किती आणि कधी सांगायचं? देव, धर्म, श्रद्धा, स्मोकिंग-ड्रिंकिंग… अशा अनेक विषयांवरचे प्रश्न होते त्यात. या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी नंतर कायमचे वादाचे मुद्दे बनतात. आम्ही यातल्या अनेक गोष्टींवर विचारच केला नव्हता. उत्तरं देताना आम्हाला स्वत:चे विचार स्पष्ट झाले आणि एकमेकांच्या स्वभावाची समज वाढली, मतभेद कमी झाले.’’
‘‘प्रेमविवाहातसुद्धा अशा गोष्टींमुळे बिनसतं?’’
‘‘हो! चांगलं ‘बाँडिंग’ असूनही आमचं तेच होत होतं. ठरवून केलेल्या लग्नात तर बाँडिंग थांबतं, दुरावाच वाढतो. म्हणून अशा मुद्द्यांवर जोडीदाराची मतं आधीच समजून घेऊन संवादातून तडजोड, मध्यममार्ग ठरवावा. काही विषय ‘अनिवार्य’मध्ये जात असतील, ‘डील ब्रेकर’ ठरत असतील, तर वेळीच माघार घेणं योग्य.’’
‘‘खरंय! पण ‘हीच ती व्यक्ती’ हे कसं ओळखायचं? चुकलं तर?’’
हेही वाचा…भय भूती: भीती नकोशी… हवीशी!
‘‘तो विश्वास प्रत्येकाला आतून, आपापलाच यावा लागतो. मी काय केलं ते सांगते. अनुपच्या प्रेमात होते, तरीही राकेशबरोबरचे आधीचे चांगले क्षण मला मधूनच आठवायचे. चलबिचल संपेना. एकदा, हे दोघंही मला कायमचे सोडून जातायत अशी कल्पना करून त्यांना पाठमोरं डोळ्यांसमोर आणलं. राकेशला निघून जाताना पाहून मला सुटल्यासारखं वाटलं. अनुपला जाताना पाहून मात्र मनात विलक्षण कळ उठली. निर्णय झाला तिथेच!’’
‘‘हे छान आहे,’’ आभा म्हणाली.
‘‘आभा, तरीही आजचा योग्य निर्णय उद्या चुकीचाही वाटू शकतो बरं का! तार्किकदृष्ट्या दोन्हीचीही शक्यता पन्नास टक्के असतेच. लग्न हा शेवटचा पडाव- ‘फायनल डेस्टिनेशन’ असेलच असं न मानता, एक टप्पा म्हणून बघितलं तर सोपं जाईल. शेवटी पुढे जाऊन नातं फुलेल, संपेल की साकळून बसेल, ते तुम्ही किती प्रगल्भ आणि लवचीक आहात यावर अवलंबून असतं. पण परिस्थिती हा महत्त्वाचा घटक कुणाच्याच हातातला नसतो. त्यामुळे ‘गॅरेंटी’ कोणीच देऊ शकत नाही.’’
हेही वाचा…पडसाद: पालकांसाठी योग्य लेख
‘‘खरंय. गॅरेंटी अपेक्षितही नाही. पण अनिवार्य आणि तडजोड करण्यासारखे मुद्दे लक्षात घेतले आणि ‘डेटा’ पाहून निर्णय घेतला तर चुकण्याची शक्यता कमी होते. दीपा, मला नवे ‘लॉजिकल’ प्रश्न देऊन एक प्रक्रिया सुरू केलीस. निदान आता माझं तिथल्या तिथे गोलगोल फिरणं थांबेल. आता ‘लवकरच तुझा राजकुमार मिळेल’ अशा शुभेच्छा दे फक्त!’’ आभा हसत म्हणाली.
neelima.kirane1@gmail.com
© The Indian Express (P) Ltd