तृप्ती चावरे तिजारे

निसर्गातल्या चांगल्या, वाईट प्रत्येक ध्वनीचा आपल्या श्रवणआरोग्यावर परिणाम होत असतो. श्रवणाचा आणि मनाचा अतूट संबंध असल्यामुळे चुकीच्या ध्वनींमुळे मनावर ताण येतो, विचारांचा वेग वाढतो. मात्र आता सततच्या गदारोळ, गोंगाटाला आपले कानही सरावले आहेत. कर्णकर्कश्श, ध्वनी सतत कानांवर पडत असतात. यामुळे निद्रानाश आणि चिडचिडेपणा यासारखे विकार वाढत आहेत. ध्वनीच्या अनियंत्रित श्रवणामुळे अशांत झालेलं मन शांत करण्यासाठी श्रवण चाचणी करणं आवश्यक असतं, कानांना विश्रांती मिळण्यासाठी कोणते सोपे उपाय करायला हवेत?

मानवाचे अति-संवेदनशील ज्ञानेंद्रिय म्हणजे कान. कानांवर सातत्यानं पडणारे बरे-वाईट ध्वनी हे मनावर, मेंदूवर आणि संपूर्ण शरीरावर कळत-नकळतपणे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम करीत असतात. या परिणामांना सामोरं कसं जावं याचा विचार करण्यासाठी आजकालच्या वातावरणात ‘श्रवणआरोग्या’चा स्वतंत्र विचार करणं आवश्यक झालं आहे.

श्रवणआरोग्यावर चांगला किंवा वाईट परिणाम करणारा घटक म्हणजे ध्वनी. काही ध्वनी मनाला आल्हाददायक वाटतात तर काही असह्य वाटतात. मनाच्या या ‘वाटण्या’तूनच श्रवणाचा आणि मनाचा अतूट संबंध लक्षात येतो. सुसह्य किंवा असह्य यापैकी कोणता ध्वनी हा कसा व कुठून ऐकू येईल हे बऱ्याचदा आपल्या हातात नसतं. हवाहवासा वाटणारा ध्वनी शुद्ध स्वरूपात आत घेण्यासाठी, नकोनकोसा वाटणारा ध्वनी गाळणारी एखादी गाळणी असती तर! कानांवर पडेल तो ध्वनी आपली आवडनिवड बाजूला ठेवून आपल्याला ऐकावाच लागतो हे वास्तव आहे.

ऐकू येणारा प्रत्येक ध्वनी हा आपल्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेच्या विविध स्तरांवरही परिणाम करीत असतो. म्हणून ‘ध्वनींचा अर्थ लागणे’ ही प्रक्रिया घडून येण्याआधी, तो योग्य पद्धतीनं ‘ऐकणं’ आणि अयोग्य ध्वनी शक्य तितका टाळणं हे महत्त्वाचं आहे. कॉम्प्युटरच्या भाषेत बोलायचं झालं तर कान हे आपल्या मनाचा ‘इनपुट डिव्हाइस’ म्हणून सतत कार्यरत असतात. या इनपुट डिव्हाइसमधून आत शिरणाऱ्या ध्वनींचा अर्थ लावण्याची प्रक्रिया ही ‘प्रोसेसिंग’चे काम करीत असते तर त्याला प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देणारी प्रक्रिया ही ‘आऊटपुट डिव्हाइस’सारखे काम करीत असते. या सगळ्या प्रक्रियेत स्मरणशक्ती ही कॉम्प्युटरच्या ‘मेमरी प्रोसेस’प्रमाणे अविरत काम करीत असते. इनपुट डिव्हाइस सदोष असेल, प्रोसेसरवर ताण आला किंवा मेमरी डिव्हाइसचा वरील गोष्टींशी समन्वय विस्कळीत झाला की कॉम्प्युटर हँग होतो. तो कॉम्प्युटर असल्यामुळे त्याच्यावर लोड येऊन तो हँग झाल्याचं आपल्याला कळतं, किंवा तसे सिग्नल्स मिळतात. पण गोंगाटाच्या कचाट्यात सापडलेल्या कानांमुळे ‘हँग’ झालेलं मन, विचारांचा वाढलेला वेग आणि तणावग्रस्त झालेली बुद्धी याकडे आपलं लक्ष जात नाही.

हँग झालेला कॉम्प्युटर ज्याप्रमाणे आपण विशिष्ट कमांड देऊन रिस्टार्ट करतो त्याप्रमाणे हँग झालेलं मन आणि बुद्धी रिस्टार्ट करण्यासाठी विचारांचा वेग कमी करण्याचे प्रयत्न करणं महत्त्वाचं ठरतं. यासाठी शांत वातावरणात जाऊन तिथल्या शांततेचा अनुभव घेणं, लक्षपूर्वक श्वासोच्छवासाचा सराव करणं, मौनाचा सराव करत राहाणं हे प्राथमिक पातळीवर निश्चितच उपयुक्त ठरू शकतं. यापुढे जाऊन जाणीवपूर्वक घेतलेल्या श्वासानं, शांत झालेल्या मनानं आल्हाददायक सुस्वर ध्वनींचा, अर्थात ध्वनिसौंदर्याचा रसास्वाद घेता आला, तर विचारांचा वेग कमी होऊन शांततेचा कालावधी आणि गुणवत्ता अधिक वाढू शकते.

ऐकू येणाऱ्या ध्वनीत आपल्याला आल्हाद तेव्हाच जाणवू शकतो जेव्हा त्या ध्वनीत विशिष्ट चित्ताकर्षण असतं, सुस्वर मिसळलेला असतो, सातत्य असतं आणि माधुर्यही असतं. सुस्वरतेमुळे निर्माण झालेला ‘आल्हाद’ हा नकोशा अनियंत्रित ध्वनिमाऱ्याने भंग पावतो, कारण अशा माऱ्यात आकर्षण, स्वर, सातत्य आणि माधुर्य या चारही गुणांचा अभाव असतो. आपला मेंदू आणि श्रवण यंत्रणा अशा ध्वनीचा प्रतिकार जरूर करीत असतात, पण हे करताना ते थकतही असतात. ते थकले की मन अस्थिर होतं आणि आपली एकाग्रता कमी होऊ लागते. ध्वनीच्या अनियंत्रित माऱ्यामुळे किंवा असंतुलित वापरामुळे निर्माण होणाऱ्या विकारांमध्ये तणाव, निद्रानाश आणि चिडचिडेपणा यांचा सामावेश होतो. मात्र याच ध्वनीचा नियंत्रित, संतुलित आणि योग्य वापर केल्यास मनावरील ताणतणाव कमी होऊन शांतता निर्माण होऊ शकते. निसर्गध्वनी, विशिष्ट वाद्या-ध्वनिस्वर आणि सुस्वर संगीत यांचा शरीर आणि मन यावर होणारा सकारात्मक परिणाम लक्षात घेऊन साऊंड थेरपी, साऊंड बाथ, साऊंड हीलिंग असे वेगवेगळे ध्वनिप्रयोग आज पूरक उपचार पद्धती म्हणून जगभरात अभ्यासले जात आहेत आणि विकसित होत आहेत.

अनेक बाजूंनी आपल्यावर होणाऱ्या सततच्या ध्वनिमाऱ्यामुळे आपले कान या गदारोळी गोंगाटाला कंटाळलेले असले, तरी ते कुठेतरी त्यालाच सरावलेही आहेत, असं लक्षात येतं. खरं तर ही काळजी वाढवणारी गोष्ट आहे, पण एखाद्या गोष्टीची सवय झाली की तिच्या पाठीमागचे धोके सहजासहजी लक्षात येत नाहीत हेच खरं. कानांचं हे सरावलेपण ही एक प्रकारे शरीराची आणि मनाची परिस्थितीजन्य प्रतिक्षिप्त क्रिया आहे, जी ध्वनिप्रदूषणाशी जुळवून घेण्यासाठी घडून येत असते. जर एखादी ध्वनिपातळी सतत किंवा वारंवार अनुभवली गेली आणि ती, ना धोका निर्माण करणारी, ना विशेष महत्त्वाची असली तर आपण तिच्याकडे दुर्लक्ष करू लागतो. पण अशा प्रकारे गोंगाटाच्या पुनरावृत्तीमुळे कानांचा संवेदन प्रतिसाद कमी होणं हे आरोग्यदायी नक्कीच नाही. उलट, श्रवणाच्या बाबतीत हे असं जुळवून घेणं किंवा सवयीचं होणं हे कुठेतरी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

सतत गोंगाटाच्या संपर्कात राहिल्यामुळे कानांच्या श्रवण संवेदनशीलतेत बदल होऊ शकतो. मिरवणुकीत वाजणारे बँडबाजे, ढोलताशे यातून निघणाऱ्या उच्च ध्वनिलहरींचा सुरुवातीला आपल्याला त्रास होतो, पण नंतर त्याच कर्कश ध्वनिलहरींकडे आपण दुर्लक्षही करू लागतो. याचाच अर्थ आपले कान त्या ध्वनिमाऱ्याशी जुळवून घेऊ लागतात. यालाच श्रवणाचं सरावलेपण (Auditory Habituation) म्हणता येईल. अंधारातून अचानक प्रखर प्रकाशात आल्यावर डोळे दिपून आपोआप बंद होतात, कारण त्या प्रखर प्रकाशाला ते सरावलेले नसतात. पण काही वेळानं डोळे त्या प्रखर प्रकाशाला सरावल्यानंतर आपण त्याच डोळ्यांनी तेच दृश्य पाहू शकतो.

कानांच्या बाबतीतदेखील अगदी असंच असतं. एखादा कर्कश आवाज सतत, सारखा सारखा ऐकून-ऐकून, तो असह्य असला तरी हळूहळू कानांना सवयीचा होऊ लागतो. डोळ्यांच्या बाबतीत, डोळे मिटण्याची तरी सोय आहे पण कानांच्या बाबतीत तर तीही नाही, म्हणून कानांचे सरावलेपण जास्त घातक आहे. गोंगाटाच्या दीर्घकालीन संपर्कात कान आल्यामुळे श्रवण क्षमता ( Hearing Threshold) कमी होण्याची शक्यता असते. याचं प्राथमिक लक्षण म्हणजे ऐकू येणाऱ्या आवाजाबाबत संवेदनशीलता घटते, ज्यामुळे कर्कश गोंगाटदेखील नॉर्मल वाटू लागतो. अशावेळी सर्वप्रथम वैद्याकीय तपासणी व श्रवण चाचणी करून घेणं आवश्यक आहे.

रमा, एक २५ वर्षांची तरुणी. तिला झोप लागत नसे. चिडचिड व्हायची, अभ्यासात, कामात लक्ष लागत नव्हतं कारण तिचे कान सततच्या चुकीच्या ध्वनींशी सरावले गेले होते. पण हे सरावलेपण अंगवळणी पडल्यामुळे ती शांततेचा अनुभवच घेऊ शकत नव्हती. त्यामुळे तिची कोणत्याच गोष्टीत एकाग्रता होत नव्हती. महागड्या तपासण्या, समुपदेशन आणि वैद्याकीय उपचार घेण्याची तिची मानसिक आणि आर्थिक तयारीही नव्हती. अशावेळी पूरक प्रथमोपचार म्हणून तिला शांत वातावरणात जाण्याचा सोपा उपाय सांगितला गेला. तिला एका साऊंड प्रूफ रूममध्ये नेण्यात आलं. कानावर बाहेरून सतत आदळणारे आवाज थोपविणाऱ्या नुसत्या त्या शांत वातावरणानंच तिला बरं वाटू लागलं. तिच्या कानांना शांततेचा जो पहिला अनुभव आला, तो तिने यापूर्वी कधी घेतला होता हेही तिला आठवत नव्हतं, पण शांतता नावाचं एक वेगळं दालन रमासाठी उघडल्याचं तिला जाणवत होतं. त्यानंतर काही दिवस तिला विशिष्ट वातावरणात वेगवेगळे संतुलित घन धातुवाद्या-ध्वनी ऐकविले गेले आणि ते ध्वनी तिला पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटू लागले. ध्वनिसौंदर्याचा आस्वाद घेण्याच्या दिशेनं तिने टाकलेलं हे पहिलं पाऊल. त्यानंतर तिच्या तक्रारी तर कमी झाल्याच परंतु पुढे ती उपचार घेण्यासाठी व तज्ज्ञांकडे जायलाही तयार झाली.

कान हे आपोआप बंद करता येत नसले तरी त्यांना विश्रांती देण्याची कुठली ना कुठली युक्ती हे काम करतेच, हे रमाच्या वरील उदाहरणावरून लक्षात येतं. ध्वनीच्या अनियंत्रित श्रवणामुळे अशांत झालेलं मन शांत करण्यासाठी ध्यान-धारणा किंवा साऊंड थेरेपीसारख्या शांततादायक पूरक तंत्रांचा उपयोग करणं, ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी योग्य तंत्रज्ञानाचा वापर करणं इत्यादी उपायांवरही विचार केला जाऊ शकतो.

शांततेचं महत्त्व आणि ध्वनींचा सुसंवादी प्रभाव हा अनियंत्रित ध्वनी सहन करण्याच्या सवयीपासून मुक्त होण्यासाठी तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक ठरतो. शरीरस्वास्थ्याबाबत जसा आपण ‘काय खावं आणि काय खाऊ नये’ याचा विचार करतो तसाच मन:स्वास्थ्याच्या बाबतीत ‘काय ऐकावं आणि काय ऐकू नये’ असा विचार केला पाहिजे. चुकीच्या ध्वनींसाठी सरावलेल्या कानांची असंवेदनशीलता कमी करण्यासाठी वेगवेगळी साधनं वापरून नवनवीन पूरक उपचार पद्धतींचा शोध लागणं आवश्यक आहे. कानांचं सरावलेपण ही समस्या आज सामान्य झाली असली तरी त्यातून कर्कश्शतेची सवय होणं हे मात्र चुकीचं आहे.

ध्वनिविषयक या चुकीच्या सवयीच्या वर्तुळकक्षेतून बाहेर पडण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे ध्वनिसौंदर्याचा आस्वाद घेणं.

trupti.chaware@gmail.com

Story img Loader