विचारांचा, आवाजांचा, तर कधी समाजमाध्यमांचा… असा कसला न कसला तरी कोलाहल आपल्या आजूबाजूला असतोच. असंख्य माणसांच्या गजबजाटात वावरणाऱ्यांमध्ये अनेक जण असेही असतात- ज्यांना एकटेपण हवं असतं, पण हल्ली त्यांच्या या इच्छेकडे फार विचित्र पद्धतीनं पाहिलं जातं. तरीही साऱ्या कोलाहलात आजूबाजूचं जग बंद करून एकटेपणासाठी आसुसलेल्यांना, स्वत:च्या शांततेत मन रमवणं हा एक उत्सवच वाटतो. मध्यंतरी एक शॉर्ट फिल्म माझ्या पाहण्यात आली- ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’ नावाची. या फिल्ममध्ये शेफाली शहा ही एकटीच कलाकार आहे. सासूच्या वाढदिवसाच्या तयारीसाठी ही एकटी बाई तिच्या फार्म हाऊसवर जाते. काही कारणानं तिचं बाकीचं कुटुंब तिथं पोहोचू शकत नाही. आणि मग तो एक दिवस… पूर्ण चोवीस तास ती स्वत:च्याच घरात एकटी राहते, अशी गोष्ट… सुरुवातीला हे एकटेपण तिच्यावर लादलेलं आहे. पण ज्या क्षणी तिच्या लक्षात येतं की, तिला एक पूर्ण दिवस स्वातंत्र्य आणि त्याहूनही महत्त्वाचं- शांतता मिळणार आहे, त्या क्षणी ती इतकी खूश होते… तिला अजिबात कंटाळा आला नाही, भीती वाटली नाही. किंबहुना तिला खूप मज्जा आली. ती एकटी स्विमिंग पूलमध्ये डुंबली. एकटीनं बसून शांतपणे टीव्ही पाहिला. मुख्य म्हणजे, याबद्दल तिच्या मनाला एकदाही अपराधीभाव शिवला नाही. घरच्यांनी फोन केल्यावर ती त्यांना प्रचंड ‘मिस’ करते आहे असा अभिनय केला, पण तसं काहीही नव्हतं. ती मजेत होती… हे पाहून मला गंमत वाटली. फिल्म ठीक आहे, पण मला ती बघताना अनेकदा त्या बाईच्या जागी मी दिसले. खरं तर मी अजिबात अशी प्रचंड घरगुती कामांखाली बुडून वगैरे गेलेली स्त्री नाही. तशी मी बऱ्यापैकी मोकळी आणि स्वतंत्र असते. मुद्दा आहे तिनं अनुभवलेल्या शांततेचा. मला ‘एकटेपणातली शांतता’ अतिशय आवडते. गंमत म्हणजे, हे काहीतरी विचित्र आहे, असा एक सर्वसाधारण समज अलीकडे वाढत चाललाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी जेव्हा पुण्याहून मुंबईला कामानिमित्त राहायला आले तेव्हा ‘एकटी राहू नको’, ‘माणसांत राहावं’, ‘हाका मारायला कुणीतरी असावं’… असे सल्ले अनेकांनी दिले. अर्थातच ते काळजीपोटी होते. एका खोलीत पाच मुली, तिथून शूटिंगचा सेट, घरी पुन्हा एका खोलीत पाच मुली… अशी मी काही काळ राहिले. एक एक टप्पा पुढे गेले, कारणं बदलली, पण जगण्याचं स्वरूप साधारण हेच राहिलं. सतत आजूबाजूला माणसं. माझं कामच माणसांमध्ये असतं, माणसांबरोबर असतं. मला माझं काम अतिशय आवडतं, पण त्याबरोबर येतो माणसांचा आवाज… दिवसभर फोन, बोलणं, ऐकणं, चर्चा, वाद, मग त्यातून येणारे भावनिक चढउतार… त्यावर उतारा म्हणून पुन्हा माणसांशीच बोलणं. कामाचं बोलणं नको म्हणून मित्रमैत्रिणींना भेटणं, घराबाहेरचं जग नको म्हणून घरच्यांबरोबर बसून एखादी फिल्म बघणं आणि ऐकणं, त्यात समाज माध्यम आहेच. आजूबाजूला सतत एक कोलाहल असतो. आवाजांचा… विचारांचा… अनेकदा दिवसाकाठी अशी काही मिनिटंही नसतात जेव्हा मी माझी एकटी असते. गेली कित्येक वर्षं मी आवर्जून ठरवून पहाटे लवकर उठते. कारण तो तेवढाच वेळ मला स्वत:ला हवी तशी शांतता मिळते. तेवढे तास- दोन तास मी घरातच ‘एकटी’ असते… आणि मला ते आवडतं.

पण या एकटं राहण्याच्या इच्छेकडे आता फार विचित्र पद्धतीनं पाहिलं जातं. ‘मला एकटं राहावंसं वाटतंय,’ असं म्हणायचा अवकाश की लोकांना मानसिक अवस्थेपासून, काही जिवाचं बरं-वाईट तर करून घेण्याचा विचार नसेल ना! इथपर्यंत सगळ्या शंका येतात. अशा खूप घटना आजूबाजूला घडतायत हेही खरंय. माणसाला एकटं रहावंसं वाटण्यामागे अनेक कारणं असू शकतात आणि त्यातली बरीचशी गंभीरही असतात. त्यातली काळजी मी समजू शकते. परिस्थितीनं लादलेलं एकटेपण फार त्रासदायक असतं हेही सत्य आहे. जगात अशी असंख्य माणसं आहेत- ज्यांना माणसांचा सहवास मिळत नाही, हे त्यांचं दु:ख आहे. असे अनेकजण आहेत जे या गजबजाटालाच आसुसलेले असतात. पण हेही समजून घ्यायला हवं की, अनेकांना काही वेळ का होईना, पण हे एकटेपण हवंसं वाटतं. यात चमत्कारिक असं काहीही नाही. फोन बंद करून बॅटरी रिचार्ज करतात तसं जगाशी संपर्क तोडून स्वत:ला रिचार्ज करण्यासारखं असतं ते. त्यांचं माणसांच्या बाबतीत पोट लवकर भरतं. अगदी जवळच्या माणसांच्या बाबतीतसुद्धा! याचा अर्थ ते दुष्ट असतात, माणूसघाणे असतात, त्यांना आयुष्यभर एकटंच राहायचं असतं असं अजिबात नाही. याचा अर्थ ते स्वत:च्या शांततेत रमतात. त्यांना मन रमवायला, सुरक्षित वाटायला, सतत आजूबाजूला माणसं लागत नाहीत. ही मंडळी एकटी हातात पुस्तक घेऊन कॉफीशॉपमध्ये जाऊन बसू शकतात, निवांतपणे एकटं जाऊन सिनेमा बघू शकतात, ठरवून एखादा दिवस एखाद्या ‘पार्टी’ला न जाता घरी शांतपणे आपल्याला आवडेल ते बघत बसू शकतात. खुट्ट झालं की चार माणसं जमवावी आणि सोहळे करावेत असं त्यांना वाटत नाही. ही माणसं ‘मी’ आहे!

अलीकडे झालंय असं की मी जर म्हणाले, ‘मी माझ्या वाढदिवसाला पार्टी करत नाही, किंवा ३१ डिसेंबरला मी शांतपणे झोपते,’ तर साधारणपणे माझं वय झालंयपासून माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहेपर्यंत सगळं मला ऐकायला मिळतं. यावर मी फक्त हसते, कुणाला काही समजवायला वगैरे जात नाही, कारण कुठल्याही गोष्टीचा उत्सव करणं आता आपल्यात इतकं मुरलंय की, एखाद्याला तो साजरा करावासा वाटत नसेल, हे समाजमान्यच राहिलं नाहीये. हल्लीचा एक परवलीचा शब्द झालाय ‘नॉर्मलाइज’ करणं. मला आता असं वाटायला लागलंय की पार्ट्या करणं, कार्यक्रम साजरे करणं, धमाल मजा-मस्ती करणं जसं आवडतं, तसंच हे काहीही करायला फारसं न आवडणंसुद्धा ‘नॉर्मलाइज’ करायला हवं. मी कामाच्या निमित्ताने इतकी सतत माणसांमध्ये असते, की उलट काही खास प्रसंगांना एकटं किंवा जवळच्या मोजक्या लोकांबरोबर असणं यातच मला आनंद मिळतो. काहींचा समूहात राहायला आवडण्याचा काळ खूप जास्त असतो. काहींचा कमी असतो, इतकंच!

या कोलाहलात समाजमाध्यमांमुळे भर घातली गेली आहे. जगातली अब्जावधी माणसं त्यावर भेटतात. माणसं किती काय काय करत असतात. चांगलं, वाईट, वेगळं, उत्तम, साधारण दर्जाचं, मन लावून, घाईघाईत, अभ्यासपूर्वक, उथळपणे, कष्ट घेऊन, फक्त करायचं म्हणून… ‘हटके’ म्हणण्यासारखं आता काहीही उरलेलं नाहीये. कारण जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कुणीतरी तेच काम करतच असतं. आपण कोणतीही गोष्ट केली तरी तीच गोष्ट आपल्यापेक्षा चांगली किंवा वाईट करणारी पन्नास माणसं आपल्याच आजूबाजूला असतात. मती गुंग होईल असा माहितीचा भडिमार सतत चहुबाजूंनी होत असतो. काय खा, काय खाऊ नका, कसा व्यायाम करा, सकाळी उठल्यावर काय करा, रात्री झोपताना कसे झोपा, काय बोला, किती बघा, काय ऐकू नका, कसा विचार करा, कुठे जा, श्वास कसा घ्या, पैसे कसे कमवा, ते कुठे गुंतवा… अशी एक गोष्ट नसेल जिच्याबद्दल सल्ला उपलब्ध नसेल. पण अगदी सूक्ष्मपणे पाहिलं तर हाही सल्ला फुकट नसतोच. (आपल्या शांततेची खूप मोठी किंमत आपण देत असतो.) या जंजाळात आपण ‘आपला’ असा विचार कधी करायचा? ‘आपलं’ म्हणून जे काही आहे ते कसं शाबूत ठेवायचं? अक्षरश: पाच-दहा मिनिटंही एकटं बसू न शकणारी माणसं दिसतात मला आणि त्यांचीच चिंता वाटते. हल्ली ‘मेडिटेशन’ आणि ‘सायलन्स’ याचेसुद्धा असंख्य कोर्सेस वगैरे असतात. पण शांतता मुळात आवडावी लागते. वय, मन:स्थिती, तत्कालीन परिस्थिती यापलीकडेसुद्धा मुळात स्वत:चं मन रमवता यावं लागतं. हळूहळू त्याची इतकी सवय होते की, दर थोड्या थोड्या काळानं मन आपसूक त्या शांततेच्या शोधाला लागतं.

एखादा सुंदर कार्यक्रम बघितला की टाळ्या वाजण्यापूर्वीचे ते दोन सेकंद, चांगलं पुस्तक वाचून बाजूला ठेवलं, चांगला सिनेमा बघून घरी परत येताना कुणाशीही न बोलावंसं वाटणं, एखादं गाणं ऐकल्यावर काही वेळ त्या गाण्यात राहावंसं वाटणं, मुक्या प्राण्याच्या अंगावरून हात फिरवाताना काही काळ थबकल्यासारखं वाटणं, एवढंच कशाला, पुणे-मुंबई प्रवास एकटीनं करणं, दिवसभर शूटिंग करून किंवा नाटकाचा प्रयोग करून एकटीनं गाडी चालवत घरी जाणं… यातसुद्धा ती शांतता मिळते. इतर कुणाही माणसाच्या, कुठल्याही ऊर्जेचा लवलेशही नसलेली ही स्थिती मधेमधे तरी मी आवर्जून मिळवते. आजूबाजूचं जग बंद करून माझं माझं राहणं हा माझ्यापुरता एक उत्सवच असतो, जो मी फार फार आवडीनं साजरा करते.

godbolemugdha2@gmail.com