आजकालच्या नोकरीनिमित्त घराबाहेर असणाऱ्या पालकांनी एकत्र येत, मुलांच्या गरजा जाणल्या आणि त्या वाटून घेत त्यावर उपाय शोधले तर सामाजिक पालकत्वाचा नवा आयाम साकारू शकेल.
आजच्या स्वतंत्र कुटुंबव्यवस्थेत स्थैर्याच्या गरजेतून जोडप्याला नोकरीचा अपरिहार्य पर्याय आवश्यक असतो. मुलांच्या सगळ्याच वाढत्या गरजा लक्षात ठेवून जीवनक्रम सुरू होतो. दैनंदिन जीवनातले वाढते खर्च, शैक्षणिक खर्च, महागडय़ा सोयीसुविधा यांची तोंडमिळवणी करताना आजच्या पालकांची दमछाक होते. त्यातून मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचा अक्षरश: आटापिटा चालला असतो. आपल्या पाल्यानं या स्पर्धात्मक जगात कुठेही कमी पडू नये ही किमान अपेक्षा पाल्याकडून केली जाते.
आई-वडिलांपैकी एकजण गावाबाहेर, शहराबाहेर, देशाबाहेर असतो किंवा कामासाठी दिवसभर घराबाहेर राहणारे पालक आपल्या पाल्याला दूरवरून सांभाळायचा (Long Distance Parenting) प्रयत्न करतात. अशा वेळी पौगंडावस्थेतल्या मुलांना योग्य रीतीनं हाताळणं, हे एक मोठं आव्हान असतं. आजच्या जागतिकीकरणात सगळं जग जरी जवळ आल्यासारखं भासत असलं तरी घरातले सदस्य हे एकमेकांपासून मानसिकरीत्या मैलोन् मैल दूर गेलेले आढळतात. त्यातून सुरू होतं मग सूचनात्मक पालकत्व (Instructional Parenting). या प्रकारात मुलांच्या वागण्याबाबतची भीती, असुरक्षितता वाढीला लागते आणि सुरू होतो सूचनांचा अखंड भडिमार!
अडनिडय़ा वयात म्हणजेच १२ वर्षांच्या मुलाला, कामावर असणारे पालक ठरावीक वेळी फोन करतात. त्याला ठरावीक प्रश्न विचारत राहतात. जसं की, जेवण केलं का? गृहपाठ केला का? अभ्यास केला का? क्लासला जाऊन आलास का? टी.व्ही., लॅपटॉप चालू आहे का? मुलांना हे सगळंच पाठ असल्यामुळे ती स्वत:ला सोयीची उत्तरं देऊन मोकळी होतात. परदेशात असलेले वडील बऱ्याचदा, ‘तू कुठे गेला होतास?’, ‘आज अभ्यास केला का?’ इत्यादींसारखे संशय व्यक्त होणारे प्रश्न विचारत राहिले की, त्या नात्यांत आपुलकी न राहता निव्वळ औपचारिकता प्रकट होत राहते.
याऐवजी परिणामकारक संवाद साधला गेला पाहिजे. त्यात अनपेक्षित प्रश्न विचारले गेले पाहिजे. फोन करण्याच्या वेळासुद्धा बदलल्या गेल्या पाहिजे. संवादातून आपले आई-बाबा आपल्याबरोबरच, इथेच आहेत असं वाटायला हवं. या संवादातही प्रश्नांची संख्या कमीच असली पाहिजे. त्यातही आपल्या दिनक्रमातले आपले अनुभव त्यांच्याबरोबर हसतखेळत वाटून घेतले पाहिजे. ट्रेनमध्ये काय झालं, ऑफिसमधल्या गमती-जमती, सहकाऱ्यांबरोबरचे अनुभव. यात मात्र आवर्जून खऱ्या घटनांचा समावेश असायला हवा. मुलं पालकांशी अशा अनुभवांमुळे जोडले जातात. अशा संवादात मग पाल्यांचं बचावात्मक कवच गळून पडतं. मुलंही मोकळी होतात. तारा जुळत जातात आणि सुंदर नातं जुळायला लागतं.
अशा संवादामुळे मुलं खरं बोलायला लागतात. बोलताना असणारं दडपण नाहीसं होतं. बऱ्याच वेळा मुलं आई-बाबांची कटकट नको म्हणून आज्ञाधारक होतात. त्यात आई-वडिलांबद्दलचा आदर कमी आणि भीती जास्त असते. या प्रकारात स्फोट हा कधी ना कधी होणारच असतो. याउलट मोकळ्या संवादामुळे ही भीती नसतेच. आई-बाबा आपल्याला समजून घेतील. आपल्या वागण्यातल्या चुका स्वीकारतील. परीक्षेत गुण जरी कमी पडले तरी आई-बाबा आपल्याबरोबरच आहेत ही भावना त्यात असते. या नात्यात मुलं जरी चुकली तरी त्यांच्यात सुधारणा सहजतेने व्हायला मदत होते. यात खोटेपणाला थारा नसतो. खोटेपणा म्हणजे तरी काय, ‘ट्रथ पोस्टपोण्ड’! आई-बाबांच्या आयुष्यात त्यांच्या बरोबरीनं आपलाही सहभाग महत्त्वाचा आहे आणि आपल्या बोलण्याला महत्त्व आहे याची जाणीव मुलांना होते आणि तेही आपलं आयुष्य आनंदानं पालकांबरोबर वाटून घेतात.
असं म्हटलं जातं की, रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं, त्याच धर्तीवर आजकाल ही म्हणसुद्धा प्रचलित होऊ शकते, ती म्हणजे, रिकामं घर हे सैतानाचं घर असतं. स्वतंत्र कुटुंबव्यवस्थेत आई-वडील दोघेही कामासाठी दिवसभर घराबाहेर असतात. कुटुंबातही एकच मूल असतं. त्यामुळे दिवसा जेव्हा तो घरी असतो तेव्हा तो एकटाच असतो. त्याच्यावर वचक असा कोणाचाही नसतो. मग त्याचं डोकं नको त्या ठिकाणी भटकायला लागतं. या वयात त्याच्यात शारीरिक, मानसिक अनेक बदल घडत असतात. या बदलांचं खूप कुतूहल असतं. पालकांशी तर याबाबतीत काहीच बोलू शकत नाही. मग यातून निघणारा मार्ग म्हणजे समवयस्क मुलांना बोलावून त्यांच्याबरोबर या माहितीबद्दल जाणून घेणं. हळूहळू प्रकरण वेगळं वळण घेत जातं.
एका नोकरी करणाऱ्या आईला या सगळ्या गोष्टींना अनपेक्षितपणे तोंड द्यावं लागलं आणि मग सुरू झालं मुलाला जबाबदार धरणं. एकदा ती आई जेव्हा काही कारणानं नियोजित वेळेपेक्षा लवकर घरी आली आणि तिला धक्काच बसला कारण, तिचा मुलगा काही मित्रांबरोबर पॉर्न फिल्म पाहात होता. आपला गुणी बाळ त्याच्या प्रतिमेच्या पूर्णपणे विरुद्ध वागू कसा शकतो? हा धक्का त्याच्या आई-वडिलांना पचवणं कठीण गेलं. त्याला चांगल्या प्रतिमेतून वाईट प्रतिमेत बंदिस्त केलं गेलं.
मी पालकांचं समुपदेशन जेव्हा करत गेलो तेव्हा त्यांना कौटुंबिक पाश्र्वभूमीबद्दल विचारलं, तेव्हा काकाने असं असं फसवलं, मामानं खोटय़ा गोष्टी सांगितल्या अशा प्रकारच्या गोष्टी कळत गेल्या. मग त्यांना विचारलं, या मुलानं तरी वेगळं असं काय केलं? काय जगावेगळं केलं? एखाद वेळी खाताना एखादी गोष्ट बाधते, तो एक अपघात असतो. तसाच हा प्रकार आहे, वागणुकीतल्या अपघाताचा (behavioural accident). हा अयोग्य वागणुकीचा प्रकार (nappropriate behavioure) आहे.
त्यानंतर, त्या मुलांचे समुपदेशन करताना मुख्यत्वानं आढळलेली गोष्ट म्हणजे, त्यातल्या काही मुलांना अभ्यास समजून घेताना अडचणी येत होत्या. मग हळूहळू अभ्यासाकडे दुर्लक्ष. यांच्या संगतीनं बरोबरच्या काही मुलांचंही अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागलं आणि गाडी भटकायला लागली. या सगळ्या घटनेचा परिणाम म्हणजे, त्या मुलाची आई नोकरी सोडायलाही तयार होती. पण या अडचणीवरचा योग्य उपाय म्हणजे परिणामकारक संभाषण हा होता. ते जेव्हा त्या आईला मी जाणवून दिलं तेव्हाच ती अडचण निम्म्या पटीत सुटली गेली. तो मुलगा मधल्या काळात आई-वडिलांच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता. त्या आईने मग त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सांगितलं की, ती त्याची आई आहे आणि कायमच आई राहणार आहे. त्याच्या गुणदोषांसकट तिनं त्याला स्वीकारलंच आहे. तिच्या या कृतीमुळे तो दोनच दिवसांत तिच्याजवळ ढसाढसा रडला आणि मोकळा होत गेला.
दरम्यान, संबंधित शिक्षकांच्या कानावरही या गोष्टी घातल्या. त्यातल्या काही मुलांना वेगवेगळे क्लासेस् लावले. त्या मुलांचे सगळे पालक एकत्र आले. त्या मुलांना भावनात्मक आधार आपोआप मिळत गेला. मुलांच्या गरजा सगळ्या पालकांनी जाणल्या आणि त्या वाटून घेत मग सामाजिक पालकत्व (ूे४ल्ल्र३८ स्र्ं१ील्ल३्रल्लॠ) सुरू झालं. यात शाळेचा सहभागही महत्त्वाचा होता.
जागतिकीकरणाच्या निमित्ताने सगळं जग एकत्र आलंय असं म्हणताना जर खरोखरच आपण पालक आपल्या चौकटीच्या बाहेर, स्टेट्स-मार्कस यांच्या मोहात न राहता, आपल्या मुलांच्या पर्यायाने आपल्याच भावनिक नफ्यासाठी जर थोडय़ा प्रमाणात जरी एकत्र आलो तरी स्वतंत्र कुटुंबव्यवस्थेत सामाजिक स्तरावरची एकत्र कुटुंबव्यवस्था तयार होईल आणि मुलंही त्यांच्या कोषातून बाहेर पडून मोकळेपणानं जगायला शिकतील.
आज आपल्या व्यावसायिक जगात सुसंवादाचं महत्त्व अत्यंत ठळकपणे आपण मांडत असतो, मात्र आपल्या वैयक्तिक विश्वात आपण, आपली खरीखुरी संपत्ती, आपली मुलं यांना आपण गृहीत धरतो. त्यांच्या अनेक गोष्टी दुर्लक्षित ठेवतो. त्यांची समज, त्यांच्या क्षमता याबद्दल आपणच अविश्वास दाखवतो. मुलांशी मोकळेपणानं बोलणं आपल्याला कमीपणाचं वाटतं. मी-माझी मुलं- माझी पत याच कोषात आपण कायम गुरफटलेलो असतो. त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी या, त्या त्या क्षणी सोडवल्या गेल्या तर नात्यांमध्ये गुंतागुंत कमी होत जाते. आपणही कोणाशी तरी बांधील आहोत अशी भावना या सरळ नात्यात पक्की होत जाते. मग बांधिलकीच्या जाणिवेने जबाबदार व्यक्ती घडायला लागते. असं होत होत, भावी पिढी जबाबदारी आपल्या स्वानुभवानेच निभावायला लागेल आणि विश्वासाच्या वातावरणात आपण पालक आणि आपली मुलं ही नि:शंक मनाने जगायला लागू!
डॉ. हरिश श़ेट्टी -harish139@yahoo.com
शब्दांकन- शिल्पा भागवत –