लैंगिक अत्याचाराच्या असोत वा घटस्फोटाच्या, अशा घटना घडून गेल्यानंतर, त्याचे भविष्यावर होणारे परिणाम पुसणे कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही. शरीराची किळस घालवून आदराची भावना पुन्हा निर्माण करणं, लाज, भीती, अपराधी भावनांपासून सुटका करवून हरवलेला आत्मविश्वास परत मिळवणं शक्य आहे. त्यासाठी वेळीच सावध व्हायला हवं.  शेवटी आपलं एकच आयुष्य असतं. म्हणूनच मागे न अडखळता पुढे चालण्यातच माणूसपण आहे.
‘एक अटळ शोकांतिका’ हा लेख १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला आणि दुसऱ्याच दिवशी एका मध्यमवयीन पालकाने संपर्क साधला, लैंगिक शोषणाच्या घटना अजूनही सर्वसामान्य पातळीवर कशा दुर्लक्षित राहतात, हे त्यामुळे समोर आले. या गृहस्थाने थोडे संकोचतच फोन केला. त्यांचा सहावीत असलेला मुलगा अनेक महिन्यांपासून शाळेत जायला तयारच होत नाही. कितीही आमिषे दाखवली तरी शाळेत जाणे टाळतोय. त्याचे कारणही सांगत नाही. चौकशीअंती कळले की त्या  मुलाचे बोलणे कमी झाले आहे, तो नीट जेवत नाही, खेळायलाही जात नाही. उपाय म्हणून पालकांनी देवाला नवस केले, नव्हे अनेक देवळांचे उंबरे झिजवले, पण फायदा होत नाहीए. मी जेव्हा त्यांना डॉक्टरांविषयी विचारलं तेव्हा कळलं की त्यांनी डॉक्टरांची अद्याप मदत घेतलेली नाही.  त्यांना तातडीने मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला. अशा घटनांमध्ये तातडीने वैद्यकीय मदतीची, उपचारांची गरज असते, हे त्यांना कळकळीने सांगितले. मात्र, आपल्या मुलांना अशा प्रकारची समस्या असू शकते. त्यांना मानसिकदृष्टय़ा काही प्रश्न असू शकतात, असं अनेक पालकांच्या गावीही नसतं.
‘एक अटळ शोकांतिका’ या लेखातून, मधूच्या शोकांतिकेतून एका महत्त्वाच्या मुद्दय़ाला हात घातला गेला. त्यामुळे बाल लैंगिक शोषणाच्या मुद्दय़ाचे गांभीर्य समोर आले. महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय घरातल्या, सुस्थापित कुटुंबातल्या मुलांचा ज्या कहाण्या यानिमित्ताने समोर आल्या, त्यामुळे हे वादळ आसपासही घोंघावत असल्याचे दाखले मिळाले. या दरम्यान आलेले ईमेल्स, फोन या प्रतिसादामुळे वाचकांच्या समस्या, त्याची संभाव्य कारणे व सुचवलेले उपाय याचा परामर्श घेण्यासाठी हा लेखप्रपंच. मानसोपचारतज्ज्ञ म्हणून एक मुद्दा प्रभावीपणे मांडावासा वाटतो, लैंगिक शोषण ही टोकाची पातळी झाली, मात्र आज नात्यांमधल्या समस्या, हरवलेला संवाद आणि भावनिक कल्लोळात अडकलेले अनेकजण ही आजच्या समाजाची प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
 बीडमधल्या एका पुरुष वाचकाने फोन केला, तो जेव्हा चौथी-पाचवीत शिकत होता, तेव्हा तोही परिचयाच्याच एका व्यक्तीच्या लैंगिक शोषणाला बळी पडला होता. लेखात उल्लेख केलेली लक्षणे त्याच्या ओळखीची होती. विशेष म्हणजे लेख वाचल्यानंतर ही लक्षणे आपल्यातही दिसतात, हा निष्कर्ष त्याला काढता आला. त्याला स्वत:बाबतची ही नोंद करता येणे, हीसुद्धा मोठी बाब आहे, असे मला वाटते. माझ्याशी चर्चा केल्यानंतर त्याने जवळच्या मानसोपचारज्ज्ञांकडे जायचे ठरवले आहे, या उपचारांचा त्याला निश्चितच फायदा होईल, मात्र कुठल्याही वेदनेचा स्वीकार हा समस्येची उकल करण्याच्या दिशेने पहिली पायरी असते हे आवर्जून ध्यानात घेतले पाहिजे.
अकोल्यातली घटना तर सुन्न करणारी होती. दोघा भावांनी फोन केला. ते दोघेही लहानपणी सख्ख्या काकाच्या वासेनेचे शिकार झाले होते. त्यांच्या मनात काकाविषयी प्रचंड संताप आहे. काकाच्या जिवाचे बरेवाईट करण्याची सूडभावना मनात कायम राहिल्याने त्याचा परिणाम मानसिक स्वास्थ्य गमावण्यात झाला आहे. त्यातूनच त्यांना वारंवार हात धुण्याची सवय लागली, तसे न केल्यास त्यांना चैन पडत नाही. आणि आता तर याचा अतिरेक इतका वाढला आहे की ते आसपासच्या माणसांनीही असे वारंवार हात धुऊन स्वच्छता पाळली पाहिजे, असे त्यांना वाटत राहते.     
तसे झाले नाही तर ते कमालीचे अस्वस्थ होतात. सारखे हात धुण्याची इच्छा होणे, निद्रानाश, वारंवार कुठेतरी काहीतरी घाण आहे, असे विचार येणे, सेक्सचे विचार येणे अशा समस्यांनी ते दोघेही पुरते त्रस्त झाले आहेत. मानसोपचारतज्ज्ञ याला  ‘ऑबसेसिव्ह कम्पल्सीव्ह डिसऑर्डर’ असे म्हणतात. लैंगिक शोषणामुळे ही  समस्या निर्माण होते. यातून बाहेर पडण्यासाठी वैद्यकीय उपचारांसह समुपदेशनाचीही गरज असते. खरं तर इतकी वेळ येईपर्यंत मानसोपचारतज्ज्ञाकडे जाणं टाळू नये. शरीराला जसा आजार होतो तसा मनाला होतो. आपल्यावर झालेल्या अत्याचाराला फक्त आजार म्हणूनच पाहिलं तरच त्यातून बाहेर पडणं शक्य होतं अन्यथा आयुष्यभर मानसिक स्वास्थ गमावलेल्या अवस्थेतच जगावं लागतं.  
  शोषणाला बळी पडलेल्या व्यक्तींविषयी असे सर्वसाधारण निरीक्षण आहे की ‘ज्यांना आपल्या शरीराचा आदर वाटत नाही, ते शोषणाला अधिक प्रमाणात बळी पडतात’.  ‘तू सावळी आहेस’, ‘ तुझी बहीण तुझ्यापेक्षा छान दिसते,’ अशासारखी वरवर साधी वाटणारी मते जेव्हा मोठी माणसं लहान मुलांना ऐकवतात त्या वेळी बालमनावर त्याचे दूरगामी परिणाम होत असतात, दुसऱ्यांच्या नजरेतून स्वत:ची प्रतिमा तयार करण्याची सवय जडते, त्याचे परिणाम गहिरे असतात. शैक्षणिक स्तरावर असमाधानकारक कामगिरी आणि भावनिक कमकुवतपणा यामुळे अनेक मुलं-मुली शोषणकर्त्यांचे सहज सावज बनतात. खूप लहानपणीच स्वत:च्या शरीरासंबंधीची मुलांची धारणा पक्की होत असते. म्हणूनच आत्मसन्मानाची बीजं मुलांमध्ये वेळीच रुजवली पाहिजेत. नाहीतर आपल्यात असणाऱ्या कमतरतेवरच इतके लक्ष केंद्रित होते की त्यामुळे सर्वागीण वाढ होण्यास पोषक वातावरणच या व्यक्ती तयार करू शकत नाहीत. तसेच स्वत:बद्दलचा अविश्वास त्यांच्या देहबोलीतून आपोआप झळकतो व या व्यक्ती शोषणाला बळी पडतात.
    अनेकदा शोषण करणारी व्यक्ती परिचयातली असेल तर मुलं पालकांना या गोष्टी सांगायला बिथरतात आणि पालकही विश्वास ठेवण्यास नकार देतात. त्यातूनच त्यांची मधूसारखी कहाणी घडत जाते. म्हणूनच एक कायम लक्षात ठेवले पाहिजे, की काळ हे उत्तम औषध असले तरी सुप्त मेंदू घडल्यापैकी काहीच विसरलेला नसतो. आणि काही कटू अनुभवांचे रूपांतर ठाम मतांमध्ये होत असते. उदा ‘सगळे पुरुष वाईटच असतात’. कल्याण येथे राहणाऱ्या एका मुलीचा अनुभव असाच आहे. ही  मुलगी तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित क रूच शकत नव्हती. लैंगिक शोषणाची शिकार ठरलेली ती मुलगी सैरभैर झाली होती. समुपदेशनाचा सल्ला तिने धुडकावून लावला. प्रत्यक्ष समोर बसून बोलण्याचे धाडसच तिच्याकडे नव्हते. बरीच चर्चा झाल्यावर तिने परीक्षा झाल्यावर समुपदेशकांची भेट घेण्याचे मान्य केले. अनेकदा शोषण करणारी व्यक्ती परिचयाची असेल तर त्यांच्यविरोधात उघडपणे बोलणे दडपण आणणारे असते. मग अनेक मुली याला आपणच जबाबदार असल्याचे म्हणत स्वत:लाच दोष देत राहतात. स्वत:विषयी न्यूनगंड बाळगत इतरांमध्ये मिसळणे टाळतात. कधी भीतीपोटी तर कधी असहायतेमुळे या मुली शोषणकर्त्यांच्या जाळ्यात कायमच्या अडकतात. काहीच उपचार होऊ शकला नाही तर अशा व्यक्ती तात्पुरते किंवा आयुष्यभरासाठी नैराश्येच्या गर्तेत ओढल्या जातात किंवा लग्नच करण्यास नकार देतात. आयुष्याचा अर्थ त्यांच्या लेखी फक्त दु:ख असतं.
 समुपदेशकाची भूमिका पीडित व्यक्तीसह संपूर्ण घराचे चित्र पालटवू शकते. म्हणूनच समुपदेशनाचा बाऊ करता कामा नये. एका पुरुषाचा अत्यंत काळजीच्या सुरात फोन आला,     ‘कसं सांगू तुम्हाला डॉक्टर, माझ्या सख्ख्या बहिणीवर बलात्कार झाला आहे. या घटनेमुळे ती पार खचून गेली आहे, उद्ध्वस्त झाली आहे. हा लेख वाचला आणि फोन करण्याचं बळ मिळालं, खरंच तुमच्याव्यतिरिक्त मी हे कुणाशीच शेअर केलेलं नाही. पण ही घटना घडल्यापासून ती एकही रात्र शांत झोपलेली नाही. काय करू म्हणजे सगळं सुरळीत होईल, प्लीज मला मदत करा.’ अखेर ताबा सुटल्याने तो रडत रडतच बोलत होता. बराच वेळ त्याचा फोन सुरू होता. त्याचं सगळं बोलणं मी शांतपणे ऐकून घेतलं. बहिणीला मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाण्याचा सल्ला मी दिला. कारण वेळीच या गोष्टी करायला हव्यात, नाहीतर उर्वरित आयुष्यातला आनंदच संपून जातो. जगण्यातला रस निघून जातो. पीडित व्यक्तीचाच नाही तर तिच्या जवळच्या व्यक्तींच्याही आयुष्यातला आनंद हरवतो. म्हणूनच या घटनेला सामोरे गेलेल्या व्यक्तीला ही घुसमट, हा त्रास, त्रागा बाहेर काढण्याचा योग्य मार्ग मिळवून दिला पाहिजे. नकोशा आठवणी पुसून नव्याने आयुष्य सुरू करण्याचं बळ मिळालं पाहिजे. मन, शरीर व आत्मा यांचा ढळलेला समतोल पुन्हा साधता आला पाहिजे, हे माझे प्रामाणिक मत आहे.
   एक मात्र नक्की, ‘एक अटळ शोकांतिका’ या लेखातून एका मानसिक आरोग्याशी निगडित समस्येला वाचा फोडल्यामुळे इतर अनेक विषयांनाही यानिमित्ताने हात घातला गेला. दोन दिवसांपूर्वी चाळीसगावाहून एका स्त्री डॉक्टरचा फोन आला, तिच्या बोलण्यात नैराश्य होतं. ‘माझे पती दोन वर्षांपासून दुसऱ्या एका बाईसोबत राहतात. तिच्याशी लग्न केलं असल्याचा दावा ते करत आहेत, मात्र मी माझ्या लग्नाची रीतसर नोंदणी केली आहे, अशा वेळी त्यांना दुसरे लग्न करताच कसे येईल हेच मला कळत नाही. माझ्या दिरावरून ते माझ्यावरच संशय घेतात. फारच संशयी स्वभाव आहे त्यांचा, मुलं माझ्यासोबतच राहतात. मला पोलिसात तक्रार करायची होती, पण माझ्या मित्रमंडळींच्या मते त्याचा काही उपयोग होणार नाही, त्यामुळे काय करावे कळत नाही.’
नात्यांची वीण उसवलेल्या अशा अनेक गोष्टी एकच बाब अधोरेखित करतात, कौटुंबिक वा जिव्हाळ्याची नाती आयुष्याला अर्थ प्राप्त करून देतात. मानसिक स्वास्थ्य हरवलेल्या व्यक्तींकडे हक्काचे माणूस नसणे, हीच निराशा वाढवणारी गोष्ट असते. वर उल्लेख केलेल्या डॉक्टर बाईंना नवऱ्यापासून विभक्त होण्याशिवाय पर्याय नव्हता. पण इतक्या वर्षांचा संसार, नवऱ्यातली भावनिक गुंतवणूक यामुळे त्या प्रचंड अस्वस्थ होत्या. विभक्त होण्याच्या दु:खाला त्यांना कुठेतरी वाट करून द्यायची होती. दु:ख कितीही असलं तरी पुन्हा काम सुरू करायचं होतं. त्यांना वकिलाच्या सल्ल्याची तातडीने गरज होती. मी त्यांना तोच सल्ला दिला. अनेकदा न्यायासाठी, हक्कासाठी भांडणे हेसुद्धा दु:खातून बाहेर पडण्याचा सर्वोत्तम मार्ग ठरू शकतो, हेच सूत्र मी वापरले.
  असेच एक प्रकरण कोल्हापूरचे. या स्त्रीचा २००३ मध्ये घटस्फोट झाला होता. तेव्हापासूनच ती मानसिक तणावाखाली जगत होती. ग्रामीण भागात शिक्षिकेची नोकरी करत, जेमतेम महिना तीन हजार रुपये कमवायची. तिला उपचारांचा खर्च परवडणारा नव्हता. तिला अनेक गोष्टींची भीती वाटायची आणि दिवसेंदिवस भीती वाटणाऱ्या गोष्टी वाढतच होत्या. अधूनमधून डोकेदुखीही होती. योगासनांमुळे मन:स्थिती सुधारण्यासाठी तिला फायदा झाला पण बोलण्यासाठी, समजून घेण्यासाठी कुणीच नसल्याने तिचा कोंडमारा होत होता. तिला जोडीदाराची आवश्यकता जाणवत होती, आता या वयात कुठे आणि कसा शोध घ्यायचा हे उमगत नव्हते. आयुष्य गतिमान झाल्यामुळे कुणाकडेच कुणासाठी वेळ नाही, या परिस्थितीचा हा दृश्य परिणाम होता.
   ग्रामीण भागातलीच आणखी एक घटना. वरिष्ठ ग्रंथपाल म्हणून कार्यरत असणाऱ्या एका प्रेमवीराचे ‘त्या’ प्रसंगापासून सारे बिनसले होते. मैत्रिणीचे तिच्या इच्छेविरुद्ध चुंबन घेतल्याने त्यांचे नाते संपुष्टात आले होते, तिने त्याच्याशी बोलणे तर सोडलेच मात्र लग्नासही नकार दिला. अपराधीपणाच्या भावनेने तो स्वत:च्याही नजरेतून उतरला होता. कामावर लक्ष केंद्रित करणे अशक्य झाले होते. जवळपास अर्धा-पाऊण तास त्याच्याशी संवाद साधल्यानंतर त्याच्या मैत्रिणीला पत्र लिहून त्याच्या भावना कळवण्याचा मार्ग सुचवला. मनात इतके साठले होते, त्याचा गोंधळ उडाला होता. अजूनपर्यंत त्याच्या मैत्रिणीला त्याची बाजू पटलेली नाही, पण भावना कागदावर उतरवल्यामुळे तो शांत झाला होता. ‘मी पुन्हा कधीही असे कृत्य करणार नाही’ असे त्याने मैत्रिणीला शेवटच्या फोनवर सांगितल्याचे मला कळवले होते.
 अशा घटना घडून गेल्यानंतर, त्याचे भविष्यावर होणारे परिणाम पुसणे कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही, ही अतिशय जमेची बाजू आहे. पद्धतशीर नियोजनबद्ध केलेला शरीराचा व मनाचा व्यायाम व समुपदेशन यांचा खूप फायदा होऊ शकतो. यामुळे घाव कायमचे पुसले जाणे कठीण असले तरी त्याची दाहकता कमी करता येणे शक्य आहे. शरीराची किळस घालवून आदराची भावना पुन्हा निर्माण करणं, लाज, भीती, अपराधी भावनांपासून सुटका करवून हरवलेला आत्मविश्वास परत मिळवणं शक्य आहे, नक्कीच शक्य आहे.
 शेवटी आपलं एकच आयुष्य असतं. काही घटना त्या आयुष्याच्या गतीला खीळ घालतं, पण तिथंच थांबून राहणं म्हणजे जगण्याचा अपमान करण्यासारखं आहे, तेव्हा जे झालं ते विसरून जाऊन किंवा बाजूला ठेवून नव्याने आयुष्याला सामोरं जाणं हेच माणूसपण आहे!   
    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा