स्व-नियमनाला, मनाला लगाम घालायला उशीर झाला तर आयुष्यात किती तरी समस्यांना तोंड द्यावं लागतं. अशा व्यक्ती मग अवाजवी उधळपट्टी, व्यसनाधीनता, अतिलठ्ठपणा, जुगारी वृत्ती, शैक्षणिक अपयश, कधी तर गुन्हेगारी कृत्यांकडे वळण्याचाही खूप धोका असतो. कुठल्याही जाणत्या तरुण किंवा प्रौढ व्यक्तीला स्व-नियमन करण्याची गरज कळणं महत्त्वाचं आहे. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर ते सुरू करता येऊ शकतं. तशी निकड मात्र वाटायला हवी.

एकोणीसशे पन्नासच्या दशकात प्रदíशत झालेला ‘साऊंड ऑफ म्युझिक’ चित्रपट आठवतो का? (किंवा त्याची ‘परिचय’ नावाची िहदी आवृत्ती) सन्याधिकारी असलेला अत्यंत कडक शिस्तीत मुलांना वाढवणारा बाबा, cr08त्या अतिशिस्तीनं दडपून गेलेली मुलं आणि त्यांना मुक्त-स्वच्छंदपणाचा झरोका उघडून दाखवणारी- खऱ्या आनंदाची ओळख करून देणारी त्याची दाई कम मत्रीण यांच्या सुरेख नात्याची ती कथा! सर्वसाधारणपणे कडक शिस्त ही गोष्ट मुलांच्या (आणि मानससल्लागारांच्या) जगात फार चांगली मानली जात नाही. थोडीशी बदनामच केली जाते, ही वस्तुस्थिती आहे. कारण व्यवहारी जगात ‘शिस्त’ ही बाहेरून काही तरी लादायची गोष्ट आहे आणि म्हणून तिला स्वाभाविकच विरोध केला जातो असं दिसतं. पण खरी शिस्त ही वागण्याला नसून मनाला म्हणजेच विचारांना असणं गरजेचं असतं, असं लक्षात घ्यायला हवं.
शिस्त म्हणजे सोप्या भाषेत स्वत:वरचा ताबा-नियंत्रण! स्वत:च्या विचाराने, मनापासून केलेलं नियमन! हे असायला वयानं खूप मोठं असावं लागत नाही. काही मुलांमध्ये ते लहानपणीच दिसतं तर काही जण स्वत:च्या ओढाळ मनाशी संघर्ष करून, त्याला वळण लावत ते आत्मसात करतात. स्व-नियंत्रण/ नियमन हा आश्वासक जीवनासाठीचा महत्त्वाचा पाया आहे, असं संशोधन सांगतं. या संदर्भात सत्तरच्या दशकात केलेला एक प्रयोग खूप गाजला. लहान मुलांमधली इच्छापूर्तीची भावना त्यांना रोखता येते का हे तपासण्यासाठी काही मुलांना आवडता खाऊ समोर ठेवून दोन पर्याय दिले गेले. लगेच खायचं असेल तर खाऊचा एक तुकडा मिळेल आणि जी मुलं १५ मिनिटं थांबून मोठय़ा मदानाला फेरी मारून येतील त्यांना दोन तुकडे मिळतील असं सांगितलं गेलं. स्वाभाविकच काही मुलांनी लगेच खाऊ खाल्ला तर काही मुलं मात्र १५ मिनिटं वाट पाहू शकली. खरी गंमत पुढेच आहे. अभ्यासकांनी या मुलांचा दीर्घकाळ पाठपुरावा केला. जी मुलं इच्छेला चटकन बळी पडली त्यांच्यापेक्षा ज्यांनी सहजपणे (कुठल्याही दडपणाशिवाय) इच्छेला काही काळ लगाम घातला, अशी मुलं शैक्षणिक आणि सामाजिक क्षमतांमध्ये मोठेपणी सरस ठरली, असं दिसलं. (बुद्धिमत्तेत फार फरक नव्हता तरीही)
थोडय़ा मोठय़ा मुलांच्या बाबतच्या एका अभ्यासातही असेच निष्कर्ष मिळाले. शाळेच्या शेवटच्या वर्षांतील मार्कापाठीमागे कोणकोणती कारणं असू शकतात असा अभ्यास केला तेव्हा दिसलं की, शाळेतले पूर्वीचे मार्क किंवा क्रमांक, काही व्यक्तिमत्त्व गुण, स्पर्धात्मक परीक्षेतील गुण आणि स्व-नियंत्रणाचे अनेक पलू अशांमध्ये पूर्वीच्या मार्काच्या खालोखाल महत्त्व स्व-नियंत्रणाच्या पलूंना मिळालं. इतर कोणत्याही व्यक्तिगुणांपेक्षा जास्त परिणाम करणारा तो घटक आहे हे लक्षात आलं.
स्व-नियंत्रण म्हणजे ‘इच्छा दाबून टाकणं’ आहे का? तर मुळीच नाही. एखादी गोष्ट हवीशी वाटणं किंवा करावी/ करू नयेशी वाटणं हे तहान-भूक भागवण्याइतकंच स्वाभाविक आहे. पण ती इच्छापूर्ती होण्यामधला विलंब सहन न होणं, आक्रमक किंवा लोभीपणानं इच्छापूर्ती करणं यातला धोका ओळखता यायला हवा. माझ्याकडे काही वर्षांपूर्वी भेटायला आलेला दहा वर्षांचा आशीष मला आठवतो. तो लहानपणापासूनच स्व-नियंत्रणात जरा दुबळा होता. एकुलता एक, सधन कुटुंबातील असल्यानं, पालकांनीही ‘नाही’ म्हणण्याचा धीर न केल्यानं त्याची ही क्षमता विकसितच झाली नव्हती. माझ्यासमोरच अध्र्या तासातच त्यानं चार वेळा आईच्या पर्समधून चॉकलेट्स काढून खाल्ली. आईनंही ‘कस्सा बाई ऐकत नाही. अगदी हवं म्हणजे हवंच!’ असे कौतुकभरले उद्गार काढले. नंतर ५-६ वर्षांनी हीच माऊली आशीषला माव्याचं व्यसन लागलंय- त्यासाठी काय करता येईल, असं डोळ्यांत पाणी आणून विचारायला आली.
स्व-नियमनाला, मनाला लगाम घालायला, शिकायला उशीर झाला तर आयुष्यात किती समस्यांना तोंड द्यावं लागेल याला गणती नाही. अशा व्यक्ती मग अवाजवी उधळपट्टी, व्यसनाधीनता, अतिलठ्ठपणा, जुगारी वृत्ती, शैक्षणिक अपयश, कधी तर गुन्हेगारी कृत्यांकडे वळण्याचाही खूप धोका असतो. (ही अतिशयोक्ती नाही तर यावर वर्षांनुवर्षे संशोधन झालं आहे!) लहान मुलांमध्ये स्व-नियमन क्षमता विकसित होण्यात पालकांची भूमिका मोठी असते हे खरंच आहे, पण केवळ तेवढी पुरेशी नाही.(नाही तर पालक कायम आरोपीच्या िपजऱ्यातच उभे राहतील! अतिशिस्त म्हणजे बंडखोरी किंवा शिस्तीची वानवा म्हणजे स्वच्छंद- स्वैरपणा, हे समीकरण काही १०० टक्के बरोबर नाही!) कुठल्याही जाणत्या तरुण किंवा प्रौढ व्यक्तीला स्व-नियमन करण्याची गरज कळणं महत्त्वाचं आहे. वयाच्या कुठल्याही टप्प्यावर ते सुरू करता येऊ शकतं. तशी निकड मात्र वाटायला हवी.
मोठेपणी घडणारं स्व-नियंत्रण हे अंतकरणातून आलेलं असेल तर जास्त उपयोगाचं असतं. ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात ते फार प्रत्ययकारी पद्धतीनं दाखवलं आहे. तरुणपणी मस्तीत मश्गूल असलेल्या मिल्खाला संयमन न जमल्यानं आलेलं अपयश त्याने नंतरच्या कसोटीच्या वेळी समोर आलेल्या मोहावर निर्धारानं पाठ फिरवून कसं धुऊन काढलं हे पाहणं खूप शिकवून जातं.
हे स्व-नियंत्रण रोजच्या अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून तपासून बघता येतं.
० पोट गच्च भरलेलं असताना केवळ आईस्क्रीम भयंकर आवडतं म्हणून समोर आल्यावर आपला हात पुढे जातो का?
० काम करत असताना/ एखाद्या व्यक्तीसोबत महत्त्वाचं संभाषण चालू असताना मध्येच मोबाइलशी चाळा करणं, व्हॉट्सअ‍ॅप पाहणं, आपण टाळू शकत नाही का?
० आपल्यासाठी ठरावीक वेळेवर उठणे आवश्यक असूनही केवळ अनिच्छेमुळे- आळसामुळे आपण लोळत राहतो का?
० एखाद्या व्यसनाचा धोका (बुद्धीला) माहीत असूनही कुणी तरी आग्रह केला म्हणून/ खूप दु:ख किंवा आनंद झाला म्हणून आपले हात-पाय ओढीने तिकडे वळतात का?
असे आपले स्व-नियंत्रणाबाबतीतले दैनंदिन मार्क्‍स शोधून काढायला हवेत. दिवसातून किमान एकदा तरी स्वत:साठी- कुठल्या तरी हव्याशा/ लगेच कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टीला ठरवून ‘नाही- आत्ता नाही’ असं म्हणायची सवय लावून घ्यायला हवी.
स्व-नियंत्रणात आणि स्व-नियमनात एक छोटासा फरक आहे. इच्छांमागे धावण्यापासून स्वत:ला रोखणं ही पहिली गोष्ट, तर रोजच्या आयुष्यात एक नियमितता- शिस्त आणणं ही दुसरी गोष्ट! म्हणजे घडय़ाळाच्या काटय़ांवर धावणं नव्हे, पण आपल्याला ठरविलेल्या उद्दिष्टांच्या जवळ नेईल इतपत आखीवपणा दिनक्रमाला आणणं नक्कीच शक्य आहे. जरा लक्ष दिलं तर आपल्या आजूबाजूला अशा नियमनानं स्वत:ला आणि इतरांनाही बळ देणारे अनेक जण सापडतील. माझ्या वडिलांना कित्येक र्वष मी सकाळी आठच्या आणि दुपारी चारच्या ठोक्याला हॉस्पिटलमधल्या त्यांच्या तपासणी कक्षात पोहोचताना पाहिलं आहे. इतकं की, इतर लोक त्यावर घडय़ाळ लावत. एका ख्यातनाम (आणि कर्मचारीप्रिय) उद्योगपतींचं कार्यालयातील पहिलं काम म्हणजे कारखान्यातील ज्या कर्मचाऱ्याचा त्या दिवशी वाढदिवस असेल त्याला स्वत: दूरभाष करून शुभेच्छा देणं आहे. काही जण रोज रात्री दैनंदिनीतील एक पान लिहिल्याशिवाय झोपत नाहीत. तर कित्येक जण जेवणापूर्वी रोजची प्रार्थना म्हटल्याशिवाय घास ग्रहण करत नाहीत. ‘अमक्या वेळेला तमकं करणं’ म्हणजे निव्वळ जाच आहे. असं मानणाऱ्या पिढीनं स्व-नियमनाला जवळजवळ हद्दपार केल्याचे परिणाम ती पिढी भोगतेच आहे. पण मानसिक सक्षमतेसाठी ते किती गरजेचं आहे ते आधुनिक शास्त्र आपल्याला गर्जून सांगतंय. त्यासाठी काय युक्त्या करता येतील तेही सांगतंय. त्यातला पहिला उपाय म्हणजे या स्व-नियमनाला आपल्या उद्दिष्टांच्या प्रकाशात पाहणं आणि अमलात आणणं. छोटय़ा छोटय़ा गोष्टी ठरवून पाळणं आणि त्या आपल्याला उद्दिष्यांच्या दिशेने कशा पुढे नेत आहेत याचा मधून मधून ताळा करणं.
विघ्नेशला कॉलेजला पोहोचायला रोज उशीर व्हायचा. कारण रात्री जागरण करायचं, सकाळी उठायला हमखास उशीर. कसाबसा नाश्ता तोंडात कोंबणे आणि आंघोळीचं ‘चट्कर्म’ उरकून स्कूटरवर टांग टाकणं हा दिनक्रम. घरात रोज चिडचिड. कधी कधी आईच्या लेक्चरबाजीमुळे त्याला शिस्तीचा झटका येई. ‘लवकर झोपे, लवकर उठे’ करून तो चक्क चहाला आई-बाबांना कंपनी देई. मग आवरणंही वेळेत होई. दिवस मस्त जाई. आता हे कधी तरी अपघातानं घडतं ते नियमित घडलं तर? विघ्नेशचं (आणि पर्यायानं आई-बाबांचंही) मन:स्वास्थ्य किती सुधारेल? फक्त हे त्यानं समजून, पटून करायला हवं, लादून नव्हे! (कधीमधी बेशिस्त वागण्याची मुभा ठेवून!) एवढं नक्की की, हे करताना मानसिक/ भावनिक दडपण घेऊन उपयोगाचं नाही.
दुसरी युक्ती म्हणजे आपल्या मनातल्या ‘आदर्श’ मी ला डोळ्यापुढे आणायचं. आजचा मी कुठे कमी पडतोय हे तटस्थपणे पारखायचं आणि आदर्श ‘मी’कडे जाणाऱ्या वाटेवरचा सोपा टप्पा ठरवून त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करायचा. उदाहरणार्थ, मेघनाला सतारीत विशारद व्हायचंय, पण नवरा-मुलांचा डबा, इतर कामं करताना सतारीच्या रियाझला वेळत मिळत नाही, असं ती म्हणते. प्रत्यक्षात वेळ असला तरी ती रियाझ करेलच असं नाही. कारण तिच्या मते आदर्श रियाज दोन तास तरी व्हायला हवा. तिनं जर ठरवलं तर ती वीस मिनिटांपुरता नक्की वेळ काढू शकते. थोडासा दुपारच्या सीरियल्समधला वेळ, तिच्या मोबाइलवरून गप्पांमध्ये जाणारा वेळ वाचू शकतो. दुपारची झाकपाक करायला कुणी मदत केली तर रियाझ नक्की होऊ शकतो. हा मधला सोप्पा टप्पा नाही का?
स्व-नियंत्रण आणि स्व-नियमन हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत. कुशल गाडीचालकाला जसा रस्ता डोक्यात फिट असला आणि चालवायचा उत्तम सराव असला की मेंदूतील ऑटोमॅटिक ड्रायिव्हग सिस्टिम चालू होऊन तो गप्पा हाकत बरोबर गाडी चालवतो तसंच हे आहे. यामुळे स्व-नियमन ओढूनताणून करण्यामुळे होणारी दमणूक पूर्ण नाहीशी होते, असं संशोधन सांगतं.
उत्तम स्व-नियमनासाठी आवश्यक आहे नेमकी कृती, लक्ष खेचून घेणाऱ्या पण ठरलेल्या मार्गावरून ढळवणाऱ्या गोष्टींच्या मोहाला टाळण्याचा निर्धार आणि काम पुढे ढकलण्याच्या सवयीला लगाम! हे जितकं व्यसनांच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी खरं आहे तितकंच नातेसंबंध जोपासायला किंवा आपलं करिअर उभं करण्यासाठी खरं आहे.
विचार करू या की, आपल्यापकी प्रत्येकानं स्वत:पुरतं जर स्व-नियंत्रण आणि स्व-नियमन करायचं ठरवलं तर?
० आपलं शरीर आणि मन किती बलवान आणि सक्षम होईल?
० आपल्या रोजच्या जगण्यातील किती ताण आपसूक हलके होतील?
० आपली नाती आपल्याला किती जास्त समृद्ध करता येतील?
लहानपणापासून शैक्षणिक वर्षांचा प्रारंभ करतानाच्या उपासनेत एक अभंग आम्ही नेहमी म्हणत आलो,
नियम पाळावे, जरी म्हणशील योगी व्हावे!
रसनेचा जो अंकित झाला,
समूळ (गाढ) निदेला जो विकला
तो नर योगाभ्यास मुकला
असे समजावे नियम पाळावे जरी..
आपल्याला भगव्या कपडय़ांतील योगी व्हायचं असो वा नसो, निदान ‘जीवनयोग’ नक्की साधायचा आहे, हो ना? मग त्यासाठी हे जमायला हवं. आपली ‘सुखसाधना’ निर्वेध व्हावी म्हणून!

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtra CM Devendra Fadnavis Attends Shaurya Diwas Program In Panipat
…तर देशाचा इतिहास वेगळा असता! पानिपतमध्ये मराठा शौर्यदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांचे योद्ध्यांना अभिवादन
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
Loksatta chaturang padsad loksatta readers response letter
पडसाद : स्वार्थ आणि परमार्थ साधायचा असेल तर…
chaturanga  article on Menstruation and menopause
ऋतुप्राप्ती ते ऋतुसमाप्ती : सर्जनशीलतेच्या वाटेवर चालताना
Ajit Pawar clarification on the Beed case pune news
पक्ष न पाहता दोषींना कठोर शिक्षा; बीड प्रकरणी अजित पवार यांची स्पष्टोक्ती

डॉ. अनघा लवळेकर -anagha.lavalekar@jnanaprabodhini.org

Story img Loader