मुख्याध्यापिका या पदावरून निवृत्त होऊन मला आता १२ र्वष झाली. शिक्षिका म्हणून ३२ र्वष जे आर्थिक, मानसिक समाधान व सामाजिक जीवनातील प्रतिष्ठा मला मिळाली ते समाधान, ती प्रतिष्ठा मला आजही निवृत्तीनंतरही मिळत आहे. अर्थात या समाधानाचा पाया नोकरीची गरज व त्यासाठी केलेला त्याग व तडजोडी हाच आहे. काही तरी मिळविण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं हेच खरं!
१९६४ साली लग्न झालं. काडी काडी जमवून संसार मांडला. नव्या नवलाईचं सणवारांचं वर्ष भुर्रकन संपलं. मुलगा होईपर्यंत दोन वर्षे निघून गेली. त्याच वेळी सहकारी गृहनिर्माण संस्था सुरू झाल्या. स्वत:च्या घराचं स्वप्न आणि मुलाला उत्तम शिक्षण देण्याचं कर्तव्य पुरं करण्यासाठी अधिक अर्थप्राप्तीची आवश्यकता होती. त्यासाठी मी नोकरी करणं हाच एक पर्याय होता. म्हणून शॉर्ट हँड व टायपिंग शिकायला सुरुवात केली. पदवीधर असल्याने मिळणारा पगार, नोकरीच्या ठिकाणी जाण्यायेण्याचा खर्च व पाळणाघराचा खर्च भागवून हाती फारशी शिल्लक राहाणारा नव्हता, त्यामुळे निर्णय घेतला पदवीधर होण्याचा. त्यासाठी मुलाला दूर ठेवणं क्रमप्राप्तच होतं. काळजावर दगड ठेवून त्याला आईकडे वाईला ठेवलं. वरचेवर त्याला भेटायला जाणं परवडणारं नव्हतं. शिवाय माझ्या व त्याच्या दृष्टीने मानसिक ताणाचं होतं. बी.ए. झाले आणि शाळेत नोकरी मिळाली. ती चालू ठेवण्यासाठी बी.एड. करणं ओघाने आलंच. ती चार वर्षे मी कशी काढली, किती रात्री आसवांनी उशी भिजली हे माझं मलाच माहीत. मुलांना जास्तीत जास्त आपला सहवास मिळावा, नोकरांवर त्यांना कमीत कमी सोपवावं या जाणिवेने मी रविवारी सुट्टी व यांनी शुक्रवारी सुट्टी घ्यावी असं ठरवलं. माझी शाळा कायम सकाळची त्यामुळे साखरझोप कशी असते ते मला कधी समजलंच नाही.
असं सर्व असलं तरी या नोकरीमुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला. अनुभवाचं विश्व विस्तारलं. जनमानसाची जाण आली. त्याचा फायदा निवृत्तीनंतर विधायक कामं करण्यासाठी झाला. ज्येष्ठ नागरिक मंडळाची कार्यवाह म्हणून मंडळाच्या कार्यात सुसूत्रता आणली. स्वरूपिणी भगिनी मंडळ रजिस्टर्ड करून हिशोब लिहिणं, ऑडिट करून घेणं, पत्रव्यवहार करणं यासाठी सक्रिय मार्गदर्शन करता आलं. शिक्षकीपेशामुळे आलेल्या सभाधीटपणामुळे व शिकवण्याच्या कौशल्यामुळे विविध विषयांवर भाषणं करीत आहे. निरनिराळय़ा स्पर्धाचे परीक्षक म्हणून काम करत आहेत. राज्यस्तरीय निबंधस्पर्धेत बक्षिसं मिळवली आहेत.
मुलांची कॉलेज शिक्षणं चालू असतानाच यांची कंपनी बंद झाली. तरी मुलांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं नाही. त्यांची इंजिनीअरिंगची शिक्षणं पूर्ण झाली. त्यांची लग्नकरय सणवार थाटात साजरे करता आले. एवढंच नव्हे तर मोठय़ा मुलाच्या अपघाती निधनानंतर सुनेला, नातवंडांना आर्थिक मदत करता आली. यांच्या दोन मोठय़ा आजारात कोणापुढे हात पसरावे लागले नाहीत. ट्रॅव्हल कंपनीतर्फे भारतातील बहुतेक सर्व प्रेक्षणीय स्थळं पाहिली, यात्रा केल्या. या सर्वाचं समाधान माझ्या नोकरीमुळे आलेल्या आर्थिक सुबत्तेमुळे मिळालं. समाधान पैशावर अवलंबून नसलं तरी पैसा समाधानाचा अविभाज्य भाग असतोच.
मुलाला दूर ठेवावं लागणं हा मोठा त्याग केला, पण आज आत्मिक व आर्थिक समाधान आहे.
प्रभा साळवेकर, डोंबिवली (पू.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा