आणीबाणीनंतर देशभर स्त्रियांच्या चळवळींना पुन्हा एकदा नव्याने जोर धरू लागला. स्त्रीवादी चळवळींची व्याप्ती आणि कार्यक्षेत्रे दिवसेंदिवस वाढू लागली. मोर्चे, आंदोलने, घेराव, संप ही नेहमीची हत्यारे तर होतीच, पण संरचनात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण, स्वास्थ्य इत्यादी पायाभूत गोष्टींची गरज वाटू लागली. त्यातून स्त्री-चळवळीला अनेक नवीन आयाम लाभले.
देशाला लागलेले आणीबाणीचे ग्रहण १९७७ मध्ये सुटले, आणि देशभर स्त्रियांच्या चळवळी पुन्हा एकदा नव्याने जोर धरू लागल्या. अनेक स्त्री संघटना उभारण्यामागे डाव्या चळवळींचा मोठा सहभाग होता. स्त्री समस्या वर्गसापेक्ष असूनही ‘प्रायॉरिटी झोन’मध्ये टाकण्यात आली. जशा ट्रेड युनियन, शेतकरी समिती, राजकीय पक्ष यांच्या स्वतंत्र महिला शाखा उदयाला आल्या, त्याचप्रमाणे स्वतंत्र, स्वायत्त, बिगरसरकारी (NGO) संस्था स्त्रियांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मोठय़ा प्रमाणात स्थापन झाल्या. त्यांना देशातून व परदेशातून अनुदाने मिळू लागली. १९७७ मधील महिला दक्षता समितीला सरकारी जनता दलाचा पाठिंबा होता आणि त्याला प्रमिला दंडवते यांच्यासारख्या आत्मभान असलेल्या स्त्रीचे नेतृत्व होते, त्यामुळे स्त्रियांचा आवाज संसदेपर्यंत पोचू शकला आणि काही कायदेविषयक सुधारणा दृष्टिपथात आल्या.
आंध्र प्रदेशातील तेलंगणमध्ये (आता स्वतंत्र राज्य) पाचव्या दशकापासूनच स्त्री आंदोलन सक्रिय होते. आणीबाणीनंतर ते अधिक सबळ झाले. सरकारने हे क्षेत्र ‘अशांत’ म्हणून घोषित केले. करीमनगर जिल्ह्य़ात स्त्रिया ६० सालापासून भूमिहीन मजुरांच्या आंदोलनात संघर्ष करीत होत्या. तिथे देवम्मा नावाच्या एका स्त्रीचे जमीनदाराने केलेले अपहरण आणि तिच्यावरील बलात्कार, पुढे तिच्या नवऱ्याची झालेली हत्या हा प्रश्न स्त्री-शक्ती संघटनेने उचलून धरला. त्यांनी गावागावातून ‘महिला संघम’च्या माध्यमातून पत्नीचा छळ आणि भूमिपतींकडून केले जाणारे बलात्कार या विरोधात मोर्चे निघाले.
याच सुमारास बिहारमधल्या बोधगया जिल्ह्य़ात जयप्रकाश नारायणांच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या छात्र युवा संघर्ष समितीच्या महिला शाखांनी मंदिरातील महंताच्या सावकारी पाशात असलेल्या कित्येक जमिनी भूमिहिनांना परत मिळवून दिल्या. १९८० मध्ये त्यांनी ‘औरत’ नावाचं एक पोस्टर प्रसिद्ध केलं. त्यात म्हटलं होतं की समाज बदलेल, तेव्हा व्यक्ती बदलेल आणि जेव्हा व्यक्ती बदलेल तेव्हा समाज बदलेल. त्यासाठी पुरुष-पुरुष, पुरुष-स्त्री आणि स्त्री-स्त्री यांच्यातलं नातं बदलावं लागेल. याच काळात पुरुषांच्या वर्चस्वाचे मुद्दे चर्चेत आले, तेव्हा बोधगयामध्ये एक स्त्री शिबीर आयोजित करण्यात आलं. त्यात पुरुषांबरोबर जमिनीच्या मालकी हक्कात स्त्रियांचेही नाव लावले जावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली. तथापि ही संघटना फक्त स्त्रियांचीच नसल्याने स्त्रियांच्या मागण्यांचा फारसा प्रभाव पडू शकला नाही.
राजकीय पक्षांशी संबंधित स्त्री शाखेच्या कार्यकर्तृत्वाला नेहमीच मर्यादा पडत गेल्या आणि त्या त्या राजकीय पक्षांच्या धोरणाबाहेर जाऊन काम करणेही अशक्य झाले. सत्तरच्या दशकातील उत्तरार्धात दिल्लीमध्ये ‘समता’ किंवा ‘स्त्री संघर्ष’ या नावाने एकत्र आलेल्या गटांत कोणतीही स्त्री राजकीय पक्षाची असणार नाही याची काळजी घेण्यात आली. या दोन्ही संघटनांचा उदय दिल्ली विद्यापीठ आणि जवाहलाल नेहरू विद्यापीठ यांच्यातील स्त्रीवादी संवाद केंद्रातून झाला. १९७८ मध्ये मुंबई येथे भरलेल्या स्त्रीवादी-समाजवादी स्त्रियांच्या पहिल्या राष्ट्रीय संमेलनात दिल्लीच्या या संघटना मोठय़ा संख्येने सामील झाल्या होत्या. या संमेलनात गांधीवादी, डाव्या विचारसरणीच्या व अन्य विचारधारेतल्या स्त्रिया चर्चेसाठी प्रथमच एकत्र आल्या. स्त्रियांमध्ये जाणीव-जागृतीसाठी एक पत्रिका काढावी, सतेच कार्यकर्त्यां-स्त्रियांसाठी एक पत्रिका स्वतंत्रपणे काढावी असे ठरले. सर्व प्रकारच्या स्त्रीवादी संघटनांमध्ये एकजूट व्हावी, आपापले कार्यक्रम इतरांना कळवून एक सर्वसामान्य रणनीती तयार व्हावी हा त्यामागे उद्देश होता.
स्त्रीवादी चळवळींची व्याप्ती आणि कार्यक्षेत्रे दिवसेंदिवस वाढू लागली. मोर्चे, आंदोलने, घेराव, संप ही नेहमीची हत्यारे तर होतीच, पण संरचनात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षण, स्वास्थ्य इत्यादी पायाभूत गोष्टींची गरज वाटू लागली. त्यातून स्त्री चळवळीला अनेक नवीन आयाम लाभले. १९८० नंतर मोफत कायदेशीर सल्ला केंद्रे निघाली. बलात्कारित स्त्रियांसाठी, घटस्फोटितांसाठी तात्पुरता निवारा म्हणून अशा अडचणीत काही दिवस राहण्यासाठी हॉस्टेल्स काढण्यात आली. पीडितांसाठी स्वयंरोजगार केंद्रे काढून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बळ दिले गेले. सखी परंपरेच्या मॉडेलनुसार एकमेकींनी आपापली दु:खे इतरांना सांगणे, समस्येच्या वेळी एकमेकींच्या पाठीशी उभे राहणे इत्यादी गोष्टी स्त्री संघटनांच्या अग्रभागी आल्या. आरोग्य, मानवी हक्क, पर्यावरण, धर्म-जाती भेद, सांप्रदायिकता, पर्यायी विकास, दलित आदिवासींच्या चळवळी इत्यादी अनेक गोष्टींशी आपली नाळ जोडून घेण्याचा प्रयत्न त्या काळातील स्त्री संघटनांनी सुरू केलेला दिसतो.
दिल्लीतील मानुषी गट करत असलेले ‘ओम स्वाहा’ हे पथनाटय़ आणि महाराष्ट्रात ज्योती म्हापसेकरांनी लिहलेल्या ‘मुलगी झाली हो’ या पथनाटय़ाचे रस्त्यावर प्रयोग करून सामान्य स्त्री-पुरुषांपर्यंत स्त्रियांवरचे अन्याय, हुंडय़ासाठी होणारे छळ, स्त्रियांना जिवंत जाळण्याच्या घटना इत्यादी प्रश्नांची झळ सर्वदूर पोचवली. अश्लील पोस्टर्सबद्दलची निदर्शने, जाहिरातीतील स्त्री शरीराची प्रदर्शने, नाटक-सिनेमांमधील अश्लील दृश्ये आणि भाषा यांच्याबद्दल मोर्चे काढून स्त्री संघटनांनी स्त्रियांच्या अवमूल्यनाकडे समाजाचे लक्ष वेधले.
जवळजवळ सर्वच भारतीय भाषांत या काळात स्त्री प्रश्नांना वाहिलेली मासिके प्रसिद्ध होऊ लागली. नारीमुक्ती (गुजराती), समता (कन्नड), मानवी (मल्याळम्), संघर्ष (इंग्रजी), सचेतना, सबला (बंगाली), वामा, मानुषी (हिंदी), दिशा, प्रेरणा, प्रेरक ललकारी, बायजा, मिळून साऱ्याजणी (मराठी) यासारख्या स्त्रियांनी संपादित केलेल्या मासिकांमधून विचारांना चालना देणारे साहित्य प्रसारित होऊ लागले आणि एका मोठय़ा वाचकवर्गापर्यंत स्त्री जाणिवा पोचू लागल्या. वृत्तपत्रांच्याही साप्ताहिक पुरवण्या खास स्त्री विषयांवर निघू लागल्याने अनेक स्त्री प्रश्न ऐरणीवर आले आणि समर्थ, सक्षम स्त्रियांची उदाहरणे इतरांना प्रेरणा देऊ लागली. सखी मंडळे, भाषणे, चर्चासत्रे, संमेलने इत्यादी माध्यमांतून स्त्री प्रश्न, स्त्री साहित्य, स्त्रीविषयक कायदे यांच्यावर स्त्रिया अभ्यासपूर्ण मते मांडू लागल्या. स्त्री पत्रकार, स्त्री वकील, स्त्री डॉक्टर, स्त्री पोलीस इत्यादी मोक्याच्या जागेवरील स्त्रियांनी डोळे उघडे ठेवून स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाचे निराकरण केले. नेर-एन.डी.पी. प्रोवेरा नावाच्या हानीकारक गर्भनिरोधक गोळय़ांना स्त्री संघटनांनी जोरदार विरोध केला.
विद्यापीठांमधून स्त्रीविषयक अभ्यासक्रम व स्त्री अभ्यास केंद्रे सुरू झाली. संशोधनाच्या स्तरावर स्त्रीप्रश्न आल्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म या दोन्ही पातळय़ांवर तळागाळातल्या स्त्रीच्या जगण्यापासून उच्चस्तरीय स्त्रीच्या जीवनशैलीबद्दल अनेक वास्तवे उजेडात येऊ लागली आणि सर्वच स्तरावरील स्त्रियांच्या शोषणाचा विविध सामाजिक शास्त्रांच्या संदर्भात अभ्यास सुरू झाला. पितृप्रधानता, लिंगभाव यासंबंधी मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र यांच्या दृष्टिकोनातून नवीन संशोधनाला चालना मिळाली. स्त्री चळवळींच्या पायावरच स्त्रीवादी साहित्याची इमारत उभी राहिली आणि मराठी साहित्यात तिने एक नवा प्रयोग आणला. विवाहातील दुय्यम भूमिका, समाजाची दुटप्पी नीती, पुरुषसत्ताकाची अरेरावी, स्त्रियांचे दडपलेपण, लैंगिक शोषण इत्यादी अनेक प्रश्नांवर धीट भाष्य करणाऱ्या कविता, कथा, कादंबऱ्या यांनी स्त्री जीवनाचे वास्तव जगासमोर उघड केले.
स्त्री-चळवळींची व्याप्ती आणि जरुरीही दिवसेंदिवस वाढत आहे. हुंडाबळी, हिंसाचार, बलात्कार, एकतर्फी प्रेमातून हत्या, गर्भलिंग परीक्षा, स्त्री-भ्रूणहत्या, स्त्रियांचे विकृत चित्रीकरण, कौटुंबिक अत्याचार, स्त्रियांचा व्यापार आणि विक्री, परित्यक्ता स्त्रियांचे प्रश्न, अंधश्रद्धेने दिले जाणारे कुमारिकांचे बळी, बालिकांचे लैंगिक शोषण.. स्त्री प्रश्नांची ही मालिका संपता संपत नाही. गेली ३०-३५ वर्षे स्त्रियांच्या चळवळी यातील एकेक प्रश्न घेऊन लढू लागल्या.
या चळवळींमुळेच स्त्रियांचे प्रश्न समाजाच्या केंद्रस्थानी आले. अस्पृश्यता हा अस्पृश्यांचा प्रश्न नसून स्पृश्यांची मानसिकता बदलण्याचा प्रश्न आहे, असे गांधीजी म्हणत. त्याचप्रमाणे स्त्रीवादी चळवळी हा फक्त स्त्रियांचा प्रश्न नसून पुरुषांची मानसिकता बदलण्याचा प्रश्न आहे, याचे भान या चळवळींनी दिले. या चळवळींची वाटचाल कशी झाली हे पुढच्या लेखामधून (९ मे) पाहणे त्यासाठी उचित ठरेल.
डॉ. अश्विनी धोंगडे -ashwinid2012@gmail.com