पिढी कालची असो वा आजची, प्रेमाची व्याख्या सगळ्यांसाठी एकच असते, काळानुसार त्यासाठीच्या संकल्पना बदलत असल्या तरीही. म्हणूनच मग आजच्या पिढीचं ‘डोन्ट आस्क डोन्ट टेल’ म्हणणं असो, ‘इगॅलिटेरियन रिलेशनशिप’ सांभाळणं असो की ‘बॉयसोबर’ होणं किंवा मग ‘स्लीप डिव्होर्स’ घेणं असो, अशा नाना इंग्रजाळलेल्या संकल्पना स्वत:मध्ये आणत आपल्या जोडीदाराला आणि स्वत:लाही ही पिढी सांभाळते आहे. आजच्या पिढीतल्या प्रेमाच्या, नात्याच्या या नवीन वळणदार वळणांविषयी, येत्या ‘व्हॅलेन्टाइन्स डे’ (१४ फेब्रुवारी)च्या निमित्ताने…

‘आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत’, अशी पोस्ट समाजमाध्यमावर अगदी सहजपणे टाकून आपलं नातं जगजाहीर करण्याची पद्धत आजच्या तरूण पिढीमध्ये आहे. एखाद्याशी नातं जुळणं ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना, तर अनेकांसाठी ते नातं लग्नापर्यंत पोहोचणं म्हणजे आयुष्य सार्थकी लागणंच. प्रियकर- प्रेयसी असतील किंवा लग्नाचं नातं, साठ-सत्तर वर्षांपूर्वीच्या आणि आताच्या नातेसंबंधांत, त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात प्रचंड फरक पडलाय. आजच्या पिढीने ‘ब्रेकअप कर लिया…’ हा सेलिब्रेशनचा विषय केलेला असला तरीही मूळ प्रवृती नातं टिकवण्याकडे असते म्हणूनच प्रेमात पडल्यापासून ते अगदी लग्नसंबंधांतही नातं टिकवण्याकडेच सगळ्यांचा कल असतो. तरूण पिढीच्या अशाच या काही संकल्पना, नवीन ट्रेंड्स नातं टिकवण्यासाठीच्या…

Akshata Murty chaturang loksatta
पालकत्वाचा संस्कार रुजवण्याची गोष्ट…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Sound beauty is preparing ears to hear sounds of body
ध्वनिसौंदर्य: नादयोग
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
mazhi maitrin
माझी मैत्रीण: फासला दोनों से मिटाया ना गया…
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 Updates: निवडून येताच डोनाल्ड ट्रम्प यांचं टीकाकारांना उत्तर; म्हणाले, “मी युद्ध घडवून आणणार नाही, तर…”
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!

‘‘अनु, तू पाहिलंस का, रवीने आज ‘इन्स्टा’वर कोणते फोटो टाकले आहेत? मला लेकीने तिच्या मोबाइलवर दाखवले.’’

‘‘हो ताई, ऑफिसची ‘सक्सेस पार्टी’ एन्जॉय करतानाचे आहेत ते सर्व फोटो. पाहिलेत मी.’’

‘‘अगं, पण तुला त्यात काहीच खटकलं नाही? ऑफिसमधल्या मुलींबरोबर वेगवेगळ्या पोजेसमधील त्यांचे फोटो पाहून मला काळजीच वाटली. रवी जर ऑफिसच्या कामानिमित्त असा फिरत असेल आणि पार्ट्या करत असेल तर काही दिवसांत तुझा संसार धोक्यात येईल. तू त्याला काही बंधन का घालत नाहीस?’’

‘‘ताई अगं, चि ssल, त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? रवी त्याच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांबरोबर आहे हे मला माहिती होतं. एकत्र काम करताना तेवढी जवळीक होत असतेच. माझ्या ऑफिसमध्येही काही इव्हेंट्स असे एकत्रित होत असतात, तेव्हा आम्हीही एन्जॉय करतोच.’’

‘‘अनु, पण अगं, असे कोणाही बरोबर तू फोटो काढलेस तर त्याला आवडेल का? पुरुषांना तर या गोष्टी लगेच खटकतात.’’

‘‘ताई, आता तसं काहीही राहिलेलं नाहीये. आम्ही बायासुद्धा त्यांच्यात बरोबरीनं करिअर करतो, त्यामुळे या सर्व वातावरणाची नवऱ्यांनाही कल्पना असते. मुख्य म्हणजे हे तेवढ्यापुरतंच असतं. पार्टी झाली की सगळे आपापल्या कामामध्ये इतके व्यग्र होतात की त्याची आठवणही राहत नाही नंतर.’’

‘‘अगं, पण तुमच्या लग्नापूर्वी त्याचा ब्रेकअप झालेला होता. त्याला ऑफिसमधील एका मैत्रिणीशी लग्न करायचं होतं, परंतु ते होऊ शकलं नाही असं तूच सांगितलं होतंस ना? म्हणून जास्त काळजी वाटते.’’

‘‘ताई, आमची पिढी वेगळी आहे. एकमेकांच्या आयुष्यात ‘भूतकाळ’ असणारच आहे, याची जाणीव दोघांनाही असते. लग्नाआधीच त्याची कल्पना एकमेकांना दिलेली असते. त्याचं सावट वर्तमानावर पडू द्यायचं नाही याची फक्त काळजी घ्यायची, तरच नातं सफल होऊ शकेल ना? आणि अगदी वर्तमानातही एकमेकांविषयी प्रेम, विश्वास आणि आदर असेल तर जोडीदाराला मोकळं सोडायलाच हवं ना? कुठे आणि किती संशय घेत फिरणार? प्रत्येकाला स्वत:च्या आवडीनिवडीचं स्वातंत्र्य हवं असतं, आणि त्यामध्ये कुणीही डोकवायला नको असतं. म्हणून आम्ही रिलेशनशिपचा ट्रेंड ठरवून घेतला आहे, DADT, म्हणजेच ‘डोन्ट आस्क डोन्ट टेल’ तू मला काही विचारू नकोस आणि मला काही सांगू नकोस. छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय आपले आपल्याला घेता येतात त्यामुळे.’’

‘‘तुमच्या या ‘डीएडीटी’मुळे नवरा-बायकोचं नातं टिकतं?’’

‘‘नक्कीच, त्यामुळे दोघांचे फुटकळ विषयांवर वाद होत नाहीत. मोकळेपणाने बोलता येतं. दोघांनाही आपलं स्वातंत्र्य जपता येतं. आम्हा दोघांनाही पुरेशी स्पेस मिळते.’’

‘‘आई, आज तुला ऑफिसला जायलाच हवं का?’’

‘‘हो राणी, आज बाबा तुझ्याजवळ थांबणार आहे ना, मला ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे.’’ अपर्णा ऑफिसला निघण्याची तयारी करीत होती. रोहिणीताई, अपर्णा आणि तिच्या लेकीमधला संवाद ऐकत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘अपर्णा, तिची इच्छा असेल तर तू घरी थांब, आजारपणात मुलांना आई हवी असते.’’

‘‘आई, मागच्या महिन्यात अपर्णानं सुट्टी घेतली होती. आता मी घेणार आहे. मुलांचं आजारपण फक्त आईनंच काढायचं का?’’ अनिकेत मध्येच बोलला.‘‘अरे पण, मुलांना काय हवं असतं ते आईला जास्त समजतं. तिला आईची आता गरज जास्त आहे.’’

‘‘मला नाही तसं वाटत. मुलांना नक्की काय हवंय हे आईबरोबर बाबांनाही समजायलाच हवं. समजून घ्यायचं ठरवलं ते तर शक्य आहेच. राणीलाही आम्हा दोघांची सवय व्हायला हवी. म्हणूनच आम्ही दोघांनी ‘इगॅलिटेरियन रिलेशनशिप’ (egalitarian relationship) मान्य केली आहे. यात सगळ्या जबाबदाऱ्या, महत्त्वाचे निर्णय घेणं अगदी घरातलं सत्ताकेंद्रही दोघांनी मिळून सांभाळायचं आहे. त्यामुळे आमच्या तरी नात्यात सहजपणा आला आहे, चिडचिड, संताप कमी झालाय,’’ अनिकेतनं त्याचं स्पष्टीकरण दिलं.


‘‘माधवी, तुझ्या बेडरूममध्ये मी एसी चालू करून ठेवला आहे. थोड्याच वेळात रूम कुल होईल. मी जातोय झोपायला. गुड नाइट.’’ मंदारची आत्येबहीण सविता बऱ्याच वर्षांनी मंदारच्या घरी आली होती. तिला हे ऐकून आश्चर्य वाटलं. तरीही मिश्कीलपणे तिनं विचारलं, ‘‘मंदार, तुझी आणि माधवीची बेडरूम वेगळी आहे?’’

‘‘होय, आमच्या बेडरूम वेगवेगळ्या आहेत. कारण आमच्यात ‘स्लीप डिव्होर्स’ आहे.’’ सविता झटका लागल्यासारखी ताडकन उभी राहिली आणि म्हणाली, ‘‘काय? डिव्होर्स? तो कधी झाला? आणि आम्हाला कुणालाच माहिती कसं नाही? डिव्होर्स झाला म्हणताय आणि एकत्रच राहताय?’’

‘‘सविता, अगं तुला वाटतंय तसं नाहीये, आमच्यात तसा घटस्फोट नाही झालेला. आम्ही एकमेकांचे नवरा-बायकोच आहोत.’’

‘‘अरे, पण हा ‘स्लीप डिव्होर्स’ का? तुमच्यात भांडणं होतात की वेगळे काही प्रॉब्लेम आहेत?’’

‘‘ तसं नाही गं, आम्ही हे समजुतीनं ठरवलं आहे. ती प्राध्यापक असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागून तिच्या लेक्चरसाठीच्या नोट्स काढत राहते, त्यामुळे मला लवकर झोपत येत नाही आणि मला झोपेत घोरण्याची सवय आहे. त्यामुळे तिला शांत झोप लागत नाही. झोप पूर्ण झाली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या कामावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि आरोग्यावरही. आमच्या दोघांच्या सवयी वेगवेगळ्या आहेत. सुरुवातीला आमची रोज भांडणं व्हायची. कधी एसी-कमी जास्त हवा म्हणून तर कधी लाइट चालू आहे म्हणून तर कधी मी लवकर उठत असल्याने माझ्या व्यायामाचा तिला त्रास व्हायचा म्हणून. सुदैवाने घर मोठं आहे. म्हणून मग आम्ही ‘स्लीप डिव्होर्स’ घेण्याचं ठरवलं.’’

‘‘पण मग तुमच्यातील नात्याचं काय?’’

‘‘आमच्या नात्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट वाद कमी झालेत. ही दोघांसाठी केलेली फक्त सोय आहे. ती आपणच लवचीक ठेवायला हवी. सुट्टीच्या दिवशी असतोच की आम्ही एकत्र. सगळ्या जबाबदाऱ्या, कर्तव्यं पूर्ण करीत आहोतच ना.’’


‘‘अक्षय, आमच्या सूरजला समजावून सांगशील का? सानिका चांगली मुलगी आहे, त्याला सांग एकदा तिच्याशी बोलून तर घे. तिच्याबरोबर डेटिंगला जा म्हणावं, म्हणजे तिच्या स्वभावाचा अंदाज येईल. सध्या तो लग्नाचा विषयही काढू देत नाही. काय करावं ते आम्हालाच समजत नाही.’’ सुलभाताई मुलाच्या मित्राला, अक्षयला सांगत होत्या.

तो म्हणाला, ‘‘काकू खरं सांगू का, तुम्ही या वर्षी याविषयी काही बोलूच नका त्याच्याशी, कारण त्याच्यासाठी २०२५ हे वर्ष ‘बॉयसोबर’ असण्याचं असेल.’’

‘‘म्हणजे? ‘बॉयसोबर’ हा काय प्रकार? आम्हाला समजावून सांग बाबा, कारण तुमच्या दृष्टीने आम्ही ‘ओल्ड स्कूल’चे ना? ’’

‘‘काकू, ‘बॉयसोबर’ म्हणजे सगळ्या कष्टदायक नात्यातून बाहेर पडून स्वत:ला वेळ द्यायचा. हे फक्त मुलगेच नाही तर मुलीसुद्धा करतात. सूरजही आता तेच करतो आहे. त्याला चांगली जोडीदार मिळावी असा त्याचाही प्रयत्न होता. त्यासाठी काही मुलींशी त्याने डेटिंगही केलं. एक मुलगी त्याला आवडली होती, तो तिच्यात गुंतत चालला होता, पण तिनं मध्येच त्याला ‘डिच’ केलं त्या वेळी तो जवळजवळ नैराश्यात गेला होता, तुम्हाला तर आठवत असेलच ते. त्या काळात अनितासोबत ‘सिच्युएशनशिप’मध्ये त्याला थोडा आधार मिळाला होता. पण ‘लाइफ पार्टनर’ म्हणून एखादीची निवड करावी असं कुणी भेटलंच नाही एवढ्या काळात, खूपच मनस्ताप झाला सगळ्याचा त्याला. म्हणून त्यानं यंदा ‘बॉयसोबर’ होण्याचं ठरवलं आहे. डेटिंगपासून, कोणत्याही नातेसंबंधांपासून तो अलिप्त राहणार आहे. स्वत:वर लक्ष केंद्रित करणार आहे, ‘सेल्फ लव्ह’. मुख्य म्हणजे स्वत:बरोबर राहणार आणि आत्मपरीक्षण करणार आहे. आपल्या तब्येतीसाठी जसं आपण ‘डिटॉक्स डाएट’ करतो तसंच सर्व अनुभवातून ‘डिटॉक्स’ होण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतला आहे. अगदीच एकटं एकटं वाटलं, कधी तरी कुणाशी बोलावं वाटलं तर तात्पुरतं बोलेल. ती त्याची ‘नॅनो रिलेशनशिप’ होऊ शकेल, बाकी काही नाही, म्हणून सांगतोय काकू, तुम्ही त्याची काळजी करू नका. सध्या त्याला त्याच्या पद्धतीने जगू द्या. कुणी सांगावं, यामुळे तो नात्याचा वेगळा विचार करू लागेल.’’

ही आहे आजची तरुण पिढी आणि त्यांच्या नातेसंबंध टिकवण्याच्या कल्पना. नात्यात पडणं सोपं असतं, परंतु ते निभावणं ही कसोटीची, चिकाटीची गोष्ट असते. आजच्या पिढीला तो संयम, प्रतीक्षा नाही, असं अनेकदा बोललं जातं. आर्थिक स्वातंत्र्यामुळे, विविध समाजमाध्यमांमुळे असेल व्यक्तिगत स्वातंत्र्याचं महत्त्व वाढलं आहे. ‘मी आणि माझं’ हे अनेकांच्या जगण्याचा केंद्रबिंदू झाला आहे. पण या पिढीत असंही दिसतंय की, स्त्री-पुरुष समानतेबाबतची यांची मतं परखड आहेत. जोडीदाराबाबत कालानुरूप अपेक्षा बदलत आहेत. लग्नाचा उद्देश आणि त्याचं आयुष्यातील स्थानही बदलत चाललं आहे. नात्यात थोड्या तडजोडी कराव्या लागतातच हे त्यांना माहिती आहे म्हणून आजची ही पिढी भावनात्मक चौकटीत न अडकता व्यावहारिक विचार करून नातं निभावण्यासाठी नात्यांचे विविध फंडे वापरून नात्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे.

आजच्या जनरेशन झी (जेनझी), अल्फा जनरेशन पुढे जाऊन बीटा जनरेशनही वेगवेगळ्या संकल्पना वापरून पाहील आणि नात्याला महत्त्व देईल असं दिसतंय. खरं तर ‘जेन झी’ लग्नापूर्वी सिमर डेटिंग, सॉफ्ट लॉँच अशा डेटिंग ट्रेन्ड्स वापरून सावधपणे जोडीदाराला समजावून घेण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला जी व्यक्ती आवडते ती आपल्याकडे नेमक्या कोणत्या नजरेने पाहाते हेही ही पिढी समजून घेते. आजकाल तंत्रज्ञान ज्या वेगानं पुढं जात आहे तसंच नात्यांबाबतच्या संकल्पनाही तेवढ्याच वेगानं बदलत आहेत. आजची तरुण पिढी सतत कुणाशी तरी ‘कनेक्ट’ राहण्याचा प्रयत्न करत असते. नात्याचेही वेगवेगळे प्रकार या पिढीमध्ये दिसून येतात.

यातल्या काही संकल्पना अशा, ‘लव्ह बोमिंग’ या प्रकारात जोडीदार तुम्हाला महागडे गिफ्ट देऊन मी तुझ्यावर किती प्रेम करतो-करते, हे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतो. ‘थ्रोनिंग’मध्ये जोडीदार तुमच्यावर प्रेम करीत नाही तर तुमची संपत्ती, तुमचं समाजातील स्थान यावर प्रेम करीत असतो. आपलं ‘सोशल स्टेटस’ वाढवण्यासाठी या नात्याचा उपयोग केला जातो, त्यामध्ये त्या व्यक्तीबद्दल प्रेम जिव्हाळा असतोच असं नाही. ‘बेंचिंग’मध्ये तर एखाद्या व्यक्तीचा सहवास आवडतो. अडीअडचणीला तिची मदतही घेतली जाते, मन मोकळं करायला ती व्यक्ती हवी असते, पण जोडीदार म्हणून कायम तिच्यासोबत राहायचं नसतं. दुसरं कुणी चांगलं भेटलं तर तिला बाजूला ठेवून दुसऱ्याच व्यक्तीशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला जातो, पण आपल्या सोयीनुसार हवं तेव्हा या जुन्या नात्याचा उपयोग केला जातो. ‘सॉफ्ट लाँच’मध्ये ‘रिलेशनशिप’मध्ये आहोत हे मान्य केलं जातं, परंतु जोडीदार कोण हे जाहीर केलं जात नाही तर ‘हार्ड लाँच’मध्ये आपल्या जोडीदाराची ओळख लपवली जात नाही, उलट ते खुलेपणाने जाहीर केलं जातं. ‘डेटिंग अॅप’मधून निर्माण होणारं नातं म्हणजे ‘नॅनोशिप.’ साता जन्माची जाऊ देत, पण आयुष्यभराची साथ देणारा जोडीदार यातून मिळणं बहुतांशी अवघडच.

सध्याच्या परिस्थितीत लग्नाचं वय वाढलेलं असल्याने अनेकांनी ब्रेकअप पचवलेली असतात. ‘सिच्युएशनशिप’, काही वेळा तर ‘वन नाइट स्टॅन्ड’ अनुभवलेलं असतं. ब्रेकअप झालं तरी ‘थँक्यू, नेक्स्ट’ असं म्हणत ‘रिबाऊंड’ शोधलेला असतो. म्हणूनच लग्न झाल्यानंतर आता ‘स्टीरिओ टाइप’मधून बाहेर पडून जोडीदाराबरोबर सर्व जबाबदाऱ्या वाटून घेऊन ‘इगॅलिटेरियन रिलेशनशिप’ मान्य केली जात आहे. जोडीदाराच्या इतर व्यक्तीसोबत असलेल्या ‘प्लेटॉनिक लव्ह’, ‘सोलमेट रिलेशनशिप’ याबाबत नाराजी असली तरी त्याचा फार बाऊ केला जात नाही. या गोष्टी होत राहतातच, पण तरीही ‘स्लो फेड’ नातं ‘फास्ट’ करण्याचा प्रयत्नही ही आधुनिक पिढी करते आहे.

वैचारिक मतभेद असले,तर कधी नात्यात ब्रेक घेतला जातो. ‘फ्लिआ बेगिंग’ म्हणजेच वारंवार वादविवाद होऊन ब्रेकअप झालं तरीही पुन्हा एकत्र येणं, त्याशिवाय नात्यात ‘मायक्रो चिटिंग’ झालं तर ‘रॉटन रिलेशनशिप’ मान्य करून भावनिक नाही तरी व्यावहारिक पातळीवर तरी नातं टिकवण्याचा प्रयत्नही होताना दिसतो. पती-पत्नी दोघेही कमावणारे असतील तर ‘हा माझा पैसा, तो तुझा पैसा’ यावर वारंवार वाद होतात, तसंच कुणी किती खर्च कुणासाठी केला यावरूनही वाद होतात. तुझ्या आई-वडिलांवर, भावंडांवर तू एवढा खर्च का केलास यावरूनही वाद होतात. त्यामुळे अनेक जोडपी सध्या ‘टी टी एम एम’चा मार्ग निवडतात. ‘तुझं तू माझं मी’ घरातील नियमित खर्च निम्मा निम्मा करायचा आणि आपला वैयक्तिक, सामाजिक, मित्रमैत्रिणी-नातेवाईकांसाठीचा यांचा खर्च ज्याचा त्यानं करायचा याबाबत कुणीही एकमेकांना दोष द्यायचा नाही, असं दोघांनी ठरवून घेतलेलं असतं.

नातं दीर्घकाळ टिकवण्यासाठी परिपक्वता येणं गरजेचं असतं. आयुष्यात आपल्याला हवं तसं सगळं मिळतंच असं नाही, त्यामुळे आपल्या मनाविरुद्ध थोडं तरी कोणी वागलं तरी त्याच्याशी नातं तोडून टाकण्याचा उतावीळपणा योग्य नाही. तडजोडीशिवाय कोणतंही नातं निभावणं अशक्यच असतं. फक्त प्रत्येक पिढीची तडजोड वेगळ्या प्रकारची असेल, पण ती तडजोड आनंदाची, सामंजस्याची आणि सामंजस्यासाठी असेल तर नात्यातला गोडवा कायम टिकेल आणि मग व्हॅलेन्टाइन्स डे साजरा करायला वर्षभर वाट नको बघायला, नाही का?

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)

smitajoshi606@gmail.com

Story img Loader