उष:प्रभा पागे
केरळ आणि तमिळनाडूच्या सीमेवर अनामलैच्या टेकडय़ांवरील जंगले मानवी हस्तक्षेपामुळे तोडली जाऊ लागली. ‘नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशन (एनसीएफ)’मधील दिव्या मुदप्पा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २००१ मध्ये खंडित झालेल्या जंगलांना शक्य तिथे जोडून घेऊन, संपूर्ण भूचित्राचे संवर्धन करण्याचे काम हाती घेतले. त्याला यश येऊन अनामलै हे विषुववृत्तीय पर्जन्य जंगलांचे आणि पर्यायाने वन्यजीवांचे फार मोठे आश्रयस्थान आणि आशास्थान झाले आहे.
केरळ आणि तमिळनाडूच्या सीमेवर अनामलैच्या टेकडय़ा आहेत. सर्वात उंच शिखर ८,८४२ फूट उंचीचे. आना म्हणजे हत्ती आणि मलय म्हणजे पर्वत. या डोंगराळ आणि दाट झाडीच्या प्रदेशात जंगली हत्ती आणि किती तरी प्रकारचे वन्य प्राणी, धनेशसारखे विविध पक्षी आहेत. मूळचा विषुववृत्तीय पर्जन्य जंगलाचा हा प्रदेश. पण ब्रिटिश अमलात इथली जंगले तोडली गेली आणि चहा, कॉफी, वेलदोडे यांचे तिथे मळे झाले. शिवाय स्थानिक लोकांची शेतीही तिथे आहे. जंगलतोड झाली होती, पण उरल्यासुरल्या जंगलातून विपुल जैवविविधता होती. मानवी हस्तक्षेप, शहरे-गावांची वाढ, धरणे, खाणी अशा योजना तिथे झाल्या.. प्राण्यांचे अधिवास कमी व्हायला लागले, नष्ट होऊ लागले, काही प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले.
जंगलतोड झाल्यामुळे जमिनीची प्रतही कमी होऊ लागली. एकूणच पर्यावरणावर त्याचे विपरीत परिणाम होऊ लागले. अशा परिस्थितीत गरज होती ती इथल्या उरल्यासुरल्या पर्जन्य जंगलांचे पुर्नसग्रहण करून त्यांना पुनर्जीवित करून पुनस्र्थापित करण्याची. त्यामुळे प्राणी आणि पक्ष्यांचे अधिवास सुरक्षित राहणार होते. निसर्ग संवर्धनाची ही गरज लक्षात घेऊन, खंडित झालेल्या जंगलांना शक्य तिथे जोडून घेऊन, संपूर्ण भूचित्राचे संवर्धन करण्याचे काम ‘नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशन (एनसीएफ)’मधील दिव्या मुदप्पा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २००१ मध्ये हाती घेतले.
निरंतर अभ्यास, संशोधन आणि सकारात्मक विचार आणि सहकार्याची भूमिका यामुळे त्यांच्या प्रयत्नांना चांगले यश मिळाल्याचे चित्र आता दीड तपाने दिसते आहे. विशेष म्हणजे या टीमची भूमिका समन्वयाची होती, संघर्षांची नव्हती. स्थानिक लोकांचे हितही या सगळ्यात डावलून चालणार नव्हते. स्थानिक लोक, शेतकरी आणि मळेवाल्या कंपन्या यांच्याशी सुसंवाद राखून, त्यांचे सहकार्य घेऊन, प्रसंगी त्यांची उत्पादने निसर्गस्नेही कशी करायची हे त्यांना पटवून देऊन, त्यांना शाश्वत शेतीचा, जीवनशैलीचा मार्ग त्यांनी दाखविला. वन खाते, स्थानिक प्रशासन व्यवस्था यांचेही सहकार्य त्यांनी घेतले.
‘एनसीएफ’चे अनामलैला वालपराई या गावी ‘रेनफॉरेस्ट रिस्टोरेशन अॅण्ड रिसर्च फिल्ड स्टेशन’ आहे. दिव्या तिथे वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. परिसर विज्ञानातील विविध विषयांचे तज्ज्ञ, संशोधक, सहायक या स्टेशनला येऊन काम करतात. विषुववृत्तीय पर्जन्य जंगलातील निसर्गप्रणाली समजून घेऊन त्याचा उपयोग संवर्धनासाठी करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घ्यायचे हे दिव्याचे काम. कोईमतूरच्या भारतीयार युनिव्हर्सिटी आणि डेहराडूनच्या डब्ल्यूडब्ल्यूआयमधून त्यांनी २००१ मध्ये जीवशास्त्र संवर्धन या विषयात पीएच.डी. केले. रिसर्च स्कॉलरशिप आणि फेलोशिप मिळवून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला दिव्या यांनी सारस पक्ष्यांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर आंध्र प्रदेशातील वेटलँडचा सव्र्हे तिथल्या वन खात्यासाठी केला.. आशियातील सिंहाचे भारतात नव्याने पुनर्वसन करताना त्यांच्यासाठी सुयोग्य अधिवास आहे की नाही याची चाचपणी करण्याचे काम त्यांनी केले. अनामलैला तीन प्रकारचे धनेश आहेत. त्यांच्या घरटय़ांचा, पिल्ले कशी वाढवतात याचा त्यांनी अभ्यास केला.
अंदमानजवळ नारकोंडा बेटावर फक्त तिथेच आढळणाऱ्या म्हणजे स्थलविशिष्ट धनेश पक्ष्याचा अभ्यास करण्याची दुर्मीळ संधीही त्यांना मिळाली. वालपराईच्या फिल्ड स्टेशनला दिव्या यांनी किती तरी प्रकल्प हाती घेतले. बिबटय़ांसारखे मांसभक्ष्यी प्राणी आणि माणूस एकाच भूभागावर राहतात अशा वेळी त्यांच्यात संघर्ष अटळ आहे का? बिबटय़ाच्या गरजा, वर्तणूक समजून घेऊन, बिबटय़ा नि माणूस यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास त्यांनी केला. कावेरी नदीमध्ये ओटर या प्राण्याची संख्या बरीच आहे. त्याच परिसरात मासेमारीचा व्यवसायही आहे. त्यांचाही एकमेकांना छेद बसू नये यासाठी त्याही प्रश्नाचा अभ्यास करून दोन्ही बाजूंच्या हिताचा मार्ग शोधावा लागला. सहकाराची भूमिका हा उपाय दिव्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उपयुक्त वाटतो. अनामलैचे भूक्षेत्र विविध प्रकारचे आहे, तेथे वन्य प्राण्यांचे अधिवास आहेत, तोडलेली जंगले, कुरणे, सडे, दलदल, ओढे, नद्या, अशी भूरूपे आहेत. निलगिरीसारख्या वृक्षांचे सामाजिक वनीकरणही तिथे झाले आहे. वृक्ष, लता, वेली, मोठे वन्य प्राणी तसेच लहान मांसभक्ष्यी प्राणी, वटवाघुळे, कोळी, अन्य कीटक असे तिथले वन्यजीवन आहे. संवर्धनात यांचाही अभ्यास करणे आवश्यक असल्याचे दिव्या नमूद करते. या सगळ्याच घटकांचा, त्यांच्यातील परस्परसंबंधांचा अभ्यास केल्यावरच संवर्धनाची दिशा ठरवणे शक्य होते.
अनामलैच्या पश्चिम घाटातील जैवविविधता संवर्धन, शेती आणि मळे यांच्या ऱ्हास झालेल्या जमिनीचे पुनरुज्जीवन करणे, जंगलतोड झालेल्या जंगलांचे पुनरुज्जीवन करणे, पर्जन्य जंगलांच्या विरळीकरणामुळे वन्य प्राण्यांवर काय परिणाम होतात ते अभ्यासणे असे विविधांगी संशोधन दिव्या यांची टीम करते आहे. एकातून दुसरी त्यातून तिसरी दिशा नजरेत येते. संवर्धनाचे काम असे विविध दिशांना जाणारे आहे. वालपराईचे पठार म्हणजे अनामलै टेकडय़ांचा भाग. इथला परिसर पुनरुज्जीवित करायची सुरुवात २००१ पासून झाली ती १० वेगवेगळ्या खंडित जंगलापासून. कामाच्या यशासाठी शेतकरी, मळेवाल्या कंपन्या, वन खाते यांचे सहकार्य घेणे आवश्यक होते. या विरळ जंगलाच्या सीमेलगत २६ हजार झाडे लावली. त्यात १६० प्रकारचे देशी स्थानिक जातीचे वृक्ष आणि वेली होत्या. दोन वर्षांच्या पाहणीत त्यातील ६१ टक्के वृक्ष जगले होते. तिथल्या मूळच्या वनस्पतींच्या संगतीमुळे ही नवीन लावलेली झाडे जगली होती. याचा अर्थ ही तुटलेली, विरळ जंगले पुनरुज्जीवित होण्याच्या मार्गावर होती. एक एक गोष्ट उलगडत होती- या जंगलातील वन्य प्राण्यांना जाण्या-येण्यासाठी दोन जंगलांना जोडणारा मार्ग हवा. लायनटेल मकाक, धनेश पक्षी यांना निर्वेध मार्ग आणि जंगली हत्तींना अन्नासाठी मोठे क्षेत्र हवे. ही काळजी घेतली तरच इथली जैवविविधता टिकणार. अशा वाटा दिल्यामुळे त्यांचे माणसांशी आमने-सामने संघर्षांचे प्रसंगही कमी येणार. तुटलेली का होईना, जी जंगले शिल्लक आहेत त्यांचे संवर्धन महत्त्वाचे. कारण वनस्पतिसृष्टी आणि प्राणिसृष्टी यांची ती आश्रयस्थळे आहेत. अनामलै हे पर्यटनस्थळ आहे. पर्यटक इथे येतात ते इथले वन्यजीव- लायनटेल मकाक, निलगिरी ताहिर, धनेशसारखे दुर्मीळ पक्षी, इथली पर्जन्य जंगले, मळे आणि हिरवी भातखाचरे बघायला. त्यामुळे या सर्वाचे संवर्धन असे एकमेकांशी आणि पर्यटनाशी निगडित आहे. वाढते पर्यटक, त्यांच्यासाठी रस्ते रुंदीकरण याचा प्रतिकूल परिणाम वन्य जीवांवर होत होता. लायनटेल मकाक, निलगिरी ताहिर असे कित्येक प्राणी वाहनांच्या धडका बसल्याने मरत होते. दिव्या यांच्या टीमने स्थानिक प्रशासनाला काही उपाय सुचविले. रस्त्याच्या वर दोन्ही बाजूला झाडांचे छत ठेवणे, वरच्या वर रस्ता ओलांडायला पूल असावेत, कडेने झाड-अडोसा असावा. घाटात रस्त्याच्या बाजूने लहान वाटा असाव्यात, रस्त्यावर क्रॅश-गार्डस, गतिरोधक हवेत. दिव्याच्या टीममधील एक जण माणूस आणि हत्ती यांच्यातील संघर्ष कमी होऊन सलोखा कसा राहील याचा अभ्यास करतो आहे. तसेच स्थानिक लोक, प्रशासन, शालेय विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी निसर्ग शिबिरे, स्लाइड शो, फिल्म शो, चित्र स्पर्धा असे उपक्रमही ही टीम करते. परिसर पुनरुज्जीवित करताना जमिनीची प्रत सुधारणे, पीक पद्धत आणि विकासाची योग्य दिशा ठरवणे गरजेचे होते. शेतकऱ्यांशी, मळेवाल्या कंपनीशी संवाद ठेवून सेंद्रिय शेतीचे फायदे त्यांच्या आणि वन्य प्राण्यांच्या हिताचे कसे आहेत हे दिव्याच्या टीमला करावे लागले. त्यासाठी शेतकरी, मळेवाले यांना शासनाचे ‘इन्सेंटिव्ह’च्या रूपात उत्तेजन असावे हे या टीमने सुचविले. एनसीएफने ‘रेनफॉरेस्ट अलायन्स अॅन्ड अॅण्ड द सस्टेनेबल अॅग्रिकल्चर नेटवर्क’शी करार केला आहे. त्यानुसार जे शेतकरी आणि मळेवाल्या कंपनी शाश्वत शेतीपद्धतीचा अवलंब करतील त्यांच्या उत्पादनांना तसे प्रमाणपत्र मिळते आणि ते अधिकृत रीतीने बाजाराशी जोडले जातात.
विरळ किंवा तोडलेल्या जंगलाला लागून शेती आणि मळे असतात, त्यातील रोपांची घुसखोरी लगतच्या जंगलात होते, परक्या वनस्पतीही घुसखोरी करतात आणि त्या जंगलाला उपद्रवी ठरतात. अशा वनस्पतींचे आक्रमण टाळण्यासाठी त्यांचा अभ्यास करून, तुटलेली जंगले पुनरुज्जीवित करणे फार गरजेचे आहे. एनसीएफच्या टीमची स्थानिक वृक्षांची रोपवाटिका आहे. जंगलांना पुनर्जीवित करण्यासाठी त्यांचा वृक्षारोपणाचा उपक्रम सातत्याने चालू असतो. तसेच मळ्यातील चहा, कॉफी, व्हॅनिला यांना वाढीसाठी सावलीची गरज असते. ती झाडे स्थानिकच असावीत हे आता मळेवाल्यांना पटले आहे.
दिव्या आणि त्यांचे लेखक आणि निसर्ग संशोधक, शास्त्रज्ञ असलेले पती श्रीधर यांचे किती तरी शोध-निबंध आणि पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. विविध प्रकल्पांवर दिव्या आणि त्यांच्या वालपराईच्या टीमने इतके मोठे, महत्त्वाचे आणि आश्वासक काम केले आहे. त्यामुळेच त्यांना देशी-विदेशी संस्थांची आर्थिक मदतही चांगली मिळते आहे. पर्जन्य जंगलांचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन हा त्या जोडप्याचा प्राण आहे, याची साक्ष त्यांचे काम आहे. त्यामुळेच अनामलै हे विषुववृत्तीय पर्जन्य जंगलांचे आणि पर्यायाने वन्यजीवांचे फार मोठे आश्रयस्थान आणि आशास्थान झाले आहे.
ushaprabhapage@gmail.com
chaturang@expressindia.com