उष:प्रभा पागे ushaprabhapage@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या सदर लिखाणातून पुन:प्रत्ययाचा जसा आनंद मिळाला, तसे या निमित्ताने नव्याने वाचन झाले आणि काही व्यक्तींचा त्यांच्या कार्यातून नव्याने परिचय झाला. हे लेख लिहिताना वाचन, अभ्यास करताना स्त्रीमधील सुप्त आणि मुक्त सामर्थ्यांचा जो प्रत्यय मला आला त्यामुळे मी स्तिमित झाले. माझ्यासाठी तो एक साक्षात्कार होता.
वाचक हो, वर्षभर चाललेल्या या सदरात निसर्ग संवर्धनातील विविध पैलूंमधून स्त्रियांची निसर्ग संवेदना व्यक्त झाली. आणखी कितीतरी स्त्रियांवर लिहिता आले असते. पण आता वर्ष संपत आले आणि समारोपाच्या या लेखात ‘निसर्ग संवेदना’ या विषया मागील सूत्र सांगणे मला महत्त्वाचे वाटते. ते सूत्र आहे, ‘निसर्गालाही मानवा प्रमाणे हक्क आहेत. निसर्ग मानवाची मालमत्ता नसून स्वतंत्र आणि स्वायत्त प्रणाली आहे. निसर्ग हक्काची जाण आणि सन्मान निसर्ग पुत्राला अधिक असते. निसर्गात राहणाऱ्या आदिम जमातीतील परंपरांमधून त्यांचे निसर्गाचे ज्ञान आणि जाण दिसून येते. ‘निसर्ग हक्कां’चा एक खंदा आणि प्रभावशाली समर्थक आहे ‘ईवो मोरालेस’. स्त्रियांच्या या सदरात या पुरुषाबद्दल सांगणे विषयाला न्याय देणारे ठरेल म्हणून त्याविषयी मी सविस्तर लिहिणार आहे.
ईवो मोरालेस- निसर्गाच्या हक्कांची पाठराखण करणाऱ्या व्यक्तींमध्ये जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले हे व्यक्तिमत्व बोलिविया या लॅटिन-दक्षिण अमेरिकेतील विकसनशील देशाचे अध्यक्ष होते. बोलिवियाच्या मूळ स्थानिक ‘आईमरा’ जमातीत अत्यंत गरिबीत यांचा जन्म झाला. कुटुंबाचे उपजीविकेचे साधन म्हणजे ‘लामा’ या प्राण्यांना पाळून त्यांना विकून पोट भरणे. औषधांचा खर्च झेपत नसल्याने यांची सातपैकी चार भावंडे मृत्युमुखी पडली. हे नऊ वर्षांचे असताना पहिल्यांदा त्यांना संत्रे खायला मिळाले तर हे त्याचे सालही खाऊ लागले तेव्हा त्यांची आई वैतागून त्यांना म्हणाली होती, ‘‘मेल्या, अरे चहासाठी तरी ती साल राखून ठेव.’’ त्यांच्या घरी न वीज होती, न पाणी. ‘मी १५ वर्षांचा होईपर्यंत कधी पाण्याखाली आंघोळ ही केली नव्हती’ असे ते सांगतात. नाना प्रकारचे व्यवसाय करून ईवो शेतीकडे वळले आणि कोका या वनस्पतीचे उत्पादन घेऊ लागले.
पुढे ते शक्तिशाली कोका युनियनचे अध्यक्ष झाले. ते सॉकरचे खेळाडूही होते. त्यात सेक्रेटरी झाले. ट्रेड युनियनचे सदस्य होऊन १९९० मध्ये राजकारणात शिरले. समाजवादी पक्षातून ते निवडून आले. सरकारी धोरणावर ते प्रचंड टीका करायचे. पिण्याच्या पाण्याच्या आणि नैसर्गिक इंधन-गॅसच्या खासगीकरणाविरोधात त्यांनी आघाडी उघडली. अनेक वेळा त्यांना अटकही झाली, पण त्याबरोबर त्यांची लोकप्रियता वाढल गेली. २००५ मध्ये बोलिवियाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. स्थानिक मातीमधून निवडून आलेले, हे देशातील पहिलेच अध्यक्ष होते. भांडवलशाहीचा कट्टर विरोधक अशी त्यांची प्रतिमा होती. ते समाजवादी विचारांचे होते. गरिबी, विषमता, वर्णभेद, निरक्षरता, लैंगिक पिळवणूक याविरुद्ध त्यांनी आघाडी उघडली. पण हे करताना त्यांचे निसर्गभान जागे होते. निसर्गाशी सुसंगत असे त्यांचे धोरण होते. निवडून आल्यावर पहिली गोष्ट त्यांनी काय केली तर स्वत:चे म्हणजे अध्यक्षपदाचे आणि मंत्र्यांचे मानधन थोडेथोडके नव्हे तर ५७ टक्क्यांनी कमी केले. विविध जमातींच्या गटांत अनौपचारिकरीत्या ते सॉकर खेळायला जात. भांडवलदार अमेरिका संघराज्याचे ते कट्टर शत्रू होते. त्यांनी अमेरिकेच्या राजदूताची हकालपट्टी केली. त्यांना त्यांचा सनिकी अड्डा हलवायला लावला. कोका वनस्पतीपासून कोकेन हा अमली पदार्थ बनतो, त्यामुळे भांडवलशाहीचा पुरस्कार करणाऱ्या अमेरिकेवर ते सडकून टीका करीत. त्या देशाबरोबर, जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय मोनेटरी फंडबरोबरचे संबंध त्यांनी तोडले. स्वबळावर धोरणे आखून त्यांनी बोलिवियाची अर्थव्यवस्था मजबूत केली, गतिमान केली. तेल आणि नैसर्गिक गॅस कंपन्या राज्याला उत्पन्नाचा १८ टक्के भाग सरकारला देत असत, ८२ टक्के स्वत:कडे घेत असत. ईवो मोरालेस यांनी हे प्रमाण उलटे केले. उत्पन्न असे वाढल्याने देशात पायाभूत सोयींचे जाळे उभारले. सुधारणांचा विस्तार केला. रस्ते, वीजपुरवठा, पाणी आणि आरोग्य या सोयी केल्या. देशातील गरिबीचे प्रमाण ६६ टक्क्यांवरून ३८ टक्केइतके खाली आणले. आर्थिक विषमतेचे प्रमाण कमी झाले, चलनफुगवटय़ाला आळा घातला. विदेशी चलनाचा साठा इतका वाढविला की इतर देशांनी हेवा करावा. संरक्षण खात्यावरील खर्च कमी करून तो निधी निसर्गाच्या पुनरुज्जीवनासाठी वापरण्याचे त्यांचे धोरण होते. त्यांनी ज्या पद्धतीने सामाजिक, आर्थिक सुधारणा केल्या त्यामुळे ते लोकप्रिय नेते झाले. निसर्ग हक्काविषयी ते अतिशय संवेदनशील होते. माणूस निसर्गाला आपली मालकीची मालमत्ता मानतो. पण निसर्ग ही कुणाची मालमत्ता नाही तर त्याचे स्वतंत्र स्वायत्त अस्तित्व आहे, त्याला आणि त्यातील सर्व सजीव-निर्जीव घटकांसह अस्तित्व ठेवून, टिकून राहण्याचा, सजीव घटकांना पुनरुत्पत्तीचा हक्क आहे, त्याची जाणीव असणे, त्यांचा सन्मान ठेवणे आणि निसर्गाच्या वतीने हे हक्क बजावणे ही मानवी प्राण्याची जबाबदारी आहे. कारण मानव सृष्टीपासून वेगळा नसून इतर सजीवांप्रमाणे तिचा एक घटक आहे. इतरांपेक्षा त्याला अधिक बुद्धी आहे म्हणून प्राचीन परंपरेमध्ये निसर्गाशी सुसंवाद होता. मानवासकट सर्व सजीव आणि निर्जीव घटक एकमेकांशी जोडलेले आहेत. कोणताही निर्णय आणि चालत आलेली मूल्ये बदलताना सर्व घटकांच्या हिताचा निर्णय घेणे हे सर्वाच्या आणि अंतिमत: मानवाच्या भल्याचे आहे. बोलिविया देशाच्या अँडीज पर्वतांच्या उतारावर कोका या वनस्पतीचे जंगल आहे. त्याच्या पानांचा उपयोग त्यांच्या खाण्यात, औषधात ते करतात. पण त्याच्यापासून कोकेन या अमली पदार्थाची निर्मितीही होते. म्हणून अमेरिका कोकेनवर बंदी आणण्यासाठी दबाव आणत होती, तेव्हा त्यांनी ठणकावून सांगितले की, ‘कोकाची पाने खाण्याची आमच्या देशाची पारंपरिक रीत आहे, हे त्या वनस्पतीचे पान आहे, अमली कोकेन नव्हे! त्याचे औषधी उपयोग आहेत. अँडीज पर्वतातील स्थानिक लोकांच्या जीवन संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे. आणि आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान आहे. त्यावर बंदी म्हणजे आमच्या हक्काची पायमल्ली ठरेल.’ कोकाचे पान कसे चावून खायचे त्याचे प्रात्यक्षिकच त्यांनी ‘संयुक्त राष्ट्र संघा’च्या बठकीत दाखविले. एप्रिल २००९ मध्ये ‘संयुक्त राष्ट्र संघा’ने दर वर्षी २२ एप्रिलचा दिवस ‘आंतरराष्ट्रीय धरती माता दिवस’ म्हणून साजरा व्हावा याची घोषणा केली यामागे अनेकांची अखंड धडपड होती, पण पुढाकार घेऊन आपले मागणे त्यांनी लावून धरले. ‘मानवी हक्कांच्या घोषणेनंतर ६० वर्षांनी का होईना, निसर्गहक्कांची जाण मानवाला झाली याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. २००९ मध्ये कोपेनहेगन इथे हवामान बदलाविषयीच्या चर्चा, वाटाघाटी फसल्या. कारण विकसित देश कार्बनवाढीविषयीची आपली जबाबदारी मान्य करीत नव्हते. तेव्हा धडाडीने ईवो मोरालेस यांनी २०१० च्या एप्रिलमध्ये लॅटिन अमेरिकेतील आपल्या बोलिविया देशात कोचाकांबे इथे शिखर परिषद आयोजित केली. विषय होता – ‘जागतिक हवामान बदल आणि जागतिक स्तरावर धरतीमाता दिन’ साजरा करण्याची मागणी. या परिषदेला संयुक्त राष्ट्र संघ परिषदेची प्रतिष्ठा नसली तरी ती अत्यंत महत्त्वाची ठरली. कारण यात अविकसित, विकसित देशांसह ९० देशांच्या प्रतिनिधींनी, जगभरचे कार्यकत्रे, शास्त्रज्ञ, सिव्हिल सोसायटीचे सदस्य आणि निरीक्षक यांनी मोठय़ा प्रमाणात भाग घेतला. जगातील अत्यंत गरीब लोकांचा आवाज जगापर्यंत पोहोचविण्याचा उद्देश सफल झाला. ईवो मोरालेस जनसामान्यांचे धडाडीचे लोकप्रिय प्रतिनिधी ठरले आणि अध्यक्षपदावर अधिक वेळा निवडून आले. त्यांच्या धडपडीमुळे निसर्गाच्या हक्कांचे महत्त्व लोकांपुढे आले.
याच निसर्ग हक्कांच्या संदर्भात निसर्ग संवर्धनातील संशोधक, निसर्गप्रेमी, कलाकार, ज्यांचा ज्यांचा वाटा होता, त्यांच्या कामाची मला अपूर्वाई वाटली. त्यांचे काम, संशोधन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे असे मला वाटले. ‘चतुरंग’च्या ‘निसर्ग संवेदना’ या स्तंभातून गेले वर्षभर दर १५ दिवसांच्या अवधीने मी वाचकांशी संवाद साधला. निसर्गाची सजग जाण हा विषय महत्त्वाचा असला तरी खूप लोकप्रिय नाही, त्यामुळे प्रतिसाद अल्प असला तरी त्याबद्दलही मी वाचकांची आभारी आहे. यानिमित्ताने वाचन झाले आणि काही व्यक्तींचा त्यांच्या कार्यातून नव्याने परिचय झाला. उदाहरणार्थ ‘ईवो मोरालेस’. लेखांसाठी वाचन, अभ्यास करताना स्त्रीमधील सुप्त आणि मुक्त सामर्थ्यांचा जो प्रत्यय मला आला त्यामुळे मी अनेकदा स्तिमित झाले. माझ्यासाठी तो एक साक्षात्कार होता. वन्यप्राण्यांमध्ये काम करणाऱ्या, गोरिलांसाठी जीवन देणाऱ्या डायना फोस्सी, ओरंग उतानच्या संरक्षणासाठी दक्ष असणाऱ्या बिरुते गल्डीकस, एल्सा सिंहिणीचा अपत्याप्रमाणे प्रतिपाळ करणाऱ्या जोय अॅडम्सन, चित्रातून निसर्गाच्या संवर्धनाचा संदेश देणाऱ्या मरिया मरियन आणि वृक्ष चित्रकार अरुंधती वर्तक, टणटणी या उपद्रवी वनस्पतीवर काम करणाऱ्या गीता, पाहुण्या पाणपक्ष्यांवर काम करणाऱ्या तरुण संशोधक तुहिना कुट्टी, कीटकनाशकांचे रासायनिक धोके जाणून सरकारी धोरण बदलायला लावणाऱ्या राचेल कार्सन आणि दक्षिणेकडील लीलाकुमारी अम्मा, सायलंट व्हॅली वाचविण्यासाठी काव्यप्रतिभेचे योगदान देणाऱ्या सुगात कुमारी, पर्यावरण आणि प्रदूषणावर काम करणाऱ्या, चुकीच्या धोरणांवर कडाडून हल्ला करणाऱ्या रणरागिनी सुनीता नारायण आणि वंदना शिवा, सुदूर वन्य पक्षी-प्राण्यांच्या प्रांतात राहून निसर्ग आणि वन्यजीवांच्या संघर्षांचा अभ्यास करणाऱ्या दिव्या मुडप्पा आणि अपराजिता दत्ता, पिकल्या पानांचे खत करणाऱ्या आणि तंत्रज्ञानाने अनेकांना याच्याशी जोडणाऱ्या अदिती, प्रदूषित नदीला पुनर्जीवित करण्यासाठी तन-मन-धनाने वाहून घेतलेल्या शैलजा, पर्यावरणीय तत्त्वज्ञानाचे अनुसरण अध्यापनातून करणाऱ्या मृणाल, निसर्गस्नेही जीवनशैली अनुसरणाऱ्या मोना पेत्राव, हिरवा वसा घेतलेल्या वांगारी मथाई, काळ्या मातीतून पीक घेऊन तिच्या संवर्धनातून अनेक कुटुंबांची गरज पुरी करणाऱ्या वनस्त्री, पाण्याअभावी शेती करू न शकलेल्या ग्रामीण भागात बांध घालून लोकांची शेती फुलविणाऱ्या ‘आकार ट्रस्ट’च्या अमला रुईया, खडकाळ माळरानाचे निसर्ग प्रणालीतील स्थान सांगणाऱ्या अपर्णा वाटवे आणि आदिवासींच्या हितासाठी आणि नदीचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष उभारून त्यात यशस्वी ठरलेल्या केरळच्या डॉ. लता या सर्वाच्या आभासी सहवासाने मला केवढे तरी संचित दिले आणि आता बोलिवियाचे एके काळचे अध्यक्ष असलेले ईवो मोरालेस यांनी निसर्गाच्या हक्कांसाठी जो संघर्ष केला त्याला तोड नाही. यामुळे निसर्गहक्कांची वाचकांची जाण अधिक वाढावी अशी कामना करून ही २५ भागांची मालिका इथे थांबवीत आहोत. मी तुम्हा सर्वाची ऋणी आहे.
(सदर समाप्त)
chaturang@expressindia.com