कर्नाटकातील मलेनाडमधील परसबागा आणि शेती तेथील स्त्रियाच मुख्यत्वे करतात. शिरसीच्या सुनीता राव यांनी सेंद्रिय शेती करून आपली जमीन पुनर्जीवित करायला सुरुवात केली आणि जन्म झाला तो ‘वनस्त्री’ या स्त्रियांच्या समूहाचा. भावी काळाला भेडसावणारी एक मुख्य समस्या आहे ती अन्न सुरक्षेची. नगदी पिकांना तोंड द्यायला आणि अन्न सुरक्षेसाठी पारंपरिक देशी बीजाची साठवणूक आणि वापर हा प्रभावी उपाय त्यांच्याकडे आहे. याच्याच मदतीने अन्न शाश्वततेचा मार्ग त्यांनी शोधला आहे.
भारतातील ६७ टक्के समाज हा शेतीवर अवलंबून आहे तर ग्रामीण भागातील ८४ टक्के स्त्रिया शेतीव्यवसायात, पर्यायाने अन्न उत्पादनात आहेत. मात्र आपल्या कामाचे मोल त्यांना माहीत नाही, ते जाणून घेण्याची सवडही त्यांना नाही आणि पुरुषप्रधान समाजाला त्याचे मोल करणे गरजेचे वाटत नाही.
बियाणे विक्री करणाऱ्या व्यापारी कंपन्यांकडून प्रत्येक पेरणी वेळी महागडे सुधारित बियाणे विकत घेऊन पेरायचे, पुन्हा त्याच व्यापारी कंपनीकडून कीटकनाशके विकत घेऊन त्यांची फवारणी करायची आणि महागडी रासायनिक खते विकत घेऊन शेतीला द्यायची. निसर्गाची कृपा झाली तर ठीक नाहीतर पीक हातचे जाणार. पुन्हा गरिबी आणि उपासमारी असे हे शेतीचे विदारक वास्तव.
या सगळ्या पाश्र्वभूमीवर शेतीनिष्ठ शाश्वत जीवनशैलीचे एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे ते मलेनाडमधील शिरसी परिसरातील ‘वनस्त्री’ या स्त्रियांच्या समूहाने. मलेनाड म्हणजे डोंगरांचा प्रदेश. पश्चिम घाटाच्या पश्चिम आणि पूर्व उतारावरील उत्तर कन्नड, चिकमंगलूर, कोडागू, हसन आणि शिमोगा या जिल्ह्य़ांचा परिसर म्हणजे मलेनाड. कन्नड भाषेत त्याचा अर्थ पावसाचा प्रदेश. येथील अगुंबे या ठिकाणी कमाल पाऊस पडतो. भरपूर पाऊस आणि सघन जंगलांचा हा निसर्गसंपन्न भूभाग-कर्नाटकातील ‘गॉडस् ओन कंट्री’ मलयनगिरी हे इथले उंच पर्वतशिखर. भद्रा, तुंगा, शरावती अशा कितीतरी नद्यांनी हा प्रदेश समृद्ध केला आहे. कॉफी, सुपारी आणि भातशेतीचे उत्पन्न देणारा हा भूभाग, मलेनाडमध्ये जंगल भाग प्रामुख्याने आहे. या जंगलामधूनच लोकांची घरे, परसबागा आणि शेती आहे. या सगळ्याचा एक निसर्गसुंदर असा मेळ झाला आहे. ही रचना इतकी एकजीव झालेली आहे की एकापासून दुसरे वेगळे काढताच येत नाही. इथला शेतीवर अवलंबून असणारा समाज कित्येक पिढय़ा परंपरागत जीवनशैली जगतो आहे. शेतकऱ्यांच्या निर्वाहाचे परसबागा हे मुख्य साधन आहे. त्या काय देत नाहीत? अन्न, पाणी, चारा, जळण, धागा, औषध- सगळंच तर देतात. जंगलाशी त्यांना मनाने, आत्म्याने जोडणारे सूत्र या परसबागा आहेत. त्या त्यांच्या शाश्वत जीवनशैलीचा आधार आहेत. त्यांनी त्या पिढय़ान्पिढय़ा जोपासल्या आहेत. त्या जपताना आलेल्या पेचप्रसंगांना तोंड दिले आहे.
या मलेनाडमधील परसबागा आणि शेती तेथील स्त्रियाच मुख्यत्वे करतात. या सगळ्या वनस्त्रिया म्हणजे जंगलातील आणि जंगलाशी नाते असणाऱ्या बायका. शिरसीच्या सुनीता राव या तिथल्याच. सामाजिक विचारांच्या. भोवतालची परिस्थिती अशी की विषुववृत्तीय पर्जन्य जंगलांचा वेगाने ऱ्हास होऊ घातलेला. हे पाहून त्यांनी सेंद्रिय शेती करून आपली जमीन पुनर्जीवित करायला सुरुवात केली. परसबाग केली सेंद्रिय खते वापरून, जमिनीची प्रत सुधारली, शेण खत वापरले, बायो गॅस प्लांट सुरू केला. एक स्वयंपूर्ण जीवनशैलीचा आदर्श त्यांनी घालून दिला. त्यांनी पाहिले की चार भिंतींमध्ये राहून बाहेरच्या बदलाची माहिती बायकांना होणार नाही. सहकारी पद्धतीने स्त्रिया एकत्र आल्या तर त्या केवढा तरी बदल घडवू शकतील. मग २००१ मध्ये सुनीताताईंनी एक बी पेरले- ‘वनस्त्री’ संस्था सुरू केली. त्यामागे फार दूरदृष्टी होती. हा स्त्रियांनी चालविलेला न्यास आहे. मलेनाडमध्ये परसबागा स्त्रियाच करतात, शेतीतील कामेही करतात. पण त्यांच्या कामाची कदर नव्हती. त्या कष्ट करायच्या पण त्यांच्या हातात पैसा नव्हता. ‘वनस्त्री’च्या स्त्रियांना परसबागांचे नव्याने पुनरुज्जीवन करण्याची प्रेरणा सुनीता राव यांनी दिली. परसबाग आणि शेती करणाऱ्या स्त्रियांनी सुगीनंतर उत्तम बियाणे निवडून ते पुढील पेरणीसाठी नीट राखून ठेवायचे, त्याची गरजू लोकांसोबत देवघेव करायची. ते बियाणे पेरून पुढील उत्पादन घ्यायचे या कामाने सुरुवात झाली. भावी काळाला भेडसावणारी एक मुख्य समस्या आहे ती अन्न सुरक्षेची. नगदी पिकांना तोंड द्यायला आणि अन्न सुरक्षेसाठी पारंपरिक देशी बीजाची साठवणूक आणि वापर हा प्रभावी उपाय त्यांच्याकडे आहे. महागडय़ा व्यापारी कंपन्यांकडून बियाणे घ्यायलाच नको. याच कंपन्या रासायनिक खते आणि कीटकनाशके विकणार. एकदा बियाणे त्यांच्याकडून घेतले की दरवर्षी नव्याने विकत घ्या हे परावलंबित्व नाहीच इथे. याच कंपन्या रासायनिक खते आणि कीटकनाशके विकणार पारंपरिक सेंद्रिय शेतीत याचीही गरज नाही. मेलनाडच्या स्त्रिया शेती, मसाल्याच्या बागा, फळबागा यात कष्ट करतात उत्पन्न घेतात. विविध प्रकारच्या शाकभाज्या, कंदमुळे, फळे त्या पिकवितात. निसर्गातील विविधता जोपासतात. बियाणे निवडून उत्तम असेल ते ‘बिजबँके’त जमवतात विकतात. त्याचे त्यांना पैसे मिळतात. नैसर्गिक साधनांचा त्या साक्षेपाने वापर करतात. शाश्वत शेतीचा मार्ग भलाईचा आहे हे त्यांना कळले आहे. समाजाला हितकारक निर्णय त्या आता घेऊ शकतात. ‘वनस्त्री’मध्ये १५० सदस्य स्त्रिया आहेत. असे आणखी २० स्त्रियांचे गट कार्यरत आहेत. त्यांच्या बैठका होतात. अनुभवांची देवघेव होते. या स्त्रियांना आता बाहेरचे जगही खुले झाले आहे. शेतमाल, इतर उत्पादने उदाहरणार्थ कोकमचे तेल काढणे, कोकम, आवळा यांचे जाम, सरबते, सुपारी, मोरावळा, लोणची चटण्या अशी उत्पादने तयार करणे. मिरे, हळद, आंबे, फणस, ऊस अशी इतर उत्पादने विकणे असा लघुउद्योगच उभा राहिला आहे. पारंपरिक लोक-खाद्य संस्कृतीचे जतन ही ‘वनस्त्री’ करते. बंगळूरु, बेळगाव, धारवाड, महाराष्ट्रात पुणे अशा बऱ्याच ठिकाणी त्यांच्या सेंद्रिय मालाला मागणी आहे. त्यांच्यात आत्मविश्वास आला आहे. त्यांच्यातील क्षमतांची ओळख त्यांना झाली आहे. त्यांच्या कष्टाचा मोबदला त्यांना मिळू लागला आहे. स्त्रियांच्या सबलीकरणाचा उपक्रम यशस्वी झाला आहे. अशिक्षित सदस्य स्त्रिया इतरांशी संवादाचे पूल बांधू लागल्या आहेत. त्यांना आर्थिक, सुरक्षा आणि सामाजिक स्थान प्राप्त झाले आहे, आदर आणि सन्मान मिळू लागला आहे.
‘वनस्त्री’चे वेगळेपण असे की, या स्त्रियांनी आपल्या परिसरातील विविध जातींच्या, संस्कृतीच्या शेतकरी समाजाला मलेनाडच्या पारंपरिक जीवनशैलीमध्ये बरोबरीने सामावून घेतले आहे. त्यांच्याशी त्या अनुभवाची देवाणघेवाण करतात. नैसर्गिक, निरोगी जमिनीत पिकांना, झाडांना जमिनीवर मल्चिंग करून म्हणजे पानांचे, भाज्यांच्या देठांचे, फळांच्या सालीचे आवरण करून ओलावा टिकविणे जमिनीचा कस, पोत वाढविणे, बियाणे टिकविण्यासाठी ते थंड अंधाऱ्या जागी टिकवायचे असे अनुभवातून त्या शिकल्या आहेत. जनुकीय बदल केलेले वाण पर्यावरणाला पूरक नाही असे त्यांचा अनुभव सांगतो. त्याविषयीच्या वादात न पडता ज्या वर्षी जनुकीय बदल केलेली वांगी बाजारात आली त्या वेळी देशी वांगी उत्पादनाची स्पर्धा त्यांनी ठेवली.
बीज संकलन आघाडी मनोरमा जोशी सांभाळतात. त्या निरनिराळ्या समुदायातून बीज संकलन करतात. त्या म्हणतात, ‘वाणाला जात धर्म लिंग नाही, ते वैश्विक आणि निष्पक्ष आहे.’
ushaprabhapage@gmail.com
chaturang@expressindia.com