तुहिना कट्टी बीएनएचएसच्या विविध प्रकल्पांत स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करते आहे. मध्य आशियातील स्थलांतरित पक्ष्यांसाठी कृती आराखडा करण्याचा प्रकल्पही चालू आहे. तमिळनाडूतील जलपक्ष्यांच्या १२ अभयारण्यांसाठी त्या त्या ठिकाणच्या जलमय भूमीचा अभ्यास करून, तिथले पक्षिवैविध्य अभ्यासून, मानवी हस्तक्षेपाचे परिणाम लक्षात घेऊन वन खात्याला, शासनाला अभयारण्य व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाचे कामही तिने केले. तुहिनासारखे झपाटलेले लोकच निसर्ग संवर्धनाला आश्वासक दिशा देतील.
‘इंडियन बर्ड मायग्रेशन अॅटलास’ – हा नवाकोरा गुळगुळीत पानांचा, पक्ष्यांच्या देखण्या फोटोंचा, त्यांच्या स्थलांतराचे नकाशे, ऐतिहासिक नोंदी आणि अन्य माहिती देणारा ग्रंथ हाती आला. लेखकांमध्ये एक नाव वाचले तुहिना कट्टी. हा सुखद धक्का होता माझ्यासाठी. स्नेही असलेल्या सुषमा आणि संजय या गिर्यारोहक जोडप्याची तुहिना ही मुलगी. कालपरवाच तर दिल्लीच्या ‘द एनर्जी अॅण्ड रिसोर्सेस’ इन्स्टिटय़ूटमधून एम.एस्सी. करून चेन्नईजवळ कोडिक्कराईला पक्ष्यांच्या अभ्यासासाठी गेल्याचे कळले होते. काळ किती झपकन पुढे गेला आणि आज २०१८ मध्ये, अवघ्या ५-६ वर्षांत तुहिनाचे नाव स्थलांतरित पाणपक्ष्यांच्या क्षेत्रातील एक जाणकार अभ्यासक म्हणून घेतले जाते.
एम.एस्सी.ची दोन वर्षे आणि नंतरची सहा अशा एकूण आठ वर्षांत तिने प्रकल्पांवर अत्यंत चिकाटीने काम केले, अनुभव घेतला, ज्ञानाचे प्रचंड भंडार जमा केले आणि इतक्या अल्प अवधीत एका महत्त्वाच्या ग्रंथनिर्मितीत लेखक म्हणून तिचे नाव येते, हा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. २०१३ पासून ती ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (BNHS) च्या ‘जलमय भूमी’ प्रकल्पात काम करते आहे जिथे ती शास्त्रज्ञ आहे.
दिल्लीची ‘टेरी’ म्हणजे ‘एनर्जी अॅण्ड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूट’. तिथे अनेक विद्याशाखांचा अभ्यासक्रम असला तरी भर हवामानबदल, धोरण, तंत्रज्ञान आणि अनुशासन यावर. ८ पैकी फक्त २ पेपर वन्यजीव विषयाचे. सुरुवातीला तुहिनालाही आकर्षण होते ते औद्योगिक प्रदूषण या विषयाचे; पण ‘टेरी’तीलच एका वन्यजीव प्राध्यापकांनी- उपमन्यू होरे -यांनी वाइल्ड लाइफ शाखेतील संधी दाखवून मार्गदर्शन केल्यामुळे वन्यजीव संदर्भात नैसर्गिक संपत्तीचे व्यवस्थापन हा विषय तिने निवडला. भविष्यात त्यामुळे स्थलांतरित पक्ष्यांच्या अभ्यास क्षेत्राला तिच्या रूपात एक नवा तारा मिळणार होता.
एम.एस्सी.च्या काळात नेपाळ देशातील कोशी नदी टापूच्या वन्यजीव संरक्षित क्षेत्रात दलदलीमध्ये राहणाऱ्या फ्रंकोलीन या पक्ष्याचा, ते या भूभागाचा उपयोग कसे करतात आणि या क्षेत्रात मानवी हस्तक्षेपाचे तसेच नैसर्गिक बदलाचे त्याच्यावर काय परिणाम होतात याचा या मागास अनोळखी तराई भागात एकटीने राहून तिने अभ्यास केला आणि एम.एस्सी.च्या प्रबंधाचे काम केले. आक्रमक पाणम्हशी, रानटी हत्ती यांचा या भागात स्वैर संचार असे. लांडगेही सोबतीला असायचे. हे थ्रिल वाटायचे तिला. एम.एस्सी.नंतर तिला तिचे करिअर ठरवायचे होते. काम पक्ष्यांविषयी करायचे हे नक्की होते. ‘बीएनएचएस’चे ‘एस बालचंद्रन’ गेली अनेक वर्षे कोडिक्कराईला स्थलांतरित पक्ष्यांवर काम करीत आहेत. हे काम करावे असे तिला वाटले. तिने सरांशी पत्रव्यवहार केला. बर्ड बॅन्डिंग कोर्ससाठी स्वयंसेवक म्हणून गेलेल्या तुहिनाला तो समुद्रकिनारा, तिथे येणारे हिवाळी पाहुणे-पक्षी हे सगळे आवडूनच गेले. खरं तर शहरी तुहिनाला हा खेडवळ भाग पूर्ण अनोळखी होता. पाणपक्ष्यांच्या अभ्यासाला वेळेची मर्यादा नव्हती. त्या तीन वर्षांत वेदारण्यातील कोडिक्कराईच्या दलदलीच्या भूमीत तुहिना दिवसरात्र स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांच्या अभ्यासात रमून गेली. सकाळी जाळी लावायची ती पक्ष्यांसाठी, रात्री मात्र केवळ waders- पाण्यात चालत भक्ष्य मिळवणारे पक्षी – यांच्यासाठी थोडी वेगळी जाळी असतात. जाळ्यातून पक्षी काढून त्याची वजने, मापे घ्यायची, पायात कडी किंवा रंगीत टॅग लावायचे आणि निसर्गात सोडायचे. बीएनएचएसने तिच्यावर कामगिरी सोपवली होती ती पाणपक्ष्यांच्या हिवाळी आगमनासाठी हा भाग अनुकूल करायचा, त्यांनी इथे मुक्काम करावा, अंडी घालावीत, असे वातावरण निर्माण करायचं. थोडक्यात पाण्यातील सपाटीचा भाग waders म्हणजे पाणपक्ष्यांसाठी राहण्याजोगा पुनर्जीवित करायचा, त्यांच्यासाठी सुरक्षित करायचा. काम आवडीचे होते, ठिकाण आवडले होते; पण सुरुवातीला खेडूत, मागकाढे बुजायचे. बीएनएचएस संस्था तस्करीच्या विरोधात असल्याने, त्यांचा धाक वाटायचा. पक्ष्यांचा चोरटा व्यवहार चालणार नव्हता. गेली ३० वर्षे बीएनएचएसचे डॉ. बालचंद्रन तिथे जाळी लावून त्यात पक्ष्यांना पकडून त्यांच्या पायात खुणेची कडी घालून पुन्हा निसर्गात सोडत होते. कडीवाला पक्षी कालांतराने सापडला की आनंदून जायचे. त्यांच्या बर्ड बॅन्डिंग प्रशिक्षण शिबिराला बाहेरचे पक्षिप्रेमी यायचे. स्थानिक पारंपरिक माग काढणाऱ्यांना ते मदतीला घेत होते. त्यामुळे त्या लोकांना रोजगार मिळत होता आणि जाणता-अजाणता पक्ष्यांचे महत्त्व त्यांना कळायला लागले होते. तुहिनाला त्याचा फायदा झाला, खेडूत तिला मदत करू लागले. भाषेची अडचण होती, पण बाला सर होतेच की. ते मूळचे त्याच भागातले. तमिळ त्यांची भाषा. तुहिनाही लवकरच ही भाषाही शिकली. तिथली जीवनशैली थोडी वेगळी होती. भात, मासे, सांभर, भाजी, इडली-चटणी इतकेच प्रकार खाण्यात; पण लहानपणापासून निसर्गसंस्कार झाले असल्याने ती पटकन रुळली तिथे. तिच्याएवढी मुलगी असलेल्या एका कुटुंबातच तुहिना राहिली, त्यांची दुसरी मुलगी म्हणून.
याबरोबरच तमिळनाडूतील जलपक्ष्यांच्या १२ अभयारण्यांसाठी त्या त्या ठिकाणच्या जलमय भूमीचा अभ्यास करून, तिथले पक्षिवैविध्य अभ्यासून, मानवी हस्तक्षेपाचे परिणाम लक्षात घेऊन वन खात्याला, शासनाला अभयारण्य व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाचे कामही बीएनएचएसच्या वतीने तुहिनाने बाला सरांच्या हाताखाली केले. हिमाचल प्रदेशातील पोंग डॅम परिसरात अंडी घालणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा, बदकांचा अभ्यास करून, त्यांच्या गळ्यात कॉलर घालण्याचे प्रशिक्षण वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना द्यायची कामगिरीही तुहिना अनेकदा करते. प्रशिक्षण देणे हाही तिच्या कामाचा एक भाग आहे. अनुभवी बाला सरांकडे कोणताही प्रकल्प आला, की तो ते विश्वासाने तिच्यावर सोपवायचे. बाला सरांचा, पक्ष्यांचा अनुभव विद्वत्तेपलीकडे जाणारा. त्यांचा भारतातील तो उच्चांक ठरावा. बीएनएचएसने पूर्वीपासून म्हणजे १९२७ पासून हाती घेतलेल्या बर्ड बॅन्डिंग कार्यक्रमामध्ये १९८५ नंतर बाला सर आले आणि बर्ड रिंगिंग आणि त्याची नोंद, माहिती हे त्यांचे जीवनध्येय झाले. त्यांनी बॅन्डिंग किंवा रिंगिंग करून सोडलेल्या पक्ष्यांची संख्या हजारात आहे.
बीएनएचएसच्या बर्ड बॅन्डिंगची सुरुवात झाली एका योगायोगातून. मध्य प्रदेशातील धार संस्थेच्या राजाला पक्ष्यांची आवड होती. या छंदातून त्यांनी १९२७ मध्ये पक्ष्यांच्या पायात ओळखीसाठी कडी अडकवण्याची सुरुवात केली आणि बीएनएचएसनेही हा प्रकल्प स्वीकारला. तेव्हापासून २०१४ पर्यंत पक्ष्यांच्या स्थलांतराच्या १० लाखांहून जास्त नोंदी जमा झाल्या होत्या. त्यांची छाननी करून त्याची माहिती आणि पक्ष्यांच्या स्थलांतराचे नकाशे हे ग्रंथरूपात प्रसिद्ध होणे हे काम अवघड होते, मात्र संवर्धनासाठी नितांत गरजेचे होते. हे शिवधनुष्य एस. बालचंद्रन, तुहिना कट्टी आणि डॉ. रंजीत मनकदन यांनी पेलले. कोडिक्कराइला
एस. बाला यांच्याबरोबर पक्ष्यांना रिंगिंग करणे, बीएनएचएसने दिलेले काम म्हणजे पक्ष्यांसाठी मडफ्लॅट्स संरक्षित करणे याबरोबरच १९२७ पासूनच्या बर्ड रिंगिंगच्या नोंदी तपासून एकत्र करणे, त्यांच्यातून संदर्भ आणि अन्वयार्थ जुळवणे हेही चिकाटीचे काम ती रात्र-रात्र करीत बसे. बीएनएचएसच्या मुंबईच्या कार्यालयातून जुन्या, लठ्ठ वजनाच्या नोंदवह्य़ा कोडिक्कराइला नेऊन त्यातील नोंदी तिने जमविल्या. अशा प्रकारे या तिघांनी ‘इंडियन बर्ड मायग्रेशन अॅटलास’ हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. सारांशरूपाने १०० पक्षी प्रजातींना कडी अडकवून सोडल्यानंतर पुन्हा सापडलेल्या पाच खंडांतील-युरोप, आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटाक्र्टिका या खंडातील – २९ देशांतून प्रवास करून भारतात स्थलांतर केलेल्या ३ हजार पक्ष्यांच्या १०० प्रजातींचा समावेश या ग्रंथात केला आहे. पक्ष्यांचे मूळ स्थान, स्थलांतराचा मार्ग, सेंट्रल एशियन फ्लाय वेदरम्यान वाटेतील मुक्कामाची ठिकाणे, यावरची माहिती यात मिळते. पक्षी संवर्धनातील हा महत्त्वाचा मैलाचा दगड ठरावा. दक्षिण आशियात जगातील १३ ते १५ टक्के जैववैविध्य आहे. जलमय भूमीचेही खूप प्रकार इथे आहेत. ही ठिकाणे किती तरी लोकांचे पोट भरतात, त्यांना रोजगार देतात. अस्तित्व धोक्यात आलेल्या अनेकानेक पक्षी प्रजातींचे हे आसरे आहेत. १८२ प्रजातींचे पाणपक्षी इथे अंडी घालायला येतात, त्यांची पिल्ले इथे जन्म घेतात आणि पुन्हा स्थलांतर करतात. त्यांच्या संवर्धनासाठी ही जलमय भूमी वाचायला हवी, ही निसर्गप्रणाली जपायला हवी.
तुहिना बीएनएचएसच्या विविध प्रकल्पांत स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करते आहे. मध्य आशियातील स्थलांतरित पक्ष्यांसाठी कृती आराखडा करण्याचा प्रकल्पही चालू आहे. हिवाळ्यात महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर येणाऱ्या पाणपक्ष्यांच्या प्रवासाच्या मार्गाचा तिचा अभ्यास सुरू आहे. तसेच त्यांच्या मार्गातील मुक्कामाची ठिकाणे, त्याविषयी हितसंबंधी लोकांची मते जाणून घेणे गरजेचे असते. शासनाला धोरणात्मक, मार्गदर्शक तत्त्वे सुचविणे हेही करावे लागते. संवर्धनाचे अनेक नवनवीन उपक्रम, पक्षी अभ्यासासाठी अभिनव साधने, तंत्रज्ञानाचा उपयोग करणे असे कामाचे स्वरूप आहे, स्थलांतरित पक्षी अनेक देशांच्या सीमांवरून दीर्घ प्रवास करतात. म्हणून त्या त्या देशांनी संघटित होऊन सहकार्यातून पक्षी संवर्धन केल्यास ते अधिक परिणामकारक होईल. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहभागाची गरज आहे. पतीसह नुकतीच ती परदेशवारी करून आली. तेव्हाही तिचे डोळे आकाशातील पक्षिमित्रांचा वेध घेत होते. तुहिनासारखे झपाटलेले लोकच निसर्ग संवर्धनाला आश्वासक दिशा देतील.
ushaprabhapage@gmail.com
chaturang@expressindia.com