उष:प्रभा पागे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. लता अनंथ यांनी शेतीशास्त्रामध्ये एम.एस्सी. केले, तर पीएच.डी. पर्यावरण विषयात मिळवली. चळकुडी नदी परिसर आणि वाजाचल परिसरात अनेक कार्यशाळा घेतल्या, लोकांच्या निसर्ग संवेदना जाग्या केल्या. १९९८ मध्ये चळकुडी नदीवर आणखी एक बांध होणार ही बातमी त्यांना कळली. तो हितापेक्षा अहितकारक असल्याने त्यांनी शांततेच्या मार्गाने मोठे आंदोलन उभे केले आणि त्यात त्या यशस्वी झाल्या. १६ नोव्हेंबर २०१७ या दिवशी  डॉ. लता अनंथ यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने.

‘‘आपण आता हे स्वीकारायला हवे की,

नद्यांचे प्रवाह आपण हिरावून घेतले,

धरणांमुळे प्रवाह बंदिस्त झाले,

दुभंगले, सांधण्यापलीकडे

तरीही अधिकाधिक धरणे

बांधली जात आहेत

एकटय़ा मानव समुदायासाठी

आपल्या नद्या मरणपंथाला लागल्या आहेत,

उशीर होण्यापूर्वी त्यांना वाचवायला हवे,

त्यांना हवा आहे त्यांचा प्रवाह

निरंतन वाहण्यासाठी,

सजीव सृष्टीच्या हितासाठी.’’

डॉ. लता अनंथ आणि डॉ. परिणिता दांडेकर यांनी नदीसाठी केलेले हे निवेदन-

‘वाहता प्रवाह हा नदीचा हक्क आहे. तिचे आरोग्य आणि तिच्यावर अवलंबून असलेल्या सजीव सृष्टीच्या हितासाठी, तिचे क्रांतिकारक काम आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी, भविष्यातील पिढय़ांसाठी ते वाहते हवेत. त्यासाठी कसून प्रयत्न करण्याची आता वेळ आली आहे, तिचे प्रवाह अडवून न ठेवता, तिच्या धमन्यांतून ते वाहते ठेवण्याचे प्रयत्न करायलाच हवे.’

त्रिसूर-केरळच्या डॉ. लता या लढाऊ कार्यकर्तीची नाममुद्रा उमटली आहे, ती चळकुडी नदीच्या पाण्यावर! ६ धरणे या नदीवर आधीच असताना यावर आणखी एक धरण आणि जलविद्युत योजना होऊ घातली होती,

डॉ. लता यांनी नदीकाठच्या स्थानिक आदिवासी कडार जमातीच्या लोकांचा अभ्यास केला, त्या त्यांच्यापैकी एक झाल्या. त्यांचे जीवन सर्वस्वी नदीशी निगडित आहे हे त्यांच्या लक्षात आले. शिवाय नदीच्या प्रवाहाचाही त्यांनी अभ्यास केला. तो आधीच क्षीण होता. धरणामुळे ती पार कोरडी पडली असती. डॉ. लता यांनी त्यासाठी सुसंघटित प्रयत्न केले, विशेष म्हणजे याच आदिवासी समाजातील एक स्त्री पुढे आली आणि तिने हा लढा पुढे नेला. त्याला यश आले.

डॉ. लता, गेल्या वर्षीच २०१७ मध्ये, अगदी कालच्याच तारखेला- १६ नोव्हेंबरला वयाच्या ५१ व्या वर्षी तुम्ही या जगाचा निरोप घेतलात. तुमच्या कार्याचा, लढाऊ बाण्याचा, निसर्गाला न्याय देण्यासाठी तुम्ही केलेल्या धडपडीचा जागर या लेखातून मी करणार आहे. चळकुडीच्या नदीवर १० लाख लोक अवलंबून आहेत. वरच्या अंगाचे जंगल तोडून तिथे मळे झाले, नदीवर ६ धरणे झाली, नदीचे काही पाणी वळवून तामिळनाडूला दिले आहे. नदीवर दोन सुंदर धबधबे आहेत, नदीत वाळू उपसा प्रचंड, त्यामुळे नदीची पातळी समुद्रापेक्षा खाली गेली. मग समुद्राचे खारे पाणी आत येऊ नये म्हणून बांध घातला आहे. पेरियार नदीची कथा काही फार वेगळी नाही. ही केरळातील सर्वात मोठी नदी. हिचेही वरचे जंगल तुटले, पाणलोट भागात मळे झाले. त्यांच्यापासून भरपूर उत्पन्न मळेवाल्यांना मिळते. मनुष्यवस्ती खालच्या भागात. नदीवर १६ जलविद्युत प्रकल्प झाले. मुलपेरियार धरण बांधून त्याचे पाणी शेजारच्या राज्याला दिले गेले. पाणलोट क्षेत्राचा आणि नदीचा संबंध तुटला. २५० लहानमोठे उद्योग नदीकाठी, त्यांचे प्रदूषित पाणी सगळे नदीत. शिवाय वाळू उपसाही आहेच. पाणलोटाचे पाणी कमी झालेले, परिणामी नदीच्या मुखातून खारे पाणी आतपर्यंत येते. भरतपुझ्झा नदीचे खोरे भाताचे कोठार. या नदीवर सांस्कृतिक आणि धार्मिक ऊपक्रम मोठय़ा प्रमाणावर होतात. पण जंगले तुटली, पाणी कमी झाले. केरळमधील कुंती नदीचा अपवाद सोडला तर सगळ्या नद्यांवर धरणे झाली. पाणी कालव्यातून विभागले गेले. धरणाखाली पाणी रोडावले. वाळू उपसा तर सगळ्या नद्यांच्या नशिबी आहेच. पाण्याची गुणवत्ता रोडावली आहे. आता पावसाळ्यानंतर नदी कोरडी पडते. काठावरच्या लोकांनाही पाणी मिळत नाही अशी अवस्था. नदीचा प्रवाह तिच्या पाणलोट क्षेत्राच्या आरोग्याचा निदर्शक आहे. केरळला दोन मोसमांत ३००० मिली.पेक्षा जास्त पाऊस पडूनही नद्या आटल्या आहेत. समुद्रापर्यंत पोचतच नाहीत. कारण जंगले तुटली, जमिनीचा अयोग्य वापर, वाळू उपसा, प्रदूषण, नदीचे प्रवाह अनैसर्गिक पद्धतीने वळवणे, अतिक्रमण, पर्यटनाची चुकीच्या दिशेने वाढ, शहरांची वाढ होत असल्याने पाण्याची गरजही वाढती आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे कोणत्याही राज्यात याचा कोणताही अभ्यास झालेला नाही. डॉ. लता यांनी मात्र या समस्येचा पूर्ण मागोवा घेतला. वाहत्या नदीला आपले कार्य करण्यासाठी तिच्यात किती पाणी असणे गरजेचे आहे. प्रदूषण किती मर्यादेत नदी वहन करू शकते, तिच्यात किती प्राणवायू असणे गरजेचे आहे, नदीचे कार्य, तिची झीज आणि भरतीच्या पाण्यातील पोषक द्रव्ये, तिच्या काठावरील वनस्पतींशी तिचे नाते, त्यांच्यातील देवघेव, नदीला वाहते राहण्यासाठी असलेली पाण्याची गरज, पाण्याचा वापर आणि उपसा किती आणि पुनर्भरण किती होते आहे या सगळ्यांचा सांगोपांग अभ्यास त्यांनी केला. नद्या आणि तिच्या काठचे लोकजीवन, लोकांचे नदीशी असलेले भावनिक नातेही त्यांनी अनुभवले. पेरियार नदीच्या अभ्यासात त्यांना अनेक गोष्टी नव्याने कळल्या. पाण्यातील सामुचे प्रमाण कमी झाले की प्राणवायूचे प्रमाण कमी होते, पाण्याचे तापमान वाढते, पाण्यातील रेडिओअ‍ॅक्टिव्हिटी वाढते, प्रदूषित रसायनामुळे खेकडे आणि कोलंब्या यांचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांना दिसले, गोडय़ा पाण्यातील बरीच सजीव सृष्टी नष्ट झाली त्याचे कारण धरणे हे आहे हे त्यांनी पूर्ण अभ्यासाने दाखवून दिले. धरणांमुळे जंगले पाण्याखाली गेली. नद्यांकाठची वनसृष्टी पुराचे नियंत्रण करते, गाळ अडविते, जलचरांना पोषक अन्न देते, पाण्याचे बाष्पीभवन कमी करते. जमिनीतील पाणी घेऊन जास्तीचे पाणी नदीत सोडते. जमिनीच्या चुकीच्या वापरामुळे पाणी जमिनीत मुरत नाही. उपसा जास्त, पुनर्भरण कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे..  नदी ही एक स्वतंत्र निसर्ग प्रणाली आहे ही जाणीव ना शासनाला ना लोकांना. डॉ. लता आणि त्यांचा पती उन्निकृष्णन यांनी अनेक निसर्ग शिबिरे, कार्यशाळा यासाठी घेतल्या, यात वन खाते, प्रशासनातील अधिकारीही असत.

नदीला वाहण्याचा हक्क आहे की नाही याचा पुरेशा गांभीर्याने विचार झालेला नाही याचा त्यांना खेद वाटतो. नदी ही एकच अशी निसर्ग प्रणाली आहे की ती अन्य निसर्ग प्रणालींशी जोडलेली आहे, त्यामुळे नदीच्या प्रणालीमध्ये अडथळे आले की त्याचा परिणाम सगळ्याच निसर्गचक्रावर होतो.

नदी प्रणालीचे व्यवस्थापन कसे असावे हेही लता सांगतात.. नदीकाठांचे रक्षण, नदीकाठाची वनसृष्टी जोपासणे, डोंगरावरील ओढे, दलदलीचे भूभाग, तळी निसर्ग प्रणालींचे संरक्षण, आवश्यक तिथे पुनर्जीवन प्रयत्न यात स्थानिक घटकांचा समावेश असावा, कारण नदीशी संबंधित घटकांची ती संयुक्त जबाबदारी असणे हेच योग्य नाही का? मळेवाले, खाणवाले यांचा यात सहभाग असायला हवा असे त्या सांगतात. नदीच्या हक्कांसाठी काम करायची त्यांची प्रेरणाही त्यांच्या निसर्गप्रेमातून मिळाली. लहानपणापासून त्यांना वाचनाचे-निसर्गविषयक वाचनाचे अतोनात वेड होते. निसर्गाच्या सान्निध्यात राहता येईल असे काहीतरी त्यांना करायचे होते. निसर्ग साहस भटकंतीतून त्या जंगल, पर्वत, नद्या यांच्या निकट आल्या अन् तीच त्यांची आस बनली. जंगल, त्यातील आदिवासी आणि वन्यजीवन यांच्यातील परस्पर संबध, साहचर्य यांच्याकडे पाहायची दृष्टी त्यांना मिळाली. डॉ. सतीशचंद्र नायर हे पर्यावरणतज्ज्ञ होते. निसर्ग शिबिरात, कार्यशाळेत त्यांच्याबरोबर सतत चर्चा करताना निसर्ग, भवताल, नदी हा त्यांचा व्यासंग झाला, त्यांचे जीवन बदलून गेले, विचारांना दिशा मिळाली. शेतीशास्त्रामध्ये त्यांनी एम.एस्सी. केले, तर पीएच.डी. त्यांनी पर्यावरण विषयात मिळवली. नदीवर काम करायचे ठरले, त्यासाठी शासकीय कार्यपद्धतीचा परिचय व्हावा म्हणून त्यांनी केरळ राज्यात शेती खात्यात अधिकार पद भूषविले. तिथे त्यांनी सेंद्रिय शेतीला उत्तेजन दिले. सरकारी नोकरीचा अनुभव घेऊन, ठरवून त्या त्यातून बाहेर पडल्या. उन्निकृष्णन या आपल्या सहकार्याशी त्यांनी विवाह केला. तेही नदीचे संबंधित कार्यातलेच कार्यकत्रे आहेत. दोघांनी मिळून चळकुडी नदी परिसर आणि वाजाचल परिसरात अनेक कार्यशाळा घेतल्या, लोकांच्या निसर्गसंवेदना जाग्या केल्या. त्यातूनच नदीकाठी राहणाऱ्या कडार आदिवासींशी त्यांचा मित्रभाव निर्माण झाला. या सुमारास १९९८ मध्ये चळकुडी नदीवर आणखी एक बांध होणार ही बातमी त्यांना कळली. त्यांनी त्या संपूर्ण प्रश्नाचा अभ्यास केला आणि हा बांध हितापेक्षा अहितकारक असल्याच्या निर्णयाला त्या आल्या. आणि त्यांनी शांततेच्या मार्गाने मोठे आंदोलन उभे केले आणि त्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांनी दिलेला लढा, त्याची पूर्वतयारी आणि पार्श्वभूमी अतिशय रंजक, वाचनीय, मननीय आणि अनुकरणीय आहे. २००० पासून त्यांनी ‘नदीसाठी शाळा’ असा अभिनव उपक्रम सुरू केला. यामुळे मुलांना भवतालाशी असणाऱ्या त्यांच्या नात्याचा गाभा कळला.

लता यांनी ‘सायलेंट व्हॅली’तील

नियोजित जलविद्युत प्रकल्प आणि धरण निर्मिती यांचा साधकबाधक अभ्यास केला, त्याविरुद्ध जनमतही तयार केले, मात्र लढा टळला. कारण पर्यावरणाला बाधक ठरणारा हा प्रकल्प सरकारी पातळीवरच बारगळला. लता ‘सेव्ह वेस्टर्न घाट’ चळवळीत सहभागी होणे स्वाभाविक होते. त्यांच्या प्रयत्नामुळे पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी यामध्ये लक्ष घातले. त्यांनी ‘एक्स्पर्ट्स इकॉलॉजी पॅनल’ची घोषणा केली. त्यात लता सदस्य होत्या.

‘२०१४ मध्ये नव्याने सुरू झालेल्या ‘भगीरथ सन्माना’च्या त्या मानकरी झाल्या. डॉ. लता अनंथ यांचे व्यक्तिमत्त्व आपलेसे करणारे होते, त्यांच्या वागण्यात समतोल होता, त्यांचे बोलणे मृदू होते. त्या हसायच्या खूप. त्यांची कोणाशीही पटकन मैत्री  व्हायची, केरळमधील, केरळबाहेरील, देशातील आणि परदेशातील अनेक समित्यांवर त्यांची निवड नदी आणि पाणी प्रश्नावरील तज्ज्ञ वा सल्लागार म्हणून व्हायची. मात्र सदोष, देखाव्यासाठी केलेले पोकळ अहवाल यावर त्या सडकून टीका करायच्या. त्या वृत्तीने निर्भीड आणि निर्भय होत्या. प्रांजल आणि तळमळीच्या अभ्यासू तज्ज्ञ होत्या. त्यांच्यात संवादकौशल्य होते आणि नेतृत्वगुणही! ‘इंटरनॅशनल रिव्हर्स’च्या त्या दक्षिण आशियाच्या सल्लागार होत्या. आंतरराष्ट्रीय स्तरावरील संमेलनांसाठी त्यांना आमंत्रणे येत. अभ्यासपूर्ण मांडणीमुळे त्यांच्याकडे महत्त्वाची पदे होती. २०१२ मध्ये अशोक फेलोशिपसाठी त्यांची निवड झाली. २०१४ पासून मात्र कर्करोगाशी त्यांचा झगडा सुरू झाला. ३ वर्षे त्याच्याशी त्या झगडल्या, पण शेवटी त्याने डाव साधला. डॉ. लता, आयुष्याचा पट अर्ध्यावर सोडून तुम्हाला जावे लागले, पण तुमच्या कर्तृत्वाची लखलखीत मुद्रा तुम्ही मागे ठेवलीत. तुम्हाला आदरांजली.

ushaprabhapage@gmail.com