दिवाळीची परिमाणं बदललेली असताना आपणसुद्धा त्यानुसार काही बदल करणार का? निदान आवाज आणि मोठय़ा प्रमाणात धूर करणाऱ्या फटाक्यांना तरी आपण फाटा देणार का? हा महत्त्वाचा सवाल आपल्या सगळ्यांच्याच समोर ठाकलेला आहे.. करा विचार.
दि वाळीचा सण आता पूर्वीचा उरलेला नाही. पंचवीस-तीस वर्षांपूर्वीचा विचार केला तर दिवाळीत रोषणाईची आणि उत्सव साजरा करण्याची साधनं मर्यादित होती. त्यामुळे फटाके आणि दिवाळी यांचा घट्ट संबंध होता. म्हणून तर इवलीशी टिकली आणि लवंगी फटाका यांच्यातही मोठा आनंद होता. पण आता सारीच परिमाणं बदलली आहेत. फटाक्यांची सुरुवातच होते- हजाराच्या लडी, अतिशय आकर्षक बाण, अॅटम बॉम्बपासून. त्यांचा शेवट कुठे होतच नाही. त्याचा परिणाम म्हणजे कानठळ्या बसविणाऱ्या आवाजापासून ते गुदमरून टाकणाऱ्या हवेच्या भयंकर प्रदूषणापर्यंत समस्यांची वाढच झाली आहे.
खरंतर आता दैनंदिन जीवन जगतानाही इतका गोंगाट सहन करावा लागतो की, शांतता अशी उरलेलीच नाही. सगळीकडेच धूर, धूळ, धूलीकण इतके वाढले आहेत की, त्यांच्यामुळे फुफ्फुसं जणू भरून गेली आहेत. प्रकाशसुद्धा इतका वाढला आहे की शहरात तर झोपायच्या खोलीतसुद्धा संपूर्ण अंधार अनुभवायला मिळत नाही. प्रकाशाला चांगलं मानलं जात असलं, तरी मनाचं स्वास्थ्य, विश्रांती व शांततेसाठी अंधार त्याहून अधिक आवश्यक असतो. पण आता शहरांमध्ये सगळीकडेच इतका झगमगाट असतो की, त्याने दिवाळीतील आकाशदिव्यांचं आकर्षणही कमी केलं आहे.. हे बदल बरंच काही सांगून जातात.
दिवाळीची परिमाणं बदललेली असताना आपणसुद्धा त्यानुसार काही बदल करणार का? निदान आवाज आणि मोठय़ा प्रमाणात धूर करणाऱ्या फटाक्यांना तरी आपण फाटा देणार का?
दिवाळीत मुख्यत: मुलांची मागणी म्हणून फटाके आणले जातात. त्याबाबत पालकही जागरूक नसतात. त्यामुळे अजूनही फटाक्यांच्या उपद्रवाबद्दल फारसा विचार होत नाही. फार पूर्वी फटाके का वाजवत असतील? त्याची एक शक्यता म्हणजे त्यापासून निर्माण होणाऱ्या प्रकाशाचे आकर्षण होते. आणि त्रासदायक असला तरी धुरामुळे कीटक दूर पळून जावेत. आता तो काळ मागे पडला आहे. कीटकांना पळवून लावण्यासाठी इतर अनेक पर्याय असताना फटाक्यांमधील विषारी द्रव्यं वापरण्याची आज गरज नाही.
फटाक्यांची रोषणाई, त्यातील निळा, हिरवा, लाल, जांभळा, स्वच्छ पांढरा असे विविध रंग अगदी नजर खिळवून ठेवतात. पण ही रंगांची नवलाई फुकट मिळत नाही, त्यासाठी पर्यावरणाच्या आणि आपल्या आरोग्याच्या रूपातही मोठी किंमत द्यावी लागते. कारण या रोषणाईसाठी फटाक्यांमध्ये अॅल्युमिनियम, अॅन्टिमनी सल्फाईड, बेरियम नायट्रेट, तसेच, तांबे, शिसे, लिथियम, स्ट्रॉन्शियम, अर्सेनिक यांसारख्या घटकांची घातक संयुगं वापरली जातात. त्यांच्यामुळेच आपणाला फटाक्यांमधील सुंदर-चमकदार रंग पाहायला मिळतात. हे घातक पदार्थ वापरल्यावर त्यातून निघणाऱ्या धुराची किंमतही तशीच मोठी असणार. या फटाक्यांधून निघणारा धूर अनेक व्याधींना निमंत्रण देतो. दमा-अस्थमा असणाऱ्यांसाठी तो जीवघेणा ठरू शकतो. श्वसनाचे विकार निर्माण करतो किंवा ते आधीच असतील तर त्यांची तीव्रता वाढवतो. फुफ्फुसाच्या कर्करोगालाही हातभार लावतो. त्वचेसाठी तर घातक ठरतोच. या सर्व गोष्टी गर्भात असलेली मुलं, नुकतीच जन्मलेली नवजात मुलं आणि इतर लहान मुलांसाठी सर्वात घातक ठरतात. या धुरामुळे लगेचच इतके वाईट परिणाम झाले नाहीत, तरी डोळ्यांची जळजळ, अस्वस्थता, नैराश्य, त्वचेवर परिणाम होणं हे निश्चितपणे घडतं. एकत्रित फटाके वाजवल्या जाणाऱ्या ठिकाणी तर हवेत पसरणारा धूर इतका असतो की, धडधाकट माणसाचाही जीव गुदमरून जावा. दिवाळी हिवाळ्यात येत असल्याने थंडी असते, मग फटाक्यांचा धूर जमिनीलगतच अडकून बसतो. तो त्रास किती तरी पटीने वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतो.
फटाक्यांची रोषणाई केल्यामुळे वातावरणात काय परिणाम होतात, याचे अनेक अभ्यास झाले आहेत. ते विविध पर्यावरण विभाग, संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांचे निष्कर्ष इंटरनेटवरही पाहायला मिळतात. एक सर्वेक्षण सांगते की, तासाभराच्या रोषणाईनंतर परिसरातील हवेतील विविध घातक घटकांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले. त्यात स्ट्रॉन्शियमचं प्रमाण १२० पटींनी वाढलं. मॅग्नेशियम २२ पट, बेरियम १२ पट, पोटॅशियम ११ पट, तर तांब्याचं प्रमाण सहापटींनी वाढलं. या सगळ्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो, तसाच तो पर्यावरणावरही होतो. हवा प्रदूषित होते, हे घटक जमिनीवर साचून नद्या, तळ्यांसारख्या जलस्रोतांच्या प्रदूषणात आणखी भर पडते. इतकंच कशाला? वनस्पती, हवेतले बरे-वाईट कीटक, वटवाघळं, प्राणी-पक्षी यांच्यावरही फटाक्यांच्या धुराचा व आवाजाचा वाईट परिणाम होतो. ज्यांनी घरात कुत्रा पाळला आहे, त्यांना याची कल्पना येईल. फटाक्यांचा आवाज ऐकून या प्राण्यांची अवस्था होते, तशीच इतरही प्राण्यांची होते.. आपल्याकडे एकटय़ा लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरच उडवल्या जाणाऱ्या फटाक्यांचं प्रमाण पाहता त्याचं हवेच्या दर्जावर आणि प्राणी-वनस्पतींवर काय परिणाम होत असतील याची कल्पना करता येईल.
फटाक्यांच्या आवाजाबाबत तर काय सांगावं? शिवाय ते वाजवताना किमान भानही उरलेलं दिसत नाही. रुग्णालयं, शांतता क्षेत्रं यांचाही विचार होत नाही. घरोघरी वयस्कर मंडळी, आजारी लोक व लहान मुलांनाही त्याच्या आवाजाचा त्रास जाणवतो. आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या आवाजाच्या पातळीचा विचार केला तर टिकली आणि लवंगी फटाका वगळता काहीही वाजवता येणार नाही. कारण सर्वच फटाक्यांचा आवाज त्रासदायक ठरणारा असतो. अॅटमबॉम्बच्या प्रचंड आवाज किंवा शेकडो-हजारोंच्या लडीमुळे तर तात्पुरता बधिरपणा, अंशत: बहिरेपणा किंवा कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. त्यांच्यामुळे मानसिक स्वास्थ्य निश्चितपणे ढळतं. आधीच आवाजाच्या प्रदूषणाने अस्वस्थता, ताण-तणाव वाढलेले असताना फटाक्यांचा आवाज हा ‘दिवाळीचा बोनस’ ठरतो. फटाक्यांमुळे भाजणं, होणारे अपघात, लागणाऱ्या आगी हे वेगळेच मुद्दे.. वरवर दिसणाऱ्या रोषणाईचे हे परिणाम हट्ट करताना मुलांना कळतीलच असे नाही, पण पालकांना निश्चितच समजतील. त्यामुळे फटाके आणण्यापूर्वी व वाजविण्यापूर्वी हा विचार करावा, मगच त्याबाबत काय आणि किती हे ठरवावं.
हल्ली शाळांमधून या गोष्टींबाबत जागरूकता केली जाते. ही बाब पालकांच्या दृष्टीने सोयीचीच आहे. प्रदूषणाविषयीचे विचार कृतीत आणण्याची वेळ आलेली आहे, याचं भान प्रत्येकानेच ठेवायला हवं आणि ही दिवाळी फटाकेमुक्त घालवण्याचा निर्णय काही जणांनी जरी घेतला तरी पर्यावरणावर उपकारच होणार आहेत.
‘आवाज’ प्रदूषणाचा…
दिवाळीची परिमाणं बदललेली असताना आपणसुद्धा त्यानुसार काही बदल करणार का? निदान आवाज आणि मोठय़ा प्रमाणात धूर करणाऱ्या फटाक्यांना तरी आपण फाटा देणार का? हा महत्त्वाचा सवाल आपल्या सगळ्यांच्याच समोर ठाकलेला आहे.. करा विचार.
First published on: 10-11-2012 at 03:24 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noise pollution