वर्षानुवर्षांच्या शोधानंतर, ‘मोटली’ला शेवटी हिंदुस्तानीत आपला आवाज सापडला- इस्मत चुगताई यांच्या आणि उर्दूतील इतर लघुकथांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून. दरम्यान, रत्ना पाठक-शाह यांचा एका नव्या भाषेशी प्रेमसंबंध जोडला गेला… उर्दूशी! इस्मत चुगताईंमध्ये त्यांना एक आधुनिक, धाडसी आणि बंडखोर लेखिका सापडली. जवळपास शंभर वर्षांपूर्वी लिहिणारी अशी स्त्री, जी त्यांना आपली, जवळची वाटू लागली… आपले अपूर्ण विचार व कल्पनांना शब्दरूप देणारी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकविसावं शतक सुरू झालं होतं… आणि सुरुवातीलाच नसीर (नसीरुद्दीन शाह) आणि आमची कंपनी- ‘मोटली’ला एक नवीन दिशा मिळाली. इस्मत चुगताईंच्या उर्दू लघुकथांचं एक लहानसं इंग्लिश भाषांतर नसीरच्या हाती पडलं आणि त्यानं त्याला खिळवून ठेवलं. लगेच त्यानं मूळ कथा वाचून काढल्या आणि आपल्याला त्या नाट्यरूपांतरण न करता कथांसारख्याच सादर करायच्या आहेत असं ठरवून टाकलं. प्रत्येक गोष्ट वेगळा अभिनेता सादर करणार होता. तोच सूत्रधार आणि तोच सगळ्या भूमिका साकारणार… त्यातून ती गोष्ट प्रेक्षकांच्या मनात उभी राहणार. म्हणजे नाटक अगदी मूलभूत रूपात. एक कथा, एक अभिनेता आणि प्रेक्षक! अनावश्यक गोष्टींना थाराच नाही. ‘इस्मत आपा के नाम’ हे नावही ठरलं. मुंबईत- जिथे सर्वच भाषा त्यांच्या मूळ रूपापेक्षा वेगळ्या-अपभ्रंश स्वरूपातच दिसतात, अशा ठिकाणी इतकं उर्दू प्रेक्षकांना पचेल का, अशी शंकाच खरं तर माझ्या मनात आली. नसीरलाही याबद्दल फारशी स्पष्टता नव्हती. पण सादरीकरणाची जी सुटसुटीत पद्धत ठरली होती, ती आकर्षक वाटत होती. अनेक वर्षांपासून असं काही तरी साधं त्याला करायचं होतं आणि आता त्याला मुहूर्त मिळाला होता.

ऑगस्ट १९९९मध्ये आम्ही वाचन सुरू केलं आणि थोड्याच काळात खडबडून जाग आल्यासारखं झालं! उर्दूतले ‘ख’ आणि ‘झ’चे उच्चार मला व्यवस्थित जमत. त्यामुळे आपल्याला उर्दू व्यवस्थित येतंय अशा भ्रमात मी होते! पण त्याशिवाय एक ‘़ग’चा उच्चार आहे, तो भरपूर वेळा आणि कुठेही येत होता. आणि कफ झाल्यासारखा, घसा खरवडायला लावणारा ‘़क’ उच्चारताना तर मला सर्व सोडूनच द्यावंसं वाटत होतं. बरं, अमुक उच्चार, अमुक ठिकाणी असा करा, असा काही नियमही नव्हता. जणू जन्मजातच तुम्हाला ते माहीत असलं पाहिजे, अशी अपेक्षा दिसत होती. आपल्याला एखादी भाषा समजतेय, असं वाटत असताना ती नव्यानं शिकायची वेळ येते, तेव्हा फार बिचारं वाटतं. कारण आपण स्वत:चं मूल्यमापन करण्यात सपशेल चुकलोय, या भावनेनं धक्का बसलेला असतो. अशा माणसाच्या चुका सुधारणाऱ्याला त्याची टिंगल उडवून चालत नाही किंवा शिकवताना संयम सुटू देऊनही उपयोग नसतो. हा भाग मोठा अवघड, पण नसीरनं ते बऱ्यापैकी चांगलं जमवलं! नसीर सहा महिन्यांसाठी पॅरिसला होता आणि त्या काळात मी मुंबईत त्या कथेवर माझं माझं काम करत होते. हेही पथ्यावरच पडलं, कारण शंभरदा संहिता वाचताना ती अधिकाधिक स्पष्ट होत गेली. अभिनेत्यांना सर्वजण अशीच तयारी करायला सांगतात, पण तुम्हाला जर माझ्यासारखे संवाद पटकन समजत असतील, पाठ होत असतील, तर हा गृहपाठ अनावश्यक वाटतो. आता मात्र माझ्यासमोर हे पुराव्यानंच सिद्ध झालं, की एक चांगली संहिता चांगल्या गुप्तहेर-कथेसारखी असते. आधी अनेक चुकीचे अंदाज बांधत, हळूहळू तुमच्यासमोर ती उलगडत जाते. मला जो काही मोकळा वेळ मिळत होता, त्यात मी सतत ती संहिताच वाचायचे. ती पाठ झाल्यावर मी संवाद मोठ्यानं म्हणायला सुरुवात केली. कामाच्या ठिकाणी जाताना कारमध्ये, घरातली कामं करताना, व्यायाम करताना किंवा लोकरीचं विणकाम करताना… (तेव्हा मी विणायला सुरुवात केली होती. त्याचा मला मन एकाग्र करायला उत्तम उपयोग झाला, पण तो गबाळा स्वेटर नसीरला कधीही घालता आला नाही!)

नसीर २०००च्या सुरुवातीला परतला आणि आम्ही नाटकाच्या इतर बाबींवर काम करायला सुरुवात केली. त्याच्या डोक्यात नेपथ्याबद्दल अनेक कल्पना होत्या. मी या नाटकात ‘मुघल बच्चा’ ही कथा सादर करायचे. हाताच्या खुर्चीत बसून ही कथा सादर व्हायची आणि जेव्हा मी खुर्चीतून उठायचे, तेही नमाजापूर्वी हात-पाय-तोंड धुण्यासाठी (वझू) समोरच्या तख्तावर अंथरलेलं शिरशिरीत, पांढरं कापड, डोक्यावर मिणमिणता दिवा, थोड्या अंतरावर तेवणाऱ्या दुसऱ्या दिव्याचा प्रकाश, या सर्व प्रतिमा नसीरच्या मनात त्याच्या आईला रात्रीचा नमाज पढताना पाहून बसलेल्या होत्या. माझ्यासाठी ती शब्दांना साजेसा आंगिक अभिनय करण्याची संधी होती. मी लहानपणी आईच्या (दीना पाठक) अनेक वयस्कर, बडबड्या मुस्लीम मैत्रिणींना पाहिलेलं होतं. एकदा तर खुद्द इस्मत आपांनाही (इस्मत चुगताई) भेटले होते, अर्थात त्या भेटीतलं मला आता फारसं काही आठवत नाहीये. त्यांचे बारीक कापलेले पांढरे केस पाहून धक्का बसल्याचं तेवढं स्मरतंय! आणि त्यांचा ‘कॅट-आय’ चष्मा!

सुलताना जाफरी (लेखक अली सरदार जाफरींची पत्नी) आईची घट्ट मैत्रीण होती. त्यांच्या घरातल्या बायकांच्या गप्पा ऐकण्यात मी अनेक दुपार घालवल्यात. दिलीप कुमार यांची बहीण आपा जान यांच्याकडेही आम्ही अधूनमधून जात असू. आपा जानचं स्थान कुटुंबात मोठ्या प्रतिष्ठेचं होतं. घनदाट पांढरे केस, जाड, पण खूप कोरडे, फुटलेले ओठ आणि घोगरा, कुजबुजता, दु:खाची छटा असलेला आवाज… ‘मुघल बच्चा’मधली सूत्रधार ‘गोरी बी’ म्हटलं, की माझ्यासमोर आपा जान उभ्या राहतात. या सर्व स्त्रिया माझ्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. आणि नसीरच्या परिवारातल्या अनेक व्यक्तींना मी भेटले आहेच. त्यांची बोलण्याची पद्धत, विनोदाचा विशिष्ट प्रकारे वापर करणं… हे सगळं मी ‘गोरी बी’च्या जगात रंग भरताना वापरलं. त्यातून ती गोष्ट सादर करायची माझी एक वेगळी शैली तयार केली. नसीरचे कान फार तिखट आहेत. एखादा उच्चार जरा चुकला की त्यानं ते पकडलंच म्हणून समजा. त्या वेळी मला ही कटकट वाटत असे, पण त्याचाच फायदा झाला. आता त्याची किंमत कळते आणि त्याबद्दल मी त्याचे आभारच मानते.

२०००च्या मार्चमध्ये ‘इस्मत आपा…’चे प्रयोग आम्ही सुरू केले आणि २५ प्रयोग करावेत असं आमच्या डोक्यात होतं. त्याला मिळालेल्या प्रतिसादानं मात्र आम्ही थक्क झालो. सगळ्यांना ते नाटक आवडत होतं. त्यात उर्दूप्रेमी लोक होतेच, पण मजा अशी की जवळपास ७० टक्के प्रेक्षक ३५ वर्षांच्या आतले असत. अनेक जण सांगत की, ‘आम्हाला सगळे शब्द कळले नाहीत, पण गोष्ट समजली. भाषेचं सौंदर्य कळलं आणि इस्मत चुगताईंच्या धारदार कल्पना आकर्षक वाटल्या.’

इस्मत यांचं लिखाण किती आजच्या काळातलं आहे, याचं मलाही नेहमी आश्चर्य वाटलेलं आहे. अगदी एकविसाव्या शतकातही मानवी व्यवहारांचं त्यांचं आकलन आणि त्याचा वापर धक्कादायक वाटतो. गेल्या २४ वर्षांत ‘इस्मत आपा के नाम’चे अगणित प्रयोग आम्ही जगभर केले. नेदरलँड्समधलं Hague (हेग) शहर, जर्मनीतलं Bonn (बॉन), अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, पाकिस्तान… काही ठिकाणी तर अजिबातच हिंदी न समजणारे प्रेक्षक असत, मग तिथे सरटायटल्स (surtitles) किंवा नाटक सुरू असतानाच इंग्लिश, जर्मन वा बेल्जियनमध्ये केली जाणारी भाषांतरं, असा जामानिमा असे. आणखी एक शोध असा लागला की, लाहोर आणि इस्लामाबादमध्ये लोक पंजाबी बोलत होते आणि उर्दू त्यांना अवघड वाटत होतं… तर बंगळुरू आणि चेन्नईतल्या प्रेक्षकांना उर्दू व्यवस्थित समजत होतं. देशात प्रत्येक ठिकाणी प्रयोगानंतर तरुणांची मोठी गर्दी लोटत असे. ते थांबून भेटायचे. ‘भारतीय साहित्यातला एक नवा कप्पा आमच्यासाठी आता उघडला,’ म्हणून आमचे आभार मानायचे.

माझ्यासाठी मात्र या सर्व अनुभवातून शिकलेला धडा म्हणजे एकच नाटक वर्षानुवर्षं वेगवेगळ्या प्रेक्षकांसाठी करणं. मी तरी असं दुसरं उदाहरण पाहिलेलं नाही, की एखादी नाटक कंपनी एकच नाट्यप्रयोग इतकी वर्षं करतेय आणि त्यातून माणूस आणि अभिनेते म्हणून त्यांचाही सगळ्यांचा विकास होत गेलाय. अभिनेत्री म्हणून माझ्यात जशी भर पडत गेली, तसं माझं या नाटकातलं सादरीकरणही आणखी कसदार होत गेलं. प्रत्येक प्रयोगातून नवीन काही तरी समोर येणं, भाषेतली, हालचालींतली सहजता वाढत जाणं, हे थरारून टाकतं.

‘इस्मत’पूर्वीची एक रत्ना होती आणि ‘इस्मत’नंतरची एक रत्ना आहे. जणू अनेक वर्षं अंधारात चाचपडून, घिरट्या घालून झाल्यावर एक दरवाजा उघडला आणि मी त्या प्रकाशाच्या दिशेनं हिमतीनं पाऊल टाकलं! ‘इस्मत’नं मला कायमचं बदलून टाकलं. तिनं मला फक्त एक नवी भाषाच दिली नाही, तर नवा आत्मविश्वास दिला… आणि अखेर मला खरेपणानं अभिनय करता येतोय, ही भावना दिली!