वंदना बोकील – कुलकर्णी
एकशे त्रेचाळीस वर्षांपूर्वी, १८८२ मध्ये आपल्या मराठीत ‘स्त्री-पुरुष तुलना’ या पुस्तकातून ताराबाई शिंदे यांनी पुरुषप्रधान संस्कृती स्त्रियांवर किती घोर अन्याय करत आली आहे, हे अत्यंत कठोर, तर्कशुद्ध आणि चिकित्सक पद्धतीने सांगितले. आज इतक्या वर्षांनंतरही त्यातल्या बहुतांश गोष्टी बदललेल्या नाहीत. दुर्दैव म्हणजे या पुस्तकालाही त्या काळी पुरुषप्रधानतेचा फटका बसला, इतका की हे पुस्तकही तब्बल १०० वर्षं अज्ञातवासात गेलं. मात्र आज ते वाचताना स्त्रीवादी विचारांची नवी दृष्टी, नवे आयाम यातून मिळतात. स्त्री चळवळीसाठी पोषक अवकाश आपल्याच मातीत १४० वर्षांपासून असा तयारच होता…
ताराबाई शिंदे यांचं ‘स्त्री-पुरुष तुलना’ हे निबंधरूपी पुस्तक १८८२ मध्ये प्रकाशित झालं. ताराबाईंचं हे लेखन मराठी गद्याचा लखलखीत नमुना आहेच, मात्र त्यातून व्यक्त झालेले विचार समाजाचे डोळे खाड्कन उघडणारे आहेत. स्त्रीवादी विचारांचा इतका थेट विश्लेषक, मर्मग्राही आणि बेधडक चिकित्सक अभ्यास यापूर्वी निदान मराठीत तरी कुणी केल्याचे संभवत नाही.
१८५० मध्ये बुलढाण्याच्या प्रतिष्ठित जमीनदार मराठा कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बापुजी हरी शिंदे ‘सत्यशोधक समाजा’चे सदस्य होते. त्यांनी ताराबाईंना अभ्यास शिकवला, मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषा त्यांना अवगत केल्या. मात्र विवाहानंतर त्यांनी लेक-जावयाला आपल्या घरीच ‘बाळगले’ होतं. ताराबाई विवाहित असूनही हे लेखन आपल्या मूळ नावानं म्हणजे शिंदे या नावानं करतात. आपल्या नावाच्या मागे आपलं वैवाहिक स्थिती दर्शवणारे कु., सौ. असे कोणतेच शब्द त्या वापरत नाहीत. त्या काळाचा विचार केला की त्यांच्या या कृती किती आधुनिक, किती ‘स्त्रीवादी’ आहेत, हे जाणवतं. ताराबाई आणि स्त्री चळवळ यांचं नातं असं स्वत:चा नामनिर्देश कसा करावा, याचं स्वातंत्र्य घेण्यापासून सुरू होतं.
‘स्त्री-पुरुष तुलना’ या लेखनाला कारणीभूत झालेली पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी. सुरतेजवळ उलपाड गावच्या विजयालक्ष्मी या चोवीस वर्षांच्या ब्राह्मण विधवेवर भ्रूणहत्या केल्याचा आरोप ठेवून तिला मॅजिस्ट्रेटपुढे उभं करण्यात आलं. आपण मुलाला जन्म दिल्याचं आणि लज्जाभयास्तव मुलाचा जीव घेऊन ते बालक मोलकरणीकरवी कचराकुंडीत टाकून दिल्याचं तिनं कबूल केलं. या खटल्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. विजयालक्ष्मीच्या बाजूनं आणि तिच्या विरोधी दोन्ही प्रकारच्या मतांचा गलबला झाला. ही काही अपवादात्मक परिस्थिती नव्हती. अशा अनेक दुर्दैवी विधवा त्या काळात होत्या. अशा प्रकारच्या घटनेत फक्त स्त्रीला बदनाम करण्याची समाजाची दृष्टी पाहून ताराबाई अतिशय अस्वस्थ झाल्या आणि अत्यंत प्रक्षोभक शब्दांत त्यांनी स्त्रियांची ही कैफियत मांडली.
आपल्या या लेखनाची सुरुवात ताराबाई (त्यांच्याच मूळ शब्दात) कशी करतात पाहा, ‘…सर्व प्रकारचे साहास दुर्गुण स्त्रियांचेच अंगी वसतात किंवा जे अवगुण स्त्रियांचे अंगी आहेत तेच पुरुषांत आहेत किंवा नाहीत हे अगदी स्पष्ट करुन दाखवावे याच हेतूने हा लहानसा निबंध मी माझ्या देशभगिनींचा अभिमान धरुन रचिला आहे. यात अमुकच जाती किंवा कुळ यांकडे माझे मुळीच लक्ष नाही. स्त्री-पुरुषाची तुलना आहे.’’ अवघ्या स्त्रिया आपल्या ‘भगिनी’ आहेत, ही मोलाची जाणीव ताराबाई व्यक्त करतात. इतकंच नाही तर स्त्रियांमध्ये भेदभाव करण्याचा पुरुषी कावा त्या ओळखून आहेत. या पुरुषसत्तेला ताराबाई खडसावतात, ‘‘रांडा कोण? यांची काही सृष्टिविरहित उत्पत्ती झाली का? का ह्या कोणी दुसऱ्या देवाने केल्या? या तुम्हीच फसवून घराबाहेर काढलेल्या स्त्रियांपैकी असतात.’’ चळवळीत मानल्या गेलेल्या ‘भगिनीभाव’ या मूल्याची ही पहिली स्पष्ट जाणीव असावी.
या निबंधामधून त्यांनी स्त्रीचं आत्मभान जागवलं आहे. आणि ते करताना व्यापक सामूहिकता विचारात घेतली आहे, म्हणून त्या अगदी नि:संदिग्ध शब्दांत म्हणतात, ‘यात अमुकच जाती किंवा कुळ यांकडे माझे मुळीच लक्ष नाही.’ एकोणिसावं शतक संपण्यापूर्वीच एका आडबाजूच्या गावातल्या स्त्रीनं हे म्हणावं आणि त्यासाठी हेतुत: ‘निबंध’ हा विचारनिष्ठ आकृतिबंध निवडावा, याचं विलक्षण कौतुक तर वाटतंच, पण त्याहून अधिक दाद त्यांच्या प्रगल्भ विचारशीलतेला, प्रश्न उपस्थित करणाऱ्या त्यांच्या चिकित्सकतेला द्यावीशी वाटते. अशाच दूरगामी विचारशीलतेनं स्त्री चळवळीला बळ पुरवलं, हे सहज लक्षात येतं.
दुटप्पी मूल्यव्यवस्था असे शब्द जरी ताराबाईंनी वापरले नसले तरी त्यांना त्याची प्रखर जाणीव होती. त्या लिहितात, ‘जर बायकोला नवराच देव तर नवऱ्याची वागणूक देखील देवाप्रमाणेच पाहिजे. बायकांनी भक्ताप्रमाणे जशी भक्ती करावी तशी नवऱ्याने देखील त्यांजवर देवाप्रमाणेच ममता करुन त्यांचे सुख दु:ख जाणावे की नाही?’ ‘अरे, स्त्रिया नसत्या तर झाडाची पाने चावीत रानोरान भटकत फिरला असता,’ असं सुनावणाऱ्या ताराबाई अगदी सुधारकी पुरुषांच्या वर्तनातला पोकळपणा पाहत होत्या. म्हणूनच ‘सभा भरली म्हणजे तेथे काय, मोठी शालजोडी, लफ्फेदार पागोट्याचा झोक लावून, डौलाने जाऊन, पल्लाभर सुपारी, दहा गाडे विड्याची पाने, हार तुरे, एक हौदभर गुलाबी अत्तराचा सत्यानास करुन घरी यावयाचे एवढेच काय ते. दुसरे काही नाही. या अशा पोकळ सभा तर तीस पसतीस वर्षांपासून चालल्या आहेत. उपयोग काय?’ अशी अगदी घणाघाती टीका त्या करतात.
ताराबाई स्त्रीकडे माणूस म्हणून पाहत होत्या. त्यांना जशी तिची ताकद दिसते तसे तिच्यातले दोषही. अर्थात ज्या दुर्गुणांचा आरोप करत पुरुष तिला दडपून टाकत असतात, तेच दोष पुरुषांतही नाहीत का, हा प्रश्नही त्या निर्भयपणे विचारतात. केवळ पुरुषच तेवढे दुर्गुणी, असं एकांगी मत त्या देत नाहीत. चळवळीत ‘आमचा लढा पुरुषांविरुद्ध नाही तर पुरुषसत्तेविरुद्ध आहे,’ हे आवर्जून सांगितलं, बोललं जातं, त्यामागेही ताराबाईंनी दिलेलं हे भान उभं आहे, असं निश्चित जाणवतं. स्त्रियांमध्येही दुर्गुण आहेत, याची जाणीव त्यांना आहे. आणि तरी ‘स्त्रियांचे पायी दुर्दशा होऊन देशोधडी लागलेले पुरुष फार थोडे सापडतील; पण स्त्रिया किती सापडतील हे सांगवत नाही,’ याबद्दल त्या नि:शंक आहेत. अनेक पुरुष केवळ ‘हीनवर म्हणून स्त्रिया निघू निघू जात्या तर हे सर्व जग या उनाड बायांनी भरून गेले असते,’ असं अत्यंत मार्मिक मत त्या व्यक्त करतात.
घरकामाला मोल हवं, हा जो नारा स्त्री चळवळीने दिला, त्याचंही बीज ताराबाईंच्या लेखनात सापडतं. ‘तुम्हाला पैशाचे बळाने बायको म्हणजे काय माल असे वाटते. जसा एखादा गडी, चार रुपये दरमहा देऊन स्वयंपाक करण्याकरिता ठेवावाच लागतो की नाही? त्याप्रमाणे एकदाच हजारबाराशे खर्चून ही एक सत्तेचीच बटीक विकत घेतली असे तुम्हास वाटू लागते.’ किंवा ‘स्त्रियांना एक शब्द बोलण्याची, अगर चिमटीभर दाण्याची सत्ता नसावी काय रे?’ ही त्यांची वाक्ये पुरेशी बोलकी आहेत.
ताराबाईंनी आपल्या या निबंधात देव आणि धर्म यांचीही चिकित्सा निर्भयपणे केलेली आहे. पुराणे, रामायण, महाभारत, पांडवप्रताप, रामविजय या ग्रंथांचीही चिकित्सा करत हे ग्रंथ बऱ्याच अंशी स्त्रीस्वातंत्र्यविरोधी आहेत, प्राधान्याने पुरुषानुकूल आहेत, शास्त्रांचा आधार घेऊन चालत आलेल्या परंपरा स्त्रीच्या दु:खाला कारणीभूत आहेत, असं प्रतिपादन त्या करतात. पुरुष आणि स्त्री यांत पुरुषाला प्राधान्य देऊन स्त्रीला कनिष्ठ ठरवण्याचा कावा उघडच सत्तासंबंधांवर आधारित आहे. यामागे कोणतेही तर्कशास्त्र नाही, हे त्या निदर्शनास आणून देतात. समाजाने स्वीकारलेल्या मानदंडांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा ताराबाईंचा प्रयत्न गौरवास्पद आहेच, पण ही दृष्टी त्यांनी दिली हे त्याहून महत्त्वाचे आहे.
यावरून प्रेरणा घेत चळवळीने इतर सर्वच साहित्याची चिकित्सा करण्याचं धोरण स्वीकारलं. शोध घेऊन स्त्रीच्या रचना प्रकाशात आणल्या, नव्याने अर्थनिर्णयन करून नव्या संहिता रचल्या, त्यांचं पुनर्निर्माण केलं. त्या काळातील ‘मंजुघोषा’, ‘मुक्तामाला’ या कादंबऱ्या, ‘मनोरमा’ हे नाटक या साहित्यकृतींमध्ये स्त्रीचं चित्रण कसं केलं गेलं आहे, यांवर ताराबाई भाष्य करतात. ताराबाईंनी दाखवलेली ही दिशाही पुढे स्त्री चळवळींनी आत्मसात केली असावी. आणि त्या दिशेने बालसाहित्यापासून अनेक प्रचलित संहितांची, त्यातून प्रस्थापित झालेल्या स्त्रीच्या प्रतिमेची चिकित्सा केली. तिचं सोशीक, समर्पणशील आणि अबला हे रूप ठामपणे नाकारलं.
स्त्रियांच्या कर्तृत्वाविषयी, त्यांच्या लेखनाविषयी असणारी उदासीनता, इतिहासाने केलेली त्याची उपेक्षा यांकडे ताराबाईंच्या या लेखनानं वेगळ्या अर्थानं लक्ष वेधून घेतलं. इतिहास नेहमीच वरून खाली असे लिहिले जातात. तळाकडून वर – subaltern history -जाणाऱ्या इतिहासलेखन पद्धतीला अलीकडे सुरुवात झाली आहे. त्या दृष्टीने ताराबाई ‘स्त्री’ या उपेक्षित घटकाची दखल घेतात, त्याची कैफियत मांडतात आणि व्यवस्थेला धारेवर धरतात, ही गोष्ट किती ऐतिहासिक मोलाची आहे हे दिसते.
ही मांडणी फक्त धीटच नाही, ती तर्कसुसंगत आहे, परखड आहे आणि तिच्यामागे खरीखरी तळमळ आहे, सात्त्विक संताप आहे. चळवळीच्या दृष्टीने लेखन कसं असायला हवं, याचाही वस्तुपाठ एका अर्थी ताराबाईंनी घालून दिला आहे, असं म्हणायला हवं. निरीक्षणांना अभ्यासाची आणि चिंतनाची जोड हवीच, मांडणी तर्कशुद्ध हवी, परखड हवी. मात्र तिच्यात अस्सल कळवळा हवा. ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर देणारी हीच शैली सुरुवातीला चळवळीतील कार्यकर्त्यांनी आपलीशी केली. बधिर समाजाला जागं करायचं तर मोठा आवाज, चढा सूर लावणं ही काळाची गरज होती.
१८८२ मधलं हे पुस्तक स. गं. मालशे यांनी १९७५ मध्ये संपादित करून प्रकाशित करेपर्यंत कोणालाच याविषयी माहिती नसावी, याचं वैषम्य वाटतं. ताराबाई ज्या पुरुषी दडपशाहीचा उल्लेख करतात, तीच त्यांच्या या पुस्तकाच्या वाट्याला आली असावी. बंडखोरी दडपून टाकणं, हे एक प्रकारचं सामाजिक आणि राजकीय कारस्थान या पुस्तकाच्या वाट्याला आलं असं म्हणायला वाव आहे. एक स्त्री इतकं गंभीर, तर्कशुद्ध आणि धाडसी लिहू शकते यावर विश्वास नाही, म्हणून हे लेखन जोतिबा फुले यांचं असावं, असा प्रवादही त्या वेळी निर्माण करण्यात आला. ताराबाईंच्या विचारांचं अनुकरण होण्याच्या भयापोटी पद्धतशीरपणे या पुस्तकाची उपेक्षा करण्यात आली असावी. पुस्तक प्रसिद्ध झालं १८८२ मध्ये. १८८५ मध्ये महात्मा जोतिबा फुले यांनी ‘सत्सार’मध्ये त्याची शिफारस करणारा सविस्तर अभिप्राय लिहिला आणि १८८६ मध्ये ना. के. वैद्या यांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर हे पुस्तक शंभर वर्षांनी उजेडात आलं, ताराबाईंची तपशीलवार चरित्रात्मक माहिती मात्र अजूनही उपलब्ध नाही. अजून बरीच भुई नांगरल्याविण पडून आहे!
ताराबाईंच्या या लेखनामुळे काय साधलं? तर समाजात राजरोसपणे रूढ असणारं, स्त्रीच्या स्वातंत्र्याचा संपूर्ण संकोच करून टाकणारं पुरुषसत्तेचं कारस्थान प्रथमच अगदी ठळकपणे उघडकीस आलं! स्त्री चळवळीला नांगरण्यासाठी आवश्यक जमीन तयार झालेली होती…
vandanabk63@gmail.com