संपदा सोवनी
जागतिक महिला दिनानिमित्त ‘लोकसत्ता’ आयोजित ‘ ‘ती’ची भूमिका’ हा मराठी नाटकांमधील निवडक स्त्री भूमिकांच्या नाटय़प्रवेशांचा कार्यक्रम नुकताच मुंबईतील ‘रवींद्र नाटय़ मंदिर’ इथं रंगला. वेगवेगळय़ा काळात महत्त्वाच्या ठरलेल्या आठ नाटकांमधील स्त्री-भूमिका या कार्यक्रमात सादर केल्या गेल्या. प्रेक्षकांनी मोठय़ा संख्येनं उपस्थित राहून उत्स्फूर्त दाद दिलेल्या या कार्यक्रमाचा हा वृत्तांत-
प्रत्येक माणसाला आयुष्यभर निरनिराळय़ा भूमिका निभावाव्या लागतात. कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी, कामाच्या ठिकाणचे लोक, प्रत्येक ठिकाणी स्वत:ला ‘सादर’ करताना माणूस थोडा-थोडा का होईना, पण वेगळा असतो. आणि मग असते केवळ स्वत:बरोबर असतानाची एक प्रतिमा.. त्यात ती व्यक्ती स्त्री असेल, तर इतरांच्या आणि समाजाच्याही तिच्याकडून अनेक अपेक्षा असतात, तिच्याबद्दलची अनेक गृहीतकं असतात. कळत-नकळत, खुशीनं किंवा नाखुशीनं स्वत:शी जोडल्या गेलेल्या अशा तमाम गोष्टींचं ‘बेअिरग’ पकडून तिला एकेक पाऊल पुढे टाकावं लागतं. तिच्या वाटय़ाला येणाऱ्या भूमिका कधी आनंददायक, तर कधी खूप आव्हानात्मक. पण त्या सर्व भूमिकांचा मेळ साधण्यात गुंतलेली असते ती.. आपलं ‘स्व’त्व जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत!
मराठी रंगभूमीवर स्त्रीची भूमिका कायमच खणखणीतपणे मांडली गेली. अर्थात सुरुवातीला पुरुष नाटककारांच्या नजरेतून तिचे ताणेबाणे मांडले गेले. तिच्या व्यक्तित्वातल्या विविध आयामांना रंगमंचावर सादर केलं गेलं. सामाजिक नाटकांचा तर मोठा पट रंगभूमीवर दिसला. ‘एकच प्याला’, ‘संगीत शारदा’, ‘घराबाहेर’पासून ते थेट ‘पुरुष’, ‘शांतता, कोर्ट चालू आहे’, ‘चाहूल’अशी अनेक नाटकं मराठी रसिक प्रेक्षकांनी उचलून धरली.
‘ ‘ती’ची भूमिका’ या नाटय़प्रवेशांच्या कार्यक्रमातून ‘लोकसत्ता’नं मराठी रंगभूमीवरच्या अशाच काही नाटकांतील वेगळय़ा प्रयोगांना उजाळा दिला. ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’ प्रस्तुत या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते ‘झी मराठी’, ‘श्री धूतपापेश्वर लि.’, ‘एनकेजीएसबी कोऑपरेटिव्ह बँक लि.’ आणि ‘दोस्ती ग्रुप’. मुंबईत प्रभादेवी इथल्या ‘रवींद्र नाटय़ मंदिर’मध्ये नुकत्याच रंगलेल्या या कार्यक्रमाचं संयोजन ‘मीती क्रिएशन’च्या उत्तरा मोने यांनी केलं होतं, तर कार्यक्रमाची संहिता लिहिली होती
मुग्धा गोडबोले यांनी. संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी अत्यंत रसाळपणे केलं. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी या वेळी या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितलं, ‘‘तिची भूमिका असं म्हणताना त्यामागे एक न लिहिलं गेलेलं वाक्य असायचं, त्यानं लिहिलेली. पण आता तिची भूमिका तिनं लिहिलेली, तिनं ठरवलेली, तिची संहिता असलेली, तिचं दिग्दर्शन असलेली अशी आहे. हा बदल आपण सारे टिपतो आहोत. या बदलाचा ‘लोकसत्ता’ साक्षीदार आहे, किंबहुना ही भूमिका अधिक जोमाने रेटण्यात अधिक क्रियाशील सदस्य आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आजच्या या कार्यक्रमात निवडलेल्या भूमिकाही तशाच आहेत. समाजातला हा खूप मोठा बदल आहे. त्या बदलाचं सकारात्मक पद्धतीने स्वागत करायला हवं. त्या जाणून घेण्यासाठी तुम्हीही मोठय़ा संख्येनं उपस्थित आहात, तुमचे खूप धन्यवाद आणि स्वागत.’’
‘लोकसत्ता चतुरंग’च्या संपादक आरती कदम यांनी सर्वाचे आभार मानताना एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच मराठी स्त्री नाटककारांनी सामाजिक नाटकांद्वारे स्त्रियांचे प्रश्न मांडत, समाजाला त्यांच्या प्रश्नांकडे गंभीरपणे बघायला लावलं आणि मराठी रंगभूमीवर सामाजिक नाटकांची सशक्त परंपरा निर्माण केली, असं सांगितलं. प्रेक्षकांनी मोठय़ा संख्येनं उपस्थित राहून कार्यक्रमांतल्या नाटय़प्रवेशांचा आनंद घेतला.
कार्यक्रमाची सुरूवात प्रा. सुषमा देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘व्हय, मी सावित्रीबाई’ या नाटकातल्या प्रवेशानं करण्यात आली. शुभांगी भुजबळ आणि शिल्पा साने यांनी सावित्रीबाई फुले यांचा खंबीरपणा पुरेपूर दाखवत हा प्रवेश सादर केला. प्रवाहाविरुद्धच्या लढय़ात नवऱ्याच्या केवळ पाठीशी उभ्या न राहता नवऱ्याबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी पदर खोचून उभ्या राहिलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई या नाटय़प्रवेशातून प्रेक्षकांना पुन्हा भेटल्या. १९८९ मध्ये रंगमंचावर आलेलं हे नाटक सुरूवातीपासून त्याच्या सहजसुंदर मांडणीसाठी वाखाणलं गेलं आहे.
समाजासाठी झिजणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या पुरुषांच्या, समाजसुधारकांच्या पत्नी जुन्या काळी कोणकोणत्या अवघड प्रसंगांना तोंड देत असतील, त्यांना कोणती दिव्यं करावी लागली असतील, याची झलक ‘हिमालयाची सावली’ या नाटय़प्रवेशानं दाखवली. ज्येष्ठ समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांच्या अशिक्षित, पण अंगभूत शहाणपण असलेल्या पत्नीची- बयोची गोष्ट नाटककार वसंत कानेटकर यांनी ‘हिमालयाची सावली’मधून मंचावर मांडली होती. आपलं म्हणणं रोखठोकपणे मांडणारी, नवऱ्याच्या कामाचं कौतुक असतानाच त्यामागे आपल्याला काय काय सोसावं लागलं, हे स्पष्ट सांगणारी बयो अभिनेत्री श्रृजा प्रभुदेसाई यांनी उत्कटतेनं सादर केली. ‘केवळ समाजाचा नव्हे, तर आपल्या मुलांच्या भविष्याचा विचारही आई-वडील म्हणून आपण करायला हवा,’ असं कर्वे यांना पोटतिडकीनं सुनावणारी बयो साकारणाऱ्या शृजा यांना प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
यानंतर नाटककार विजय तेंडुलकर यांच्या ‘शांतता, कोर्ट चालू आहे’ या नाटकातला बेणारे बाईंच्या स्वगताचा अतिशय गाजलेला प्रवेश अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी सादर केला. १९६७ मध्ये मंचावर आलेल्या या नाटकानं त्या काळात अगदी नवीन असलेली आणि अजूनही तितकीच खरी वाटणारी एक स्त्री-भूमिका मराठी रंगभूमीला दिली. शाळेत शिकवणाऱ्या बेणारे बाई या मनस्वी शिक्षिकेला अभिरूप न्यायालयातल्या खटल्याचा सराव करताना बरोबरची मंडळी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात, तिच्या चारित्र्यावर बोट ठेवून तिला गिधाडांसारखं टोचून कोंडीत पकडतात, तेव्हा घायाळ पक्षिणीसारखी झालेली ही स्त्री या स्वगतातून समाजाला सुनावते, की ‘माझ्या चारित्र्याबद्दल बोलणारे तुम्ही कोण?’ जीव ओतून प्रेम करणाऱ्या, पण प्रत्येक वेळी पुरूषाकडून गैरफायदाच घेतल्या गेलेल्या बेणारे बाईंचं दुखावलं गेलेलं लहान मुलीसारखं निर्मळ मन विभावरी देशपांडे यांनी आपल्या अभिनयातून उलगडून दाखवलं.
या कार्यक्रमात एक अगदी वेगळी स्त्री भूमिका सादर केली गेली, ती विचारवंत हेलन केलर यांच्या जिद्दी शिक्षिकेची- अॅन सुलेवान यांची. जन्मत:च श्रवण आणि दृष्टी नसलेल्या हेलन केलर यांना महत्प्रयासानं, अनेकदा अपयश येऊनही हार न मानता शिकवणारी ‘टीचर अॅनी’ अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी सादर केली. नाटय़प्रवेश होता ‘किमयागार’ या गाजलेल्या नाटकातला. पल्लवी वाघ- केळकर आणि राधा धारणे यांनी त्यांना उत्तम साथ दिली.
१९९१ मध्ये रंगमंचावर आलेलं ‘चारचौघी’ हेही एक गाजलेलं नाटक. त्या वेळीही बाईनं आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार म्हणून घटस्फोट मागणं समाजात अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरेल असंच होतं. ‘नवऱ्यानं टाकलेली बाई’ हा शब्दप्रयोग रुळलेल्या आपल्या समाजात दुसऱ्या स्त्रीबरोबर प्रेमप्रकरण करून परत आलेला नवरा स्वीकारायचा की नाही, हे ठरवणारी मानी स्त्रीही असू शकते, हे या नाटकातल्या एका व्यक्तिरेखेनं मांडलं होतं. त्याच विद्या या व्यक्तिरेखेचा नाटय़प्रवेश अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी सादर केला.
‘मिस्टर अँड मिसेस’ हे साधारण दहा वर्षांपूर्वी रंगमंचावर आलेलं नाटक त्याच्या वेगळय़ा विषयामुळे लक्षवेधी ठरलं होतं. ‘रिअॅलिटी शों’चं वाढलेलं प्रस्थ आणि त्यांनी थेट माणसाच्या जगण्यातच केलेला प्रवेश या नाटकात दाखवला होता. नवरा-बायकोंमधल्या भांडणाचं, त्यांच्या ताणल्या गेलेल्या नात्याचं छुपे कॅमेरे लावून चित्रण करू देणारा अभिनेता नवरा आणि या ‘घटस्फोटाच्या रिअॅलिटी शो’बद्दल कळल्यानंतर मनातून कोसळलेली, पण त्यातही स्वत:ला सावरून नवऱ्यासमोर उभी राहणारी पत्नी या नाटय़प्रवेशात अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम यांनी समर्थपणे सादर केली. त्यांना साथ दिली अभिनेते
आशीष कुलकर्णी यांनी. यानंतर सादर करण्यात आलेल्या ‘प्रपोजल’ या नाटकातल्या रंगलेल्या प्रवेशाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. सुरेश चिखले यांनी लिहिलेल्या आणि २०१२ मध्ये रंगमंचावर आलेल्या या नाटकात लोकलच्या डब्यात घडलेल्या प्रसंगांचं चित्रण आहे. कॉलगर्ल म्हणून काम करणारी बिनधास्त राधा आणि शेवटच्या लोकलनं घरी निघालेला एक तरुण यांच्यातली संवादांची खुमासदार देवघेव अभिनेत्री आदिती सारंगधर आणि अभिनेता आस्ताद काळे यांनी सादर केली. फोनवर मुद्दाम नाजूक, नाटकी आवाज काढून बोलणारी, पर्सला ‘डिपार्टमेंटल स्टोअर’ म्हणत त्यातून अगदी हवी ती वस्तू काढून देणारी आदिती यांची ‘राधा’ प्रेक्षकांचं मन जिंकून गेली.
प्राजक्त देखमुख लिखित ‘संगीत देवबाभळी’ या २०१८ मध्ये मंचावर आलेल्या आणि अतिशय वाखाणल्या गेलेल्या नाटकाच्या प्रवेशानं कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. विठोबारायाची रखुमाई आणि तुकोबांची आवली या दोघींच्या संवादातून रंगणारं हे नाटक. शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांनी या नाटय़प्रवेशात रंग भरले. मराठी नाटकांनी स्त्रीची बाजू मांडण्याचा, तिचं मन उलगडण्याचा वेळोवेळी केलेला प्रयत्नच या नाटय़प्रवेशांमधून समोर आला. त्या-त्या काळी यातले काही प्रयोग आजच्याइतके पटकन पचनी पडले नसले, तरी स्त्रीच्या अस्तित्वाची दखल घ्यायला या प्रयोगांनी भाग पाडलं होतं. आपापल्या काळात पाय रोवून उभी राहिलेली ही नाटकं आजही तितकीच ताजी वाटतात याचं कारण बहुधा हेच असावं!
मुख्य प्रायोजक महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)
सहप्रायोजक झी मराठी, श्री. धूतपापेश्वर लिमिटेड, एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बॅँक लि., दोस्ती ग्रुप
chaturang@expressindia.com