कुठल्याही निरोगी व्यक्तीचे गाढ निद्रेतील श्वसन जर आपण तपासले, तर असे लक्षात येईल की, ती व्यक्ती स्त्री असो, पुरुष असो, कोणत्याही वयाची असो, त्याची श्वासोच्छ्वास क्रिया संथगतीने, लयबद्ध, सहजपणे चालू असते आणि या क्रियेच्या वेळी पोटाची वरखाली होणारी हालचाल दिसते. ही स्वस्थ व्यक्तीच्या गाढनिद्र्रेेतील श्वासोच्छ्वास क्रिया नेणिवेतील आहे ज्याला वैद्यकीय परिभाषेत इनवोलंटरी (Involuntary) असे संबोधतात. त्या गाढनिद्रेत व्यक्तीचे मनही कार्य करत नाही आणि शरीरही कार्य करत नाही. या क्रियेत श्वासपटल हा श्वासाचा प्रमुख स्नायू सहज आकुंचन पावल्याने श्वास फुप्फुसाच्या खालच्या रुंद भागात जातो. त्यामुळे गाढनिद्रेतील स्वस्थ व्यक्तीचे पोट वर उचलले जाते व श्वास सोडताना पोट पुन्हा पूर्वस्थितीत  येते. भारतीय तत्त्वज्ञानातील आध्यात्मिक शास्त्रात याच क्रियेला सोऽहम् अजपाजप अशी संज्ञा दिली आहे.
 कोणीही व्यक्ती दिवसभरात २१,४०० ते
२१, ६०० वेळा श्वासोच्छवासाची क्रिया करते. ती इतकी सहज व लयबद्ध चाललेली असते की, दिवसातून एकदाही आपले या श्वासोच्छ्वास क्रियेकडे आपले लक्ष जात नाही. श्वासोच्छ्वास क्रियेत काही अडथळा आला, दम लागला तरच तो डॉक्टरांकडे धाव घेतो. गाढ निद्रेतील स्वस्थ माणसाचे सोऽहम् श्वासोच्छ्वास क्रिया ही श्वासपटलाधारित श्वसनाचीच क्रिया आहे. सोऽहम् या शब्दातील स आणि ह ही अक्षरे काढली तर शिल्लक उरतो तो ॐ.
 शास्त्रशुद्ध ॐकार साधनेतून श्वासाचा प्रमुख स्नायू श्वासपटल बलवान होतो, सशक्त होतो आणि त्याची २४ तास सोऽहम् स्वरूपच श्वासोच्छ्वास क्रिया चालू राहते. ॐकार साधना ही श्वासपटलाधारित श्वसनाच्या पायावरच उभी राहिली तरच ते नादचतन्य साधक व्यक्तीला निरामय आरोग्याकडे घेऊन जाईल अन्यथा नाही. या आधीच्या लेखातून विशद केलेले ॐकाराचे अष्टगुण व त्यातून निर्माण होणारे सुपरिणाम श्वासपटलाधारित श्वसनानेच ॐकार उच्चारण झाले तरच साधक व्यक्तीच्या प्रत्ययास येतील.
 प्रत्येक व्यक्तीने खाली दिलेला प्रयोग घरी करून बघावा.
सतरंजीवर अथवा गादीवर उताणे सरळ झोपावे, उजवा हात नाभीवर पालथा ठेवावा, डावा हात छातीच्या अगदी वरच्या भागावर मध्यस्थानी ठेवावा, सर्व अंग शिथिल करून डोळे मिटावे व त्रयस्थ म्हणून आपणच आपल्या श्वासोच्छ्वास क्रियेचे अवलोकन करावे. श्वास खेचू नये, ओढू नये, कृत्रिम रीतीने मुद्दामहून घेऊ नये. आपण गाढनिद्रेत आहोत असा मनात भाव ठेवावा. या स्थितीत श्वासोच्छ्वास क्रियेच्या वेळी होणारी हालचाल पोटावर व छातीवर ठेवलेल्या पालथ्या पंजाने तपासावी.
 ती तपासताना जर पोट वरखाली होत असेल तर श्वासोच्छ्वास क्रिया बरोबर चालू आहे असे समजावे. परंतु छातीच्या वरच्या भागावर ठेवलेला डावा हात वर-खाली होत असेल तर मात्र आपली श्वासोच्छ्वास क्रिया चुकीची होत आहे असे समजावे.
पुढील लेखांकात आपण श्वासपटलाधारित श्वासोच्छ्वास क्रिया म्हणजे काय? आणि ॐकारस्वरूप वाग्यज्ञात म्हणजेच त्याच्या अष्टगुणी व शास्त्रशुद्ध उच्चारणासाठी ती का व कशी करायची हे जाणून घेऊ व समजावून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा