भारत माता की जय बोलो, जय बोलो..’’
सोमवार १० डिसेंबर २०१२च्या पहाटे असले आगळेवेगळे ‘मंगलप्रभात’ कसे काय कानावर पडते आहे बरे? या सुरांबरोबरच प्रचंड डोकेदुखी आणि थंडी भरून तापाने १०३ डिग्री पार केले. भावी डॉक्टर सुनेच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणी केल्यावर प्लेटलेट काऊंट कमी झाल्याने डेंग्यूने अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आणि ‘अरे छळतंय मला कोण?’ अशी माझी अवस्था झाली. माझ्या लेकाच्या लग्नाचे २३ डिसेंबरचे काऊंट-डाऊन सुरू झाले होते. भरीसभर प्लेटलेटचेही काऊंट-डाऊन ७४ हजारावरून ४६ हजार..आणि नंतर १३ हजारांवर येऊन ठेपले.
शेजारीपाजारी आजारी असलेल्या मला ‘चकटफू’ सल्ले द्यायला येऊ लागले..
‘कसा काय आला ताप? तेही तुमच्या मुलाचे लग्न इतक्याजवळ आले असताना?’
(‘आता मला काऽय ठाऊक? जसं काही इतर निमंत्रितांबरोबर मी त्या तापाला पण माझ्या मुलाच्या लग्नाची निमंत्रण-पत्रिका देऊन म्हटलं होतं.. ‘वरील विनंतीस मान देऊन अगत्य येण्याचे करावे-म्हणून!)
‘काय खाता? काय पिता?’
‘हातसडीच्या तांदळाची मूगडाळ घालून खिचडी आणि भरपूर पाणी पितेय मी.’
‘अरे बापरे, तांदूळ-मूगडाळीची खिचडी? निषिद्ध! आणि भरपूर पाणी तर अज्जिबात नको’- इति नॅचरोपॅथीवाली शेजारीण.
‘पिण्याचे पाणी ताजे भरून झाकून ठेवता ना?’ – खवचट शेजारीण.
आत्ता माझी सटकलीच..
(‘छे हो! आधी मी त्या पाण्यात मत्स्योत्पादन- नंतर कोलंबीची शेती करायचे- ती यशस्वी झाली म्हणून करतेय आता डासांची पैदास’ मनातल्या मनात चिडून – मी.)
‘तुम्ही किवी खा.’
‘किवी म्हणजे ऑस्ट्रेलियन पक्षी- त्याचे मांस?..’
..‘नाही.. नाही.. ते चिकूसारखे फळ!’
आता किवी खाऊ? की माझी (मीच कींव करू? अशा संभ्रमात मी.
इतक्यात ओळखीच्या आजीबाईंचा फोन, ‘बरी आहेस ना?’
..‘अं.. हो.. तशी बरी आहे, पण काल प्लेटलेट संख्या ४६ हजारांवर होती, आज १३ हजारावर आलेय.’
‘अरे व्वा! कालच्यापेक्षा कमी झालेत का? फारच छान. होशील हो- आत्ता लवकरच बरी होशील तू!’ आजीबाईंचा ‘आशीर्वाद.’
हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर रीतसर सलाइन-ऑक्सिजन-इंजेक्शन्सचा भडिमार सुरू झाला. सकाळ-संध्याकाळ लॅब-असिस्टंटस् (?) छे.. छे.. ‘कुत्ते,xxx मै तेरा खून पी लूँगा’ या धर्मेन्द्रजी स्टाइलने ब्लड टेस्टसाठी माझे रक्त चुसू लागले. त्यातच अधूनमधून व्हेन फ्लो आऊट होत असल्यामुळे कधी डाव्या तर कधी उजव्या मनगटाची चाळण झाली. एका भल्या पहाटे ‘मुझे तुम्हारे हाथ दे दो ठाकूर’..अशा गब्बरसिंगच्या आविर्भावात सिस्टर्स आणि आया माझ्या हातावरच्या आर्टरीचा शोध घेण्यासाठी झेपावले. हातांवर सुया टोचून टोचूनही आर्टरीतून रक्त मिळत नव्हते. त्यांची टीम विरुद्ध मी अशी घमासान हातापायी चालली होती आणि माझा अक्षरश: बळीचा बकरा झाला होता. ‘सत्त्वर पाव गं मला, भवानी आई रोडगा वाहीन तुला..’ मी आळवत होते. (बळीचाच बकरा देवीला साकडं घालताना कधी ऐकलंय तुम्ही?) पुष्कळ प्रतिकार करून शेवटी बकरा जसा स्वत:हून वेदीवर डोके ठेवतो, तशीच काहीशी ‘सरेंडर’ होत मी शेवटचा मांडवलीचा प्रस्ताव मांडला- ‘तुम्ही असं करा- आर्टरी शोधण्यापेक्षा माझा हातच कापून घ्या.. मग त्याचे तुकडे घ्या आपसात वाटून..सग्गळया टेस्टसाठी? माझ्या अशा वक्तव्याने माझ्या अज्ञानाची फक्त कींवच करण्यात आली. नंतर कळले- आर्टरीतून काढलेल्या ब्लडटेस्टने ऑक्सिजन लेव्हल तपासण्याचा प्रस्ताव आमच्या भावी डॉक्टर सूनबाईचाच होता. (ब्रूटस् यू टू?)
दिवसा सिस्टर्सची लगबग. ‘अगं, तिला ‘नेबू’ लावलं का? नेबू? की निंबू? हा काय प्रकार बुवा? मिरगी आल्यावर नाकाला कांदा लावतात असं ऐकून होते. पण निंबू? मग कळले ‘नेबूलायझर’चा हा शॉर्टफॉर्म!
सोनोग्राफीची आणखी विचित्र तऱ्हा. आता ‘तारांबळ, चंद्रबळ..’ हे खरे तर भटजींचे क्षेत्र. पण हे डॉक्टरमहाशय माझ्या ओटीपोटावरून प्रोब फिरवीत, समोरच्या स्क्रीनवर चक्कचंद्रावरचे खाचखळगे आणि त्यावरच्या पाण्याचा अंदाज घेत माझ्या फुप्फुसाबाहेरच्या पाण्याचे (इन्फेक्शनचे) निदान करीत होते. मुलाचे लग्न चार दिवसांवर आहे कळल्यावर मोठय़ा उदार अंत:करणाने लग्नाच्या दिवशी फक्त दोन तास लग्न अटेंड करण्याची अनुमती त्यांनी मला दिली. म्हणजे पॅरोलवर सोडलेल्या कैद्यासारखी लग्नात दोन तास हजेरी लावायची मी? त्यापेक्षा २३ डिसेंबरला फक्त रिसेप्शन आणि बुफे ठेवले तर.. पण मग लग्न? ते करू की एक महिन्याच्या मुदतीनंतर कोर्टात नोंदणी पद्धतीने! (अहो काय करणार? हल्ली आगाऊ भरलेले हॉलचे पैसे ‘नॉन रिफंडेबल असतात ना? म्हणजे आधी रिसेप्शन- मग लग्न- पण मग वधवूराच्या हनिमूनचे काय? अरेच्चा! कहानी में भलतीच ट्विस्ट! म्हणून मग माझी ही टिपिकल मध्यमवर्गीय आयडियाची कल्पना मी मनातच ठेवली.
‘आयसीयू’त गेल्यावर लेकाने (भावी नवरदेवाने) माझ्या सुरक्षेची व्यवस्था स्वत:च्या हाती घेतली. बाजीप्रभूप्रमाणे खिंड लढवीत तो हितसंबंधीयांना आत येण्यास असा काही मज्जाव करीत होता की, वाटलं..कसाबला ‘अंडा सेल’ची काय गरज होती? त्याच्या सुरक्षेसाठी एकटय़ा माझ्या लेकाला नियुक्त केले असते तर सरकार कोटय़वधी रुपये वाचवू शकले असते. तरीही गनिमी काव्याने काही हितसंबंधी आत घुसतच होते. त्यापैकी एकीने तर कमालच केली. माझ्यापुढे हात जोडून अश्रूभरल्या नेत्रांनी गदगदलेल्या स्वरात म्हणाली,-
‘‘ईश्वर तुला लवकरात लवकर..
(अरे..अरे..थांबा.. इतक्यातच काय मला सद्गती देताय?)
..बरे करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!’’
(हुश्श्.. सुटले एकदाची!)
दरम्यान, माझा सख्खा शेजारी-कम २२ वर्षीय दोस्त पायी चालत प्रभादेवीच्या सिद्धिविनायकला माझ्यासाठी साकडे घालायला गेल्याचे कळले. अरे व्वा! यन्ना रास्कला, माईंड्ड इट्ट. हे! हे!! रजनीकान्तजी/अमिताभजी ऐकताय ना? आपुनके भी फॅन्स है भाय्!
डाळिंब-किवी-ड्रॅगन फ्रूटस, पपयाच्या पानांचा रस आणि औषधोपचारांच्या जोरावर प्लेटलेट काऊंट दीड लाखांवर गेला आणि २१ डिसेंबरला मी घरी परत आले.
आज रविवार २३ डिसेंबर २०१२. माझ्या हातावर मेंदी नाही, पण इंजेक्शनच्या सुयांनी टोचून टोचून बनलेली ठिपक्यांची छान हिरवी-निळी रांगोळी आहे. आता मी त्या डासाला म्हणतेय, ‘एक मच्छर आदमी को xxx बना देता है’ हा नाना पाटेकरचा डायलॉग आता घिसापिटा झालाय. आता माझा नवा फंडा तू ऐकच. अरे, तुझ्या नाकावर..सॉरी.. सोंडेवर टिच्चून मी माझ्या लेकाच्या लग्नासाठी उभी आहे. पण तरीही थँक्स ! आज तुझ्याचमुळे मला कळतंय- स्टेजवर मला भेटायला येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यांच्या ओलावणाऱ्या कडा..ते अश्रू..एक ग्रॅम सोन्याच्या ‘स्वर्गीय’ दागिन्यांसारखे नाहीत, तर शंभर नंबरी सोन्यासारखे खरेखुरे- माझ्यावरच्या प्रेमाचे प्रतीक आहेत..आणि माझ्या नवरदेव सोनुल्याच्या डोळ्यात मी वाचतेय- ‘माय ममी स्ट्राँगेस्ट!’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा