‘एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले’ ही सुरेश भटांच्या कवितेची ओळ. शब्दांचं आपल्या आयुष्यात इतकं महत्त्व असतं. अशाच शब्दांचं हे सदर, फक्त तीन शब्दांचं. असे तीन शब्द जे माणसाला घडवतात, बिघडवतात, सांभाळतात किंवा संपवूनही टाकतात. ‘लोक काय म्हणतील?’ ‘झालं तुझ्या मनासारखं?’ ‘मीच का म्हणून?’ साधे, सोपे, नेहमी म्हटले जाणारे हे तीन शब्द, पण कित्येक जणांचे आयुष्य विस्कटवून टाकतात, तर काही माणसं हेच शब्द आयुष्यातून हद्दपार करतात.काय किमया करतात हे ‘फक्त तीन शब्द’ आपल्या आयुष्यात, हे सांगणारं सदर दर पंधरवडय़ाने.
कोणी भरून ठेविले तेथे शब्दांचे रांजण
बाळ रांगत रांगत घेई एकेक वेचून
किती उपासला जरी, परी भरीला रांजण
शब्द, अर्थ, प्रेम, भाव जणू मनीचा दर्पण….
शिगोशिग भरलेले, वैविध्यतेने नटलेले, सजलेले, सप्तरंगी मोठमोठाले शब्दरांजण आपल्या आजूबाजूला भरलेले असतात. त्यांचे अस्तित्व जाणवत नाही, तरीही भराभरा त्यातूनच उपसा करून शब्द ओतत असतो आपण. लहानपणी त्यांचा उच्चार, अर्थ, गांभीर्य आणि गंमत काही समजत नसतं. फक्त टिपायचे, रांजणातून उचलायचे कळू लागते आणि ओठ अलग होऊन ते भिडू लागतात. जसं वय वाढेल, समज येईल तसे उचलले जातात जाणीवपूर्वक. शब्द उचलता उचलता सलगी वाढते आणि संपूर्ण आयुष्य व्यापून टाकतात ते शब्द. किती जरी उपसले तरी शब्दरांजण रितं होत नाही.
भाषा कुठलीही असो, शब्द आहेत, अर्थ आहे. हवेत विरून जाणारे असले, तरी शब्दांना मोल आहे, महत्त्व आहे.
शब्द शब्दात मांडण्या बनविला शब्दकोश
शब्दाशब्दांतून पुसे दोघामधला तो रोष
अशी शब्दांची किमया, शब्द आहे एक कोडे
कधी सांगावया गोष्ट, एक शब्द ना सापडे.
नाही सापडला शब्द तर? शब्दांनीच व्यक्त व्हावे लागते का? उगीच नाही म्हणत, शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. हे सांगायलाही मनातल्या मनात शब्दराशी घालाव्याच लागतात. मन लोळण घेतं अशा राशींवर. ऐकलं नाही तर दुसऱ्याबरोबर आणि तीच जाणीव ओठ शिवून टाकते. समíपत भावना उत्कट होते आणि शब्दराशी कोसळते आतल्या आत. अशी नि:शब्दता खूप बोलकी असते. समजते फक्त ज्याची त्यालाच. कशाला हवेत प्रत्येक वेळी शब्द. हेच शब्द लाजेने लपून बसतात, तर काही शब्द सहज गिळले जातात. कधी काही तरी बिनसत जातं आणि मग रुसवा, राग आणि काही दिवसांचा अबोला. असं असलं तरी आत शब्द घुमतातच आणि परत हा दुरावा दूर करताना शब्दच येतात जिवाच्या आकांतानं धावत.
शब्दांचे धन अनमोल. मनातल्या मनाशी तर कायम विचार आणि संवाद चालू असतोच. दोघांचीही ताकद प्रचंड अफाट. एकमेकांना पूरक, सांभाळून घेणाऱ्या या दोन अतिमहत्त्वाच्या गोष्टी. शब्दांमुळे विचार बदलतात, विचाराबरोबर आचरण. कळत नकळत शब्द संस्कार करतात मनावर आणि त्यावरून व्यक्तिमत्त्व स्पष्ट होते. या हृदयीचे त्या हृदयी तेही शब्दांच्याच माध्यमातून. शब्दांइतके प्रभावी माध्यम नाही. अगदी एकटी बसलेली व्यक्ती मनातल्या मनात शब्द गुंफतच असते. जबरदस्त ताकद असते शब्दांमध्ये. काही शब्द प्रेमळ, काही लागट, काही मृदू, काही कठीण, काही लवचीक, काही ताठ, काही वाकडे, तर काही अनाकलनीय. शब्दांचा अर्थ समजणे, जाणून घेणे महत्त्वाचे. कधीकधी अर्थाचा अनर्थ होतो, निघतो किंवा काढलाही जातो, मग भलताच प्रसंग ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय ते शब्द कोण बोलत आहे, कुठल्या परिस्थितीत उच्चारला तो शब्द यालाही खूप महत्त्व येते.
शब्द खूप काही देऊन जातात आपल्याला. सारस्वतांकडे शब्द पाणी घालतात म्हणे. खूप मोलाची निर्मिती तिथेच होते. शब्दांना स्वरांचा साज चढतो. गीत, संगीत, अधिकार, आधार, ओलावा देणारे अलवार शब्द. ऊब मिळाल्याने येते उभारी, सावरलं जातं. कदर केली जाते शब्दांची. जपले, मानले, झेलले जातात. एखादी व्यक्ती दूर गेल्यावर जास्त जाणीव होते ती नसल्याची, तसंच होतं शब्दांचं. आठवत राहतात कायम अधूनमधून, तेव्हाच जर कोणी सांगितलेले ऐकले असते तर, माझं आयुष्य खूपच वेगळं असतं. आईवडील, मोठी माणसं सांगत असतात, पण तरुणाई त्याकडे दुर्लक्ष करते, नको ते घडते, तेव्हा हमखास वाटते, आईचं मी ऐकायला हवंच होतं. काय करावं बरं. तेव्हाही दुसरे शब्द धीर द्यायला धावून येतात.
मानवी नातेसंबंध आणि शब्द यांची भारी गट्टी. शब्दांना जसं वजन, किंमत असते तशीच धारही. शब्दांनी परिवार वाढतो, नाती जोडली जातात तशीच तोडली जातात. शब्द आणि मन यांची सांगड घातली आहे. कायम मन साशंक असतं, सांगू की नको, बोलू की नको, त्याला काय वाटेल, कसे बोलू आणि काय बोलू? बोलून मनाला दिलासा मिळतो. उलट भरलेल्या जखमांना खपली काढून कुरतडणारे शब्द रडायला लावतात. वेदना आणि औषध दोन्ही शब्दच. दोन्हीचीही जात, कूळ, वेळ, उच्चार आणि गाभाच वेगळा.
काय म्हणावे या शब्दांना. काळजाला भिडतात, आयुष्यातून उठवतात, शब्दांची टांगती तलवार डोक्यावर सदोदित लोंबत असते. तिच्या धाकापोटी अर्धमेलं झालं तरी त्या तलवारीला त्याचं सोयरसुतक नसते. शब्दांच्या तालावर नाचावेच लागते. काही शब्दांची भीती वाटते. गाळण उडते, बोबडी वळते, दातखीळ बसते. शब्द बाहेर पडत नाहीत. काही शब्द इतके कडवट, बोचरे असतात, की कडाक्याच्या थंडीतही कापरं भरावं. एखादी व्यक्ती शब्दाला पक्की असते, तर दुसरीला शब्द असे आले आणि गेले इतके सोपे साधे वाटतात. स्वत: दुसऱ्या कोणास दिलेल्या शब्दाला जगण्यासाठी पोटच्या मुला-मुलीच्याही भावनांचा विचारच केला जात नाही. केवळ एका शब्दाखातर काहीही पणाला लावणारे वीर असतात, तर काहींना त्यांच्या शब्दाबाहेर गेलेले अजिबात चालत नाही. कोणी एखादा अर्धा शब्दसुद्धा खपवून घेणारा नसतो. शब्द झेलणारे झेले कोणाकोणाचे शब्द झेलतात. शब्द फिरवून घोळून बोलणारे असतातच आजूबाजूला. एखाद्याची शाब्दिक चपराक रडायला लावते. कोणी तरी शब्दांनी चीतपट करतो. शब्द पाळावेच लागतात, स्वखुशीने नाही, तर जबरदस्तीने. लादलेले शब्द पाळताना यातना होतात. त्या शब्दांत व्यक्तसुद्धा करायच्या नसतात, फक्त भोगायच्या असतात. शब्द आत गिळले जातात. शाब्दिक केसांनी गळा कापता येतो. घरे यांनीच पेटतात. लकाकणाऱ्या पात्याची धार असते शब्दांना. कटय़ार घुसावी आणि कोथळा बाहेर काढावा इतके प्रभावी विष शब्दच देऊ शकतात. शस्त्राविना खून करायला शब्द हेच शस्त्र असते. शब्द हेच शस्त्र, अस्त्र, मंत्र, तंत्र.
कधी तरी शब्द नुसतेच असतात
पटकन आत घुसून आपलेच होतात.
कुणाशीही त्यांना बोलायचं नसतं
उगीचच आतल्या आत घुमायचं असतं.
शब्दसमुच्चयाचे वाक्य. छोटी, मोठी. बोलायला सोपी वाटतात आणि खूप काही सांगून जातात, म्हणून की काय बरीच छोटी छोटी वाक्ये आपण बोलतो. ‘काय तुझ्या मनात?’‘झालं तुझ्या मनाजोगं?’‘थोडा धीर धरावा’,‘यात किती गुंतायचं’, ‘आमच्याकाळी असं नव्हतं’, ‘लोक काय म्हणतील?’
उदाहरण म्हणून घेते. लोक काय म्हणतील? चांगलं की वाईट. समाजात राहतो ना. त्याचा विचार हवाच. सामाजिक बंधने असतातच. माझं काय मग? मन वेगळंच सांगतं. मला असंच करायचंय. मी ऐकणार नाही. लोकांना बोलू देत. त्यांचं काय जातंय? काही का म्हणेनात? असं म्हणून चालेल? नाही ना चालणार? म्हणून तर घाबरतो. मनाजोगे नाही करीत. भीती वाटते खूप. त्यापेक्षा नकोच तसं. माझं सोडून द्यावं? लोकांसाठी सारं काही? मनाविरुद्ध घडेल सगळं. जगात राहायचं ना. मग नाइलाज आहे. काही दिवसांनी विसरशील. जमेल रे तुला. धीर धरायचा असतो. खूप अवघड वाटतं? पण करायचं काय? आहे मार्ग दुसरा? असंच असतं रे. नको हळवा होऊस. सांभाळ जरा स्वत:ला. शेवटी काय केलंस? लोक काय म्हणतील. घाबरलास ना त्यालाच. सगळे असेच वागतात. जगावेगळा नाहीस तू.
शब्द शब्द शब्द. हे आहेत ‘फक्त तीन शब्द’, तीन शब्दांचं एकेक वाक्य, पण आयुष्याचा पट मांडणारं, एखाद्याचं जगणं सांगणारं. या सदरातून आपण पाहाणार आहोत या तीन शब्दांची किमया. शब्दांचं आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. शब्दांशिवाय कशालाच अस्तित्व नसतं. आजपासून दर पंधरवडय़ाने भेटायला येतील तुम्हाला फक्त तीन शब्द. किमयागारी तीन शब्द.
शब्दांचे भरले रांजण!
'एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले' ही सुरेश भटांच्या कवितेची ओळ. शब्दांचं आपल्या आयुष्यात इतकं महत्त्व असतं. अशाच शब्दांचं हे सदर, फक्त तीन शब्दांचं. असे तीन शब्द जे माणसाला घडवतात, बिघडवतात, सांभाळतात किंवा संपवूनही टाकतात. 'लोक काय म्हणतील?' 'झालं तुझ्या …
आणखी वाचा
First published on: 04-01-2014 at 07:17 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Only three words carving filled with words