विवाहोत्सुक वधू-वरांच्या एका खुल्या चच्रेत त्यांची निरनिराळी मतं नवीन पिढीनं आवर्जून मांडली होती. सूर असा होता की आमच्या निष्ठा वेगळ्या आहेत. विवाहपूर्व शारीरिक संबंध असतील आणि त्या व्यक्तीशी लग्न नाही झालं तरी आम्हाला त्यात वावगं वाटत नाही. आम्हाला प्रामाणिकपणा महत्त्वाचा वाटतो. पण ठरवून केलेल्या विवाहात एखाद्या मुलानं किंवा मुलीनं त्याच्या माहितीत प्रामाणिकपणे त्याच्या-तिच्या ब्रेक-अप बद्दल लिहिलेलं असलं तर ती स्थळं पाहिली जात नाहीत. कारण अजूनही लग्न संस्थेमध्ये पालकांचा पगडा जबरदस्त आहे.
गेल्या वेळचा लेख (१८ एप्रिल)वाचून लोकांच्या अनेक प्रतिक्रिया वाचायला, ऐकायला मिळाल्या. तर अनेकांनी आपली मनं मोकळी केली. त्यावरून गर्ल फ्रेण्ड आणि बॉय फ्रेण्ड हा खरोखरच संवेदनशील विषय आहे, असं लक्षात येतंय.

 अनेक वधू-वरांशी जेव्हा मला बोलायचा (खरं तर रोजच) योग येतो त्या वेळीही खूप मोकळेपणी वधू-वर बोलत असतात. त्यांच्या ‘ब्रेक-अप्स’बद्दलही ते बोलत असतात. पण अनेकदा बहुसंख्य मुला-मुलींना आणि त्याच्या पालकांना त्यांचे पार्टनर मात्र धुतल्या तांदळासारखे हवे असतात. मनामध्ये साशंकता असते. आमच्या संस्थेच्या फॉर्ममध्ये आम्ही ‘ब्रेक-अप्स’बद्दल विचारलेलं असतं. पण सगळीच्या सगळी मुलं ‘नाही’ असं लिहितात. मला नेहमीच असं वाटतं की भावनिक पातळीवर तरी किमान ५० टक्केजणांचे ‘ब्रेक-अप्स’ झालेले असतात. लहान वयातसुद्धा अनेकदा कुणी तरी आवडलेलं असतं. नंतरच्या आयुष्यातही भावनिकदृष्टय़ा अडकलेलं असलो तरीही त्यातून बाहेर पडायला खूप त्रास होऊ शकतो.
 मध्यंतरी संदीपचे वडील आले होते. एका मुलीशी संदीपचं लग्न जवळजवळ ठरत आलं होतं. त्या मुलीचे आई-वडील दोघेही गेली ४-५ र्वष कर्करोगाशी झुंजत होते आणि गेल्या वर्षी सहा महिन्यांच्या अंतराने दोघे जण वारले. तिला एक लग्न झालेली बहीण होती. तिचं वास्तव्य अमेरिकेत होतं. गेल्या वर्षांपासून ती एकटी राहत होती आणि एका मोठय़ा बँकेत काम करीत होती. संदीपचे वडील म्हणाले, ती एकटीच राहत आहे, तर तिची माहिती कशी मिळेल? कशावरून ती ‘चांगली’ असेल?
मी त्यांना म्हटलं,‘ तुमचा मुलगा गेली तीन र्वष अमेरिकेत आहे. त्याची खात्री तुम्ही कशी देऊ शकाल? शेवटी हा प्रश्न विश्वासाचा आहे.’
कुठलेही पालक आपल्या मुला-मुलींची खात्री देऊ शकत नाहीत किंबहुना त्यांनी ती देऊच नये, असं मला वाटतं. कारण मुलं-मुली घरी खरं बोलतातच असं नाही. आई-वडील मुलांच्या पातळीवर येऊन संवाद साधू शकत नाहीत, कारण ते त्यांच्या लग्नाच्या वेळी काय होतं यातच अडकलेले असतात. त्याबद्दलच ते बोलत राहतात.
अनेक वेळा आपण ज्या वेळी गर्ल फ्रेण्ड-बॉय फ्रेण्ड असा विषय बोलत असतो, त्या वेळी विवाहपूर्व शारीरिक संबंध हा विषय अपरिहार्यपणे येतो. काही महिन्यांपूर्वी एका प्रथितयश दिवाळी अंकाने या विषयावर एक सर्वेक्षण केलं होतं आणि त्याचे निष्कर्ष धक्कादायक होते. प्रामुख्यानं १८ ते २८ या वयोगटातील मुलांचं ते सर्वेक्षण होतं. लग्नाच्या वयातील मुला-मुलींपकी किमान ८० टक्के मुला-मुलींचा लग्नापूर्वी शारीरिक संबंध आला आहे. त्यात मुलं-मुली असं म्हणतात, की विवाहपूर्व शारीरिक संबंध येणं आता अपरिहार्य आहे.
 प्रसिद्ध लेखक राजन खान यांनी याबद्दल अतिशय संवेदनशील निरीक्षण नोंदवलं आहे. आता सध्याच्या काळात वयात येण्याचं वय अलीकडे आलेलं आहे. पूर्वी मुलगी साधारणपणे १३-१४-१५ या वयात मोठी व्हायची. पण आता हेच वय १० वर्षांपर्यंत खाली उतरलं आहे. पण मुला-मुलींचं लग्नाचं वय मात्र पुढं गेलं आहे. पूर्वी या दोन्हीमध्ये
७-८ वर्षांचं अंतर असायचं पण आता मात्र जवळपास हे अंतर दुप्पट झालं आहे. म्हणजे लैंगिक ऊर्मी तर मनात जागी होते आणि ती पूर्ण होण्याचं वय मात्र पलीकडे गेलंय.
आत्ता जी पिढी पन्नाशीच्या आसपास आहे, त्या वेळी लग्नापूर्वी चहापाणी झालं तरी चालेल पण जेवण हे लग्नानंतरच व्हायला हवं, लग्नानंतर नवऱ्याला द्यायची ‘ती’ भेट होती. थोडक्यात लैंगिक संबंध हे लग्नानंतरच सुरू व्हायचे पण आता दिवस बदलले आहेत. मुला-मुलींचं वडील पिढीनं, पालकांनी वारंवार ऐकून घ्यायची गरज आहे. काळाचे संदर्भ लक्षात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मध्यंतरी आम्ही ‘रिलेशनशिप ..मनातलं ओठावर’ या विवाहोत्सुक वधू-वरांच्या एका खुल्या चच्रेत नव्या पिढीने निरनिराळी मतं आवर्जून मांडली होती. सूर असा होता की आमच्या निष्ठा वेगळ्या आहेत. विवाहपूर्व शारीरिक संबंध असतील आणि त्या व्यक्तीशी लग्न नाही झालं तरी आम्हाला त्यात वावगं वाटत नाही. मात्र आम्हाला प्रामाणिकपणा महत्त्वाचा वाटतो. पण ठरवून केलेल्या विवाहात एखाद्या मुलानं किंवा मुलीनं त्याच्या माहितीत प्रामाणिकपणे त्याच्या-तिच्या ब्रेक-अपबद्दल लिहिलेलं असलं तर ती स्थळं पाहिली जात नाहीत. कारण अजूनही लग्न संस्थेमध्ये पालकांचा पगडा जबरदस्त आहे.
पंकज म्हणाला, की ‘हो, कॉलेजमध्ये असताना माझी एक गर्ल फ्रेण्ड होती. आम्ही चार र्वष रिलेशनशिपमध्ये होतो, पण नंतर आमचं नाही जमलं, त्यामुळे ब्रेक अप झालं, पण आता माझी जी कुणी बायको होईल, तिला मी याची कल्पना दिल्याशिवाय पुढं जाणार नाही. तिचंही काही असेल तर मीही स्वीकार करीन. पण माझे पालक म्हणतात की तू ही कल्पना दिलीस तर तुला मुलगी मिळणार नाही. पण मला तिला अंधारात ठेवून पुढं जायचं नाही. मला विश्वास जास्त महत्त्वाचा वाटतो.’
मुलं-मुली याबाबतीत एकमेकांना समजून घेतात असं मला वाटतं, पण जिथं पालकांचा प्रश्न येतो, तिथं त्यांना असं स्थळ नको असतं. निरनिराळ्या कल्पनांचं आणि आदर्शवादाचं ओझं घेऊन ही पालक मंडळी चालताना दिसत आहेत. आणि मग ‘आमच्या वेळी असं नव्हतं.’ हे पालुपद आळवताना दिसत आहेत. नवीन पिढीला पालक समजून घेण्यात कुठे तरी कमी पडताना दिसत आहेत. मुलांच्या लग्नात पालक त्यांची स्वत:ची एक्स्टेण्डेड मॅरेज पाहताना दिसत आहेत.
   लग्न संस्थेच्या बाबतीतही हे ‘लादणं’ होताना दिसतंय. रात्री ११ नंतर आजच्या पिढीचा दिवस सुरू होतो. लग्नाचं वाढतं वय, करिअरसाठीची धावाधाव यात मुलं-मुलींना लग्नाचा विचार करायला वेळ नाही. ज्या काही मित्रांची मत्रिणींची लग्नं झाली आहेत त्यांचे अनुभव त्यांना महत्त्वाचे वाटतात. शारीरिक संबंधांबद्दलचे त्यांचे विचार काय आहेत, हे पालकांनी ऐकायला उत्सुक असायला हवं. सगळं जग इंटरनेट नावाच्या खिडकीतून  मुला-मुलींना खुलं झालेलं आहे. माहितीचा स्फोट आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे. पण म्हणजे या मुला-मुलींना सगळं व्यवस्थित माहिती आहे, असं समजणं वेडेपणाचं ठरेल.
अनेक मुलं-मुली पोर्नोग्राफीची वेडी झालेली आहेत. ब्लू फिल्म्स सर्रास पाहिल्या जातात. आणि त्यामुळेच खरं काय, वास्तव काय याचा संभ्रम निर्माण होतो. ब्लू फिल्म्समध्ये दाखविलेली दृश्यं अतिरंजित असतात, तुकडे तुकडे जोडून केलेली असतात. पण याचं भान नसेल तर तेच खरं, तेच वास्तव असं मानलं जाऊ लागतं आणि वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होऊ लागतात. भावना, मानसिक गुंतवणूक यापेक्षा कृतीवर भर दिला जातो. शरीरधर्माची शास्त्रीय माहिती असणं आवश्यक आहे. इथं पालकांचे २५-३०-३२ पावसाळे उपयोगी पडायला हवेत. लग्नाचं वय उलटून गेलेलं असेल तर प्रत्यक्ष जेव्हा लग्न होतं, त्या वेळी मुलाकडून घाई केली जाऊ शकते, ते मुलीला समजतंच असं नाही. तिला ते आवडतही नाही. आणि तिथं कुठंतरी मिठाचा खडा पडायला सुरुवात होते.
समिता माझ्याकडे आली त्या वेळी सुरुवातीला तिला बोलताच येईना. ती समोर बसून हमसाहमशी रडत होती, तिला खूप अवघडल्यासारखं होत होतं. त्या रात्री काय काय झालं हे आठवून तिलाच अपराध्यासारखं वाटत होतं. ती म्हणाली, ‘हनिमूनला गेल्यामुळे तिथं आम्ही फक्तदोघंच होतो. मला काय करावं काही सुचत नव्हतं. आईला फोन करावा तर तिला जास्तच काळजी वाटणार. त्याच्याशी तर बोलणं सोडाच पण मला बघावंसंसुद्धा वाटत नव्हतं. मला त्याचा खूप राग आला होता. माझ्या सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झालाय. सगळं संपलंय आता.’
मी तिला म्हटलं, ‘काहीही संपलेलं नाही. ही गोष्ट अशी नाही की त्यातून मार्ग निघणार नाही. तू थोडी शांत झालीस की नक्की आपण त्यावर बोलूया. तोपर्यंत आईकडेच राहा.’ तिच्याकडून मी तिच्या सासरच्या घराचा आणि तिच्या नवऱ्याचा फोन नंबर घेतला..
त्यानंतर काय झालं? पाहूया पुढच्या लेखात..

Story img Loader