आशावादी वृत्ती आणि स्वप्नरंजन यातला फरक नक्की लक्षात ठेवायला हवा. आपलं जगणं सदासर्वदा गुळगुळीत हायवेवरून धावणार नाही हे तर आपल्याला माहीतच असतं. पण कधी कधी खड्डेदार भाग थोडे जास्तच येतात. अशा वेळी कामी येतो तो आशावाद. आपल्या नियंत्रणात काही गोष्टी तरी नक्कीच आहेत, यावर विश्वास ठेवणं म्हणजेच आशावाद!
आज सकाळी उठल्याबरोबर खूप सुंदर गाणं कानावर पडलं आणि मन नकळत तेच दिवसभर गुणगुणत राहिलं. ‘मुश्किल है जीना उम्मीद के बिना.. थोडासा मुस्कुराए.. थोडासा रूमानी हो जाये..’ पंचवीसएक वर्षांपूर्वी अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातलं हे एक अतिशय अर्थपूर्ण गाणं आहे! आणि माणसाच्या मनाची विलक्षण क्षमता दर्शवणारंही!
रोज आपल्या आयुष्यात कितीतरी छोटय़ा छोटय़ा खारट-तुरट गोष्टी घडत असतात. काही त्रास देतात, तर काहींचा उबग येतो. पण म्हणून रात्री झोपताना ‘उद्याचा दिवस उगवूच नये’ असं आपल्याला सहसा वाटत नाही. आपण मनाशी म्हणतो, ‘आजचा दिवस माझा नव्हता, पण उद्या नक्की बदलेल’! हा ‘उद्या’च आपल्याला पुढे पुढे जायला धक्का देत असतो. एका संस्कृत सुभाषितात फार सुंदर वर्णन केलं आहे, ‘आशा नावाची अशी चमत्कारिक बेडी आपल्या पायात असते, की जी घातलेला मनुष्य सुसाट धावतो आणि तो नसलेला मात्र एकाच जागी अडकून बसतो!’ हे शब्दश: खरं आहे.
‘आशा’ नावाचं हे काय रसायन आहे? ते आपल्यात जन्मजात असतं का कमवावं लागतं? आशा आणि स्वप्नरंजन (फॅन्टसी) एकच आहे का? आशावादी असण्याचा आपल्या रोजच्या जगण्यावर कसा परिणाम होत असतो? जगभरातील अभ्यासक यावर काम करत आहेत, त्याचं महत्त्व अधोरेखित करत आहेत.
चैतन्य एक उच्चशिक्षित, तरुण आहे. इतक्या साऱ्या वर्षांत त्यानं जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या परीक्षा दिल्या तेव्हा तेव्हा त्याला स्वत:च्या यशाबद्दल कधी विश्वास वाटला नाही. ‘पेपर’ कसे गेले या प्रश्नाला त्याचं उत्तर असायचं, ‘काही खरं नाही! मागच्या वेळी खूप अवघड होता’ सुरुवातीला काही वर्षे त्याच्या या ‘निराशा’ वृत्तीमुळे खूपच खडतर गेली. काही परीक्षा पुन:पुन्हा द्याव्या लागल्या. समुपदेशकानं जेव्हा त्याला समजावलं की, ‘तुझ्या नकारघंटेचा परिणाम तुझ्या अभ्यासावर, एकाग्र होण्यावर होतोय. काहीच न करता सगळं उत्तम होईल असं मानायचं कारण नाही हे खरं. पण जे करतो आहेस, त्यावर विश्वास ठेव आणि खूप पर्याय असतात त्यातला आपल्याला जो उपयोगाचा वाटतो, त्यावर विश्वास ठेवून तो निवडायचा आणि पूर्ण प्रयत्न करायचे, असं ठरतं.’ चैतन्यनं अवघड वळणावर ते ऐकलं आणि विचारांची दिशा बदलली. ‘काही खरं नाही’च्या ऐवजी ‘जमू शकेल मला. प्रयत्न तर करतो’ अशी वाक्यं मनात म्हणायला सुरुवात केली आणि मग हळूहळू त्याची त्यालाच कामाची दिशा कळत गेली. आज तो व्यवस्थापनशास्त्रातला एक प्रस्थापित तज्ज्ञ म्हणून ओळखला जातो. निराशेचं तण वेळीच उपटून ‘आशेचं’ बी विचारपूर्वक पेरलं गेलं नसतं तर?
आशावादी वृत्ती आणि स्वप्नरंजन यातला फरक मात्र नक्कीच लक्षात ठेवायला हवा. आपलं जगणं सदासर्वदा गुळगुळीत हायवेवरून धावणार नाही हे तर आपल्याला माहीतच असतं. पण कधी कधी खड्डेदार भाग थोडे जास्तच येतात. अशा वेळी कामी येतो तो आशावाद. आपल्या नियंत्रणात काही गोष्टी तरी नक्कीच आहेत, यावर विश्वास ठेवणं आणि This too shall pass!!’ उक्तीचा विचार जागा ठेवणं म्हणजे आशावाद! जे पूर्णपणे ढगात आहे, तथ्याच्या काडीइतकंही जवळ नाही, असं काहीतरी घडण्याची इच्छा म्हणजे स्वप्नरंजन, जे फक्त वस्तुस्थितीपासून पळवाट काढण्यासाठी माणूस करत राहतो. त्यातून स्वप्नांची नशा चढणं आणि ती उतरल्यावर पूर्ण असाहाय्य वाटणं अशा चक्रात अडकायला होतं. कारण जे घडायला हवं असतं ते ‘इतरांनी’ घडवून आणावं अशी एक छुपी अपेक्षा असते. (उदा.- मला दहा लाखांची लॉटरी लागावी/ विचारल्याबरोबर तिने मला ‘हो’ म्हणावं, ऑफिसमध्ये माझा जंगी मान-सन्मान व्हावा, अपयशामधून मी एकदम यशोशिखरावर पोचावं इत्यादी) पण त्यासाठी स्वत:च्या हातात करण्याजोगं काय आहे, याकडे सरासर दुर्लक्ष असतं. मग हा ‘पोकळ’ आशावाद आपल्याला ‘समस्यांची’ तीव्रता जाणवूच देत नाही. एखाद्या घसरत्या क्षणी जेव्हा वस्तुस्थिती धाडकन समोर उभी राहते तेव्हा खचून जायला होतं, हातातली सगळी सूत्रं सुटण्यासारखी वाटतात.
आशावादी माणसाला हे पक्कं माहीत असतं की आपल्याला कुठे जायचं आहे. परिस्थिती कठीण असली, प्रतिकूल असली तरी दगडावर कुठे हळूहळू घाव घालत राहायचं, ते माहीत असतं. (एका घावात दगड फुटणार नाही, हेसुद्धा!) त्यामुळे त्याचा ‘प्रयत्नवाद’ त्याला काम करत राहायला प्रवृत्त करतो. अनूताई वाघांचं ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ हे पुस्तक खूप खूप वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. आदिवासी भागातील पाडय़ापाडय़ांवरच्या मुलांच्या आयुष्यात जाणिवेचा प्रकाश यावा, म्हणून केलेली अविश्रांत धडपड आठवली. किती आशावादी राहावं लागलं असेल त्यांना! पण ती आशा जिवंत ठेवली. कधीतरी मुलं शिकायला लागतील, खेळतील, बाहेरच्या जगाचं दार किलकिलं करतील म्हणून किती दिवस त्यांनी अविश्रांत कष्ट केले!
सामाजिक आयुष्यात काय किंवा व्यक्तिगत आयुष्यात काय आशावादाला पर्यायच नाही. विद्याला जेव्हा समजलं की, स्तनांत छोटीशी गाठ लागते आहे, तेव्हा आधी एकदम घाबरायला झालं. पण मग तिने विचार केला की आता जर हा कर्करोग असेलच तर आपण या क्षणी परतवू तर शकत नाही. योग्य उपचार घेणं, डॉक्टरांवर विश्वास ठेवणं आणि यातून सहीसलामत बाहेर पडायचंच या इच्छाशक्तीला ताणणं हे आपण नक्की करू शकतो. शिवाय डोळ्यांपुढे लेकाचं सहा महिन्यांनंतर ठरलेलं लग्नंही होतं. ‘तोपर्यंत आपण ठणठणीत होणार’ या विचारावर पक्का भरवसा होता तिचा. तिच्या या आशावादामुळे तिच्या शरीराच्या प्रतिक्षिप्त क्षमताही ट्रिगर झाल्या. उपचारांना उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याच्या अगदी उलट प्रतिमाच्या बाबतीत घडलं. साध्या ब्राँकायटिसच्या आजाराला ती इतकी घाबरली की तिला वाटायला लागलं आता आपल्याला न्यूमोनियाच होणार. प्रत्येक गोष्टीत तिची तक्रार, कुरकुर सुरू झाली. ‘माझ्या बाबतीत आजपर्यंत कधी बरं घडलंच नाही, आताही तसंच घडणार!’ या ‘निर-आशावादा’नं मनात पक्कं घर केलं. त्यामुळे जो खोकला ८-१० दिवसांत बरा व्हायचा तो तीन महिने लांबला- तोही लाख-दीड लाखाची (तपासण्या-उपचारांनी) फोडणी देऊनच.
काही काही उद्योग व्यवसायांच्या बाबतीत तर ‘आशा’ कायम जागी ठेवणं अगत्याचं असतं. जिथे जिथे आर्थिक किंवा मानसिक जोखीम असते, तिथे वस्तुस्थितीची दखल घेत तरीही ‘उद्या चित्र पालटू शकतं’ असं म्हणत ते पालटण्यासाठीची स्वत:ची कृती चालू ठेवावी लागते. मग ते वैद्यकीय क्षेत्र असेल, शेअरबाजार असेल किंवा विशेष गरजा असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात जमेल तेवढं आणण्याची धडपड असेल!
आशावादी असणं म्हणजे अजून काय? तर संधी घेण्याची आणि देण्याचीही तयारी असणं! ‘मी अजून एकदा यूपीएससीचा प्रयत्न नक्की करणार’ असं म्हणणारा विद्यार्थी किंवा ‘एकदा दोनदा अनुत्तीर्ण झालास तरी परत देऊन तर बघ’ असं म्हणणारे पालक असोत- त्यांचा स्वत:वरचा आणि दुसऱ्यावरचा विश्वास दृढ असतो म्हणून ‘आशा’ जोपासता येते.
काही पालक मुलांच्या बाबतीत इतके भयंकर निराशावादी असतात, की समुपदेशकांनाच त्यांना समजावताना नाकी नऊ येतात! ‘तो सुधारणेच्या पलीकडे आहे, ‘तिला या जन्मात काही करणं जमणार नाही.’ ‘हा हा कोर्स हट्टानं घेतलाय- आता बसलेत बोंबलत!’ अशा टिप्पण्या इतक्या बिनदिक्कत येतात की मुलांच्या मनातली आशासुद्धा करपून जावी! असे पालक मग नकळत मुलांच्यामध्ये आपल्या ‘निराशावादाचे व्हायरस सोडत असतात. ‘मिस कुरकुरे’ होण्याचं प्रशिक्षणच म्हणाना!’
काही प्रमाणात ‘आशावाद’ हा आनुवंशिक असतो तर काही प्रमाणात परिस्थितीतून घडत जातो. पण संशोधन असं सांगतं की आशावाद प्रयत्नपूर्वक जोपासताही येतो. आत्मविश्वास आणि आशावाद हे हातात हात घालून जाणारे घटक आहेत. जी व्यक्ती स्वत:च्या विचारांवर-प्रयत्नांवर श्रद्धा ठेवते ती आशावादी बनण्याची शक्यता जास्त. जी विचारांनी डळमळीत आणि ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ वृत्तीची असते तिला तलम वस्त्रातही मच्छरदाणी बघितल्यासारखं वाटू शकतं.
एक महत्त्वाचं संशोधन सांगते की ज्या लाडक्या ‘टेलिव्हिजन’ आणि सोशल मीडियाला आपण करकचून बांधले गेलो आहोत, त्यातून नैराश्याची लागण होताना दिसत आहे. जी मुलं दिवसाकाठी २/३ तासांपेक्षा जास्त दूरदर्शन पाहतात, त्यातही हाणामारी/ भयपट/ गुप्तहेर कथा/ हिंसक कार्टूनपट पाहतात ती ‘आशावादा’च्या क्षमतेपासून दूर राहण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या प्रसारमाध्यमांमधून ‘आशावाद’ जपणारं काही ना काही जाणीवपूर्वक घेत राहिलं तरच त्यांचा उपयोग आहे. जे पालक मुलांना भावनिक सुरक्षेचं, उबदार वातावरण देतात थोडक्यात सारखे शाब्दिक चिमटे काढत नाहीत, ‘तुम्ही आम्हाला हवे आहात’ हे शब्द- स्पर्श- नजरेतून पोचवतात, त्यांची मुलं आशावाद शिकण्याचा आपोआप प्रयत्न करतात.
विभावरीला प्रत्येक घटनेचा काहीतरी अनुकूल अर्थ लावण्याची सवयच आहे. कितीही कठीण प्रसंग येवो, अडचण येवो, ती म्हणणार, ‘तरी बरं ७७७ नाही झालं! पण त्यामुळे ७७७ केलं की नक्की हे संकट/ अडचण पार करता येईल!’ एकदा तर मुलींनी तिला जरा वैतागूनच विचारलं, ‘सगळ्यातच कसं गं आई तुला काहीतरी चांगलं दिसतंच?’, ‘तेव्हा विभावरी म्हणाली, ‘अगं, माझी आई असंच करायची ना! शिकले मीही बघून बघून.’
असा ‘आशावाद’ जोपासणाऱ्या लोकांच्या बाबतीत काय काय घडू शकतं?
० त्यांची शैक्षणिक कारकीर्द पुष्कळच सुरळीत आणि चांगली बनते.
० क्रीडाकौशल्यात ते निपुण होऊ शकतात.
० त्यांची कार्यालयीन कार्यक्षमता खूप जास्त असते.
० नातेसंबंधांमधून त्यांना जास्त आनंद मिळतो.
०‘निराशेच्या’ कचाटय़ातून ते लवकर सुटतात.
० त्यांचं एकूण आरोग्यही खूपच चांगलं राहू शकतं.
आणि जर प्रभावशाली व्यक्तींच्या आयुष्याचं अशा दृष्टीनं वाचन केलं तर दिसतं की एखाद्या घटनेच्या त्रासदायक परिणामांपासून भावनिकदृष्टय़ा त्यांनी स्वत:ला प्रयत्नपूर्वक दूर ठेवलेलं असतं, तर चांगल्या/ रचनात्मक परिणामांशी जोडून घेतलेलं असतं. उदाहरणार्थ किरण बेदींच्या आत्मकथनात, प्रस्थापित अधिकाऱ्यांकडून जेव्हा त्यांना उपद्रव झाला- करिअरवर विनाकारण टीका झाली तेव्हा ते व्यक्तिगत न घेता ‘व्यवस्था’ सुधारण्यावर त्यांनी भर दिला आणि त्यामुळे त्या प्रतिकूलतेतही ‘यशाचा’ आनंद घेऊ शकल्या, अशी कितीतरी उदाहरणं आहेत.
जेव्हा ‘आशावाद’ ही एकेका व्यक्तीची वृत्ती न राहता पूर्ण समाजाची बनते तेव्हा तर मोठमोठी स्थित्यंतरं घडू शकतात. मग ती बर्लिनची कोसळलेली भिंत असेल, त्सुनामीतून उभा राहणारा जपान असेल किंवा भारतात नुकताच झालेला राजकीय ‘भूकंप’ असेल- सर्वातला‘आशावाद’ व्यक्त होण्याची ती निमित्त आणि परिणामही आहेत.
आपल्या रोजच्या व्यवहारात असं ‘आशेचं’ सिंचन आपण करू शकलो तर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ‘कोलंबसाचे गर्वगीत’मध्ये वर्णन केल्याप्रमाणे कितीही वादळवारे आले तरी आपल्या नावेचं शीड फडकतं ठेवून ‘किनारा’ कधी ना कधी मिळणारच या ईर्षेने आपण झुंजत राहू!
anagha.lavalekar@jnanaprabodhini.org