पिवळ्या-केशरी रंगाच्या संत्री दिसायला मनमोहक, चवीने आंबट-गोड असल्यामुळे मनाला व शरीराला तृप्तीदायक असे हे फळ आहे. त्याच्या अवीट आंबट गोड स्वादामुळे लहान बालकांपासून ते वृद्धापर्यंत सर्वाच्याच आवडीचे आहे. संस्कृतमध्ये नारंग, इंग्रजीमध्ये ऑरेंज तर शास्त्रीय भाषेत औरंटीको या नावाने ते ओळखले जाते. संत्र हे फळ िलबूच्या जातकुळीतीलच असून नागपुरी, खानदेशी, रेशमी, कलबा या संत्र्यांच्या जाती जास्त प्रसिद्ध आहेत.
औषधी गुणधर्म –
कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह व ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वे या शरीररक्षक अन्नघटकांनी संत्रे परिपूर्ण असल्याने निरोगी राहण्यासाठी व शरीराच्या वाढीसाठी ते बहुमोल आहे. संत्र्यामध्ये सर्वात जास्त कॅल्शिअम असते. याशिवाय त्यात भरपूर असणाऱ्या ‘क’ जीवनसत्त्वामुळे अन्नातील कॅल्शिअमचा वापर शरीरातील पेशींना विनाअडथळा करता येतो. याशिवाय संत्र्यामध्ये आद्र्रता, प्रथिने, तंतुमय व पिष्टमय पदार्थही असतात. आयुर्वेदानुसार संत्रे मधुर आम्ल चवीचे अग्नीप्रदीपक, दाहशामक, ज्वरहारक, तृषाशामक, रक्तपित्तशामक, अरुचीनाशक, लघु, हृदय व बलकारक आहे. संत्र्याची साले, पाने, फुले व फळ या सर्वामध्ये औषधी गुणधर्म आहेत.
उपयोग –
० आंबट, गोड संत्री ही अग्नीप्रदीपक असल्यामुळे शरीराची पचनशक्ती वाढते. भूक मंदावणे, अन्न व्यवस्थित न पचणे, पोटात गॅस धरणे अशा लक्षणांमध्ये संत्र्याचा रस प्यावा. हा रस घेतल्याने अन्न चांगले पचते.
० संत्र्याचा रस प्यायल्याने गर्भवतीच्या उलटय़ा व मळमळ ही लक्षणे दूर होतात. म्हणून सकाळ-संध्याकाळ १-१ कप संत्रारस गर्भवती स्त्रीने प्यावा तसेच मळमळीची भावना कमी व्हावी म्हणून संत्र्याची साल हुंगावी.
० मलावरोधाचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी व पहाटे सकाळी उठल्यावर संत्रे आतील सालासकट खावे. यामुळे आतडय़ांची हालचाल वाढते व संत्र्यामधील चोथ्यामुळे शौचास साफ होते.
० दातांचे व हिरडय़ांचे आरोग्य सुधारण्यासाठी संत्रे नियमितपणे खावे. यातील ‘क’ जीवनसत्त्वामुळे हिरडय़ांमधून रक्त येण्याचे थांबते व दात हिरडय़ांमध्ये पक्के बसतात.
० थकलेल्या, अशक्त, निरुत्साही उन्हातून दमून आलेल्या व्यक्तीस तसेच आजारी रुग्णास संत्ररस हा अमृता समान कार्य करतो. संत्रारस प्यायल्याने त्याच्या शीतल व मधुर गुणाने त्या व्यक्तीस पुनर्शक्ती लाभल्याचा आनंद मिळतो. सर्व शरीरात उत्साह व शक्ती संचारते.
० संत्र्याच्या सेवनाने रुक्ष, काळवंडलेली त्वचा मऊ व मुलायम बनते.
० संत्र्यांच्या सेवनाने आतडय़ांमधील कृमी नष्ट होतात.
० जीर्णज्वर, अतिसार, उलटी या विकारांमध्ये संत्रारस अमृतासमान कार्य करतो.
० संत्र्यांच्या सेवनाने उच्च रक्तदाब प्राकृत होतो तसेच शरीरातील उष्णता कमी होऊन शीतलता प्राप्त होते.
० संत्र्याची साल सुकवून ती बारीक दळावी व तिचा वापर केस धुण्यासाठी शिकेकाईमध्ये करावा. केस मऊ, मुलायम व दाट होतात.
० संत्र्याच्या सालीमधून निघणारे तेल हे कृमीनाशक व पाचक असते.
० संत्राच्या सालाचे चूर्ण हे कोमट पाण्याबरोबर घेतल्यास अपचन, भूक मंदावणे, कृमी, जंत या विकारांमध्ये लाभदायक ठरते.
० अति उष्णतेमुळे वारंवार तहान लागत असेल तर संत्र्याचा रस सकाळ संध्याकाळ १-१ ग्लास प्यावा.
० संत्र्याचा रस व १ चमचा मध नियमित घेतल्यास हृदयविकार होत नाही.
० संत्र्याच्या सालीचे सूक्ष्म चूर्ण चेहऱ्यावर लावल्यास मुरुमे व पुटकुळ्या दूर होऊन त्वचा कांतीयुक्त होते.
० लहान मुलांची वाढ उत्तम होण्यासाठी संत्र्याचा रस १-१ कप दोन वेळेस घ्यावा. अशक्तव संथगतीने वाढ होणाऱ्या मुलांची वाढ झपाटय़ाने होण्यास सुरुवात होते.
० संत्र्याच्या नियमित सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
० लहान बालकांना दात येण्याच्या काळात नियमितपणे संत्ररस दिल्यास दात मजबूत व सरळ रेषेत येतात. कारण सहसा वेडेवाकडे व ठिसूळ दात हे कॅल्शिअम व ‘क’ जीवनसत्त्वाच्या अभावाने येतात व हे दोन्ही घटक संत्र्यामध्ये भरपूर आहेत.
० तापामध्ये पचनशक्ती मंदावते व त्यामुळे जीभेवर पांढरा थर जमा होतो. अशा अवस्थेत संत्रे आतील सालीसह चावून खावे. यामुळे जीभेचा पांढरा थर निघून तोंड स्वच्छ होते व मंदावलेली पचनशक्ती सुधारते.
० अति उष्णतेमुळे लघवीचे प्रमाण कमी होऊन जळजळ जाणवल्यास संत्रारस १-१ ग्लास तीनवेळा प्यावा.
० संत्र्यापासून संत्ररस, जॅम, जेली, अत्तर , सुगंधी तेल, संत्रासाल सूक्ष्म चूर्ण असे अनेक पदार्थ बनवता येतात.
सावधानता –
सर्दी, खोकला झाला असेल तर अति आंबट चवीचे व कच्चे संत्रे खाऊ नये. याने खोकला अधिकच वाढू शकतो.
डॉ. शारदा महांडुळे – sharda.mahandule@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा