अनाथ मुलांच्या पुनर्वसनाच्या कामी गेली अनेक वर्षे कार्यरत असल्यामुळे अनेक अनुभव गाठीशी जमा झाले. कधी या अनाथ मुला-मुलींचे भावविश्व ढवळून काढणाऱ्या घटनांची साक्षीदार झाले, तर कधी अनाथ मुलींना मदत केल्यानंतर आलेल्या कटू अनुभवांनी खिन्न झाले. तर काही जणांनी जिद्दीने आपले अनाथपण सन्मानच्या आयुष्यात परावर्तित केले त्याचे समाधान मिळाले. आपल्यातल्याच या काही मुलांना ‘राहिले रे दूर घर माझे..’ असं म्हणायला लागू नये म्हणून, केलेल्या प्रयत्नातले हे काही अनुभव.
शासकीय बालगृह आणि अनुदानित बालगृहात असणाऱ्या अनाथ मुलांना अठरा वर्षांनंतर (अपवाद वगळता) तेथे राहण्याची परवानगी नाही. अशी हजारो मुले दरवर्षी बालगृहातून बाहेर पडतात. ज्यांना पालक आहेत किंवा कुणाचा आधार, आसरा आहे त्यांना आपले आयुष्य मार्गी लावण्याची संधी तरी असते, अन्यथा कुणाचेही पाठबळ नसलेली ही अनाथ मुले या जगात अक्षरश: फेकली जातात. मोलमजुरी करीत दिवस घालवतात किंवा परिस्थितीमुळे गुन्हेगारीच्या दुष्टचक्रात अडकतात. अनेक कोवळ्या मुली वाममार्गाला लागतात. बाल न्याय कायदा १९८६ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या बालकल्याण मंडळाच्या अध्यक्ष म्हणून काम करीत असताना माझ्यासमोर अशी असंख्य उदाहरणे आली ज्यात मुला-मुलींच्या आयुष्याचा कोळसा झालेला मी पाहिला. पण अशीही उदाहरणे पाहिली ज्यांना योग्य पाठबळ मिळालं, शिक्षण मिळालं, आधार मिळाला आणि त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. म्हणूनच आज गरज आहे ती शासकीय पातळीवर आणि सामाजिक पातळीवर या अनाथ मुलांना आधार देण्याची, त्यांना आपल्यात सामावून घेण्याची!
कोल्हापूरच्या पोलिसांनी लालदिवा वस्तीतील कुंटणखान्यावर धाड टाकून ४०-४२ मुलींना सोडवून राहण्यासाठी महिलाश्रमात आणून ठेवले होते. संबंधित मुलींचे पुनर्वसन कसे करावे, यासंबंधी मार्ग सुचवावा, असा आदेश मला देण्यात आला. त्या आदेशाप्रमाणे वेश्या व्यवसाय करणाऱ्या त्या प्रत्येकीशी मी दोन-तीन तास चर्चा केली. फसलेल्या, फसवलेल्या, घरातून पळून गेलेल्या, आई-वडिलांनी किंवा पतीने विकलेल्या, ‘देवदासी देवाची, मालकी गावाची’ या नात्याने वेश्या व्यवसाय करणाऱ्या या सर्व भगिनींची दु:खे ऐकून मन हेलावून गेले. यातील काही वेश्या तर कर्नाटकातील बालग्रामात लहानाच्या मोठय़ा झालेल्या. पण १८ वर्षांनंतर बाहेर पडल्यानंतर दलालाने त्यांना फसवून मिरजेच्या कुंटणखान्याच्या मालकिणीला विकले होते. सोलापूरच्या बालगृहात लहानाची मोठी झालेल्या एकीबरोबर तर बालगृहातून बाहेर पडल्यानंतर स्वत:ची दोन लग्ने झालेल्या पुरुषाने तिसरे लग्न केले. तिचा उपभोग घेतला आणि मुंबईतल्या बाजारात विकून टाकले.
सोलापूरला देवदासींचे सर्वेक्षण कसे करावे? याचे प्रशिक्षण देण्यासाठी मी जेव्हा गेले होते, त्या वेळी त्या बालगृहातील मुलीच सर्वाची जेवण्या-खाण्याची व्यवस्था बघत होत्या. त्यापैकीच एक रेणू. आई-वडिलांचा असाध्य रोगाने मृत्यू झाला होता. वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या देवदासीने तिला लहानाचे मोठे केले. ती वयात येण्यापूर्वीच, तिने तिच्या गळ्यात देव बांधून तिला देवाला सोडण्याचा घाट घातला, हे कळताच काही कार्यकर्त्यांनी तिला बालगृहात आणून सोडले. १८ वर्षांनंतर बालगृहातून बाहेर पडल्यानंतर, ज्या देवदासीला पाटलाने ‘ठेवली’ होती, त्याने रेणुचा मुलीसारखा सांभाळ करू, असे सांगून पुन्हा तिला देवदासीच्या घरी आणले. पाटलाची नजर वाईट होती. त्याने संधी मिळताच त्याचा डाव साधला, तिचा उपभोग घेतला आणि मुंबईच्या गोलपीठा बाजारात विकून टाकली. तिथून पळून जाण्याचा तिने प्रयत्न केला. पण मारहाण, जबरदस्ती यामुळे तिची सुटका झाली नाही आणि सरतेशेवटी मुंबईतील फोरास रोड, पुण्यातील दाणा आळी, मिरजेतील प्रेमनगर असे फिरत-फिरत शेवटी ती कोल्हापूरच्या डोंबार वाडय़ातील कुंटणखान्यात आली. तिचे म्हणणे एकच होते. ‘ताई इथून आम्ही जाणार कुठे? परत आमच्या कुंटणखान्याच्या मावशीकडेच जातो. जेथे आम्हाला राहायला, जेवायला मिळते. धंदा करावा लागला तरी मालकिणीकडून सुरक्षा मिळते. मालकीणच गिऱ्हाईक आणते. आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा याशिवाय आणखी काय पाहिजे’, हे ऐकून मी अचंबित झाले. तिच्या पुनर्वसनासाठी काय करावे? हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.
अठरा वर्षे झाल्यानंतर बालगृहातून बाहेर पडलेली कुणीतरी अपर्णा नावाची मुलगी, मी समाज कार्यकर्ती आहे असे सांगितल्याने माझे घर शोधत आली. म्हणाली, ‘आपल्याला कुठलाही आसरा नाही, आई-वडील, भाऊ-बहीण कोणीही नसून चार वर्षांची असतानाच माझ्या आजीने बालगृहात ठेवले. आता १८ वर्षे पूर्ण झाल्याने मला संस्था सोडावी लागतेय. आपण मला आसरा दिला तर माझ्यावर फार फार उपकार होतील.’ तिचे बोलणे ऐकून मन हेलावले. तिला दुसऱ्या दिवशी घरी येण्यास सांगितले. तत्पूर्वी तिची संपूर्ण माहिती काढली. माझी मुलगी रेणू लहान होती. तिच्याबरोबर खेळण्यासाठी अपर्णा मला योग्य वाटली. अपर्णा उंचीने लहान, पण गोड चेहरा, राहणे टापटिपीचे व रेणूवर असलेल्या तिच्या प्रेमामुळे आमच्या घरात लगेच मिसळून गेली. रेणूला संस्कृत श्लोक, बडबड गीते, प्रार्थना तिनेच शिकवल्या. रेणूची पण तिच्यावर माया जडली. अपर्णा तिच्या सगळ्या चांगल्या-वाईट सवयींसह आमच्या घरात रेणूबरोबर चांगली रमली. पण तिला कायम कऱ्हाडच्या तिच्या संस्थेतून बाहेर पडलेल्या मैत्रिणींचा व तिच्या नवऱ्याचा दूरध्वनी यायचा. एकेदिवशी ते दोघेही पती-पत्नी आमच्या घरी आले व अपर्णाला आम्ही चार दिवस आमच्या घरी घेऊन जातो, अशी गळ घालू लागले. त्यांनी पत्ता दिला. त्यांची सर्व माहिती काढली. तिलाही बदल होईल म्हणून मी परवानगी दिली. आठ दिवसांनंतर येणारी अपर्णा एक महिना झाला तरी आली नाही. माझाही संपर्क होत नव्हता. महिन्याने अपर्णा सकाळी-सकाळीच घरी उगवली. हातात हिरव्या चुडा, गळ्यात मंगळसूत्र, जरीची साडी, एका नव्या नवरीचे तेज तिच्या चेहऱ्यावर होते. ‘माझे लग्न झाले. माझा नवरा काम करतो. घरी सासू-सासरे आहेत. मी सुखात आहे. मला रेणूची-तुमची खूप आठवण आली. म्हणून मी भेटायला आले. पण आपण कुठे राहतो, पत्ता काय याचा मात्र तिने अंदाज दिला नाही. त्याचे मला थोडे वाईट वाटले..पण ती आनंदात आहे यातच मी समाधान मानले.
तीन वर्षांनी अपर्णा दोन लहान मुलांसह माझ्याकडे आली. रडतच होती. ‘नवरा दारू पितो. मारहाण करतो आणि एका बाईला त्याने ‘ठेवली’ आहे. मला सध्या कोणताही आधार नाही. माझ्या लहान मुलांना ‘बालग्राम’मध्ये ठेवण्यासाठी मी गेले होते. त्यावेळी मला कळले की तुम्ही ‘बालन्यायाधीश’ असल्याने तुम्हीच मुलांना संस्थेत प्रवेश देता तेव्हा माझ्या मुलांना संस्थेत प्रवेश द्या. मी कोठेही हॉस्पिटलमध्ये काम करून पोट भरेन. तिची एकूण परिस्थिती पाहून मुलांना बालगृहामध्ये प्रवेश दिला. त्यानंतर एक, दोन, चार महिने ती मुलांना भेटायला आली. पण त्यानंतर मात्र ती बालगृहामध्ये मुलांना भेटायला परत कधीच आली नाही. अनाथ असल्यामुळे अपर्णा संस्थेत आली, वाढली. पण आज तिची मुलेही अनाथ म्हणूनच संस्थेत राहतात. त्यांचे भवितव्य काय? याची मला सतत चिंता वाटायची. हे दृष्टचक्र असेच चालू राहणार का याचे वाईट वाटते.
अर्थात बालगृहातून बाहेर पडलेल्या सर्वच मुलींच्या बाबतीत असे घडते असे नाही. काही अनाथ मुलींना महिलाश्रमात प्रवेश मिळतो. तेथे राहून काहींनी नर्सिग, शिवणकाम, टायपिंग, कॉम्प्युटरचे शिक्षण घेतले आहे. आज त्यातील नीलिमा, पौर्णिमा, श्रद्धा या अंगणवाडीत सेविका म्हणून काम करतात, तर पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयामध्ये कडक पांढऱ्या ड्रेसमध्ये असलेली नसिमा नर्सिगचे ट्रेनिंग घेऊन आता लग्न करून स्थिरस्थावर झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा