मुलांना प्रेम आणि कठोर शिस्त या दोन्ही गोष्टींची गरज आहे, कारण आयुष्य तसंच असतं; मुलाला फक्त प्रेम मिळालं तरी त्याच्यासाठी ते चांगलं नाही; आणि त्याच्याशी नुसतं कठोरपणे वागलं तरी त्याला त्याचा पुढे त्रास होईल. त्याला दोन्ही गोष्टींची गरज आहे. आई आणि वडिलांचं काम हेच आहे. त्यांना फुलं आणि काटे या दोहोंचा अनुभव असला पाहिजे..
आमच्या मुलाला कसं वाढवावं याबद्दल आम्ही जरा द्विधा मन:स्थितीत सापडलो आहोत. माझ्या नवऱ्याला त्याच्याशी थोडं कठोर वागावं असं वाटतं, तर मला थोडं आणखी प्रेमळ वागावं असं वाटतं.- असं एकीने विचारल्यावर माझं उत्तर होतं, मला वाटतं तुमच्या नवऱ्याला त्याच्या पद्धतीने काही गोष्टी करू द्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने करत राहा; त्यात काहीच अडचण नाही. मुलांना प्रेम आणि कठोर शिस्त या दोन्ही गोष्टींची गरज आहे, कारण आयुष्य तसंच असतं; मुलांना फक्त प्रेम मिळालं तरी त्याच्यासाठी ते चांगलं नाही; आणि त्याच्याशी नुसतं कठोरपणे वागलं तरी त्याला त्याचा पुढे त्रास होईल. त्याला दोन्ही गोष्टींची गरज आहे. आई आणि वडिलांचं काम हेच आहे.
आईने मुलांवर प्रेम करत राहावं, म्हणजे आपल्यावर कुणीतरी प्रेम करू शकतं याची जाणीव मुलाला होते आणि वडिलांनी त्याच्याशी कडक वागत राहावं, म्हणजे आयुष्य इतकं सोपं नाही याची कल्पनाही त्यांना येते.
आयुष्य असंच असतं!
यात काटेही आहेत आणि फुलंही आहेत. मुलांनी दोन्हीसाठी तयार झालं पाहिजे. जग नेहमी आईसारखं वागणार नाही; जगणं हा कठीण संघर्ष आहे. त्यामुळे तुम्ही मुलांवर फक्त प्रेम करत राहिलात तर त्यांना जगाच्या या कठोरपणाचा अनुभवच मिळणार नाही. जेव्हा आयुष्यातल्या कठोर वास्तवाचा सामना त्यांना करावा लागेल, तेव्हा ते पूर्णपणे कोसळूनच जातील. कारण ते आईच्या प्रेमाची वाट बघत राहील आणि या कठोर जगात त्यांना आईचं प्रेम सापडेलच असं नाही; आयुष्य त्याची पर्वा करणार नाही. मग अशा वेळी त्यांना वडिलांबद्दल कृतज्ञता वाटेल. कारण आयुष्य त्यांना बरेचदा बाहेर हाकलून देईल, त्यांच्यावर ओरडेल. त्यावेळी त्यांना कळेल की ते हे सगळं हाताळू शकताहेत. कारण वडिलांच्या कडक शिस्तीने त्यांना यासाठी तयार केलं आहे.
मुलांना कोमलता स्वीकारण्यासाठी आणि कठोरपणाचा सामना करण्यासाठी तयार केलं पाहिजे, त्यांना अंधाराचा सामना करण्यासाठीही सज्ज केलं पाहिजे आणि प्रकाशात उजळून निघण्यासाठीही. तेच तर आई आणि वडिलांचं काम आहे. मुलांना नाजूक, सौम्यपणाचा अनुभवही द्यायला हवा आणि पुरुषी रांगडेपणाचाही, म्हणजे तो बाहेर पडण्यासाठी तयार होईल. परिस्थिती कशीही असो, तिला योग्य तो प्रतिसाद देईल. आयुष्य कठोर झालं, तर तो कणखरपणे त्याचा सामना करेल आणि आयुष्य त्याला प्रेम देत असेल, तर तो त्या प्रेमाचा स्वीकार तितक्याच प्रेमळपणाने करू शकेल. तो कोणत्याच ताठर चौकटीत अडकणार नाही.
आता त्याला हे सगळं एकटे वडील शिकवत असतील, तर मात्र तो काहीसा रूक्ष होईल. तो एकदम कठोर माणूस होऊन जाईल, तो कधीच प्रेम स्वीकारू शकणार नाही. कारण प्रेम म्हणजे काय हेच त्याला माहीत नसेल. तो सैनिक होईल; लढण्यासाठी सज्ज होईल, मारण्यासाठी किंवा मरण्यासाठी तयार राहील. मात्र, त्याचं तर्कशास्त्र तेवढय़ापुरतंच असेल, त्यापलीकडचं काहीच त्याला कळणार नाही. हे खूपच धोकादायक आहे.
तेव्हा एखादं मूल केवळ त्याच्या वडिलांच्या ताब्यात राहिलं, तर ते कधीही कठोर विचारसरणीला बळी पडू शकेल; हे अत्यंत धोक्याचं आहे. आणि एखाद्या मुलाला केवळ आईने वाढवलं तर ते खूपच प्रेमळ होऊन जाईल. मग जेव्हा जेव्हा लढण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा ते निसटण्याचा मार्ग शोधेल, ते शस्त्रं टाकून शरण जाईल; ते लढण्यापूर्वीच शरण जाईल! ते गुलामाचं जिणं पत्करेल. या दोन्ही बाजूंमध्ये मूल ताठर अशा चौकटीत अडकेल आणि एक खरा जिवंत माणूस कधीच कोणत्या ताठर चौकटीत अडकत नाही. तो द्रव पदार्थासारखा असतो: तो हलूही शकतो आणि परिस्थितीची गरज असेल तर ठाम उभाही राहू शकतो. आवश्यकता भासल्यास तो पोलादाप्रमाणे कठोर होऊ शकतो आणि परिस्थितीची मागणी असेल तर तो गुलाबाच्या फुलासारखा मुलायम आणि संवेदनशीलही होऊ शकतो, तो अत्यंत कोमल होऊ शकतो.
मुलांच्या जाणिवेसाठी हा सगळा अवकाश उपलब्ध झाला पाहिजे, म्हणजे, मग ते सहजपणे त्यात हालचाली करू शकेल. तेव्हा प्रेमळपणा आणि कठोरपणा या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत; यातील एकीची निवड करा असं मी कधीही म्हणणार नाही. आणि कोणत्याही प्रकारच्या द्विधा मन:स्थितीत अडकण्याची गरजच नाही: तुम्ही मुलाशी तुम्हाला वाटतं तसं वागा, नवऱ्याला त्याच्या मनाप्रमाणे वागू द्या आणि यातून कधी संघर्ष निर्माण झालाच, तरीही ते चांगलं आहे! अर्थात याचं टोक गाठलं गेलं तर सगळं काही विद्रूप होऊन जातं, हेही लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
आपले आई आणि वडील एकमेकांशी भांडू शकतात हेही मुलाला कधीकधी समजलं पाहिजे. कारण आयुष्यात पुढे त्यालाही बायको असेल आणि त्याची तिच्यासोबत भांडणं होतीलच; भांडणं हे नैसर्गिक आहे हे त्याला समजलं पाहिजे. खरंतर जे काही नैसर्गिक आहे, ते सगळं चांगलं आहे. नवरा आणि बायको दोघंही मुलाशी कसं वागावं याबद्दल दक्ष राहिले, तर यातून नक्कीच चांगले बदल घडून येणार आहेत.
ओशो, धिस इज इट! टॉक #३
सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन
ओशो टाइम्स इंटरनॅशनल
http://www.osho.com
भाषांतर – सायली परांजपे