‘‘ति सरं अंग अर्थात मानसिक अंग दुसऱ्या अंगाहून म्हणजेच भावनिक अंगाहून अधिक मोठं आहे, अधिक सूक्ष्म आहे आणि त्याला अधिक उंचीही आहे..’’
‘‘प्राण्यांकडे दुसरं अंग असतं पण तिसरं अंग नसतं. प्राणी किती विलक्षण असतात. एखाद्या सिंहाला चालताना बघा. काय ते सौंदर्य, काय तो दिमाख, काय ते विशालपण. एखाद्या हरणाला दौडताना बघा. कसली चपळाई असते, कसली ऊर्जा असते. माणसाला याचा कायम मत्सर वाटत आला आहे, पण माणसाकडची ऊर्जा खरं म्हणजे आणखी जास्त उंचीवरून वाहत असते.
तिसरं अंग म्हणजे मनुमाया कोश अर्थात मानसिक अंग. हे दुसऱ्या अंगाहून खूप मोठं आहे, अधिक प्रशस्त आहे. आणि तुम्ही या अंगाचा विकास केला नाही, तर तुम्ही केवळ माणूस नावाच्या प्राण्याची शक्यता होऊन राहाल, खरा माणूस तुम्हाला होता येणार नाही. मनच तुम्हाला माणूस करतं. पण कमी-अधिक प्रमाणात तुमच्याकडे त्याचा अभावच असतो. त्याच्या जागी तुमच्याकडे काय असतं तर एक अंगवळणी पडलेली, सवयीची झालेली यंत्रणा. तुम्ही नक्कल करतच जगता : अशा परिस्थितीत तुम्हाला मन नाही असंच म्हटलं पाहिजे.
तुम्ही जेव्हा स्वत:च्या बळावर जगू लागता, उत्स्फूर्तपणे जगू लागता, जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या समस्यांवर स्वत:च्या स्वत: उत्तरं शोधू लागता, जेव्हा तुम्ही जबाबदार होता, तेव्हा तुम्ही मनुमय कोशात वाढत जाता. त्या वेळी तुमच्या मानसिक अंगाचा विकास होत जातो.
अधिकाधिक जिवंत व्हा, अस्सल व्हा, प्रतिसादक्षम व्हा. यात भरकटण्याची शक्यता आहे पण प्रसंगी भरकटतही जा. कारण चुका होतील अशी भीती बाळगून पावलं उचललीत तर वाढीचे सगळे रस्ते बंद होतील. चुका चांगल्या असतात. किंबहुना चुका केल्याच पाहिजेत. एकच चूक पुन:पुन्हा करू नका पण चुका होतील अशी भीती कधीच बाळगू नका. चुका होतील अशी भीती सतत बाळगणारे लोक कधीच वाढत नाहीत. ते एकाच जागी बसून राहतात. त्यांना हलायचीच भीती वाटते. ते जिवंतच नसतात खरं म्हणजे.
तुम्ही जेव्हा कशाला तरी सामोरे जाता, स्वत:च्या बळावर परिस्थितीचा सामना करता तेव्हाच मनाची वाढ होते. समस्या सोडवण्यासाठी जेव्हा तुम्ही स्वत:ची ऊर्जा वापरता, कायम कोणाचा तरी सल्ला विचारत बसत नाही, आपल्या आयुष्याची सूत्रं स्वत:च्या हातात घेता; तुमच्या गोष्टी तुम्हीच करा असं मी जे म्हणतो, त्याचा हाच अर्थ आहे. यातून तुम्ही कदाचित संकटात सापडाल- दुसऱ्याचं अनुकरण करत राहणं कधीही सुरक्षित असतं. समाजाला अनुसरून वागणं कधीही सोयीचं असतं. परिपाठाचं, परंपरेचं, धर्मग्रथांचं अनुसरण करणं सोपं असतं. ते अगदी सोपं असतं, कारण, सगळे याच गोष्टींचं अनुकरण करत असतात; तुम्हाला फक्त या कळपाचा एक मृत भाग होऊन राहायचं असतं. तुम्हाला केवळ ही गर्दी ज्या दिशेने जाईल, त्या दिशेने जावं लागतं. यात तुमच्यावर कोणतीही जबाबदारी नसते.
पण तुमच्या मानसिक अंगाला, तुमच्या मनुमय कोशाला मात्र याचा भयंकर त्रास होईल, त्याची वाढच खुंटून जाईल. तुमच्याकडे तुमचं स्वत:चं असं मनच नसेल आणि एका अत्यंत सुंदर गोष्टीपासून तुम्ही वंचित राहाल, अधिक उंचीपर्यंत वाढण्यासाठी पुलाची भूमिका पार पाडू शकणाऱ्या कशापासून तरी वंचित राहाल तुम्ही.
तेव्हा नेहमी लक्षात ठेवा, मी तुम्हाला जे काही सांगतो त्याकडे तुम्ही दोन प्रकारांनी बघू शकता. म्हणजे तुम्ही ते पूर्णपणे माझ्या अधिकाराने घेऊन शकता- ओशो असं सांगताहेत; म्हणजे ते सत्य असलंच पाहिजे. असं कराल तर तुमचं खूप नुकसान होईल, तुमची वाढ थांबून जाईल. मी जे काही सांगतो ते लक्षपूर्वक ऐका, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, तुमच्या आयुष्यामध्ये ते अमलात आणा, त्याचा कसा उपयोग होतोय ते बघा आणि मग तुमचे स्वत:चे निष्कर्ष काढा. ते कधी मी म्हणतो तसे असतील, तर कधी तसे नसतीलही. हे निष्कर्ष माझ्या निष्कर्षांशी तंतोतंत जुळणारे नसतीलच. कारण तुमच्याकडे एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे, तुमचं स्वत:चं असं निराळं अस्तित्व आहे. मी जे काही म्हणतो ते माझं स्वत:चं आहे. ते निश्चितपणे माझ्यात कुठेतरी खोल भिनलेलं आहे. तुम्ही माझ्या निष्कर्षांशी साधम्र्य असलेले निष्कर्ष काढाल, पण ते तंतोतंत सारखे कधीच नसतील. तेव्हा माझ्या निष्कर्षांना तुमचे निष्कर्ष समजू नका.
तुम्ही मला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तुम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण तुम्ही माझ्याकडून ज्ञान गोळा करू नका, माझ्याकडून निष्कर्ष गोळा करू नका. म्हणजे मग तुमच्या मानसिक अंगाची वाढ होईल.
..एकदा का तुम्ही या मानसिक अंगाच्या पलीकडे गेलात की, तुम्ही म्हणजे हे मन नाही, तर तुम्ही केवळ साक्षीदार आहात, याची जाणीव तुम्हाला होईल. मनाच्या खाली कुठेतरी तुम्ही त्याच्याशी तादात्म्य पावाल. विचार, मानसिक प्रतिमा आणि कल्पना या केवळ वस्तू आहेत, तुमच्या जाणिवेच्या आकाशात तरंगणारे ते केवळ ढग आहेत हे एकदा का तुम्हाला कळलं की, तुम्ही त्यापासून स्वतंत्र व्हाल.. तात्काळ स्वतंत्र व्हाल.
तुम्ही अंगाच्या पलीकडे जाल. कोणत्याही अंगापुरते मर्यादित नाही असे कोणीतरी तुम्ही व्हाल, शरीर म्हणजे मी नाही हे जाणणारे कोणीतरी व्हाल, तुम्ही ढोबळ असाल किंवा सूक्ष्म असाल पण आपण अमर्याद आहोत, आपल्याला सीमा नाहीत हे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला कोणत्याही सीमा नाहीत असं वाटणारा म्हणजे महाविदेह. सगळ्या प्रकारच्या सीमा या मर्यादा असतात, बंदिवास असतात आणि महाविदेह त्या सीमा तोडू शकतो, त्या सीमा ओलांडू शकतो आणि अमर्याद आकाशाशी एकरूप होऊन जातो.’’
– ओशो, योग : द पाथ टू लिबरेशन, टॉक #१
सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन
ओशो टाइम्स इंटरनॅशनल
www.osho.com
भाषांतर – सायली परांजपे