आपल्याकडे पाण्याची इतकी कमतरता की पाणी भरून ठेवावं लागतं. अमेरिकेत अशा बादल्या भरून ठेवत नाहीत. आपण करतो कारण आपल्या सभोवतालची अविश्वसनीय परिस्थिती – अवलंबून न राहण्याजोगी आणि त्यामुळे वर्षांनुवष्रे घडलेली आपली मनोवृत्ती – सतत भविष्याची काळजी करणारी!!  आयुष्यभर आपण प्रत्येक ‘आज’ बादल्याच भरत असतो, त्या उद्यासाठी. कारण आपला सगळ्यांचा विश्वास असतो तो या संचितावर.
आज शॉवर घेताना सहज विचार आला, भारतात असताना क्वचितच शॉवर घेतला जाई..कारण तशी परिस्थितीच नसायची. विचार मनात आला आणि बघता बघता मन भूतकाळात शिरलं.. भारतातले दिवस आठवले..
 अगदीच पाणी आलेलं असेल (ही संकल्पना इथे अमेरिकेत एक कल्पनाविलासच म्हणायचा) तर शॉवर घेण्याची मुभा असे. त्यातही अनेक अटी वा शक्यता आड येतात. एक फ्लोचार्टच म्हणा ना. पावसाळ्याचे दिवस असतील, दुष्काळ नसेल, धरण नीट भरले असेल, पालिकेच्या नळातून मध्येच कोठेही बाहेर न डोकवता आपल्या इमारतीच्या भूगर्भीय साठय़ाचे पोट भरले असेल, विद्युत महामंडळ आपल्यावर मेहेरबान असेल, पाणी वरच्या टाकीत नीट चढले असेल आणि वेळेवर ते आपल्या घरातल्या सिंटेक्सच्या टाकीमध्ये पोहोचले असेल तर विचार शॉवर घ्यायचा विचार करू शकतो. कारण १५ मिनिटे सुटणाऱ्या त्या पाण्यासाठी किती धावपळ असते ते सांगून नाही कळणार. घरातली पिण्याच्या पाण्याची निदान सात भांडी तरी तृप्त झाली पाहिजेत. मग बादल्या, टब (घंघाळ म्हणू हवे तर!), िपप सगळे ओतप्रोत भरले पाहिजे. रात्र असेल तरी सगळ्या कुंडय़ांनी मनसोक्त न्हाले पाहिजे. त्या भरून पत्र्यावर पाण्याच्या धारेचा टर टर असा आवाज झाला पाहिजे. बाल्कनी धुवून- धुवून काय? खरे म्हणायचे तर , जोवर खाली – अलिखित पाìकग जागेत- उभ्या आडव्या लावलेल्या, एखाद्या तिऱ्हाईताच्या चारचाकीवर अभिषेक होत नाही तोवर बाल्कनीत बादल्या रित्या करणेच. ते झाल्यावर पाण्याची टाकी फक्त भरली नाही तर उतू गेली पाहिजे. खालच्या मजल्यावरील लोकांनी आपले काम झाले असूनसुद्धा सगळे नळ चालू ठेवले असतील तर आपल्या घरी येणाऱ्या  पाण्याचे तथाकथित ‘प्रेशर’ही कमी होते ही हायड्रोलॉजी समजायला स्थापत्यशास्त्र शिकण्याची काही गरज नाही. कारण नेमके तुमच्याकडे पाहुणे आले असून पाण्याची नितांत निकड असताना, वरच्या मजल्यावरचा चवथीतला चिंटू ‘तुमच्याकडचे नळ बंद करा, आमच्याकडे प्रेशर नाही येत,’ असे हक्काने बजावून जातो. खरे तर पाण्याचा प्रवाह तळमजल्यावरच्या सद्गृहस्थांनी खेचून घेतलेला असतो आणि त्यांना सांगायची कोणाचीच हिम्मत नसते. थोडक्यात काय तर सगळ्या प्राथमिक गरजा पुरून झाल्या की मग शॉवरच्या आंघोळीची काय ती चंगळ करू शकतो.
 इतक्या सगळ्यात महत्त्वाचा तो वॉचमन भया किंबहुना ‘भया वॉचमन.’ अष्टावधानी असलेला हा प्राणी जवळपास नजीकच्या शंभर इमारतींचे तरी ‘पाणिपत्य’ – माफ करा ‘पारिपत्य’ करत असतो. व्यवस्थापनकौशल्य कुणी त्याच्याकडून शिकावे. प्रत्येक इमारतीच्या पाण्याच्या वेळा ठरवणे- त्या एकसारख्या का होईना; त्यांचे पाणी बंद करताना काटेकोरपणे पालन करणे आणि तेच सोडताना करण्याचे विसरणे; बाका प्रसंग उद्भवल्यास टँकर मागवणे, वीज आणि पाण्याच्या वेळा जुळत नसल्यास तशी सूचना फलकावर लिहिणे. त्याचे ते ‘सुबक’ अक्षर वाचण्यापेक्षा, कोणीही दमयंती बनून ‘नळा’ची वाट पाहणे पसंत करेल. खरे तर त्यालाही हे माहिती असावे. म्हणून पाणी सोडण्यापूर्वी १० मिनिटे तो युद्धाच्या प्रसंगी नगारा वाजवावा त्या आवेशाने सगळ्यांचे दरवाजे वाजवत जातो. आपल्या गुप्तहेराने आपल्याला खासगी सूचना द्यावी तसा ‘वो आ रहा है, भागो’ आणि पाणी सोडल्यावर ‘पानी छुट गया है’ अशी दवंडी पिटत येतो. वास्तविक आपण पाणी भरण्याच्या घाईत असतो त्यात हा बेल वाजवून व्यत्यय आणत असतो. आपला पाणीदाता साक्षात आपल्या दारात उभा असूनही कुठल्याही क्षणी पाणी जाऊ शकते ही आपली घालमेल होत असते. त्याचे ‘पानी छुट गया है’ असे असते की त्याने पाणी सोडले नसून ते आपोआप कैद्यासारखे पळाले आहे!! आल्या पाण्यात कपडे-भांडी ही उरकायची असतात ते निराळं. तर इतक्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर मग काय तो शॉवर.
गमतीचा भाग वगळला तर असे लक्षात येते की, इथे अमेरिकेत अशा बादल्या भरून ठेवत नाहीत. अर्थात आपल्याकडे तसे करण्याला कारणही आहेच. आपल्या सभोवतालची अविश्वसनीय परिस्थिती – अवलंबून न राहण्याजोगी आणि त्यामुळे वर्षांनुवष्रे घडलेली आपली मनोवृत्ती – सतत भविष्याची काळजी करणारी!!     आयुष्यभर आपण प्रत्येक ‘आज’ बादल्याच भरत असतो, त्या-त्या ‘आज’च्या उद्यासाठी. सगळ्याच गोष्टींच्या. रद्दी आणि भंगारापासून, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा उभा करणे, मुलीच्या लग्नासाठी तिच्या जन्मापासूनच एकेक दागिना बनवणे, मुलांच्या घरासाठीच आपला पीएफ राखून ठेवणे; अशा स्पृश्य गोष्टी तर कधी अदृश्य बाबी, मग ते पाठ केलेले पाढे असोत, स्तोत्र असोत किंवा मनातल्या भावना. नाही का साठू देत आपण हे सगळं? आणि नंतरही किती जपून खर्च करतो ते. हे सगळं राहतं का जसंच्या तसं आपल्याला हवं तोवर? आपला सगळ्यांचा विश्वास असतो तो या संचितावर. किंबहुना आपली सगळी शक्ती त्यासाठी खर्चून मग त्यावर अवलंबून राहतो आपण. मग ती शिदोरी असो वा नाती!!
इथे अमेरिकेमध्ये पाहिले तर अगदीच उलटी परिस्थिती. तंत्रज्ञानामुळे सगळे सुकर झाले आहे. सगळे इलेक्ट्रॉनिक झाल्यामुळे कात्रणांच्या गठ्ठय़ापासून ते फोटोच्या जत्थ्यापर्यंत सगळं रद्दबातल झालं आहे. घरात पाणी, वीज, शेगडी, फ्रिज, ओवन आणि मोबाइल, इंटरनेट  आणि गाडी याही तितक्याच महत्त्वाच्या..  या झाल्या किमान गरजा. किमान राहणीमानच इतक्या चांगल्या दर्जाचं आहे म्हणजे किमान पगार म्हणजे सगळ्यात कमी पगार असलेली व्यक्तीही इतकं कमवते की हे राहणीमान पेलून सुखात राहू शकेल. मुलांसाठी साठवण्याची गरज नाही कारण ती पाळण्यात असल्यापासून स्वतंत्रच निपजतात. स्वयंशिस्त तर इथे कमालीची आहे. आणि तेच त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचं रहस्य म्हणावं लागेल. स्वातंत्र्याआधी ते जबाबदारी शिकतात. तो एक वेगळा कौतुकाचा विषय झाला. पण या सगळ्यात कधी वाईट, अस्थिर तर कधी चांगले म्हणावे असे न गोठणारे नातेसंबंध.
सांगायचा मुद्दा हा की हे लोक ‘आजच’ आज जगून घेतात आणि बरे-वाईट सारे इथेच सोडून पुढे जात राहतात. आपण तर उद्याचंही दु:ख उधारीवर घेऊन येतो आज कंठण्यासाठी.  काहीच साठवू नये असे मला म्हणायचे नाही. आपल्या परिस्थितीसाठी ते अपरिहार्य आहे. पण एवढेच म्हणायचे आहे की, त्यात जगणे हरवून जाऊ नये.
साठवण उद्यासाठी इतकी नको
की तिचा आठव जास्त अन मोकळे श्वास कमी;
जिवंत असावे जगणे आज अन्
उद्यासाठी संचित त्याच्या आठवणी!
.. शॉवर घेता घेता आलेले हे काही विचार जे न साठवता, शॉवरसारखे बरसू दिले, तुमच्यासाठी!   

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
maharashtra Government climate action cell plan to face climate change zws
राज्यातील हवामान कृती कक्ष कसा करणार हवामान बदलांचा सामना?
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?