अमित घोडेकर
एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेने जगाची दारं सगळ्यांसाठी मोकळी केली आहेत, त्यातली संशोधने प्रगतीचे विविध मार्ग खुले करत आहेत, तर दुसरीकडे त्याच्या अति वापरामुळे माणसं एकांतापासून एकाकीपणाकडे जाऊ लागली आहेत, विचारशक्ती हरवून बसण्याइतपत त्यावर अवलंबून राहू लागली आहेत. कोणत्याही गोष्टीचा सजग आणि सावध वापरच तंत्रज्ञानाला उच्च स्तरावर घेऊन जाऊ शकतो.
कार्यालयात पोहोचल्यावर मधुराची सोमवारची सकाळ आपले दैनंदिन ई-मेल पाहण्यात, उत्तर देण्यात जात असे. अशाच एका सोमवारी तिचं लक्ष वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आलेल्या एका ई-मेलकडे गेलं. ज्यात एका प्रोजेक्टसंदर्भात अनेक गुंतागुंतीचे तांत्रिक आणि आर्थिक प्रश्न विचारलेले होते. सर्वसाधारणपणे अशा प्रश्नांची पडताळणी करून त्याला व्यवस्थित उत्तर देण्यासाठी तिला बराच वेळ लागला असता, पण या वेळी तिनं मदत घेतली ती कृत्रिम बुद्धिमत्तेची अर्थात ‘आर्टिफिशल इंटेलिजस’(एआय)ची. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आलेले प्रश्न तिनं ‘एआय’ला विचारले आणि अगदी काही क्षणांत तिला जशी हवी तशी उत्तरं चुटकीसारखी मिळाली. इतकंच नाही तर ‘एआय’नं तिला हा प्रकल्प यशस्वी करण्याकरिता कोणत्या तांत्रिक बाबीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे व त्यातील जोखीम घटक कोणते, कोणतं काम कोणत्या वेळी केलं पाहिजे, त्यावर किती खर्च झाला पाहिजे याची तपशीलवार माहिती दिली, आणि हे सर्व काम झालं अगदी काही क्षणांत. नकळत तिच्या मनात स्वत:च्या बुद्धीने विचार करून उत्तर देण्यापेक्षा ‘एआय’चाच वापर करण्याच्या विचारानं घर केलं.
अनेक दिवसांपासून काही कामानिमित्त परदेशात वास्तव्यास असणाऱ्या सावीला नवीन ठिकाणी मित्र-मैत्रिणी नव्हते. अनोळखी देशातील अनोळखी शहरात ऑफिसचं काम झाल्यावर किती भटकणार आणि काय करणार? काही दिवसांतच तिला खूप एकटं वाटायला लागलं. काय करायचं? कोणाशी बोलायचं? या प्रश्नाला उत्तर म्हणून सहजच तिनं तिच्या स्मार्टफोनवरील संभाषणासाठी वापरल्या जाणाऱ्या एका ‘एआय’टूलशी बोलायला सुरुवात केली. ते एक ‘ओपन एआय -चॅटबॉट’आणि ‘व्हर्च्युअल असिस्टंट’ होतं. जे तिनं आपल्या स्मार्टफोनवर डाऊनलोड करून घेतलं. त्याआधी तिनं कधीही ‘एआय’शी बोलायचा विचारही केला नव्हता. त्यामुळे अगदी जुजबी सुरुवात केली. आजचं तापमान काय आहे? ऑफिसला किती वाजता निघालं तर वेळेत पोहोचता येईल? या परिसरात चांगली भारतीय हॉटेल्स कोणती? तिथे कोणते चांगले पदार्थ स्वस्तात मिळतात? असे काही प्रश्न तिनं विचारले. त्या ‘एआय’नं तिला अतिशय योग्य आणि तिचं काम होईल इतकी चांगली माहिती दिली. साहजिकच तिचा त्यावर विश्वास बसला आणि एखादी मैत्रीण असल्यासारखी ती चक्क ‘एआय’शी ‘चॅट’ करू लागली. ती वैयक्तिक प्रश्नदेखील विचारू लागली. जवळपास प्रत्येक वेळी ‘एआय’ने तिला योग्य उत्तर देऊन चकित केलं. अगदी तिला जडलेल्या निद्रानाशावर कशी मात करता येईल आणि बिछान्यात गेल्यावर तिला लगेच चांगली झोप कशी लागेल यावरही अनेक चांगले उपाय सुचवले. इतकंच नाही, तर परदेशातील एकांतवासात कंटाळा घालवण्यासाठी कोणती चांगली गाणी ऐकावी किंवा कोणती पुस्तकं वाचावी हेदेखील ते सुचवत होतं. तिच्या या एकांतवासातील दिवसांत ते चॅटबॉट’तिच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक कधी झालं हे तिला कळलंदेखील नाही.
समाजमाध्यमावर नियमित काही ना काही टाकत असणाऱ्या अवनीच्या ‘पोस्ट’ना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. अनेकदा तिच्या माहितीपूर्ण लेखापेक्षा दुसऱ्यांच्या सर्वसाधारण माहितीलादेखील चांगला प्रतिसाद बघून ती काहीशी आश्यर्यचकित झाली होती, पण सांगणार कोणाला? सहजच एकदा तिचं बोलणं तिच्या एका ‘टेक’वेड्या मैत्रिणीशी झालं. तिची ही मैत्रीण म्हणजे तंत्रज्ञानातील तिची गुरूच. तिच्याकडून ‘टेक’जगात होणाऱ्या अचाट बदलांबद्दल आणि नवीन गॅजेट्स आणि अॅप्सबद्दलची माहिती ऐकून ती हरखूनच गेली होती. तिच्याकडूनच मग तिला ‘एआय’वर चालणाऱ्या विविध अॅप्लिकेशन्सची माहिती मिळाली. ‘एआय’चा वापर करून समाजमाध्यमावर चांगला प्रतिसाद कसा मिळू शकतो, याची माहिती तर तिच्यासाठी एखाद्या ‘मास्टरक्लास’सारखीच होती. हळूहळू तिनं ‘एआय’चा वापर करून आपली माहिती, आपला श्रोता आणि त्यांना काय आवडतं, याचा चांगला अभ्यास करून ‘पोस्ट’ करणं सुरू केलं. अगदी काही दिवसांतच तिला उत्तम प्रतिसाद मिळू लागला.
मैत्रीण म्हणाली, ‘‘तंत्रज्ञानाच्या जगात असं म्हणतात की, तुमचा मोबाइल तुम्हाला तुमच्या आई-वडील, बायको, मित्र-मैत्रिणींपेक्षा जास्त चांगलं ओळखतो आणि हे अगदी खरं आहे. तुम्ही किती वाजता उठता? सकाळी तुम्ही कोणते मेसेजेस वाचता? तुम्ही कोणत्या ठिकाणी काम करता? त्या ठिकाणी येण्याजाण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? तुम्हाला काय खायला आवडतं? कोणत्या प्रकारचे चित्रपट बघायला आवडतात? कोणती पुस्तके तुम्ही वाचता? कोणती औषधे घेता? इंटरनेटवर तुमचा वेळ तुम्ही कसा व्यतीत करता? अगदी तुम्ही कोणता व्यायाम करता? त्यामध्ये तुम्ही किती कॅलरीज ‘बर्न’ करता? सर्वाधिक कोणाशी बोलता? अशी तुमची जवळपास सगळीच माहिती तुमच्या मोबाइलमध्ये तुम्हाला माहीत असताना किंवा नसताना रेकॉर्ड होत असते. याच माहितीचा वापर मग मोबाइलमधली विविध अॅप्लिकेशन्स त्याच्या ‘एआय’मध्ये करतात आणि तुम्हाला अनेक गोष्टींची माहिती पुरवत असतात. एक प्रकारची गुप्तहेरच. ती सदैव तुमच्यावर लक्ष ठेऊन असतात आणि कोणत्या क्षणी तुम्हाला काय माहिती पुरवायची यासाठी सदैव तत्पर असतात. अर्थात सेटिंग्जमध्ये काही बदल केले तर ते काही प्रमाणात थांबू शकतं.
मात्र त्याचा अतिवापर नेहमीच सर्वनाशाकडे नेऊ शकतो. निशाही अशाच विविध ‘एआय’मध्ये अडकलेली. ऑफिसमधील काम असो किंवा मित्र-मैत्रिणींसाठी एखाद्या सुंदर ठिकाणी सहल आयोजित करणं, अशा जवळपास सर्वच गोष्टींसाठी निशा कृत्रिम बुद्धिमत्ता असणारी अनेक अॅप्लिकेशन्स वापरत असे, तिचा वापर एवढा होतो की तिला तिच्या मित्र-मैत्रिणींनी ‘निशा जीपीटी’ (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगातील लोकप्रिय नाव) हे नाव दिलं होतं. दिवसातला बराच वेळ निशा अशा अनेक सॉफ्टवेअरमध्ये हरवून जायची. तिचं हे हरवून जाणं एकाद्या व्यसनासारखंच होतं. पण तिला मात्र त्याचं गांभीर्य कळत नव्हतं.
रात्री झोपताना एका बोलणाऱ्या ‘एआय’वर मंद आवाजातली गाणी लावून ती शांत झोपी जायची, पण सकाळ झाल्यावर ‘तिला’ काही ना काही विचारत तिचा दिवस सुरू होत असे, दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांनी वाढदिवसाला तिला ‘ती’ भेट दिली होती, पण आता ती आई-वडिलांपेक्षा ‘तिच्या’शी जास्त बोलत असे, (कदाचित तक्रारी ऐकाव्या लागत नसल्यामुळे) घरी सुट्टीच्या दिवशीदेखील तिचा बहुतेक वेळ ‘तिच्या’शी बोलण्यात जात होता. इतका की, आता आईची तक्रार असे की, ती जिवंत माणसांशी बोलण्यापेक्षा आभासी जगातच जास्त वावरते.
या व्यसनाधीनतेचा परिणाम निशाला जाणावू लागला. त्याची सुरुवात तिच्या कार्यालयामधून झाली. त्यांच्या कार्यालयातील सायबर सिक्युरिटी विभागाने सुरक्षिततेच्या कारणास्तव सर्व कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या अॅप्लिकेशन्सचा वापर बंद केला. निशासाठी तो मोठा धक्काच होता. कारण ई-मेलला प्रतिसाद देणं किंवा एखादा प्रोजेक्ट करणं यात निशा सर्रास ‘एआय’चा वापर करत होती. सुरुवातीच्या काही दिवसांतच निशाला अगदी सोपी कामं करणंही अवघड जाऊ लागलं. एखाद्या ई-मेलला प्रतिसाद देताना निशाला बराच वेळ लागू लागला, कधी कधी तर प्रतिसाद काय द्यावा, त्याचा मायना कसा असावा, त्यातलं व्याकरण बरोबर आहे की नाही असे प्रश्न पडू लागले. तेच तिच्या प्रोजेक्टमध्ये घडू लागलं. त्याच्या तांत्रिक बाबीमध्ये कोणत्या वेळी कोणती गोष्ट वापरावी, ते वेळेत कसं पूर्ण करावं यात ती अपयशी ठरत होती. गेल्या दोन वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा नको इतका वापर करून त्यांची इतकी सवय लावून घेतली होती की, स्वत:च्या बुद्धिमत्तेचा वापर करायला जणू विसरलीच होती. साहजिक ऑफिसमधली आवडती निशा आता नावडती झाली होती.
या सर्व गोष्टींचा परिपाक तिच्या वैयक्तिक आयुष्यावर झाला. आईने ‘ती’ला तिच्यासोबत नेलं होतं, त्यामुळे घरीही तिला कुणीही बोलायला राहिलं नाही. एकूणच तंत्रज्ञानाचा चुकीचा आणि नको इतक्या वापराचा गंभीर दुष्परिणाम तिच्या विचारक्षमतेवर झाला होता. सतत कोणती ना कोणती ‘स्क्रीन’ मग ती मोबाइल फोनची, लॅपटॉप, डेस्कटॉप नाही तर टीव्ही तिला कशात ना कशात गुंतवत होती. मात्र तिचा स्वत:चा विचार हरवला होता. अगदी जवळचे मित्र-मैत्रीण दुरावले होते, कारण कित्येक दिवस त्यांच्याशी तिचा संपर्कच नव्हता. तिचा एकटेपणा तिला एकांतपणाच्या गर्तेत घेऊन गेला होता.
शेवटी तिच्या वडिलांनीच तिची समजूत घातली, ‘‘अगं, कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक शक्तिशाली साधन आहे, परंतु त्याचा योग्य वापर करणं आवश्यक आहे. मानवी मन आणि शरीरावर होणारे नकारात्मक परिणाम, आपल्या भावना आणि त्याचे परिणाम टाळण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीनं आणि मर्यादित वेळेतच करायला हवा. जागरूकता, योग्य शिक्षण आणि योग्य सवयी असतील तरच कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्यासाठी अकृत्रिम स्नेहाचा सेतू ठरू शकतो.’’
हा विचार मात्र तिला साक्षात्कारासारखा सर्व नकारात्मक गोष्टींतून बाहेर घेऊन आला. आता यापुढे मात्र ती ‘एआय’चा वापर ‘विचारपूर्वक’ करणार होती.
(लेखक ‘अरामॅक्स’ या बहुराष्ट्रीय कंपनीत ग्लोबल सायबर सिक्युरिटी ऑफिसर (CISO) या पदावर कार्यरत असून त्यांनी गेल्या दोन दशकात तंत्रज्ञान, सायबर सिक्युरिटी आणि इतर विषयात मार्गदर्शनपर विपुल लिखाण केले आहे. ‘ब्लॅकहॅट’ या जागतिक सायबर सिक्युरिटी परिषदेमध्ये त्यांचे अनेक शोध निबंध प्रकाशित झाले आहेत.)
amitghodekar@hotmail.com
‘पडसाद’ तुमच्यासाठी
‘चतुरंग’ ने यंदाही तुम्हाला वाचनाचा भरघोस आनंद देत आहे. विविध कंगोरे मांडणारे वेगवेगळे विषय, नामवंतांचे अनुभव, त्यांच्या मुलाखती या सगळ्यांमुळे तुमच्याही विचारांत, अनुभवांत नक्कीच भर पडत असेलच. काय आहे तुमचा अनुभव या सदरांविषयी आणि पान १ वरच्या लेखांविषयी. आम्हाला नक्की कळवत राहा. ‘पडसाद’ हे सदर याच साठी आहे. तुम्ही मोकळेपणाने आम्हाला कळवू शकता तुमची मते. अगदी मतभेदही मुक्तपणे नोंदवा. ठोस विचार मांडणारी पत्रे नक्कीच प्रसिद्ध केली जातील. फक्त आणि फक्त मराठीमध्ये पाठवलेलीच पत्र प्रसिद्ध केली जातील. ईमेल करताना सब्जेक्ट मध्ये ‘चतुरंग पडसाद’ असा उल्लेख करावा. मात्र लेखएकाच ईमेलवर पाठवावा तसेच यासंदर्भात पत्रव्यवहार केला जाणार नाही आमचा पत्ता ईएल १३८,टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई ४००७१० किंवा chaturang@expressindia.com अथवा chaturang.loksatta@gmail.com