कित्येकदा समोरच्या व्यक्तीचे मत अधिक तर्कशुद्ध व स्वीकारण्याजोगे आहे हे लक्षात येते, मात्र तरीही आपल्या मनात जी स्वमतांधतेची चौकट झालेली असते, त्यामुळे आपण आपल्या मताला चिकटून राहतो. वेगळ्या मतांच्या माणसाला दूषण देतो आणि स्वत:चेच नुकसान करून घेतो.
माणूस म्हणून आपला जो विकास व्हायला हवा त्यात स्वमतान्धता, परमताविषयी द्वेष, धिक्कार, इतरांच्या मताबाबत तुच्छता, असहिष्णुता या गोष्टी फार मोठय़ा शत्रू ठरतात. एवढेच नव्हे, तर आपली कट्टर मते िहसक मार्गाने इतरांवर लादणारे स्वमतांध लोक जगाच्या विनाशाला कारणीभूत ठरतील, असे स्वामी विवेकानंद यांनी शतकापूर्वी नोंदवून ठेवले आहे. हे त्रिकालाबाधित सत्य असून जगातील विचारवंतांचे याबाबत दुमत नाही. भारतीय भूमीवरील संस्कृती टिकून राहिली, एक विशाल तत्त्वज्ञान इथे बहुअंगांनी बहरले, कारण परकीय मानव समुदायातील अनेक गोष्टी इथे स्वीकारल्या गेल्या, संस्कृतीत सामावल्या गेल्या.
माणूस आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या चांगल्या-वाईट मतांना अगदी घट्ट चिकटून असला तर जगण्यात किती विसंगती निर्माण होऊ शकते याचं गमतीदार उदाहरण देताना स्वामीजी म्हणतात, ‘‘एखादा मनुष्य लोकांना सतत फसवत असेल, लोकांना त्याच्यापासून धोका असेल, परंतु हा दुष्ट माणूस मद्यपान करीत नसेल, तर त्याचं पक्कं मत असतं की, जगातील सर्वात निंदनीय गोष्ट म्हणजे मद्यपान! ती जगातून नाहीशी झाली, की जग नीतिमान बनेल. जो माणूस थोडंबहुत मद्य घेत असेल, त्याच्या अंगी थोडासाही चांगुलपणा या मद्यपान निषेध करणाऱ्या महाशयांना आढळत नाही, पण तो स्वत: जी दुष्कृत्ये करीत असतो त्याचे त्याला काहीच वाटत नाही. अशा स्वार्थीपणाने एकांगीपणाने मनुष्य स्वत:चे आणि मनुष्यजातीचेही नुकसान करीत आला आहे.
एखाद्याचे मत आपल्याला पटले नाही तरी त्याचे मत बाळगण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे, हे कधीच विसरता कामा नये. अशा वेळी वादविवाद करून त्याचे मत हिरिरीने खोडून काढताना आपल्या मनात जर द्वेष आणि राग उद्भवू लागला तर आपली ऊर्जा नाहक खर्च होते. विधायक विचारांना खीळ बसते. विचार नकारात्मक, अगदी िहसकसुद्धा होऊ शकतात. आपले आणि आपल्या समाजाचे भले करण्यासाठी ही ऊर्जा खर्च करण्याऐवजी त्या माणसाला किंवा त्या समाजाला नामोहरम करण्यासाठी आपण व्यूहरचना सुरू करतो. इथेच अध:पतनाला सुरुवात होते. कित्येकदा असेही घडते की, समोरच्या व्यक्तीचे मत अधिक तर्कशुद्ध व स्वीकारण्याजोगे आहे, त्यामुळे आपले भले होणार आहे असे आपल्या उशिरा का होईना लक्षात येते, मात्र तरीही आपल्या मनाची जी स्वमतांध चौकट झालेली असते, त्यामुळे आपण आपल्या मताला चिकटून राहतो. वेगळ्या मतांच्या माणसाला दूषण देतो. त्याच्याबद्दल भलेबुरे बोलतो आणि स्वत:चेच नुकसान करून घेतो.’’
स्वामीजी म्हणतात, ‘‘अशा शंभर स्वमतान्ध व्यक्तींपकी नव्वद व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रोगाने पछाडलेल्या असतात.’’ परमताविषयी सहिष्णुता, उदारता बाळगणे स्वत:चा विकास करून घेण्यास पोषक असले तरी परमत आपल्यावर लादून घेण्याची दुर्बल सहिष्णुताही कामाची नाही. आपल्या मतात, दृष्टिकोनात लवचीकता हवी. कालानुरूप तर्कशुद्धपणे मताची फेरमांडणी करायला हवी. उदाहरणार्थ समुद्रातून परदेशगमन करणे पाप आहे, असे मत िहदू समुदायावर एका रूढीच्या स्वरूपात लादले गेले. येथील विचारवंतांनी या मताशी चिकटून असलेल्या स्वमतांध लोकांचे मत स्वत:वर लादून घेतले नाही. हळूहळू ते मत, ती रूढी कालबाह्य़ ठरली.
स्वामीजी म्हणतात, ‘‘सुधारणा करण्यासाठी एकांगीपणा आणि अतिरेकीपणा दोन्हीही वाईटच. तेव्हा त्या वज्र्य करा. आधी आपले शरीर आणि मन निरोगी बनवा. अधिक उदारपणे जगाकडे बघा. जगाबद्दल सहानुभूती बाळगा. स्वमतान्ध लोक नुसते तिरस्कार करीत असतात. वेगळ्या मतांच्या लोकांचा द्वेष करीत असतात. तिथे विवेक, सहानुभूती, प्रेम यांना थारा उरत नाही. समजा एखादा माणूस मद्य पिण्याच्या अगदी कट्टर विरोधात असेल, तर तो मद्यपी माणसाला समजून घेण्याच्या फंदात सहसा पडत नाही. तो मद्यपी माणसाचा तिरस्कार करतो, त्याला दोष देतो आणि त्यातून आपली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करतो. आपण ज्या मताचा हिरिरीने प्रचार-प्रसार करतो त्या बदल्यात आपल्याला (मान्यता, प्रतिष्ठा, पसा) काही तरी मिळावे अशी स्वमतांध मनुष्याची अपेक्षा असते. त्यासाठी तो हाणामारी करतो, लुटालूट करण्यास धावतो, िहसासुद्धा करतो.’’ हे सर्व समजावून स्वामीजी म्हणतात, ‘‘जेव्हा तुम्ही स्वमतांध लोकांची संगत सोडाल तेव्हाच खरे प्रेम कसे करावे, इतरांबद्दल सहानुभूती कशी बाळगावी हे तुम्हाला कळू लागेल. प्रेम आणि सहानुभूती वाढल्यावर तुम्ही विरोधी मतांच्या लोकांचा धिक्कार करणार नाही.’’
आपल्या पूर्वजांनी म्हटले आहे, ‘बालादपि सुभाषितम् ग्राह्यम्’ म्हणजे लहान मुलाचे मतसुद्धा विचारात घ्यावे. जर ते योग्य, सुसंगत असेल तर त्याचा अंगीकार करावा. एखाद्या गोष्टीवर, कर्मावर, विचारावर, समुदायावर किंवा व्यक्तीवर श्रद्धा असणे स्वाभाविकच आहे. त्यातून मते बनतात, पण ती परिवर्तनशील हवीत. एका व्यक्तीच्या आयुष्यातसुद्धा बालपणी, तरुणपणी, वृद्धापकाळी मते भिन्न होत जातात. कट्टरता माणसाला मतांध बनविते. ती मनुष्याची अवनती घडवायला कारणीभूत ठरते. स्वामीजी म्हणतात, ‘‘मनुष्य नुसताच श्रद्धाशील असू नये, तर त्याची श्रद्धा ही बुद्धिनिष्ठ असावी. प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी स्वीकारायला व तिच्यावर विश्वास ठेवायला जर तुम्ही मनुष्याला भाग पाडाल, तर तो लवकरच पागल होऊन जाईल.’’
इतरांचे मत बुद्धीच्या कसाला लावून पारखून घ्यायचे तर आपले मतही तसेच पारखून स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क इतरांनाही असेल हे ओघाने आले. त्यांच्या विरोधी मताचा आदर राखणे हेही त्याच ओघात आले.
परमतसहिष्णुता ही व्यक्तीप्रमाणेच समाज आणि धर्माबद्दलही असायला हवी. परधर्माविषयी जिव्हाळा, सहानुभूती, द्वेषाचा अभाव आपल्या देशातच विद्यमान आहे, असे स्वामीजी अभिमानाने नमूद करतात. शिव महिम्न स्तोत्रातील एक श्लोक समजावताना ते म्हणतात, ‘‘ भिन्न भिन्न पर्वतांमधून उगम पावणाऱ्या नद्या सरळ वा नागमोडी गतीने वाहत जाऊन अखेरीस समुद्रास मिळतात त्याप्रमाणे आपापल्या भिन्न प्रवृत्तींच्या अनुरोधाने माणसे जे भिन्न धर्ममार्ग चोखाळतात ते कितीही वेगळे दिसले तरी अंती एकाच ईशतत्त्वाशी येऊन पोहोचतात.’’
स्वामीजी म्हणतात,‘‘सर्व भेद नाहीसे होतील हे असंभाव्य आहे. वैचित्र्याखेरीज, विविधतेखेरीज जीवनच शक्य नाही. विचारांमधील हा संघर्ष, हे वैचित्र्य, ही विविधताच ज्ञान, उन्नती वगरेचे मूळ आहे. विरोधी भाव अस्तित्वात राहतीलच, परंतु म्हणून आपण एकमेकांचा द्वेष करायला हवा, एकमेकांशी कलह करायला हवा असे नाही. अपरिवर्तनीय स्वमतांधतेमुळे माणसाला घातक असा अहंकार होतो. आपण लक्षात घ्यायला हवं की, परिवर्तन हा स्थायिभाव आहे. त्यामुळे आपली स्वत:चीही मते भिन्न होत जातात. आपल्या पूर्वजांनी घोषित केलेली मूलतत्त्वे तर्कशुद्धपणे कृतीत आणली, तर जीवनाविषयी उदार, व्यापक दृष्टी स्वाभाविकपणे अंगी बाणेल. संकुचित क्षेत्रातून बाहेर पडणे, सर्वाशी मिसळणे व हळूहळू विश्वाशी एकरूप होणे, हे आपले खरे ध्येय असायला हवे.’’
स्वमतान्धता
कित्येकदा समोरच्या व्यक्तीचे मत अधिक तर्कशुद्ध व स्वीकारण्याजोगे आहे हे लक्षात येते, मात्र तरीही आपल्या मनात जी स्वमतांधतेची चौकट झालेली असते, त्यामुळे आपण आपल्या मताला चिकटून राहतो.
आणखी वाचा
First published on: 10-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Own opinion