घरच्या आर्थिक विवंचनेला उत्तर म्हणून पल्लवी पालकर यांना एक उद्योग मिळाला  चिरलेल्या भाज्यांची पाकिटं विकायचा. नोकरदार स्त्रीला फायद्याचा ठरणारा हा व्यवसाय त्यांना थेट उद्योजिकाच करून गेला. दिवसाला पन्नास पाकिटांपासून सुरू झालेला त्यांचा हा व्यवसाय आता दिवसाला दोन हजार पाकिटांपर्यंत पोहोचला आहे. स्वतच्या आर्थिक अडचणी सोडवतानाच इतर गरजू स्त्रियांना रोजगार मिळवून देणाऱ्या पल्लवी पालकर यांच्याविषयी..
मिळवतीचं दु:ख म्हणजे ऑफिसमधून आठ तास काम करून लोकलला लटकत घर गाठायचं. पदर खोचून किंवा ओढणी बांधून स्वयंपाकघरात शिरून स्वयंपाकाला लागायचं. रात्रीचं जेवण संपवून हुश्श होतंय तोच सकाळच्याला भाजी काय? डब्याला सुकी भाजी काय? विचार करीत पेंगुळत्या शरीरानं व मनाने भाजी निवडायला बसायचं. या कंटाळवाण्या, वेळखाऊ कामातून मिळवतीची सुटका करण्याचं काम नवी मुंबई इथल्या पल्लवी पालकर यांनी केलं आहे. हवी ती भाजी ताजी ताजी आणि तीही आयती, चिरलेली पल्लवीकडे सहज उपलब्ध होते.
पल्लवीचं शिक्षण डी.एम.एल.टी. म्हणजे पॅथालॉजी लॅबशी निगडित आहे. लग्नाआधी ते काम केलं. लग्नानंतरही लॅबमध्ये नोकरी केली, पण घरी यायला रात्रीचे नऊ वाजायचे. त्याला पर्याय हवा होता तोही छोटी मुलं, सासुसासरे हे एकत्र कुटुंब सांभाळून पल्लवीला काही तरी करायचं होतं, हातभार लावायचा होता. विचार चालूच होता. पती आशीषचा व्यवसाय खडी-मशीनचा होता. अचानक मंदी आली. आíथक विवंचना भेडसावू लागली. मुंबईतला खर्च, मुलाचं शिक्षण याचा ताळमेळ बसेना. काही तरी करायच्या ऊर्मीचं गरजेत रूपांतर झालं. विचारचक्र फिरू लागलं अन् अचानक चिरलेल्या भाज्या  उपलब्ध करून देण्याच्या व्यवसायाचं बीज मनात पडलं व पल्लवीनं ते लगेच कृतीत आणलं.
 मग पल्लवीची भ्रमंती सुरूझाली. सुरुवातीला एल.आय.सी., यू.टी.आय., एच.डी.एफ.सी., एम.टी.एन.एल. अशा मोठय़ा प्रमाणात नोकरदार स्त्री वर्ग असणाऱ्या कार्यालयात लंच टाइममध्ये पल्लवी भाज्याचे पाकिट्स दाखवायची. महिला वर्ग आनंदानं भाज्या विकत घ्यायचा. महिलांच्या प्रतिसादानं पल्लवीला उभारी आली. सुरुवातीला पहाटे पाचला पल्लवी वाशी जवळच्या ए.पी.एम.सी. मार्केटला स्वत: जाऊन भाज्या खरेदी करायची. व्याप वाढला तसं तिच्या पतीने, आशीष पालकरांनी आपणहून भाजी खरेदीची जबाबदारी स्वत:कडे घेतली. पल्लवीचा दिवस चारला सुरू व्हायचा. गाडीनं वाशी स्टेशन व इतर भागांतून स्टाफला प्रथम घेऊन यायचे. प्रत्यक्ष कामाला ५ वाजता सुरुवात व्हायची. पालेभाज्या, भेंडी, गवार, पडवळ, कारली, तोंडली, फरसबी, घेवडा, वालपापडी या सर्व भाज्या प्रथम स्वच्छ धुऊन सुकवल्या जायच्या. देठे काढणे, किडकी भाजी बाजूला काढणे, चांगली चिरून वजनाप्रमाणे पाकिटं बनवणे हे काम सकाळी ५ ते दुपारी २ पर्यंत चालते. ‘आशीष एंटरप्रायजेस’ या नावानं कामाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी १०० पाकिटे विकली गेली. हळूहळू त्यात मॅन्चुरियन, हक्का नूडल्स, सांबार मिक्स, पावभाजी, कुर्माभाजी अशी दोनशे ग्रॅमची कॉम्बो पॅकेट्स तयार होऊ लागली.
 वाशीतील ‘सेंटरवन’, बिग बाजारच्या ‘फूड बाजार’सह मुंबईतील ‘अपना बाजार’, ‘स्पिनॅच’, ‘फूडलॅड’ अशा जवळपास २० ते २२ मॉल्समध्ये त्यांच्या भाज्यांचा पुरवठा केला जातो. त्याशिवाय लसूण, स्वीट कॉर्नचे दाणे, ऑर्डरनुसार ओल्या खोबऱ्याचा कीसही पल्लवीची कंपनी पुरवते. दिवसाला ५० पाकिटापासून सुरुवात झालेल्या उद्योगाची मजल आज दिवसाला ६००  किलो भाजी आणि दीड ते दोन हजापर्यंत पाकिटे इथपर्यंत गेली. शनिवार, रविवार, सणासुदीला तर जास्तच ऑर्डर्स येतात.
 या व्यवसायाला लागणारं तुटंपुजं भांडवलही सुरुवातीला तिच्याकडे नव्हतं ते तिच्या आईनं दिलं. व्यवसाय वाढू लागला तसं पल्लवीचा व्याप प्रचंड वाढला.  मुलं लहान होती. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी सासूबाईंनी आनंदाने स्वीकारली. वेळ पडल्यास सासूबाई स्वत: भाजी चिरायला बसायच्या. व्यवसायात जम बसू लागला तसा पल्लवीचा आत्मविश्वास वाढू लागला. ‘इवलासा वेलू गगनावरी’ जायची तिची स्वप्नं प्रत्यक्षात उतरू लागली. अडचणी खूप होत्या त्यावर ती मात करू लागली. स्वत:च्या घरातून तिनं हा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय वाढला तसं सोसायटीतच दोन बेडरूमचा एक फ्लॅट भाडय़ाने घेतला. मात्र बििल्डगमधील लोकांनी आठ दिवसांतच विरोधाचे शस्त्र उगारले. सही मोहीम राबवून ‘वास येतो’ या सबबीखाली फ्लॅट खाली करायला सांगितलं. आता काय करायचे प्रश्नचिन्ह आ वासून उभे असताना ए.पी.एम.सी. मार्केटमधील अडतदार शिवाजी बाबूराव ठोंबरे यांनी तुभ्रे येथे जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे व्यवसाय एकदम तेजीत आला. भाज्यांची पाकिटं वाशी, परळ, मुलुंड, अंधेरी, गोरेगाव, कांदिवली, मालाड, ठाणे अशा १५ ते २० मॉल्सपर्यंत पोहोचू लागली.
गरजू महिलांनाच काम द्यायचं हे पल्लवीचं धोरण होतं. अलिबागला त्यांचे काका, काकी व त्यांची दोन मुलं अतिशय हलाखीच्या परिस्थितीत राहत होती. पल्लवीनं त्यांना बोलावून घेतलं. त्यांची राहण्याची व्यवस्था केली. व्यवसायात योग्य ते काम दिलं. काकीच्या मुलांनी काम करत शिक्षण पूर्ण केले. अख्ख्या कुटुंबाला मार्गी लावण्याचं सत्कार्य पल्लवीनं केलं.
पल्लवीच्या सोसायटीत मानखुर्दवरून कचरा उचलायला सागराबाई यायची. अतिशय गरीब अशा तश्मिया शेखला ती पल्लवीकडे घेऊन आली. तश्मिया नंतर आपली बहीण नाझिया व आईलाही कामाला घेऊन आली. महिन्याला बारा हजार रुपयांची मिळकत व्हायची. त्यांनी धाकटय़ा बहिणीचे शिक्षण पूर्ण केले. नंतर या तिन्ही बहिणींची लग्नं झाली. एक दाक्षिणात्य अम्मा हलाखीच्या परिस्थितीत धुण्याभांडय़ांची कामं करायची, पण वयामुळे झेपत नव्हतं, शिवाय अशी काम करण्याची तिला लाजही वाटायची. पल्लवीनं तिला काम दिलं. ती आता आयुष्य आनंदात घालवते आहे. पल्लवीकडे िहदी भाषाही ती शिकली. अशीच आणखी एक बाई, घरची आर्थिक परिस्थिती एकदम बिघडत गेली. महागाईला मेळ घालता येईना. मुलांनी घरकाम करू नकोस म्हणून सांगितलेलं. त्याच वेळी हे भाजी चिरण्याचे काम मिळाले आणि त्या बाईंची आíथक विवंचना दूर झाली.
या  व्यवसायात पल्लवीने कर्ज काढयचं नाही हे ठाम ठरवलं होतं त्यासाठी तिने कायम भांडवल फिरते ठेवले. आलेला फायदा घरखर्चाला वापरून उरलेले सारे पसे परत उद्योगासाठी वापरले. कुटुंबाची आíथक ददात तर मिटवलीच, पण गरजू गरीब महिलांनाही उपजीविकेचं साधन मिळवून दिले. २६ जानेवारीला अचानक एका मॉलमधून दोन हजार भाजी पाकिटांची ऑर्डर आली. एका दिवसात कसे काम करायचे म्हणून पल्लवीने ऑर्डर नाकारायची ठरवले, तर सगळ्या स्टाफनं- ‘ताई, संधी चालून आलीय. आपण ती ऑर्डर घेऊ,’ अस्सं स्वत:हून सांगितलं. रात्री दहा वाजता सुरू केलेलं काम सकाळी नऊला संपले. स्टाफनं ऑर्डर पूर्ण केली. गणेश चतुर्थीच्या वेळी पल्लवी पूर्ण स्टाफला घरी जेवण देते. वर्षांतून एकदा गेटटुगेदर पार्टी ठेवून हॉटेलमध्ये जेवायला नेते. आलिबाग बीचवर तिने स्टाफची पिकनिकही काढली होती.
 ‘आशीष एंटरप्रायजेस’ हे एक कुटुंब आहे, ही भावना स्टाफच्या मनात निर्माण करण्याचे श्रेय पल्लवीला जाते. मितभाषी, ऋजू, निगर्वी अशा तिच्याशी बोलताना अवघ्या पंधरा वर्षांतील उत्कर्षांचा आलेख अचंबित करतो. तिचा स्वभाव हेच तिचे सामथ्र्य आहे अस्सं वाटतं.
पल्लवीच्या या कामाची पोचपावती म्हणजे २००६ मध्ये ‘स्नेहांकिता’ या संस्थेकडून ‘उद्योगशील’ पुरस्कार, तर ‘सांस्कृतिक युवा प्रतिष्ठान’, ‘विहंग ग्रुप’ यांच्या वतीनं २०११ मध्ये ‘शिवगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दूरचित्रवाणी वाहिनीवर ‘तेजस्विनी’ व ‘ग्रेट गृहिणी’मध्येही त्यांची मुलाखत झाली आहे. भविष्यकालीन योजनांविषयी विचारताना पल्लवीने मला एक धाडसी प्लॅन सांगितला. काही काळ भाजी व्यवसायाला विराम देऊन नवीन व्यवसाय सुरू करणार आहे. तो मेगा इव्हेन्ट असेल. मसाले, पापड, पीठ यांचं मोठय़ा प्रमाणावर उत्पादन सुरू करून जास्तीत जास्त गरजू महिलांना काम द्यायचे आहे. पोळीभाजी केंद्र सुरू करून महिलांची स्वयंपाकघरातून सुटका करायची आहे. मोठय़ा स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करणारी पल्लवी मोठय़ा जागेच्या शोधात आहे.
 अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपली जिद्द, चिकाटी, कष्ट यांच्या बळावर पल्लवीने मारलेली ही भरारी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.. ठरते आहे !

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा