मैत्रेयी केळकर

कलेची साधना करणं म्हणजे जणू ईश्वराची आराधना करणं. निबीड अरण्यात, एकांतवासात आपल्या आराध्याला आळवणारे योगी पुरुष काय किंवा अनंत अडचणी सोसत, अथक परिश्रम करत कलेची साधना करणारे कलाकार काय, यात यित्कचितही फरक नाही! दोघांचीही ध्येयासक्ती एकसारखीच. सच्चा कलाकार परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल, एकतानतेने तो आपल्या कलाविष्कारात, कलाप्रसारात स्वत:ला झोकून देतो. या वर्षी आईमुडियंद राणी माछेई यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा वरील गोष्टींचा पुन:प्रत्यय आला.

Swara bhaskar photo with Sajjad Nomani Troll
Swara Bhaskar: ‘व्होट जिहाद’चा उल्लेख केलेल्या सज्जाद नोमानींसह स्वरा भास्करचा फोटो पाहून नेटिझन्सनी उडवली खिल्ली
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Poetess Ushatai Mehta believed she only wrote poetry but discovered she also wrote prose
बहारदार शैलीचा कॅनव्हास
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
savita malpekar bald look in kaksparsh praises Mahesh Manjrekar
“महेशने विचारलं टक्कल करशील का? मी लगेच…”, सविता मालपेकरांनी सांगितला ‘काकस्पर्श’चा किस्सा, म्हणाल्या…
marathi actress wedding photo
‘पुन्हा सही रे सही’ नाटकातील अभिनेत्रीचं थाटामाटात पार पडलं लग्न! यापूर्वी लोकप्रिय मालिकेत साकारलेली भूमिका, पाहा फोटो
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई

घर, संसार, नोकरी सांभाळत आपल्यातल्या कलाकाराला त्यांनी घडवलं, फुलवलं. एवढंच नाही, तर मुक्तहस्तानं ही कला आपल्या शिष्यांकडे प्रवाहित केली. लोकसंस्कृतीच्या अमूल्य ठेव्याची जपणूक केली. ५० वर्ष अविरतपणे चाललेल्या त्यांच्या प्रयत्नांचा ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरव होत आहे. राणी यांचा जन्म १९४३ मध्ये सिद्धपुरा इथे झाला. कुर्ग म्हणजेच कोडागुच्या (कर्नाटक) निसर्गरम्य परिसरात त्यांचं बालपण गेलं. मुळात हा प्रदेश दैवी नैसर्गिक वरदान लाभलेला प्रदेश. कावेरी नदीच्या पवित्र उगमाचा प्रदेश. इथला सांस्कृतिक वारसा अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आणि संपन्न. याच कोडागु परंपरेतील ‘उम्मथाट’ हा नृत्यप्रकार राणीजींनी पुनर्जीवित केला, त्याचा प्रसार केला. लहानपणापासून त्या नृत्य करत असत. कोडागु परंपरेतल्या नृत्यप्रकारांवर लक्ष केंद्रित करत त्यांनी ‘कावेरी कलावृंदा’ची स्थापना केली. अनेक मुलांना नृत्य शिकवलं. कावेरी मातेच्या आशीर्वादस्वरूप असलेल्या उम्मथाट या जनपद नृत्य प्रकाराचं पुनरुज्जीवन केलं. कोडागु परंपरेत अनेक पारंपरिक नृत्यप्रकार सादर केले जातात. यात काही नृत्यं ही फक्त स्त्रिया, तर काही फक्त पुरुष सादर करतात. कोलाटा, बलकाटा, काथ्याटा, पिलाटा आणि उम्मथाट असे अनेक प्रकार यात आहेत. खरंतर ‘आटा’ या शब्दाचा अर्थ खेळ. ‘कोल’ म्हणजे काठी. काठी घेऊन सादर केला जाणारा तो कोलाटा. बलकाटा, काथ्याटा हे पुरुषांनी सादर करायचे नृत्यप्रकार. उम्मथाट हा मात्र स्त्रियांनी सादर करायचं नृत्य. यात पारंपरिक दागिने घालून, कोडागु पद्धतीची विशिष्ट साडी नेसून, हातात लहानगे टाळ घेत स्त्रिया नृत्य सादर करतात. मध्यभागी पाण्यानं भरलेला कुंभ घेऊन एक स्त्री उभी असते. तिच्याभोवती फेर धरत इतर स्त्रिया नाचतात. या वेळी गायन आणि वादन करणारे कलाकार साथ करत असतात.

राणीजींनी हे पारंपरिक नृत्यप्रकार तरुण मुलामुलींना शिकवले. पहिली चार-पाच वर्ष कर्नाटकात मडिकेरीमध्येच अनेक कार्यक्रम सादर केले. पुढे मुलामुलींना विचारून, त्यांची पसंती लक्षात घेऊन आणि घरच्यांच्या संमतीनं हळूहळू आसपासच्या चौदा जिल्ह्यांत कार्यक्रम सादर केले. सतत मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे त्यांनी या कलाप्रकाराचा अधिक प्रचार-प्रसार केला. या वेळी त्यांनी कोणाकडूनही आर्थिक मदत घेतली नाही. राणी त्या वेळी पोस्टात एजंट म्हणून काम करत होत्या. सुमारे चोवीस वर्ष त्यांनी हे काम केलं. आपलं घर, संसार, नोकरी सांभाळत त्यांनी कलेच्या विकासाकडे लक्ष पुरवलं. त्या स्वत:च या नृत्यासाठी पोशाख आणि दागदागिने तयार करत. मुलामुलींना स्वखर्चानं विविध ठिकाणी कला सादरीकरणासाठी घेऊन जात.
राणी यांनी पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा या कामास सुरुवात केली, त्या वेळी कुर्गमध्ये शाळेव्यतिरिक्त मुलींना बाहेर पाठवलं जात नसे. मग दुसऱ्या प्रदेशात कला सादरीकरणासाठी पाठवणं तर अशक्यच होतं. पण राणी यांनी पालकांच्या मनात विश्वास निर्माण केला. मुलांची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि आपला कार्ययज्ञ सुरू ठेवला. पुढे नोकरी थांबवून त्यांनी पूर्णवेळ नृत्यसेवेला वाहून घेतलं. त्यांच्या कावेरी कलावृंदाला अनेक ठिकाणांहून बोलावणी येऊ लागली. कर्नाटक सोडून सुरुवातीला त्या गोवा, मग हिमाचल, मध्य प्रदेश, हैदराबाद, चेन्नई, केरळ, महाराष्ट्र, एवढंच नव्हे तर पार जम्मू- काश्मीर, पंजाब, मिझोरामपर्यंत ही कला सादर करण्यासाठी प्रवास करत्या झाल्या. प्रत्येक राज्यात त्यांना अतिशय प्रेम आणि कौतुक मिळालं.
सदैव त्यांनी हिरिरीनं आपलं काम सुरू ठेवलं. मुलांना उत्तम शिकवलं, संसार मार्गी लावला. अनेक लोकांना गुंतवणुकीचं महत्त्व पटवून दिलं, नोकरीमध्येही मानसन्मान प्राप्त केले. जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी त्यांचा सन्मान झाला. दऱ्याडोंगरांतून फिरत, अवघड वाटा-वळणं पार करत लोकांना प्रत्यक्ष भेटून त्या बचतीचं महत्त्व पटवून देत, गुंतवणुकीसाठी त्यांना उद्युक्त करत आणि त्याच वेळी आपल्या सांस्कृतिक, कलापूर्ण ठेव्याच्या जपणुकीकडेही त्यांचं लक्ष असे.

आजवर सुमारे दहा हजार विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षित केलं आहे. एक प्रकारे कावेरी मातेचा आशीर्वादच घराघरात पोहोचवला आहे! छोटय़ा, दुर्गम भागापुरत्या सीमित असलेल्या कलेचं क्षितिज विस्तारण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. मागील पन्नास वर्षांपासून हे काम सुरूच आहे. ‘राजोत्सव पुरस्कार’, ‘उम्मथाट की रानी सन्मान’ यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. कर्नाटक अकादमीचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलं आहे. आता वयोमानामुळे त्या स्वत: नृत्य सादर करत नसल्या तरी विद्यादानाचं त्यांचं काम सुरू आहे. वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्या कुर्गी बोलीला लिपी प्राप्त व्हावी म्हणून प्रयत्नशील आहेत.

राणी यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. ‘उम्मथाट की रानी’ अशीच ओळख असणाऱ्या राणी माछेई या कलातपस्विनीला प्रणाम!