‘सरोगसी ही इंडस्ट्री होऊ नये’
२९ जानेवारीच्या अंकात मंजिरी घरत यांनी ‘सरोगसी’ या विषयाला लेखाद्वारे वाचा फोडली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. या संदर्भात माझे विचार मांडावेसे वाटतात. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’, ज्ञानेश्वर माऊली, विठु माऊली या शब्दांमध्ये आईचे श्रेष्ठत्व जाणवते. प्रत्येक जोडप्याची आपल्या रक्तामांसाचं मूल असावं अशी दुर्दम्य इच्छा असते. पूर्वी काही कारणांनी मूल झाले नाही तर दुसरा विवाह, दत्तक घेणे किंवा एखाद्या नातलगाचे मूल सांभाळून आपली अपत्याची तहान भागवली जायची. देवकी इतकेच यशोदेचे मातृत्व श्रेष्ठ होते. आज विज्ञानाच्या प्रगतीने त्यासाठी सक्षम नसलेल्या जोडप्याला सरोगसीद्वारे स्वत:चे अपत्य मिळण्याचा आनंद मिळतो. सध्याच्या परिस्थितीत करिअर, व्यग्र जीवनशैली यामुळे सक्षम असूनही स्वत:चे मूल या मार्गाने जन्माला घालण्याचे प्रकार सुरू आहेत. नऊ महिन्यांचे गरोदरपण आणि लहान बाळाचे संगोपन यासाठी वेळ नाही ही सबब सांगितली जाते. बाळाशी नाळेचे तर नाहीच नाही, पण त्याला सांभाळण्यासाठी आया ठेवून सहवासाचेही नाते राखले जात नाही. या परिस्थितीत आई-वडील आणि मूल यांचे भावबंध कसे असणार? पैशांच्या जोरावर स्वत:चं स्त्रीत्व किंवा पुरुषत्व सिद्ध करण्यासाठीचा प्रयत्न तर नाही ना हा? किंवा फावल्या वेळात अपत्यसुखाची तहान भागवण्यासाठीचा खटाटोप तर नाही ना?
एखादा मूर्तिकार स्वत:च्या हातांनी मूर्ती घडवतो, तिला सजवतो, ती मूर्ती आणि कारखान्यात बनणारी मूर्ती यातील फरक सामान्य माणसालाही समजतो. निकोप संगोपनासाठी आई-वडिलांनी पुरेसा वेळ अपत्याला देणे गरजेचे आहे. सरोगसी ही इंडस्ट्री होऊ नये, एवढं नक्की वाटतंय.
– शोभा राजे, नागपूर</p>
आधुनिकतेचा स्वीकार व्हावा
२९ जानेवारीच्या अंकातील मंजिरी घरत यांचा ‘आधुनिक आरोग्य तंत्रज्ञान- गरज, सोय आणि बरंच काही!’ हा लेख वाचला. त्या विषयावरची डॉ. मनीषा गुप्ते यांची प्रतिक्रिया जास्त आवडली. त्यात म्हटल्याप्रमाणे ‘स्वत:चं नसतं त्याला प्रेम देणं अशक्य’ असे जे म्हणतात त्यांना मला असं सांगावसं वाटतं, की असं म्हणणारे आपल्या देशातील लोकच कृष्णाची ‘यशोदेचा नंदलाल’ म्हणून पूजा करतात अन् यशोदेच्या मातृत्वाचं गुणगान गातात. इथे प्रत्येक गोष्टीला पळवाट (अगोदर मांत्रिक, आता तांत्रिक असते) आखूनच ठेवलेली असते. मागच्या पिढीनं सगळय़ा गोष्टी स्वत:च्या सोयीप्रमाणे केल्या. पण नव्या पिढीवर मात्र धार्मिक कार्य, रूढी, परंपरा आदींचा खूप जास्त दबाव टाकला जातोय. अगदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या सगळय़ा गोष्टींची सक्ती केली जाते (जसं की देवाचं ऑनलाइन दर्शन, प्रत्येक गोष्टीत उपस्थितीची सक्ती, एखादा संदेश ५-६ गटांत पाठवणं, एखादा मंत्र १० लोकांना पाठवणं). पण त्याबरोबरीनं आधुनिक आरोग्य तंत्रज्ञानालाही स्वीकारणं आवश्यक आहे.
– रेणुका तपसाळे, लातूर</p>
वाचनीय ‘सोयरे सहचर’
‘चतुरंग’मध्ये दर शनिवारी प्रसिद्ध होणारं ‘सोयरे सहचर’ सदर खूप छान आहे. २९ जानेवारीच्या अंकातील ‘अवाढव्य देहातलं गोंडस बाळ’ हा हत्तींवरचा लेख आवडला. आनंद शिंदे यांचे हत्तींबद्दलचे अनुभव हळवे नि वेधक होते. सामान्य माणसाला हत्तींच्या अज्ञात असणाऱ्या काही गोष्टी या लेखाद्वारे उलगडल्या. हत्तींशी असणारा हा त्यांचा सुसंवाद इतरांच्या माहितीत भर टाकणारा आहे. छायाचित्रेही खूप बोलकी होती. आगामी लेखांमधून असेच सच्चे सोयरे सहचर वाचकांच्या भेटीस येतील ही इच्छा.
हत्तींची छायाचित्रे काढताना, उलगडले एक वेगळे जग।
आणि अवर्णनीय अनुभवांचा, प्रवासच सुरु झाला मग।।
– मंगेश शशिकला पांडुरंग निमकर, कळवा