पडसाद: पालकांसाठी योग्य लेख
नीलिमा किराणे यांचा ‘मुलं असं कशामुळे वागतात?’ हा लेख (११ मे ) पालकत्वाची भूमिका किती आव्हानात्मक आहे हे समजावून सांगणारा आहे. किशोरवयीन मुले अशीच ‘का’ वागतात यापेक्षा ती ‘कशामुळे’ अशी वागतात याचा विचार् प्रथम होणे खूप गरजेचे आहे. किशोरवयीन मुलांमधील ताण त्यांच्या वागणुकीतून, भावनांमधून, विचारांमधून पालकांना लगेच समजून येतो. मुलांना या वाढत्या ताणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मुलांच्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करून त्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. छंद जोपासण्यास त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलांचे म्हणणे काय आहे हे पूर्णपणे ऐकून घेऊन त्यांचे मत मांडण्यासाठी वेळ द्यायला हवा. त्यांच्यासह अधिकाधिक वेळ घालवावा त्यामुळे मुलांना काय म्हणायचे आहे हे आपणास समजते. मुले हट्टी, खोडकर असणे, त्यांनी खेळण्याकडे जास्त लक्ष देणे, जंक फूड खाणे, यात फार घाबरण्यासारखे काही नाही. पण शाळेतील गुंडगिरी, दुसऱ्यांविषयी वैर धरणे, गुन्हेगारी वृत्ती असणे, यावर मात्र त्यांच्यासाठी योग्य वेळी मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेतला पाहिजे. आहार, व्यायाम, योगासने, ध्यान, याबाबतीत मुलांना जागृत करायला हवे. मग बघा, मुले कशी मोकळेपणाने वागतील! – भाग्यश्री रोडे-रानवळकर
समुपदेशकाचे महत्त्व आहेच
‘कुटुंब सांधणारी न्यायसंस्था’ हा डॉ ‘स्मिता प्रकाश जोशी लिखित लेख (११ मे) वाचनात आला. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हटले जात असलं तरीही कौटुंबिक न्यायालयाने अनेक संसार वाचविले आहेत. आणि त्यामुळे कौटुंबिक कोर्टात येणे शहाणपणाचेच ठरेल, हे विविध उदाहरणांसह लेखिकेने उद्धृत केले आहे. ही गोष्ट अत्यंत खरी आहे. गेली ४० वर्षे समुपदेशनाच्या सहाय्याने मीही स्वत:च्या परिवारातील आणि मित्र परिवारातील अनेक संसार योग्य दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. समुपदेशकाचे महत्त्व लक्षात घेऊन उच्च शिक्षण क्षेत्रात ४० वर्षे काम करत असताना महाविद्यालयांमधून असे समुपदेशक नेमण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अनेक विद्यार्थी, पालक, प्राध्यापक यांना समुपदेशनाची गरज असते आणि ती अशा समुपदेशकाकडून निश्चितच पूर्ण केली जाऊ शकते. दोन्ही बाजूने अहंकार कमी करून, अविचाराला बाजूला ठेवून, संसाराचा गाडा योग्य दिशेने नेता येतो, हेच या लेखातून जागतिक कुटुंब दिनाच्या (१५ मे) मांडल्यामुळे समुपदेशकांचे महत्त्व लक्षात येते. त्याबद्दल लेखिकेचे व ‘लोकसत्ता’चेही अभिनंदन! – डॉ. राजेंद्र कांकरिया
हेही वाचा…महागडी पुस्तके आपण मुलांच्या हाती केव्हा देणार?
एलकुंचवार यांची प्रगल्भता अफाट
अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी ‘ती’च्या भोवती या सदरातील ‘असामान्य ते सामान्य’ या लेखात म्हटल्याप्रमाणे महेश एलकुंचवार यांची स्त्रीमन समजून घेण्याची प्रगल्भता खरोखर अफाट आहे. लेखात सांगितल्याप्रमाणे एलकुंचवारांच्या लेखनात ते स्त्रियांचं मन ज्या प्रखरपणे, निर्भीडपणे आणि तितक्याच हळुवारपणे उलगडतात, ते पाहून लेखक म्हणून त्यांची अंतर्दृष्टी आणि जाण किती अफाट आहे हे वारंवार जाणवत राहतं. ‘आत्मकथा’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे १९८८ मध्ये ‘एनसीपीए’मध्ये जे सलग २४ प्रयोग झाले होते ते सगळे हाऊसफुल्ल होते. या प्रयोगांच्या यशामुळे डॉक्टर लागू यांच्या ‘रूपवेध’ या नाटक संस्थेला बरंच आर्थिक स्थैर्य लाभलं होतं. त्यामुळे डॉक्टरांना पुढे आणखी काही नवनवीन प्रायोगिक नाटकं करता आली. मला वाटतं, जेवढी प्रज्ञा व्यक्तिरेखा आजच्या काळात ‘रीलेटेबल’ आहे तेवढीच पद्माविभूषण राजाध्यक्ष यांचीही आहे कारण आजकाल असे आपल्या भूमिकेचं सपाटीकरण झालेले, गुळगुळीत झालेले, थोडे सरकारधार्जिणे झालेले विद्वान (स्वयंघोषित!) अनेक सापडतात. विभावरी देशपांडे यांचे परत एकदा आभार, की अशा काळातील नाटकाचे वेगळे पैलू त्यांनी समोर आणले. – मयूर कोठावळे