‘‘कॅनव्हासवरचा पहिला स्ट्रोक ठरवतो त्याचं रूप, त्याची दिशा आणि त्याचा आवाका.. मनाची त्या वेळी जी काही भावस्थिती असते, ती आपले रंग निवडत असते. कलर पॅलेटच नाही तर अशा वेळी माझा ब्रशही खूप बोलका होतो. मी जरी गाणारी नसले तरीही गोव्याच्या भूमीने माझा कान अतिशय तयारीचा केलेला आहे. शास्त्रीय रागदारीची लयकारी माझ्या गळ्यातून हुबहू उतरत नसेलही, मात्र ते शाश्वत सूर माझ्यासोबत नेहमीच असतात. कलाकृती साकारताना संगीताची धून आणि रंगांची किमया यांचे तादात्म्य अलौकिकच असतं.. चराचरांत व्यापून राहिलेल्या त्या आनंदाची कुपी मला सापडलेली आहे, नव्हे तर तो सद्चित् आनंद अर्थात शिव म्हणजे मीच आहे, याची एक साक्षात्कारी जाणीव याच कलेने मला दिली आहे. ’’ सांगताहेत चित्रकर्ती प्रफुल्ला डहाणूकर
भल्या पहाटेचं उजळलेलं आभाळ.. जमिनीवर बकुळ आणि पारिजातकाच्या फुलांचा पडलेला सडा.. त्याचा एक संमिश्र मत्त गंध आपल्याला वेढून घेणारा.. अशा वातावरणात तोडी रागाची सुरावट अगदी सहज गुणगुणत लोणावळ्याच्या घरात माझा चित्र काढायला मस्त मूड लागतो. कॅनव्हास समोर आला, की निसर्गाने मनावर केलेलं गारूड रंगांच्या माध्यमातून प्रत्यक्षात यायला लागतं. ती माझी एक वेगळीच दुनिया असते. आणि ती फक्त माझी असते. त्यात मला कुणाचाही व्यत्यय खपत नाही. त्या वेळी प्रवाहित होणारे विचार हे मला तहानभूक, सभोवताल, माझी माणसं हे सारं सारं विसरायला लावणारे असतात. कॅनव्हासच्या समोर येईपर्यंत तरी मनात प्रस्तावित चित्राबद्दल कोणताही विचार अगर त्याची आखणी केलेली नसते. रोजच्या जगण्यात डोळसपणे जगताना, वावरताना भोवताल तुमच्यातील संवेदनशील मनाला, जगण्याला भरभरून देत असतो. गरज असते, ती फक्त ते समजून घेण्याची, त्याला आपल्या भाषेत व्यक्त करण्याची आणि चित्रांच्या माध्यमातून मी हेच करत आले आहे..
याच अथांग अवकाशातील चतन्याचा वेध माझ्या चित्रांतून घेतलेला पाहायला मिळतो. निसर्ग हा ऋतूप्रमाणे आपल्यातील चतन्याचा, आनंदाचा नूर पालटत असतो. तो कधीही खिन्न, उदास, म्लान नसतो. त्याच्याठायी आनंदाचे निर्झर हे शिगोशीग भरलेले असतात आणि त्याच आनंदाची पखरण तो नित्यनेमाने करीत असतो. मी चित्र चितारते म्हणजे तरी काय हो, याच अवकाशाचा, हाती गवसलेल्या आनंदाचा एक क्षण आडव्या कॅनव्हासवर क्षितिजरेषेसारखा दृश्यमान करण्याचा प्रयत्न करीत असते. त्यात तत्कालीन मानसिक स्थितीला जाणवणारे निसर्गाचे आनंदविभ्रम हे आपापले रंग घेऊन कागदावर अवतरत असतात. आपणहून काही सांगण्याचा, सुचविण्याचा, बागडण्याचा प्रयोग करीत असतात. त्यात मी असते आणि नसतेही. रंगांच्या त्या अद्भुत दुनियेत माझी मी राहिलेलीच नसते. ही तदाकारता अत्यंत मोहविणारी, गुंगवून टाकणारी असते. अनंत हस्ते कमलाकराने.. या न्यायाने माझ्या कलामनाला दिलेलं दान तोच निसर्ग माझ्यातील कलाकाराकडून साकार करवून घेत असतो. आनंदाच्या सर्वोच्च स्थानावर असल्याचा तो प्रत्यय असतो. नव्हे तर, त्याक्षणी मीच एक आनंदरूप असते.
गोव्याच्या संपन्न अशा भूमीत माझ्यावर संगीत, साहित्य, कला यांचे संस्कार होत गेले. माझं सगळं घरच गाणारं, पण मला काही वेगळं करायचं होतं. माझ्याही नकळत अवकाशातले नाद, रंग, ताल, आकार हे आपली एक प्रतिमा मनावर िबबवत होते. तिथल्या निसर्गानेही मला स्वभावातला मोकळेपणा, विशालता, देण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टी सहज दिल्या. जाणतेपणा आल्यानंतर हे आता शब्दांत मांडू शकते आहे, इतकंच. कॉलेजच्या दिवसांमध्ये विविध कलाप्रकारांतून सहभागी होत असताना त्यातल्या आनंदाची नस सापडत होती. पुढे जेव्हा मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाल्यानंतर माझ्यातल्या कलाकाराची जडणघडण होत गेली. पोट्र्रेट्स, म्युरल्स, लॅण्डस्केिपग, अमूर्त चित्रं असे विविध कलाप्रकार हाताळताना पूर्वसूरींपेक्षा काहीतरी वेगळं आपण करायचं हे निश्चित केलं होतं. आज जितकी माझी अमूर्त चित्रं नावाजली जात आहेत, तितकीच हुकूमत मी पोट्र्रेट्समध्येही मिळवली होती. कमीतकमी रेषांच्या साहय़ाने समोरच्या व्यक्तीला नेमकेपणाने साकारणं, हे माझं कौशल्य होतं आणि आहेही. अनेकांनी त्याची खूप स्तुतीही केली. तिच बाब म्युरल्सची. तिथेही वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न मी केला. लॅण्डस्केिपग करतेवेळीही शोधक दृष्टीने काम केलं. हे सगळं काही ठरवून केलेलं नाही. कलाप्रवासाच्या टप्प्यावर प्रत्येक कलाकार हा विकसित होत असतो, अधिक सजग, जाणीवसमृद्ध प्रगल्भ व्यक्ती म्हणून आकार घेत असतो. कलाविष्काराशी एक आंतरिक ऊर्मी कुठेतरी सांधली जात असते. समोरील अवकाशाला जे काही माझ्या हातून साकारायचं असतं ते रंगाच्या पहिल्या स्ट्रोकमधून पुढे विकसित होत जातं. पहिला स्ट्रोक ठरवतो त्याचं रूप, त्याची दिशा आणि त्याचा आवाका.. मनाची त्या वेळी जी काही भावस्थिती असते, ती आपले रंग निवडत असते. कलर पॅलेटच नाही तर अशा वेळी माझा ब्रशही खूप बोलका होतो. फारच सुंदर अशी ही भावावस्था असते. मी जरी गाणारी नसले तरीही गोव्याच्या भूमीने माझा कान अतिशय तयारीचा केलेला आहे. शास्त्रीय रागदारीची लयकारी माझ्या गळ्यातून हुबहू उतरत नसेलही, मात्र ते शाश्वत सूर माझ्यासोबत नेहमीच असतात. कलाकृती साकारताना संगीताची धून आणि रंगांची किमया यांचे तादात्म्य अलौकिकच असतं.
सुरुवातीच्या काळात लॅण्डस्केिपग करताना निसर्गात जे काही प्रत्यक्षात दिसतं, त्याहीपलीकडे पाहण्याची एक वेगळीच आस लागून लागली होती. ते विस्तीर्ण आकाश, ती गूढाने भारलेली पोकळी, पंचमहाभूतांचं संवेदनशील मनाला जाणवणारं अस्तित्व, त्यांचं नसíगक सूचन हे सारं मला त्या कलाप्रकाराच्याही पुढे शोध घ्यायला भाग पाडत होतं. आणि यातूनच माझी ‘माइंडस्केप’ ही शृंखला तयार झाली. विस्तीर्ण अवकाश, त्यातली मुक्तता, मुक्ततेमध्ये दडलेलं सौंदर्य आणि त्याहूनही अधिक म्हणजे मुक्ततेला लाभलेला आनंद हे सगळं मनाला अतिशय आल्हाद देणारं वाटायला लागलं होतं. ही अनुभूती त्यापूर्वीच्या कलानुभूतीहूनही विलक्षण अशी होती. सर्व जगात राहूनही त्यापासूनची अलौकिक अशी निल्रेप मुक्तता आणि त्याचा विलक्षण आनंद असं काहीसं कॅनव्हासवर उमटायला लागलं. दैनंदिन जगण्यातले ताण, चिंता विसरायला लावत स्थिर, शाश्वत अशा आनंदाच्या जगात नेणारी अंतर्मनातली जागा सापडावी, तसं जाणवलं. साहजिकच, ‘माइंडस्केप’मधून माझ्या या दृष्टिकोनाचं आकलन हे रसिकांनाही आवडायला लागलं.
कलाकार आणि रसिक यांची वैचारिक नाळ जुळणारे क्षणही सुखावणारे असतात. असे अनेक क्षण त्यापुढच्या कलाप्रवासात येत गेले, येत असतात. चराचरांत व्यापून राहिलेल्या त्या आनंदाची कुपी मला सापडलेली आहे, नव्हे तर तो सद्चित् आनंद अर्थात शिव म्हणजे मीच आहे, याची एक साक्षात्कारी जाणीव याच कलेने मला दिली.
चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्यामुळे मलाही झेन तत्त्वज्ञान वाचण्याची, ते समजून घेण्याची संधी मिळाली. सभोवतालातून, भेटणाऱ्या नानाविध व्यक्तींशी होणाऱ्या वैचारिक देवाणघेवाणीतून कलाकार समृद्ध होत असतो. माझंही तसंच झालं. सगळ्या कलाप्रवासाच्या दरम्यान मनाला स्पर्शून जाणाऱ्या चिरंतन जाणिवांनी मला अमूर्ताच्या वाटेवर नेऊन पोहोचवलं. त्या अथांगतेचा, आनंदाच्या अनेक रंगांनी व्यापलेल्या त्या अवकाशातलाच आपण एक भाग आहोत, यापेक्षाही ते अवकाश म्हणजेच आपण आहोत. बाहेर कितीही उलाढाली होवोत, खळबळ माजो मात्र अवकाशाचा आनंदगर्भ जसा अविचल, शांत – स्थिर राहतो, त्या प्रकारची मनाची अवस्था झाल्याचं जाणवतं. शाश्वत आनंदाचा प्रत्यय ही जणू आध्यात्मिक अनुभूतीच आहे. शेवटी कलाकार हा कलेचा साधकच असतो. दिवसेंदिवस तो कलेद्वारे वृिद्धगत होत जातो. हीच साधना त्याला कलानंदाच्याही पलीकडे घेऊन जात, निरपेक्ष करत जाते. चित्राशी बांधीलकी ही ते पूर्ण होईपर्यंतच असेल तेव्हाच पुढच्या वाटेने आपण प्रवास करू शकतो. अडकून पडणं, आपल्याच शैलीच्या मोहात, कौतुकाच्या कैफात धुंद होणं हे काही खरं नव्हे. इथे एक आठवण सांगते. आर्ट स्कूलच्या शेवटच्या वर्षी मला सुवर्णपदक मिळालं, खूप आनंद झाला. त्या आनंदात घरच्यांनीही सहभागी व्हावं, असं मला तेव्हा वाटत होतं. परंतु, कोणीही त्याचे साधं कौतुकही केलं नाही. मन खट्ट झालं. त्या वेळी माझ्या आईने दिलेला सल्ला मला आजही मौलिक वाटतो. ती तेव्हा म्हणाली होती, की तू पदक मिळवलंस यात आम्हांला आनंद नक्कीच आहे. परंतु हे यापूर्वी कुणाला तरी आणि यानंतरही कुणाला तरी मिळणार आहे. त्याच्यापुढे काय.. पदकाच्या पुढे तू जावंस असं आम्हांला वाटतं. त्या क्षणापासून वेगळ्या दृष्टीने मी माझ्या कलेकडे, विचारप्रक्रियेकडे पाहायला शिकले. मला तरी हा कलाप्रवास बंधमुक्त करत शाश्वत आनंदाच्या विश्वाशी एकरूप करणारा वाटत आला आहे. ज्या आनंदाला कशाचीही लिप्तता राहत नाही, त्याला ना आदि असतो ना अंत, त्या आनंदाला मृत्यूचं भय, अहंकार कधीही शिवत नाही, त्याला कोणतीही संज्ञा नाही, असा निस्सीम आनंद म्हणजे मी आहे, ही जाणीव आज प्रबळ आहे. आणि त्या चिदानंदरूपी शिवोहम प्रतितीमुळे भौतिक जीवनातील व्यवहार पार पाडतानाही त्याचे कोणतेही क्लेश मनाला स्पर्शत नाहीत. जगण्याने जसजशी परिपक्वता येत गेली त्यानुरूप कलेची शैली, प्रकार बदलत गेले आणि ह्या दृष्टिकोन बदलाची दखल रसिकांनीही घेतली. आनंदाचं मोजमाप हे नेहमीच सारखं असेल असं नाही, परंतु ती संवेद्यता अंतिमत: आनंदाचीच प्रतिती देणारी असते, हे माझ्या मते अधिक महत्त्वाचे आहे.  
प्रत्येक रंग हा मानवी भावभावनांची अभिव्यक्ती करतो, असं म्हणतात. तुमच्या मनाच्या अवस्थेनुसार समोरची कलाकृती ही तुमच्याशी संवाद साधत असते. नियत रंगांच्याही पलीकडे जात आपला विचार मांडत असताना कलाकार व्यक्ती म्हणून शिल्लक राहतच नाही. तो ती कलाकृतीच होऊन जात असतो. हे तादात्म्य कोणत्याही आध्यात्मिक पातळीवरच्या अनुभवाच्या तोडीचेच असते. या अनुभवानंतर स्वाभाविकरीत्या चित्रांसाठी घेतला जाणारा माझा कॅनव्हास हा आडव्या आकारात आला. पंचमहाभूतांचं हलतं प्रतििबब हे कोणत्याही कवेत मावणारं नाही, हे काही वेगळं मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळेच पंचमहाभूतांपकी जल, वायू आणि पाणी या तत्त्वांना माझ्या आकलनानुसार अथांगरूपात चितारू लागल्यानंतर रसिकांनाही त्या अथांगतेने आपलंसं केलं. मला त्या अथांगतेने दिलेलं आत्मिक समाधान रसिकांनीही अनुभवले. माझ्या चित्रकृतींनी आजपर्यंत मला भरभरून आनंद, तृप्ती दिली. काही करायचं राहून गेलं आहे, असं आता वाटत नाही. रंगांचा मुक्त वापर करताना निसर्गाचाच एक रंगच मी कधी होऊन गेले ते मलाच समजलं नाही. एका प्रवासातील क्षण मला इथे आवर्जून सांगावासा वाटतो. आम्ही एकदा हिमालयातील रोहतांग पास इथून प्रवास करत होतो. उंचच उंच बर्फाच्छादित डोंगर, आल्हाददायक निसर्ग, त्या बर्फावर पडलेली मऊशार सूर्यकिरणं आणि त्या किरणांमुळे बर्फाच्या स्फटिकांना लाभलेली जांभळट, गुलाबीसर लकाकी.. हे दृश्य विलोभनीय, नजरबंद करणारं होतं. काही काळ मंत्रमुग्ध झाल्यागत मी तिथे खिळून होते. निसर्गाचा तो अद्भुत आविष्कार, ती भव्यता याने मलाच मानवीय क्षुद्रत्व यापरते काय असू शकते, याची प्रकर्षांने जाणीव करून दिली. हा अनुभव घेईतोवर अन्य चित्रकार बर्फाला विविध रंगच्छटा का देतात, हे समजून येत नव्हते. निसर्गाच्या त्या भव्य साक्षात्कारानंतर कलाकार म्हणून माझी मनोवस्था, दृष्टिकोन पालटून गेला. ईशप्राप्तीसाठी, साधनेसाठी साधुसंतांनी हिमालयाची वाट का धरली असावी, त्याचं काही प्रमाणात उत्तर मला त्या काही मिनिटांच्या अवधीमध्ये मिळालं होतं. निसर्ग मूकपणे आपल्या चतन्याच्या विविध रूपांतून आपल्याला खूप शिकवत असतो. त्या भव्यतेशी सांधली गेलेली आंतरिक आनंदाची लय मला सापडली होती. अहंकाराला आता थारा उरलेला नव्हता. गवसलेला तो अद्वैतानंद कलेच्या माध्यमातून प्रत्ययास आणून द्यावा, एवढीच इच्छा यापुढच्या प्रवासातही आहे.


सुप्रसिद्ध लेखिका सानिया ‘चतुरंग मैफल’ मध्ये पुढील शनिवारी (४ मे )

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Bobby Deol
‘जमाल कुडू’ची व्हायरल झालेल्या डान्स स्टेपमागची प्रेरणा काय? बॉबी देओल खुलासा करत म्हणाला, “मी लहान असताना…”
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Story img Loader