मुलांना भाषा नवीन असते. ती अंदाजाने शब्दांचे अर्थ समजून घेत असतात. मुलांच्या मनातलं विश्व, त्यांनी लावलेले शब्दाचे अर्थ आपल्याला इतके अपरिचित असतात की दरवेळी असं काही नवं ऐकताना आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. ते समजून घेणं पालक म्हणून आपली जबाबदारी.
मु लांच्या लहानपणच्या आठवणी म्हणजे घरातला खजिना असतो. आपण मुलांच्या बोलण्याची, खेळांच्या प्रकारांची डायरी ठेवली तर पुढे ती वाचायला गंमत वाटतेच, त्याचबरोबर हे मूल काय विचार करत असावं म्हणून ते असं बोललं, वागलं हे समजून छान वाटतं. मुलाचं बोलणं आपल्याला दरवेळी कळतच असं नाही, ते लक्षपूर्वक समजून घ्यावंसं वाटलं पाहिजे. त्यासाठी त्या बोलण्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे.
आमच्या बालभवनात कबीर नावाचा तीन वर्षांचा मुलगा यायला लागला. त्याला सोडून आई घरी गेली की त्याला फार वाईट वाटायचं. तो माझ्या ऑफिसमध्ये यायचा आणि ‘आई?’ एवढंच विचारायचा. मी म्हणायची, ‘येणारए’. असं चार दिवस झालं. तो दहा-पंधरा वेळा तरी ‘आई?’ असं विचारायचा. पाचव्या दिवशी तो आला तेव्हा त्याने विचारायच्या आत मी म्हटलं, ‘‘कबीर आई?’’ तेव्हा तो पटकन् माझ्यासारखंच म्हणाला, ‘‘येणारए’ आणि त्या एका शब्दाने त्याला आश्वासन मिळालं. त्यानंतर तो नुसता मजेत गप्पा मारायला यायचा पण ‘आई?’ असं विचारायचा नाही.
मुलं ज्या गोष्टी पालकांकडून, शाळेतून ऐकतात त्या त्यांना खऱ्याच वाटत असतात. एका मुलीच्या घराभोवती बांधकाम चालू होतं. खड्डे खणले होते. त्यात तिचा दोन वर्षांचा भाऊ पडला आणि रडत होता. ती त्याला वर काढण्यासाठी काहीतरी खटपट करत होती, पण ते जमेना. आत येऊन ती आईला म्हणाली, ‘‘अगं, केव्हाची मी खड्डय़ात खडे टाकतीए पण आमोद काही वर येत नाहीए.’’ शाळेत तहानलेला कावळा खडे टाकतो आणि आतलं पाणी वर येतं हे तिनं ऐकलेलं होतं. तिला वाटलं, आपला भाऊही असाच आपोआप वर येईल.
गोष्टीतली सिंहाची गुहा, उंदराचं बीळ हे सगळं मुलांच्या कल्पनेत प्रत्यक्षात असतंच. एक छोटी मुलगी आजोबांशी खेळत होती. मधेच आजोबा अंघोळीला गेले आणि नंतर देवांच्या छोटय़ा खोलीत पूजा करायला बसले. मुलगी त्यांना शोधत देवघरात पोचली. तिला फार नवल वाटलं ते त्यांच्या खोलीत नव्हते आणि इथे आले होते! ती म्हणाली, ‘हे काय नाना, मी तुम्हाला गुहेत शोधत होते आणि तुम्ही इकडे बिळात काय करताय?’
आमच्या घरी आमची ‘टिंकी’ नावाची एक सर्वाची लाडकी मांजरी होती. ती अचानक मेली. मुलांना त्याचं खूप वाईट वाटलं. मी ऑफिसमधून आले तर मुलगा फ्रीजला टेकून मांडी घालून डोळे मिटून बसला होता. मी म्हटलं, ‘‘का रे असा बसलास?’’ तर तो म्हणाला, ‘मी तपश्चर्या करतोय्. टिंकी जिवंत होईपर्यंत मी इथून उठणार नाही.’’ त्याला खरंच वाटत होतं की तपश्चर्या केली की कोणीही जिवंत होतं!
शेजारची मुलगी आमच्याकडे बराच वेळ असायची. एकदा खेळताना तिला महाबळेश्वरला मिळतात तशा चिमुकल्या चपला खिडकीत दिसल्या. तिला इतका आनंद झाला! ती म्हणाली, ‘‘ताई, तुमच्याकडे काल सिंड्रेला आली होती का? आणि खिडकीतून गेली का? तिच्या चपला आहेत इथे! तिच्या मनातली सिंड्रेला अशी छोटीशी होती!’’
राहुलला शाळेत गेल्यावर प्रथमच अभ्यासाची वही शाळेतून परत मिळाली. लिहिलेलं सगळं चूक होतं. बाईंनी याला सगळीकडे झिरो मार्क दिले होते. तरी तो खूश होता. म्हणाला, ‘‘हे बघ टीचरने मला सगळीकडे ओ ओ दिलय.’’ त्याला ‘ओ’ चा अर्थ कळत नव्हता.
सगळे शब्द मुलांना नवेच असतात. त्यामुळे एक ताई मुलाला सांगत होती, ‘सुई-दोरा घे आणि ओव. तिने सहा वेळा सांगितल्यावर तो हळूच म्हणाला, ‘‘तू सांगतेस खरं, पण सुई ओव म्हणजे काय?’’ मुलांना भाषा नवीन असते. ती अंदाजाने शब्दांचे अर्थ समजून घेत असतात. एक छोटा मुलगा हातात बॉल घ्यायचा. त्याबरोबर त्याला समोरचं मोठं माणूस म्हणायचं, ‘टाक’. टाक ऐकल्यावर मुलाची समजूत अशी झाली की चेंडूला ‘टाक’ म्हणायचं. तो ‘मला टाक दे’ असंच म्हणायचा. पूर्वी चरक औषधांच्या जाहिरातीत दगडी खलबत्ता दाखवत. तो पाहून एक मुलगी म्हणाली होती, ‘‘आमच्याकडे हा चरक आहे.’’
मुलांच्या कानावर अनेक शब्द पडत असतात. त्यांच्या परीने ती त्यांचे अर्थ लावत असतात. एक मुलगी एकदा भातुकली खेळत होती. तिच्या मत्रिणी पण होत्या. बाहुल्यापण होत्या. त्यातली एक बाहुली सोना आजारी होती. तिच्या शाळेत चिठ्ठी पाठवायची होती. त्या सोनाच्या आईने पालकत्वाच्या जबाबदारीनं चिठ्ठी लिहिली : ‘‘आज सोनाला हॅटॅटॅक आला आहे. ती आज शाळेत येणार नाही. उद्या येईल.’’ कधी कधी अशा भातुकलीत शाळा भरवली जाते आणि वर्गात कोणी मुलगी (बाहुली) बोलली तर तिला बाई काय शिक्षा करतात? तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. तिच्या गळय़ात दोरी बांधून तिला थोडावेळ फाशी देतात आणि मग दोरी सोडून तिला परत वर्गात येऊन बसायची परवानगी मिळते. हे सगळं मुलांच्या मनातलं विश्व, त्यांनी लावलेले शब्दाचे अर्थ आपल्याला इतके अपरिचित असतात की दरवेळी असं काही नवं ऐकताना आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो.
मुलं मोठी होतात. त्यांचं लहान भावंडं घरात येतं. त्या काळात ती आपण कसे त्या बाळासारखंच सगळं करू शकतो हे दाखवण्याची धडपड करतात. मग ती बाळाचं टोपडं घालतात, बाळाच्या बाटलीने दूध पितात, आईच्या मांडीवर झोपतात, बाळासारखे हात-पाय हलवून रडतात. हे सगळं करण्याचा हेतू आईला हे सांगण्याचा असतो की तू माझ्याकडे पण लक्ष दे. मीपण बाळासारखं सगळं करू शकतो.
मुलं जसजशी मोठी होतात तसे त्यांचे आई-वडिलांना द्यायचे धडेही बदलत जातात. एकदा एक आजी नातवंडांना भरवत होती. मोठय़ा नातवाचं खाणं पटपट आवरलं, धाकटा काही तोंड उघडेना. आजी मोठय़ाला म्हणाली, ‘‘तू तरी सांग रे याला जेवायला. ऐकतच नाही तो.’’ तर मोठा म्हणाला, ‘‘मला कसं माहीत असेल त्याला किती भूक आहे ते. मी कसं सांगणार? आणि तुला तरी कुठे माहीत आहे त्याला भूक आहे की नाही. तू पण त्याला आग्रह करू नको. त्याला भूक लागेल तेव्हा तो खाईल.’’ खरंच की! आजी एक काम उरकू पाहात होती, पण भुकेचा मुद्दा तिने विचारात घेतलाच नव्हता!
मुलं आपल्याला अनेकदा असे शहाणे सल्ले देत असतात आणि आपल्याला वाटतं खरंच की! हे कसं आपल्या लक्षात आलं नाही. माझ्या नऊ वर्षांच्या मुलानं असा एकदा मला धडा दिला होता. तो आणि मी सकाळी चालायला गेलो होतो. त्यानं मला विचारलं, ‘‘तू सारखी आभाची (बहीण) बाजू का घेतेस?’’ मी म्हटलं, ‘‘कारण ती फक्त तीन वर्षांची आहे. तू पाच वर्षांचा होईपर्यंत मी घरात होते. आता मी नोकरी करते, त्यामुळे तिला मी मिळत नाही.’’ तो म्हणाला, ‘‘यात माझा काय दोष?’’ ‘‘काहीच नाही.’’ ‘‘मग तू माझी पण मधून-मधून बाजू घेत जा. कारण तिला असं वाटतं की तिचं सगळं बरोबर असतं. मग ती ऐकत नाही.’’ मला ते पटलं आणि मी त्याला तसं वागेन असं सांगून माझं वागणं बदललं.
अलीकडेच माझ्या नातवाने त्याच्या आईला एक धडा दिला. तो बुद्धिबळ छान खेळतो, पण जेवायचा कंटाळा! आई त्याला म्हणाली, ‘‘तू धड जेवत नाहीस, तू प्यादच राहणार, काही राजा बिजा होणार नाहीस.’’ तर तो म्हणाला ‘‘तुला कोणी सांगितलं प्यादं ताकदवान नसतं म्हणून? एकतर ते एकटं नसतं त्याला सात मित्र असतात. ते शेवटापर्यंत पोचलं तर त्याचा वजीर होतो. उलट राजाच कमकुवत असतो त्याला सारखा स्वत:चा बचाव करावा लागतो. कारण तो एकच घर जातो.’’ आई यावर काय बोलणार? तिला कळलं की तो फक्त वरवरचा खेळ खेळत नव्हता, त्याचं तत्त्वही त्यानं आत्मसात केलं होतं.’’
असं हे मुलांचं विश्व! आपण समजून घेतो का? हा खरा प्रश्न आहे.
शोभा भागवत- shobhabhagwat@gmail.com