मुलांच्या संदर्भात कोणतीही गोष्ट आपण करत असलो तरी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ती अत्यंत प्रेमानं, जिव्हाळ्यानं, जबाबदारीनं आणि जीव ओतून झाली पाहिजे. कारण ती आपण आपल्या मानवी संस्कृतीच्या ‘मुळासाठी’ करत असतो.

‘मूल’ म्हणजे मला मानवी संस्कृतीचं ‘मूळ’ वाटतं. आज समाजात जी माणसं इतरांशी वाईट वागतात, निष्प्रेम असतात, गुंडगिरी, दहशतवाद यात गुंततात ती एकेकाळी निर्मळ, निरागस, प्रेमळ बालकंच असतात ना? मग त्यांची वाट कशामुळे चुकते?
चार हजार वर्षांपूर्वीपर्यंत समाजात मातृप्रधान कुटुंबपद्धती होती. तेव्हा स्त्रियांच्या प्रेमळ सहवासात मूल वाढत असे. त्याच्या आजूबाजूला दिवसभर आई, आजी, मावश्या, भावंडं असत. वडील घराचे राजे नसत. ही मातृकुळं उद्ध्वस्त करून त्यांच्यावर स्वत:चं आधिपत्य निर्माण करण्यासाठी लढाया झाल्या. त्याची एक गोष्ट मी अमेरिकेतल्या पोर्टलॅण्डजवळ ऐकली. त्सागाल्गिया नावाची एका मातृकुळाची प्रमुख स्त्री होती. तिच्या कुळावर हल्ला झाला आणि आता तिथल्या टेकडीवर एक मोठी शिळा आहे, ती म्हणजेच त्सागाल्गिया असं लोक मानतात. ती तिच्या मुलाबाळांकडे तिथून पाहत असते, असं म्हणतात. अशा ऐतिहासिक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात तोवर त्यातले धारदार भाग बोथट होऊन जातात. माझ्या मनात आलं, त्या त्सागाल्गियाला काय झालं असेल? तिच्या नावाचा दगड करून टाकला आक्रमण करणाऱ्यांनी! हा काही सन्मान नव्हता. अत्याचार होता.
पितृसंस्कृती निर्माण झाली ती अशा अत्याचारातून. हे परिवर्तन सोपं नसणार! या परिवर्तनात मूल हे ‘मूळ’ उखडलं गेलं आणि त्याचे परिणाम मानवी संस्कृती भोगते आहे अस्वस्थ कुटुंब, अनाथाश्रम, वेश्यागृहं, निराधार मुलं यांच्या रूपानं. मानववंशास्त्राच्या अभ्यासक मंगला सामंत यांचा एक लेख ‘चतुरंग’मध्ये प्रसिद्ध (१४ नोव्हेंबर) झाला होता ‘बालकप्रधान समाजाची गरज’ असा त्याचा मथळा होता. तो वाचून स्त्रियांच्या आणि मुलांच्या दुर्दशेच्या पूर्वापार साखळ्यांचा शोध लागला! आपल्या संस्कृतीचं मूळच जर त्रस्त असेल, तर काय करावं लागेल? ते स्वस्थ कसं होईल? मूल योग्य प्रकारे कसं वाढेल यावर शांताबाई किलरेस्करांनी एका गीतात म्हटलं आहे,
जागवा जागवा. सकल विश्व जागवा.
‘बालकांस अग्रहक्क’ हाच मंत्र घोषवा.
विश्व सकल जागवा.
शरीर बनो सुदृढ सबल,
सदय मने, हात कुशल,
ममतेच्या परिसरात निर्भय मन वाढवा.
मूल असं वाढवायचं असेल तर समाजानं ‘बालकांस अग्रहक्क’ हे मूल्य म्हणून मानायला लागेल. घर, शाळा आणि समाज या तीन ठिकाणी मूल वाढतं, वावरतं म्हटलं तर आज घराचं मुलांकडे लक्ष नाही, शाळांतही ‘मुलाला अग्रहक्क’ नाही, समाजात मुलांसाठी काय खास व्यवस्था आहेत?
लहान मुलांसाठी चांगली पाळणाघरं भरपूर प्रमाणात हवीत. त्यासाठी मोठय़ा जागा राखून ठेवल्या पाहिजेत. पाळणाघरात काम करणाऱ्या सर्वाना प्रशिक्षण दिलं पाहिजे. मुलांच्या काळजीपूर्वक आणि प्रेमपूर्वक देखभालीचं. तसंच संध्याकाळी मुलांच्या मोकळ्या हवेत खेळण्याची सोय हवी त्यासाठी मैदानं राखायला लागतील. सध्या तरी अशा मोकळ्या मैदानांवर मुलं खेळत असली तर अनेकांना त्याचा त्रास होतो. ती जागा वाया जाते आहे असं वाटतं. त्याऐवजी तिथे घरं उभी राहावीत, मॉल्स, दुकानं उभी राहावीत म्हणजे त्या जागेचं कल्याण झालं असं त्यांना वाटतं. याला सर्वानी विरोध करायला हवा. मुलांसाठी मोकळी मैदानं राखून ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे.
खास मुलांसाठी पुस्तकालयं हवीत. पालक मुलीला मोठय़ा ग्रंथालयात सोडताहेत. ती त्यांना आनंदानं निरोप देते आहे. आत जाऊन ती स्वत:ला हवी ती दोन-तीन पुस्तकं शोधते. ती ग्रंथालयाच्या काऊंटरवर दाखवते. ती तिला लगेचच दिली जातात. ती थेट बाहेर येऊन बागेत झाडाखाली वाचत बसते. मनात आलं तर थोडं काही खाऊन-पिऊन येऊ शकते. कधी ग्रंथालयातल्या दालनांतले करमणुकीचे कार्यक्रम बघू शकते. दोन तास होतात आणि तिला घरी जावंसं वाटतं तेवढय़ात आई-बाबा येतात..
आपल्याकडे सगळी चित्रपटगृहं मोठय़ांचीच असतात. पण केवळ लहान मुलांसाठी थिएटर्स हवीत. जगभरातले उत्तम चित्रपट मुलं तिथे पाहतील. मोठय़ा मुलांसाठी सायन्स पार्कस् हवीत, छोटय़ांसाठी त्यांना मनसोक्त खेळता येईल अशी मोठी आणि खूप खेळणी असलेली खेळघरं हवीत. तिथले कार्यकर्ते प्रशिक्षित हवेत.
मुलांच्या अशा संस्थांमध्ये मुलांची अनेक चित्रं भिंतीवर लावलेली हवीत. मुलांनी लिहिलेल्या काही कविता, गोष्टीही लावाव्यात. इतरही हस्तकलेतले प्रकार येतील. मुलांसाठी मुलांची पुस्तकं दुर्मीळ आहेत ती लिहायला त्यांना प्रोत्साहन हवं. त्यांना योग्य प्रकारचे प्रकाशक मिळायला हवेत. पुस्तकांच्या किमती कमी ठेवता याव्यात. संस्थांकडे १००० वाचकांचा एक गट असे गट असले, तर एकेक आवृत्ती एका दिवसात संपेल. पुस्तकं गावोगावी पोहोचावीत.
टी.व्ही.वर लहान मुलांच्या कार्यक्रमांनाही बंधनं हवीत. लहान मुलं कितीही सुंदर नाचत असली तरी त्यांनी मोठय़ांसारखे अंगविक्षेप करायचे नाहीत हे सांगितलं पाहिजे. अश्लील, शृंगारिक गाण्यांवर स्पर्धा नकोत आणि शाळांनीही हे नियम पाळावेत.
जी मुलं सार्वजनिक बसमधून किंवा इतर गर्दीच्या वाहनातून शाळेत जातात त्यांचे फार हाल होतात. पाठीवर मोठं दप्तर त्यामुळे त्यांना लोक आत येऊ देत नाहीत. कोणीही टप्पल मारायला मागेपुढे पाहत नाही. मुलं काय करणार? कोणत्याही मुलांना मारहाण करणं हा गुन्हाच आहे. मारणाऱ्यांना शासन व्हायला हवं.
मुलांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी रस्त्यावर रहदारीचे नियम कडकपणे पाळायला हवेत. मुलं आई-वडिलांना शिकवत असतात नियम पाळायला.
मुलांना रोज एक तासभर निसर्गाच्या सहवासात ‘हिरवा तास’ मिळायला हवा त्यातून त्यांना शुद्ध हवा, शुद्ध पाणी, शुद्ध माती म्हणजे काय ते कळावं आणि तो त्यांच्या शिक्षणाचा भागच व्हावा. मुलांच्या वावरण्याच्या ज्या ज्या गोष्टी समाजात आहेत तिथे खेळायच्याही सोयी हव्यात. काही खेळणी हवीत. मुलांच्या स्पेसवर मोठय़ांचं आक्रमण होऊ नये.
लहान मुलांना शेतीचा अनुभव यावा म्हणून थोडी मोकळी जागा शिल्लक ठेवावी. मोठी मुलं तर स्वत:च जवळच्या शेतावर जाऊ शकतील. शेतीत काय काय होतं, अवेळी पाऊस आला तर बियाणं, पीक कसं वाहून जातं, शेतकऱ्याला कसा फटका बसत असेल! पीक छान आलं की कसा आनंद वाटत असेल! हे सारं त्यांनी स्वत: वर्षभर अनुभवलं पाहिजे.
मागे आम्ही एकदा काही संस्थांनी मिळून मोठी मिरवणूक काढली होती. बरीच मुलं आणि बरेच कार्यकर्ते होते त्यात मुख्य घोषणा ‘पुण्याचं चित्र बालक मित्र!’ अशी होती. ‘मैदानं वाचवा’ ही घोषणा होती. दर वॉर्डमध्ये एकेक बालभवन व्हायला हवं. मुलांना घराजवळच ‘बालभवन’ मिळू दे.
लहान गावातसुद्धा बालभवनं चांगली चालू शकतात. शाळेव्यतिरिक्त वेळात त्यांना मुक्तपणे अनेक कलांचा अनुभव मिळू शकतो, अनेक खेळ खेळता येतात, पुस्तक वाचणं, सहलींना जाणं, अनेक कामं करणं, काही चांगल्या माणसांचा सहवास मिळणं, गाणी म्हणणं, गोष्टी ऐकणं, चित्रं काढणं, विज्ञानाचे प्रयोग करणं आणि अनेक कल्पक गोष्टी.. करता येतील.
मुलांच्या संदर्भात कोणतीही गोष्ट आपण करत असलो तरी हे लक्षात ठेवलं पाहिजे की, ती अत्यंत प्रेमानं, जिव्हाळ्यानं, जबाबदारीनं आणि जीव ओतून झाली पाहिजे. कारण ती आपण आपल्या मानवी संस्कृतीच्या ‘मुळासाठी’ करत असतो.
केवळ स्वत:च्या फायद्यासाठी लहान लहान मुलांना राबवून घेणं बंद झालं पाहिजे. असे लोक स्वकेंद्रित असतात आणि स्वकेंद्रीय असणं म्हणजेच माणुसकी विसरणं. व्यक्तिकेंद्री असणं म्हणजे जंगली जनावरांचा कायदा चालवणं, असं गांधीजी म्हणत. इतरांचं शोषण करण्यातून स्वत: मुक्त होणं हे स्वत:ला माणूस करणं असतं. बालमजुरांची या जंगली जनावरांच्या कायद्यातून सुटका झाली पाहिजे.
गांधीजी म्हणत वसाहतवादी शिक्षणपद्धती अपुरी, अपायकारक, माणसाला आतून मोडून टाकणारी, समाजात फूट पाडणारी आणि मुलांना सांस्कृतिकदृष्टय़ा परकं बनवणारी आहे. ती नाकारून आपण चांगलं शिक्षण द्यायचं म्हटलं तर सहभागी पद्धतीनं शिक्षण घेता आलं पाहिजे. आतले विचार, बाहेरचं जग आणि आपली कृती यात एकवाक्यता असली पाहिजे. यातून जबाबदारीची संस्कृती निर्माण होईल. नैतिक स्वातंत्र्याचं वातावरण निर्माण होईल.
‘मुलांवर विश्वास ठेवा’ याहून सोपं आणि याहून कठीण काही नाही. त्यासाठी स्वत:वर मात्र विश्वास असावा लागतो. ‘मुलांबरोबर चालणारा’ बालकेंद्री समाज आज हवा आहे आणि आपण सगळे त्यातले ‘बालकारणी’!
या लेखमालेच्या निमित्तानं आपण वर्षभर मोकळेपणानं भेट राहिलो. वर्ष आनंदात गेलं. तुम्हा सर्वाना धन्यवाद!

shobhabhagwat@gmail.com
(सदर समाप्त)