तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपलं करिअर उजळावं म्हणून दुसऱ्याचं श्रेय लाटणं, स्त्रियांना आणि वृद्धांना दुय्यम वागणूक देणं, हाती लागलेला पैसा किंवा हातात आलेली गाडी हवी तशी उधळणं.. या गोष्टी आपण आजूबाजूला पाहतो. परंतु त्यांचं मूळ लहानपणापासून घरातून मिळालेल्या किंवा न मिळालेल्या संस्कारांमध्ये आहे, हे लक्षात घ्यायला हवं. बालपणी दिल्या गेलेल्या योग्य संस्कारांचं मोठेपणी माणूसपण शिकवणाऱ्या मूल्यांमध्ये रूपांतर होत असतं. त्यासाठी हवं सजग पालकत्व.

माझ्या लहानपणी संध्याकाळी शुभंकरोती म्हटल्यानंतर एक गीत म्हणावं लागे.  ‘खोटे कधी बोलू नये, चोरी कधी करू नये,  पाहिले ते मागू नये..  वडिलांची आज्ञा घेतल्यावाचोनि कुठे घरातुनी जाऊ नये’ हे ते गीत. रोज रोज हे गीत म्हणणं म्हणजे आपण कसं वागावं याचा पुनरुच्चार. यालाच मानसशास्त्राच्या भाषेत ‘अफर्मेशन’ (पुष्टीकरण) म्हणतात. या संस्कारगीतामधून एक प्रकारे मूल्य शिक्षणच दिलं जात होतं. खरंच आजच्या काळात हे असं मूल्य-संस्कार शिक्षण घेणं गरजेचं आहे का? हे सर्व कालबाह्य झालं आहे, की उलट अधिक गरजेचं आहे? यात पालकांची भूमिका काय असू शकते आणि ती कशी पार पाडता येईल? याचा विचार आवश्यक ठरला आहे.

    निशाची आई मल्टिनॅशनल कंपनीत कामाला आहे. तिची फिरतीची नोकरी आहे. बाबा आयटीमध्ये कामाला आहेत. ते मान मोडेपर्यंत संगणकावर काम करतात. शनिवारी आई-बाबांच्या ग्रुपच्या पाटर्य़ा असतात. अर्थातच आठवडाभर काम करून थकल्यावर या पाटर्य़ा त्यांच्यासाठी आराम-विरंगुळा असतात. मग रविवारी उशिरा उठणं आणि मग इतर कामं उरकणं, यात निशाचा आणि तिच्या पालकांचा संवाद फक्त तिनं अभ्यास केला की नाही, तिच्या अभ्यासाव्यतिरिक्तचे खेळ, कला आदी उपक्रम व्यवस्थित होत आहेत की नाहीत, याबद्दल आणि तिच्या मागण्यांपुरताच होता. बरं हे वेळापत्रक काही एखाद्-दुसऱ्या महिन्याचं नसतं. ते तसंच वर्षांनुवर्ष राहातं. अभ्यासाव्यतिरिक्त काही मूलभूत संस्कार मुलांवर करणं राहूनच जातं. बरं, हे झालं उच्च आर्थिक उत्पन्न गटातल्या पालकांचं. तळातल्या आर्थिक स्तरावरही मुलांना आवर्जून असे काही संस्कार द्यायचे राहून जातात. बाल निरीक्षण गृहात काम करताना मंग्या (नाव बदललं आहे.) चोरीच्या गुन्ह्यात पकडला गेलेला, पण चुणचुणीत मुलगा भेटला. माझ्याकडे त्याला आणल्यावर मी सुरुवातीलाच मंग्याला विचारले, ‘‘तू चोरीच्या आरोपात इथं आला आहेस. खरंच तू चोरी केलीस, की काही गैरसमज झाला?’’ त्यानं स्पष्टपणे सांगितलं, ‘‘मला जर एखाद्या बाईकला किल्ली राहिलेली दिसली, तर मी ती बाईक चालवायला घेऊन जातो आणि पेट्रोल संपलं की बाईक तिथंच सोडतो. किल्लीही तिथंच सोडतो. मी बाईक विकली असती, तर चोरी केली असं म्हणता आलं असतं.’’ चोरीच्या त्याच्या या व्याख्येमुळे त्याला आरोप मान्य नव्हता. जिथं आपल्या हातून काही चूक झाली हेच मान्य नसतं, तिथं बदल होणं कसं शक्य आहे? अशा परिस्थितीत आपण ‘दुसऱ्या कुणाचीतरी एखादी गोष्ट त्याच्या परवानगीशिवाय घेणं, वापरणं म्हणजे चोरी’ ही व्याख्या आधी मंग्याच्या डोक्यात बसावी लागेल. ‘माझ्या मुलाला मी सगळं व्यवस्थित किंवा कदाचित गरजेपेक्षा जास्तच पुरवतो. मग मला त्याला ‘चोरी करू नये’ हा संस्कार देणं गरजेचं आहे का?’ असा विचार आर्थिक परिस्थिती चांगली असणाऱ्या पालकांच्या मनात नक्की येऊ शकतो. पण वास्तव अगदी वेगळं आहे. मौजमजा करण्यासाठी, व्यसनांसाठी सधन घरातली मुलंही चोरी करताना पकडली गेल्याचं आपण अनेक वेळा पाहिलं आहे. पण चोरीचा थोडा अधिक व्यापक विचार करू या. दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय स्वत:च्या नावावर खपवणं, कामाच्या ठिकाणी दुसऱ्यांच्या कल्पना स्वत:च्या असल्यासारख्या कंपनीतल्या मीटिंगमध्ये सादर करणं, या गोष्टी चोरी म्हणवल्या जात नाहीत का? ‘एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर’ यामध्ये आता करिअरसुद्धा जोडलं गेलं आहे. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी ‘स्मार्टनेस’च्या नावाखाली अशा दुसऱ्यांच्या आयडिया वापरण्यात काहीच गैर वाटत नाही. पण त्यातूनही या ‘अतिस्मार्ट’ लोकांना फटके बसू शकतात. त्यासाठी तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असू द्या, पण मुलांना ‘चोरी करणं चूक आहे’ हे सांगत राहा. ते मूल्य तुमच्या ‘डीएनए’मधून आपोआप मुलांकडे जाईल असं गृहीत धरू नका. मध्यमवर्गीय आणि सधन कुटुंबात व्यसनाच्या आहारी गेलेली मुलं आपल्याच घरातून पालकांच्या नकळत पैसा उचलतात आणि स्वत:ची अशीही समजूत काढतात, की ‘माझ्याच वडिलांचा आणि माझ्यासाठीच कमवलेला पैसा आहे तो. थोडा आता घेतला तर ती चोरी नव्हे.’ व्यसनी मुलांच्या टोळक्यांमध्ये अडकलेली अशी मुलं किरकोळ कारणांमधून होणारी मारामारी ते अपघात, प्राणघातक हल्ला, अशा कोणत्याही संकटात सापडू शकतात. अशा वेळी ज्या मुलांमध्ये याबाबतची मूल्यं पक्की असतील, ते अशा चुका करायला धजवणार नाहीत आणि आपोआपच ती अनेक आकस्मिक संकटांपासून सुरक्षित राहातील, हे लक्षात घ्यायला हवं. 

 गोंडस दिसणारं बाळ आपल्या घरी येतं, त्याचं कोडकौतुक होतं. पण मूल्यं आणि संस्कारच त्याला माणूसपण देतात. आपण पालक आपापल्या परीनं मुलांवर संस्कार करतोच, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण अभ्यासाचं आणि इतर क्लासेसचं वाढलेलं महत्त्व, अपूर्ण पडणारा वेळ, यामुळे संस्कारांसाठी असणारा संवाद निश्चितच कमी झाला आहे. खोटं न बोलणं, चोरी न करणं, याबरोबरच नातेसंबंध जपणं आणि वडीलधाऱ्यांचा मान ठेवणं, लहान मुलांशी प्रेमानं-गोडीनं वागणं, हा संस्कारही या एकवीसाव्या शतकात विशेष महत्त्वाचा झाला आहे. पूर्वी पत्र लिहिताना जितकं ‘श्री’ अथवा ‘सौ’ लिहिणं आवश्यक असायचं, तेवढंच घरातल्या सगळय़ा मोठय़ांना नमस्कार आणि लहानांना आशीर्वाद लिहिणं हीसुद्धा प्रथा होती. त्यातून नातेसंबंधांतला व्यावहारिक कोरडेपणा जाऊन एक कौटुंबिक सौहार्द निर्माण होण्यास मदत व्हायची. आता पत्र नाहीत. ई-मेलमध्ये ‘विथ रिगार्डस्’ लिहिलं की काम संपतं. पत्रासारखंच कुणाच्याही घरी गेल्यावर मोठय़ा माणसांना नमस्कार करणं आणि निघताना घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना ‘येतो’ असं सांगून निघण्याची प्रथा होती. या सगळय़ा प्रथांमागे तुम्ही ज्या घरात जात आहात, त्या घरातल्या सगळय़ांना वयानुसार मान देणं हा संस्कार असायचा. आता आधुनिकतेच्या नावाखाली आपण व्यक्तिकेंद्रित होत चाललो आहोत. आपल्या मुलाचे किंवा मुलीचे मित्रमैत्रिणी घरी आल्यावर आपण त्यांची दखल घेतो का? त्यांना पाणी विचारतो का? याचा विचार करा. पुष्कळ घरांमध्ये हे खातं फक्त आईचं असतं. बाबा मंडळी ‘छोटी मुलं आहेत’ असा विचार करून त्यांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. लहान मुलांच्या ते मनाला लागू शकतं किंवा आपण आलेलं त्यांना आवडलेलं नाही का? असा समज होऊ शकतो. घरातल्या सदस्यांनी त्यांची दखल घ्यावी, हा एक साधा संस्कार आहे. ते आपण आपल्या वर्तनातूनच मुलांना देऊ शकतो. हेच वाढदिवस किंवा कोणत्याही मंगलप्रसंगी शुभेच्छा देण्याबाबत. केवळ व्हॉट्सअ‍ॅपवर दोन-तीन शब्दांचा संदेश आणि पुष्पगुच्छाचा इमोजी टाकण्याऐवजी दोन मिनिटं काढून संवाद साधला, तर नात्यांमधला ओलावा टिकून राहण्यास मदत होऊ शकते. खूपच साधी गोष्ट आहे ही! पण तरीही लोक तसं करत नाहीत हा अनुभव सर्वानाच येत आहे.

  पालक आणि मुलांची मैत्री असावी की नाही हा एक वादाचा मुद्दा आहे. मैत्रीत आदर नसतो का? की आदर किंवा मैत्री हा निवडीचा मुद्दा होतो? तसं न होता आदरयुक्त मित्रत्व असावं. शौर्यची त्याच्या बाबांबरोबर फायटिंगची दंगामस्ती चालायची. पण म्हणून त्यानं बाबाला कसंही उलटं बोलावं किंवा त्याचं ऐकू नये असं करणं घरात अजिबात चालायचं नाही. मैत्री आणि पालकत्वाच्या सीमारेषा वेळोवेळी शौर्यला दाखवून देण्यात आल्या होत्या. पालक मित्रासारखे वागत असल्यानं अनेक मुलं पालकांच्या नीटनेटकेपणाच्या आणि वक्तशीरपणाच्या आग्रहाकडे दुर्लक्ष करतात, असंही एक चित्र समोर येत आहे. केवळ आपण टापटीप राहून चालत नाही, तर आपलं कामही तसंच असावं लागतं. जान्हवी शाळेतून आली, की मोजे, ओळखपत्र कुठेही टाकते. डबा दप्तरातून न काढता तसाच राहतो. जेवण झालं की खरकटं ताट कधी टेबलावर, कधी सोफ्यावर तर कधी स्वयंपाकघरातल्या सिंकच्या शेजारी ती टाकून देते. अशा सवयी लागल्या की त्या सुटणं कठीण असतं आणि त्यांचा फटका मोठेपणी कौटुंबिक आयुष्यात आणि करिअरमध्येही बसू शकतो. यासाठी घर नीटनीटकं, टापटीप ठेवण्याची आणि ज्या-त्या गोष्टी ज्या-त्या जागी ठेवण्याची सवय मुलांमध्ये रुजवावी लागते. तोही एक संस्कारांचा भाग आहे. 

 एखादा हुशार, स्मार्ट मुलगा समोरच्याला प्रभावित करू शकतो. पण समोरच्याचं मन जिंकायला आदर, प्रेम ही मूल्यंच कामाला येतात. आताच्या मुलांची भाषा ‘माय वर्ल्ड माय रुल्स’पर्यंत आली आहे. ती भाषा करणाऱ्यांना एवढा मुजोरपणा करण्याची चैन केवळ सुस्थितीत असलेल्या आणि लोकशाही समाजात मिळू शकते. त्यामुळे या स्वातंत्र्याचा उपयोग करून मनमानी करू नये, ही गोष्टही रुजवण्याची गरज असते.   

  स्त्रियांवरच्या अत्याचारासाठी, भ्रष्टाचारासाठीच्या किंवा व्यसनांतून अपघात, किंवा कोणत्याही गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या लोकांमध्ये आपलं मूल नसावं असं वाटत असेल, तर स्वच्छ शब्दांत ती मूल्यं, ते संस्कार मुलांपर्यंत पोहोचवावे लागतील. ते रुजतील की नाही, यावर पालकत्वाची कसोटी लागणार आहे. हेच आजचं सजग पालकत्व.

trupti.kulshreshtha@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palkatva trupti jsohi kulshreshtha parents children childhood sanskar ysh
Show comments