‘‘मैफल जिंकायचीच म्हटलं, की त्यात एक प्रकारची आक्रमकता येते. आपलं गाणं चांगलं होण्यासाठी आवश्यक जिद्द (कििलग इिन्स्टक्ट) असणं चांगलं, परंतु त्याकरिता पेटून उठणं (कििलग अटिटय़ूड) हे वाईट! सुरांनी श्रोत्यांना अगदी अलगद कवेत घेत आपलंसं केलं पाहिजे. टाळी घेण्याच्या वृत्तीपेक्षा रसिकांनी मंत्रमुग्ध होणं, हे खरं संगीत आहे. संगीतामधील अध्यात्म म्हणजे त्या सुरांच्या विश्वात कलाकाराने लीन होत शरण जाणं. त्या सुरांशी लीलया खेळणं. त्या वेळचा आनंद हा शब्दातीत आणि अमूल्य असतो. सुरांवर ज्यांची भक्ती, निष्ठा असते त्याचा सूर हा चांगला, प्रभावी होतो. त्यांची कंपोझिशन्स वेगळी ठरतात आणि हेच सच्चे सूर थेट काळजाला हात घालतात.
५६ र्वष झाली आज या क्षेत्रामध्ये, पण तरीही या संगीताने दिलेल्या आनंदाची गणना कशातही होणे नाही. सूर, ताल, लयीचे पक्के संस्कार गळ्यावर तर झालेच शिवाय संगीताकडे चौफेर दृष्टीने पाहण्याची सवय लागली. अजाण वयातही कौतुकापेक्षा संगीत हा आत्मिक आनंदाचाच भाग अधिक राहिला. शाबासकीने हुरळून न जाता कलेचा अधिकाधिक सखोल, सांगोपांग अभ्यास कसा करता येईल, घराण्याचा ठसा घेऊन वाटचाल करण्यापेक्षाही गाण्यात वैविध्य कसं आणता येईल, यादृष्टीने माझ्या रियाझाकडे आईचा कटाक्ष होता. ती माझं प्रेरणास्थान तर होतीच शिवाय एक चाणाक्ष गुरूही होती. खेळता खेळता सहजपणे ती माझ्याकडून संगीताचे धडे गिरवून घेत असे. तितकीच सहजता मफिली करतानाही येत गेली. खेळाइतकाच निव्र्याज आनंद मला गाण्यानेही दिला. घरी येणाऱ्या तसंच संगीत जलशांतून ऐकलेल्या अनेक दिग्गजांच्या गाण्यातून उत्तम ते टिपत, त्यात स्वविचारांची भर घालत माझं गायन विस्तारत गेलं.
मध्य प्रदेशातील जबलपूरमधील सर्वार्थाने संपन्न, समृद्ध अशा घरात बालपणापासूनच माझ्यावर संगीताचे असेच सुदृढ आणि निकोप संस्कार झाले. माझी आई डॉ. सुशीलाताई पोहनकर उत्तम गायिका, हिचे आजोबा बापूजी जोशी, वडील बाबुराव जोशी हेही संगीतातील नामवंत कलाकार होते. आईवर उस्ताद अमीरखाँ साहेबांच्या गाण्याचा प्रभाव होता. माझ्या वडिलांनीही लखनौला अण्णासाहेब रातंजणकरांकडे गाण्याची तालीम घेतलेली होती आणि शिक्षणातही ते अव्वल होते. आमच्या कलासक्त घरात त्यामुळे दिग्गज कलाकारांचा नेहमीच राबता होता. त्यांचे विचार, गायन, शैली यांचा अगदी जवळून परिचय घडत विविध सांगीतिक शैलींच्या संकरामधून सूर, लयीचा अभ्यास सुरू होता. माझ्या गाण्याबाबत आई कमालीची कठोर आणि सजग होती. वडिलांनाही ती तिच्या शिस्तीच्या आड येऊ देत नसे. खेळाच्या वयात मी व्यासपीठावर संगीतामधील दिग्गजांसमवेत गात होतो. त्या वेळचं संगीत क्षेत्रातलं वातावरण हेदेखील निर्मळ, निभ्रेळ आणि सकस होतं. कलेला अमूल्य असा बहुमान होता, आदर होता. कलाकार हा वयाने नाही तर त्याच्या प्रतिभेने नावाजला जात होता. त्यामुळे लहान गायक म्हणून माझ्या गाण्याचं कौतुक होण्यापेक्षाही ‘अलौकिक प्रतिभेला’ गाण्याचे सटीक विश्लेषण होत असे. सूरश्री केसरबाई केरकर, बडे गुलाम अली खाँ, पं. निखिल बॅनर्जी, थोर गायिका अंजनीबाई मालपेकर, पं. विनायकराव पटवर्धन, पं. भीमसेन जोशी, पं. हिराबाई बडोदेकर, जोत्स्ना भोळे अशी अनेक ज्येष्ठश्रेष्ठ कलाकार मंडळी माझं गाणं ऐकायला समोर बसत. त्यामुळे सांस्कृतिक संपन्नतेमध्ये जगण्याचं भाग्यच मला लाभलं.
आजसारख्या तेव्हाही स्पर्धा होत असत. अव्वल येण्यासाठी नव्हे तर इतरांच्या क्षमता जाणत आपल्या क्षमतांच्या विकासाला खतपाणी मिळावं, हा त्यामागील हेतू असे. त्यानुसार वयाच्या १०-११व्या वर्षी पुण्यातल्या एका संगीत स्पध्रेत मी आयुष्यात पहिल्यांदा आणि अखेरचा सहभाग घेतला. स्पध्रेत माझ्या गाण्याने प्रभावित होत त्या वेळी ‘संगीत प्रविर’ ही उपाधी मला देण्यात आली. हा प्रसंग जेव्हा उस्ताद अमीरखाँ साहेबांना कळला तेव्हा, ‘‘अशा स्पर्धामध्ये भाग घेत जाऊ नकोस,’’ असा मौलिक सल्ला त्यांनी दिला. असाच आणखी एक प्रसंग बहुप्रख्यात अशा ‘सवाई गंधर्व महोत्सवा’मधला आहे. तेव्हाही मी अगदीच पोरवयातला होतो. पं. भीमसेन जोशी आणि पं. वसंतराव देशपांडे यांनी मला तिथे गायला बोलावलं होतं. हा महोत्सव तेव्हा दिवसरात्र अखंड चालत असे. बालवयामुळे मी ग्रीनरूममध्ये झोपी गेलो होतो. माझ्या गाण्याची वेळ आली तेव्हा अक्षरश: मला झोपेतून उठवून व्यासपीठावर बसविण्यात आलं. तब्बल ५० मिनिटं यमन राग झुमरा तालात गायल्यानंतर चमत्कार झाल्यासारखं वातावरण स्तब्ध झालं होतं. त्या प्रसंगाची पुढे आठवण सांगताना पं. हिराबाई बडोदेकर म्हणाल्या होत्या, ‘‘मी पाहत होते तुझ्याकडे. गाणं चांगलं होऊ देत, नाही तर आई घरात घेणार नाही म्हणून साईबाबांच्या तसबिरीसमोर सारखी प्रार्थना करीत होतास.’’ असाच एक प्रसंग १९५९ सालच्या नागपूर मफलीचा. तिथल्याही माझ्या गाण्यानंतर श्रीमंत बाबुरावजी देशमुख या संगीत दर्दीने त्या वेळी म्हटले होते, की ‘‘या बालगायकाला जपा. योग्य शिक्षण देऊन त्याचे पलू देदीप्यमान करा.’’
गाणं हे एखाद्या रंगीबेरंगी पुष्पगुच्छासारखं असावं. बागेतून फुलं वेचून आणल्यानंतर त्यांचा जसा सुंदर, आकर्षक असा पुष्पगुच्छ बनवता आला पाहिजे तसंच गाण्याचंही आहे. चहुबाजूंनी संगीत ऐकताना त्यातून चांगलं आणि आपल्या गळ्याला साजेसं निवडण्याची एक डोळस वृत्ती अंगी बाणवता आली पाहिजे. त्याचबरोबरीने हे सगळं स्वीकारताना, साकारताना त्यात आपल्या बुद्धिमत्तेची स्वतंत्र चमकही दाखविता आली पाहिजे. तेव्हाच प्रत्येक रंगाची एक वेगळी मजा अनुभवतानाच एकत्रित आविष्काराचाही तितकाच सुमधुर आनंद मिळू शकेल. कुणा एकाच घराण्याचा कित्ता गिरवण्याऐवजी त्या घराण्याच्या मॅनरिझमच्या पलीकडे जात त्याच्या घरंदाजपणावर लक्ष केंद्रित करण्याची सवय घरातूनच लावली गेली. घराण्यामुळे नाही तर कलाकार आपल्या प्रतिभेने, कर्तृत्वाने घराण्याचं नाव मोठं करीत असतो. प्रत्येक संगीत घराण्यांमध्ये सूर तेच सात. म्हणण्याची पद्धती, लगाव वेगवेगळा असं असलं तरीही गणितामध्ये जसं बे दुणे चार करता येतात तसे दीड आणि अडीचही चार होतात, आठातून चार वजा केल्यासही चारच उरतात. अर्थात, तुम्ही किती परीने त्या सगळ्या शैलींचा मागोवा घेता, अभ्यासता त्यावर तुमच्या कलेची समृद्धता अवलंबून असते. सुफी, ठुमरी, दादरा यांची ‘कहन’ (म्हणण्याची पद्धत), उस्ताद, पंडित अशांच्या संगीतामधील ‘सोच’ याचा अभ्यास करण्याची शिकवण मिळाल्याने आपोआपच विचारांना व्यापकता आली. साहजिकच, अभ्यासातून, रियाझातून, मफिलींतून सुखावणारा आनंद हा शतगुणित होत राहिला. मी कधीच बांधीव विचार केला नाही. हरेक प्रकारचं संगीत मला आवडतं. सूर आणि लय यावर कुणाचीही मक्तेदारी नाही. त्यामुळे ते ऐकताना, पलू टिपताना अपार आनंद मिळाला.
कला ही नित्यनूतन तेव्हाच राहते जेव्हा त्यात काळानुरूप बदल आणि वेगळा विचार यांचा मिलाफ साधला जातो. सांस्कृतिकदृष्टय़ा आपण गर्भश्रीमंत आहोत, परंतु ही श्रीमंती जपण्याबरोबरच आपल्यापरीने समृद्ध करणं, संवíधत करणंही तेवढंच आवश्यक आहे. संगीताचे प्रकार, शैली कोणत्याही असोत त्याचा एकत्रित विचार करता तो अखेरीस सूर, लय आणि ताल यांचा अथांग सागरच आहे. त्याचा आस्वाद घेताना मानसिक समाधानाबरोबरच, विचारांनाही प्रेरित करण्याची क्षमता तो राखून असतो. सागरातून मोती टिपून घेतल्याने जशी त्याची श्रीमंती कमी होत नाही तसंच संगीताचंही आहे. सूर, लयीचा हा सगळा प्रवास, प्रवाह अंतिमत: तरल आत्मिक आनंदाप्रतच नेत असतो.
उस्ताद अमीर खाँसाहेब, पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, पं. किशोरीताई आमोणकर, उस्ताद सलामत नजाकत, बेगम अख्तर अशा उत्तुंग कलाकारांचा जसा माझ्यावर प्रभाव आहे तसंच लताबाई, आशाताई, हृदयनाथ, मदनमोहन, आर. डी. बर्मन यांचंही संगीत मला आवडतं. प्रत्येकाची स्वतंत्र धाटणी आहे. एक सृजनात्मक विचारप्रक्रिया प्रत्येकाच्याच संगीत रचनेत, गायनात, मांडणीत दिसते. हे सर्व आपलं आहे. आणि ते ‘क्लासिक’ याच पठडीतलं आहे. रागदारी संगीत अनवट, अवघड असल्याबद्दल म्हटलं जातं, तसंच सुगम संगीतही गाणं सोपं नाही. यातीलही सुरांची सजावट, अभिव्यक्ती हे मला सुखावणारं, भावणारं असतं. याच्या श्रवणाने मलाही नवीन काही गवसत असतं. त्याचा आविष्कृतीसाठी मी उपयोग करून पाहतो. अलीकडेच मी ‘पिया बावरी’ हा फ्युजन अल्बम माझा मुलगा अभिजीत याच्यासोबत केला. पाश्चात्त्य संगीत आणि िहदुस्थानी रागदारी संगीताचा एक अनोखा मिलाफ त्यात आणत संगीत क्षेत्रामध्ये वेगळा प्रयोग करण्याचं धारिष्टय़ दाखवलं. अर्धशतकाहून अधिक काळ संगीत क्षेत्रात साधना केल्यानंतरही नव्या दमाने काही करण्याची उमेद मला अधिक बळ देऊन जाते. ‘जुनं तेच चांगलं’ म्हणण्यापेक्षा नवनवीन प्रयोगांसाठी स्वत:ला सिद्ध करण्याला मी महत्त्व देतो. यातून माझी संगीतविषयक जाण तर वाढतेच शिवाय श्रोत्यांनाही मी वेगळं काही दिल्याचं समाधान मला मिळतं.
गवय्याबरोबरच चांगला खवय्याही मी आहे. जगण्याचा मनमुराद आनंद मी लुटतो. नवं काही समजून घेण्यासाठी मी उत्सुक असतो. इंग्रजी या विषयाचा मी उच्च शिक्षित प्रोफेसर असलो तरीही अवांतर वाचन, अवलोकन, चर्चा यासाठी माझ्या मनाचे अवकाश मी नेहमीच मोकळे ठेवलेले आहे. माझी पत्नी अंजली ही चांगली गायिका आणि उत्तम वाचक आहे. माझ्या गायनाचे मुलगा आणि ती असे दोन खंदे टीकाकार आहेत. चांगलं ते वाचण्यासाठी ती जसं मला प्रवृत्त करते तसंच अभिजीतही संगीतक्षेत्रातील नवीन गोष्टी माझ्या नजरेस आणून देत मला अपडेट ठेवत असतो. शिक्षण ही अथक, निरंतर चालणारी अशीच प्रक्रिया आहे. तुमच्या ज्ञानाचा आवाका व्यापक, लवचीक असेल तर घडणारी पुढची पिढी हीदेखील तेवढय़ाच मुक्त विचारधारेची असेल. संगीतालाच काय परंतु कोणत्याही प्रकारच्या चाकोरीबद्ध शिक्षणाला मी नकारच देईन. मुळाक्षरं गिरवल्यानंतर नव्या शब्दांचा, वाक्यांचा, रचनांचा वेध आणि शोध हा संवेदनशील मनांना लागायलाच हवा. तरच पुढल्या काळात रागदारी संगीतामध्ये प्रयोगात्मक बदल आपण अनुभवू शकू.
आजच्या पिढीतही सत्यजित तळवलकर, निलाद्रीकुमार, कौशिकी चक्रबर्ती, अमान-अयान अशी काही प्रॉमिसिंग नावं आहेत. ही सर्व कलाकारांची मुलं आहेत म्हणून नव्हे तर त्यांचे सूर पक्के आहेत. संगीताचं स्ट्रक्चर त्यांना नेमकं अवगत आहे आणि त्या बळावरच ते या क्षेत्रात नानाविध प्रयोग करतानाही दिसत आहेत. स्वत:च्या गाण्यावर, रचनांवर खूश जरूर व्हा, परंतु त्याचबरोबरीने त्यात कोणती कमतरता राहिली याकडेही लक्ष असू द्यात. कौतुक, प्रशंसा जशी आपण स्वीकारतो, टीकाही तशीच स्वीकारता आली पाहिजे. त्याचा नकारात्मक विचार न करता कलेच्या विकसनासाठी त्या टीकेचा वापर आपल्याला करता आला तरच निखळ आस्वाद, आनंदाला जागा होते. शेवटी तुम्ही त्या स्वरांची पूजा बांधलेली असते. त्यात मनापासून जान ओतलीत तर ती आध्यात्मिक बठक ही रागलोभ, टीका-प्रशंसा, श्रेष्ठ-कनिष्ठता या सगळ्या पल्याड नेणारी असते. लोकप्रियता, पुरस्कार हे काही ग्रेटपणाचे निकष नव्हेत. त्यासाठी आटापिटा करण्याऐवजी कलेतून तुम्हाला मिळणाऱ्या आणि तुमच्या निरलस सृजनकलेने इतरांना मिळणाऱ्या आनंदाला झुकतं माप दिलं गेलं पाहिजे. कारण कला आणि तिच्यातून गवसणारा आनंद हाच ईश्वराइतका शाश्वत आहे.’
शब्दांकन – अनुराधा परब
anuradhaparab@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा