उत्पल व. बा.
ही लेखमाला लिहीत असताना अनेक अनुभव आले. मनातील बऱ्याच प्रश्नांना आणि उत्तरांना वाट मोकळी करून देता आली. ज्या विषयांना आपण या मालिकेत स्पर्श केला त्या सर्वच विषयांवर अधिक सविस्तर उत्तरं मिळतील अशी मांडणी करता येईलच. हे विषय सामाजिक, नैतिक स्वरूपाचे असल्याने तिथे गणितासारखी उत्तरं मिळत नाहीत. असं असलं तरी अमुक एका प्रश्नावर मला हे उत्तर दिसतं हे सांगणं ही आपली जबाबदारी असतेच. जॉन लेनन या विख्यात गायकाचं एक वचन आठवतं. तो म्हणतो- तुम्ही एकटय़ाने पाहिलेलं स्वप्न हे फक्त स्वप्न असतं. पण सगळ्यांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न म्हणजे वास्तव असतं! त्यामुळे स्वप्न तर बघतच राहूयात. लेट्स ड्रीम टुगेदर!
एखाद्या प्रसन्न रात्री मित्रांबरोबर गप्पा रंगत आलेल्या असाव्यात, काही मौलिक प्रश्न पुढे येत जावेत, त्यातून डोक्यातील चक्रं आपल्या सोयीच्या वाटेऐवजी थोडय़ा अवघड वाटांवरून धावू लागावीत आणि एकुणात चच्रेला रोमांचक स्वरूप येत असताना सकाळी उठून कामावर जायचंय म्हणून सभा बरखास्त करण्याची वेळ यावी.. अशा वेळी जी मन:स्थिती होते तशी माझी आत्ताची मन:स्थिती आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये ‘चतुरंग’कडून लेखमालिका लिहिण्याविषयी प्रस्ताव आला तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया नकाराची होती. आपल्याला स्तंभलेखन जमणार नाही, असं मला ठामपणे वाटत होतं. शिवाय स्तंभलेखन म्हणजे ‘कमिटमेंट’! त्यामुळे मी लेखमाला न लिहिणंच कसं योग्य होईल हे मी त्यांना पटवून द्यायचा सर्वतोपरीने प्रयत्न केला. पण त्यांचा आग्रह कायम होता. आज लेखमालेचा समारोप करताना मी त्यांचे आभार मानतो, कारण गेल्या वर्षभर मी जे काही थोडंफार लिहू शकलो, विविध वाचकांशी जोडून घेऊ शकलो, त्यांच्या प्रश्न-प्रतिक्रिया-प्रशंसेमुळे विचारमग्न आणि उत्साही राहू शकलो त्याचं श्रेय त्यांना जातं.
माणसाने लावलेल्या सगळ्या शोधांमध्ये भाषेचा शोध ही एक विलक्षण गोष्ट आहे. एकेकाळी नसलेल्याच किंवा नि:शब्द रूपात असणाऱ्या जाणिवा, विचार भाषेतून प्रकट होऊ लागल्यावर त्यांच्यातील गुंतागुंत, टक्कर, रस्सीखेच सगळंच वाढत गेलं आहे. लिहिण्यातून व्यक्त व्हायची सवय असलेल्या माझ्यासारख्याला भाषेचा मोठा आधार तर वाटतोच, पण कधी कधी भाषेचं भयही वाटतं. कारण भाषेतून जे मी सांगतो ते ‘मला जे म्हणायचं आहे आणि मला जे म्हणायचं नाही’ ते सगळं निर्दोषपणे सांगता येतंच असं नाही. शिवाय आणखी एक प्रश्नही सतावत असतो. तो म्हणजे विश्वाचा एवढा मोठा पसारा – तो उलगडण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते विविध विज्ञानशाखांचे अभ्यासक, माणसाच्या मनोविश्वाचा आणि सामाजिक व्यवस्थांचा अभ्यास करणारे मानव्यशास्त्राच्या शाखांचे अभ्यासक यांच्या योगदानापुढे आपण वेगळं असं काय सांगणार?
पण इथेच एक ‘ट्विस्ट’ आहे. ज्ञानाची विविध क्षेत्रे आपल्याला विशिष्ट विषयाची सखोल माहिती देतात. त्या त्या क्षेत्रातील ज्ञानी मनुष्य हा समाजाचा एक ‘अॅसेट’ असतो. या ज्ञानक्षेत्रांच्या बरोबरीने जे व्यापक असं ‘वैचारिक क्षेत्र’ आहे ते विविध ज्ञानक्षेत्रांतील घडामोडींचा परस्परसंबंध, त्यांचे सकारात्मक-नकारात्मक सामाजिक परिणाम, समाजव्यवस्थेचे विविध पलू, त्यातील सुधारणा या गोष्टींवर सतत विचार करत असतं. मानसशास्त्रातील ज्ञानी मनुष्य एखाद्याच्या मानसिक आजारावर उपचार करू शकेल, परंतु वैचारिक क्षेत्रातील मनुष्य आपल्या निरीक्षणातून आजवर लक्ष गेलं नाही अशा एखाद्या ठिकाणी या ज्ञानाची गरज आहे हे सांगू शकेल. वैचारिक क्षेत्रातील मनुष्यासाठी ‘समाज’ हा एक प्रमुख आस्थेचा विषय असतो. ‘विशिष्ट ज्ञान’ त्याला आकर्षित करतंच, पण ‘ज्ञानाचं उपयोजन’ त्याला अधिक आकर्षित करतं. वैचारिक क्षेत्र हे प्रामुख्याने कुतूहल, नियोजन या पायावर आधारलेलं असल्याने खरं तर आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार याचा शिलेदार होऊ शकतो. आपण प्रत्येकजण समाजाचा भाग असतो आणि समाजव्यवस्थेसंदर्भात, संकल्पनांच्या संदर्भात विश्लेषक विचार करण्याची क्षमता विकसित झाली तर प्रत्येक जण काही कल्पना मांडू शकतो, उपाय सुचवू शकतो. रोजच्या जगण्याच्या पलीकडे जात वैचारिक घुसळण सुरू ठेवण्याची प्रक्रिया आपण सुरू ठेवली तर त्यातून आपलं ‘मनुष्यत्व’ उजळून निघत असतं.
ही लेखमाला लिहीत असताना मला हे अनुभवता आलं. मनातील बऱ्याच प्रश्नांना आणि उत्तरांना वाट मोकळी करून देता आली. यात अपूर्णतेची जाणीव तर नक्कीच आहे. ज्या विषयांना आपण या मालिकेत स्पर्श केला त्या सर्वच विषयांवर अधिक सविस्तर उत्तरं मिळतील अशी मांडणी करता येईलच. हे विषय सामाजिक, नैतिक स्वरूपाचे असल्याने तिथे गणितासारखी उत्तरं मिळत नाहीत. असं असलं तरी अमुक एका प्रश्नावर मला हे उत्तर दिसतं हे सांगणं ही आपली जबाबदारी असतेच. ‘जातीयता संपायला हवी’ असं मी म्हणत असेन तर ती संपवण्याकरता मला कोणते उपाय दिसतात हे मी सांगितलं पाहिजे. ते उपाय किती परिणामकारक आहेत हा पुढचा मुद्दा, परंतु केवळ ‘विशफुल थिंकिंग’ करत राहणं हा व्यापक बदलासाठीचा उपाय असू शकत नाही.
ज्या विषयांवर बोलायची इच्छा होती, पण ते राहून गेलं त्यात प्रतिगामी-पुरोगामी हा संकल्पना भेद, धर्मश्रद्धा आणि आपलं मानस, धर्मश्रद्धा आणि राजकारण हे विषय आहेत. गांधीजींची आधुनिकतेविषयीची मुळापासूनची वेगळी दृष्टी आणि तिची प्रस्तुतता यावर आपण बोललो, पण तो धागा आणखी पुढे नेता येईल. मागील लेखात आपण ‘जीवनकौशल्ये’ या विषयावर बोललो. त्याच्या पुढे जात, काही व्यावहारिक उदाहरणं घेत जीवनकौशल्ये विकसित करण्याच्या प्रक्रियेवर तपशिलात बोलता येईल. लोकशाही व्यवस्थेत सत्तेचं विकेंद्रीकरण आणि त्यातून स्वशासन हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या विषयावर गांधीजी आणि त्यांच्यानंतर विनोबा भावे यांनी मूलभूत मांडणी केली आहे. मराठीत मिलिंद बोकील यांनी या विषयावर मौलिक लेखन केलं आहे. या सगळ्याचा आधार घेत या विषयावर थोडी चर्चा करायचं मनात होतं.
आपण प्रेम आणि लैंगिकतेविषयी बोललो, परंतु या विषयाशी जोडलेला महत्त्वाचा सामाजिक मुद्दा वेश्याव्यवसाय हा आहे. लैंगिक गरज आणि लैंगिक इच्छा यांच्या पूर्ततेची व्यवस्था समाजमान्य नैतिकतेअंतर्गत होत नसल्याने वेश्याव्यवसाय अस्तित्वात आहे. लग्नव्यवस्थेला समांतर चालणारी, परंतु विस्कळीत, बहुतेकदा शोषणावर आधारलेली, कुणाही संवेदनशील मनुष्याला अस्वस्थ करणारी ही व्यवस्था आहे. यासंदर्भात ‘पुरुष’ म्हणूनच लैंगिक मनोविश्व घडत असताना वेश्याव्यवसायाबद्दल विचार होत होताच, हे जग पाहिलंही होतं, परंतु पुण्यातील ‘सहेली’ या ‘सेक्स वर्कर्स कलेक्टिव्ह’शी जोडला गेल्यानंतर वास्तवाच्या अधिक जवळ जाता आलं. त्यामुळे याबाबत सविस्तर लिहायचं होतं. पारंपरिक चौकटीला छेद देत काही चित्रपटांनी मुख्य प्रवाहाला वेगळं वळण दिलं त्याबद्दल थोडं बोलायचं होतं.
हे सगळं इतरत्र किंवा याच व्यासपीठावर पुढे बोलता येईलच. आत्ता मात्र निरोपाचा क्षण आहे. या लेखमालेच्या निमित्ताने अनेक वाचकांशी ई-मेलद्वारे जो संवाद झाला तो मला समाधानी आणि समृद्ध करणारा ठरला आहे. अनेकांशी अनेक संदर्भात बोलणं झालं. काहीजणांनी या लेखमालिकेमुळे/विशिष्ट लेखामुळे त्यांना मदत झाल्याचं कळवलं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. माणसांशी असं जोडलं जाण्याचं मोल फार आहे. सर्व वाचक मित्र-मत्रिणींचे मन:पूर्वक आभार!
आहे ती चौकट बदलून काही नवं करण्याचा विचार करणाऱ्याला स्वप्नाळू, अव्यवहारी, कधी उपहासाने क्रांतिकारक वगैरे म्हटलं जातं. नवी दिशा कोणती, ही वाट चांगलीच असेल कशावरून हे नीटपणे न कळल्याने किंवा सांगणाऱ्यालाही नीट सांगता न आल्याने असं होतं. परंतु असं स्वप्नाळू असणं हे आवश्यक आहेच. त्याविषयी शंका नसावी. जॉन लेनन या विख्यात गायकाचं एक वचन आठवतं. तो म्हणतो- तुम्ही एकटय़ाने पाहिलेलं स्वप्न हे फक्त स्वप्न असतं. पण सगळ्यांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न म्हणजे वास्तव असतं! त्यामुळे स्वप्न तर बघतच राहूयात. लेट्स ड्रीम टुगेदर!
(सदर समाप्त)
utpalvb@gmail.com
chaturang@expressindia.com