फळभाजी किंवा पालेभाजीची लागवड करताना बियाणं शक्यतो गावरान वापरावं. गावरान बियाणांना उत्पादन कमी असतं, हा भ्रम आहे. उत्तम माती, खतं मिळाली तर विश्वास बसणार नाही एवढं उत्पादन ते देतं. गावरान बियाणं हे सबुरीनं गोळा करावं लागतं, त्याचं जतन, संवर्धन करावं लागतं. गावरान बियाणं नसेल तर संकरित बियाणं हे छोटय़ा प्रमाणातही मिळतं. पण ते एकदा फोडलं की ते संपूर्ण वापरून घ्यावं. गावरान बियाणांची रुजवण करताना ती रात्रभर कोमट पाण्यात, दुधात, गोमूत्रात पाण्याच्या समप्रमाणित द्रावणात भिजवावीत, म्हणजे ती लवकर अंकुरित होतात. टोमॅटोची रोपं ही घरीच तयार करता येतात. जास्तीचा पिकलेला, लिबलिबीत झालेला टोमॅटो कुंडीतील मातीत पिळावा, बियाणं आठवडय़ाभरात अंकुरित होतात. महिनाभरानं जोमदार वाढलेली रोपं इतरत्र लागवड करावी. कमी उंचीची, खुरटलेली रोपं काढून टाकावीत.
वांगी, मिरचीची बियाणं असल्यास त्याची रोपं तयार करावीत. त्याची दुसऱ्या ठिकाणी लागवड करावी. रोपांची वाढ जलद होते. पालक, गावरान कोथिंबीर, शेपूच्या काडय़ा, मेथीच्या काडय़ा या पाने काढून पुन्हा पेरून टाकाव्यात. बीट, मुळा यांचा शेंडय़ाकडील भाग पुन्हा रुजवता येतो. तर बटाटा, रताळी यांना अंकुर आले की त्यांना काप देऊन पुन्हा लागवड करता येते.
दोन वेगवेगळ्या वाणांची कलमं तयार करून लागवड केल्याने काय होतं व त्यातून निसर्ग आपल्याला परत काय देतो हे पाहणं अनेकदा जागेअभावी शक्य नाही. पण आपल्याला शक्य आहे ते उगवण्यातून काय मिळतं हे प्रयोग करून पाहणं नेहमीच शिकण्यासारखं आहे. तुम्हीही तुमच्या घरात असे प्रयोग करा आणि ताजी भाजी, फळं खा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा