रती भोसेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आजच्या आजी-आजोबांच्या बाह्य़ रूपात अगदी जाणवेल असा ठसठशीत बदल घडलेला आहे, मात्र नातवंड नावाचा नाजूक हळव्या नात्याचा एक समान धागा त्या सगळय़ांमध्ये आहेच. त्यांना सांभाळणं, वाढवणं त्यांना आपलं कर्तव्य वाटतंय, पण जीवनशैली बदललेल्या समाजात ते तेवढं सोपं राहिलंय का? काय आहेत आजच्या पालकांच्या पालकांसमोरची आव्हानं याचा ऊहापोह, उद्याच्या (१० सप्टेंबर) जागतिक ‘आजी-आजोबा दिना’च्या निमित्तानं.

त्या दिवशी शाळा सुटल्यानंतर मुलं घरी जाताना एक शिक्षिका म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेवायला मी खाली उभी होते. तेवढय़ात माझं लक्ष गेलं.. तीन वर्षांची एक लहानगी आपल्या आजोबांच्या खांद्यावर बसून घरी निघाली होती. आजोबा खास गावाकडच्या पोषाखात. पांढरा लेंगा, पांढरा शर्ट आणि टोकदार टोपी. त्यांच्या टोपीला धरून नातीची स्वारी मस्तपैकी आजूबाजूला बघत प्रवासाची मजा घेत होती. छान वाटलं दोघांना बघून!

जे पालक मुलांना न्यायला आले होते त्यांच्यावर सहजच नजर फिरवली तर बहुतेक करून आजी-आजोबाच आपापल्या दुधावरच्या सायीला घरी घेऊन जायला आले होते. आपल्या आजीला किंवा आजोबांना पाहून मुलं आनंदानं उडय़ा मारतातच, पण आजी-आजोबांच्या चेहऱ्यांवरूनही आनंद निथळत असतो. हा रोजचा सोहळा बघणं हे आमच्यासाठीही आनंदाचं असतं.

 ‘ए आजी मी तुझ्याशी खेळेन गं.

 चुलीवर पातेलं, पातेल्यावर तपेलं,

तुझं माझं घरकुल बांधेन गं,

ए आजी मी तुझ्याशी खेळेन गं.’

जुन्या काळचं हे आजी-नातवडांचं नातं आणि गट्टीचं वर्णन करणारं सुंदर बालगीत, जे कालातीत आहे. पूर्व प्राथमिक स्तरावरच्या शाळेत काम करत असल्यानं आजही घराघरांत अशीच आजी-आजोबा नातवंडाची गट्टी वर्षांनुवर्ष अनुभवायला मिळते. त्याचा आणि त्या अनुषंगानं इतर काही जाणवलेल्या बाबींविषयी हा संवाद उद्याच्या जागतिक आजी-आजोबा दिनाच्या निमित्तानं.

खरंतर, आमच्यासाठी हे आजी-आजोबा म्हणजे आमच्या पालकांचे पालक असतात. काळानुरूप त्यांच्यामध्ये काही बदल झालेत. त्यांच्या काही जबाबदाऱ्या वाढल्या आहेत किंवा काही त्यांनी ओढवून घेतल्या आहेत. तसंच त्यांच्यासमोर काही नवी आव्हानं उभी राहिली आहेत. त्यातला एकदम जाणवण्यासारखा दृश्य बदल म्हणजे आजी-आजोबांचं रहाणीमान. शाळेच्या इतक्या वर्षांत आजीचा प्रवास नऊवारीपासून सलवार-कमीजपर्यंत झाला आहे. आजोबांचाही धोतर-टोपीपासून टी-शर्टपर्यंत प्रवास झाला आहे. त्याचा परिणाम असा, की मला आठवतंय, एकदा आपल्या आजीकडे बघून एक मुलगी, ‘‘मला साडीवाली आजी नको. ड्रेसवाली आजी पाहिजे.’’ असा हट्ट धरून बसली होती. आणखी एक महत्त्वाचा बदल या आजी-आजोबांमध्ये, विशेषत: शहरांमध्ये दिसतो तो म्हणजे, पूर्वी बहुतांशी घरातच असलेला आजी-आजोबांचा वावर, उंबरठा ओलांडून सातासमुद्रापलीकडे गेला आहे. मुलं सर्रास आजी-आजोबा परदेशात गेले किंवा आले आहेत, असं गप्पांमध्ये सांगायला लागली आहेत. तर काही घरांमध्ये दुधावरची सायच परदेशी असल्यामुळे सतत सहा-सहा महिने त्यांच्यासाठी तिथे उपस्थित राहून मध्ये-मध्ये इथे येणारेही आजी-आजोबा आहेत. बरेच आजी-आजोबा भरपूर फिरणारे, हौसमौज करणारे असे आहेत. एकमेकांना अरे-तुरे म्हणणारे आहेत. मित्रत्वाच्या नात्यानं राहाणारे आहेत. परंतु आजी-आजोबांच्या या बदललेल्या रूपातही नातवंड नावाचा नाजूक हळव्या नात्याचा एक समान धागा आहेच. नातवंडाला पाहिल्यावर त्यांचे भाव हे तसेच आहेत आणि तसेच राहतीलही.

या पालकांचं रहाणीमान बदललं तसेच काळानुसार इतरही बदल झाले आहेत. नातवंडांच्या आई-वडिलांना म्हणजे दोन्ही पालकांना नोकरी करणं काळानुसार बहुतांशी अनिवार्य झालं आहे. तर काही वेळा करिअरला महत्त्व देणं त्यांच्यासाठी प्राधान्याचं ठरतं. याशिवाय एकल पालक असेल तर मग आजी-आजोबांनाच खंबीरपणे आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या पाठीशी उभं राहावंच लागतं आहे. शहरी भागात प्रामुख्यानं जबाबदारी येते ती म्हणजे नातवंडांना शाळेत नेण्या-आणण्याची. आजी-आजोबा जर नुकतेच निवृत्त झाले असतील तर तेही ती जबाबदारी आनंदानं उचलताना दिसतात. आताच्या आज्या स्वत: जेव्हा नोकरी करत होत्या, तेव्हा स्वत:च्या मुलांना सांभाळताना होणारी तारांबळ त्यांनी अनुभवलेली असते. नातवंडांबाबत त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची त्या काळजी घेतात. त्यामुळे नातवंडांना शाळेत नेणं-आणणं हे आनंदानं सुरू असतं. पण शहरातली रहदारी आणि वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड देताना काही वेळा त्यांची दमछाकही होत असलेली जाणवते. नातीला शाळेत सोडायला येणाऱ्या एक आजी, घर लांब असल्यामुळे शाळा सुटेपर्यंत आवारात बसायच्या. तर एका आजीची गोष्ट आजही आठवली तरी तिची आणि तिच्या नातीची काळजी वाटत राहाते. तिची छोटी नात म्हणजे मुलीची मुलगी. लेकीनं आत्महत्या केली. जावयानं पाठ फिरवली आणि नातीची जबाबदारी आजीवर टाकून तो निघून गेला. आता उतारवयात आजी परत कंबर कसून नातीसाठी उभी आहे. अर्थात असे अनुभव अपवादात्मक.

आजकालच्या आईबाबांच्या ‘बिझी शेडय़ुल’मुळे पालकसभांना तर हमखास पाठवण्यात येणारा हक्काचा माणूस म्हणजे आजी-आजोबा, असंच आजचं चित्र आहे. या सगळय़ामुळे असं वाटतं, की आमच्या मुलांची पालक मंडळी आपल्या आई-वडिलांना, म्हणजे आपल्या पालकांना गृहीत धरतात, की आजी-आजोबाच त्यांना सांगतात- ‘आम्ही आहोत, तुम्ही आपापल्या कामाला जा’; हे न सुटलेलं कोडं आहे. पण कधी कधी असंही लक्षात येतं की, हे आजी-आजोबाच हळूहळू पालकांच्या भूमिकेत जाऊन जबाबदाऱ्या घ्यायला लागतात. त्यात ‘आपल्या मुलांना जमणार नाही. आपल्यालाच त्यांच्यासाठी करायला हवं,’ असाही विचार काहीजण करतात. एका मुलाचे आजोबा नेहमी सभांना, उपक्रमांना हजर असायचे. सुरुवातीला जरा कौतुक वाटलं, मग लक्षात आलं, की काहीतरी वेगळं आहे. प्रत्येक वर्गासाठी असणाऱ्या ताईच्या वर्गगटावरही त्याच आजोबांचा मोबाईल क्रमांक होता. त्या मुलाच्या आईनं शाळेत भेटायला यावं असा आग्रह आम्ही धरला, तेव्हा आजोबा म्हणाले, ‘सगळं मीच बघतो. त्या दोघांना काही कळत नाही’. वर्गताईंनी त्यांच्याशी बराच संवाद साधून आईला शाळेत बोलावून घेतलं. तिच्याशी बोलल्यावर लक्षात आलं, की आई शाळेत यायला उत्सुक आहे, पण आजोबांचं मत वेगळं होतं. एका बाबांनी सांगितलं, की ‘मी ऑफिसमधून घरी आल्यावर मुलीशी शाळेविषयी गप्पा मारायला लागलो, की माझे आई-बाबाच उत्तरं देतात. त्यामुळे माझा आणि मुलीचा संवादच खुंटतो. त्यांना कसं सांगावं हेच कळत नाही.’ अशा वेळी हे असं वाढीव, स्वत:वरच लादून घेतलेलं पालकत्व घराघरांत भिंती निर्माण करू लागतं.

  आणखी एक अशीच जबाबदारी आजी-आजोबांवर येते किंवा ते घेतात, ती म्हणजे नातवंडांचा अभ्यास. पूर्व प्राथमिक स्तरावर हे विशेष जाणवतं. पालकांच्या अनुपस्थितीत मुलं दिवसभर घरी असताना बहुतेक वेळा आजी पूर्व प्राथमिक स्तरावरच्या अभ्यासाचा ताबा घेते. ती तिच्या पद्धतीनं शिकवत राहते. शाळा जर काही वेगळा अभ्यासक्रम वा वेगळय़ा पद्धतीनं अभ्यास घेत असेल तर मुलांचा अभ्यास हा एक संभ्रमाचा विषय ठरतो. उदाहरणार्थ, आमच्या शाळेत आम्ही मुलांच्या अक्षरओळखीच्या प्रवासाबाबत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत, मुलांच्या आई-बाबांना याबाबत प्रशिक्षण देत असतो. एकदा असंच एक प्रशिक्षण संपल्यावर काही आई-बाबा पालकांचा गट थांबला होता. ते म्हणाले, ‘ताई तुम्ही हे सांगताय ते आम्हाला पटतंय, पण आमच्या आई-बाबांना आम्ही सांगितलं तर त्यांना ते पटत नाही. मुलं दिवसभर त्यांच्याकडे असतात. ते त्यांच्याच पद्धतीनं अभ्यास घेत राहातात. शाळा काहीही सांगू देत, आपण हे असंच जायचं असं त्यांचं म्हणणं असतं.’  या परिस्थितीत जर नातवंडांच्या आई-वडिलांना त्यांचं मूल ज्या शाळेत शिकतंय त्या शाळेची भूमिका समजली आहे आणि त्यांना ती पटली आहे तर आजी-आजोबांनीही त्यांना साथ द्यायला हवी. नाहीतर ज्यांच्या शिक्षणाची आपल्याला काळजी वाटत आहे त्या नातवंडाचा गोंधळ होणार आहे.

पालकत्वाच्या बाबतीत काही गोष्टी काळाच्या ओघात विस्मरणात गेल्या आणि नंतर जबाबदारीच्या स्वरूपात दिसायला लागल्या. त्यातली एक गोष्ट म्हणजे मुलांचं सहज शिक्षण. म्हणजे मुलांची अनेक गोष्टी स्वत:चं स्वत: शिकण्याची क्षमता, करण्याची क्षमता. त्यामुळे आपण नातवंडांना सगळय़ा बाबतीत मदत केलीच पाहिजे किंवा त्यांना शिकवलं तरच ते त्यांना येईल या विचारानं अनेक गोष्टींची जबाबदारी नकळत घेतली जाते. मग ते साधं चपला, बूट घालणं असो किंवा स्वत:ची बॅग भरणं, उचलणं असो, आजी-आजोबाच धावपळ करून करत असतात.

खरंतर आता आजी-आजोबा असलेली, त्या पिढीतली मंडळी ही अशी सध्या एकच पिढी शिल्लक आहे, की ज्यांनी त्यांच्या लहानपणी सहज शिक्षण पूर्णपणे अनुभवलं आहे. आजूबाजूच्या मुलांबरोबर, आपल्या मोठय़ा भावंडाबरोबर किंवा धाकटय़ा भावंडाबरोबर राहून अनेक गोष्टी न शिकता ही मंडळी आपली आपण शिकली आहेत. त्यांच्या आई-वडिलांना याचा पत्ताही नसायचा. काळ बदलत गेला. या मंडळींची मुलं जेव्हा लहान होती, तेव्हापासूनच घर दोन मुलांवर आलं. कुटुंबं स्वतंत्र राहायला लागली. नोकरीसाठी मुलांना पाळणाघरात किंवा घरात एकटं ठेवून घराबाहेर जावं लागलं. या सगळय़ा गडबडीत स्वत:च्या मुलांनाही त्यांना स्वत:ला मिळाला तसा सहजशिक्षणाचा अवकाश देणं शक्य झालं नाही. प्रत्येक गोष्ट शिकवणं किंवा मुलांना मदत करणं सुरू झालं.

एका घराची गंमत म्हणजे एक पालक सकाळचा डबा मुलाला शाळेत सोडताना सासूकडून घेऊन जायचे आणि रात्रीचा डबा त्यांची आई पाठवायची. घरी स्वयंपाक करणं नाहीच. आता आपल्या प्रौढ मुलांना ही अशी मदत करणं कितपत योग्य आहे, हा विचार दोन्ही पिढय़ांकडून व्हायला हवा. मुलांना स्वत:ची जबाबदारी घ्यायला कधी समर्थ करायचं आणि मुलांना समर्थ केलं नाही तर नातवंड कसं समर्थ होणार, हाही प्रश्न आहेच. यात नुकसान पुढच्या दोन पिढय़ाचं होणार आहे. हल्ली बहुतेक घरात आलेलं बाळ हे लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी आलेलं असतं. तेव्हा त्याच्या प्रत्येक गरजेसाठी सगळेजण तत्पर असतात. यामुळे की काय, पण हल्ली असं लक्षात येतं, की आजी-आजोबा या भूमिकेत गेलेली ही मंडळी सहज शिक्षण ही संकल्पनाच पार विसरून गेली आहेत.

आमच्या शाळेत आमच्या पालकांशी मुलांच्या सहज शिक्षणाच्या अनुषंगानं जे काम चालतं, त्यात पालकांशी सहज शिक्षण म्हणजे काय, मुलांचे खेळ ही प्रक्रिया काय आहे, त्यात मोठय़ांची काय भूमिका असावी, असे संवाद होतात. जेव्हा घरी पालक मुलांच्या सहज शिक्षणाला पोषक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मग खरी गडबड सुरू होते. पालक सांगतात, की ज्येष्ठ पालक याला हरकत घेतात. आम्ही मुलांना बेशिस्त बनवतोय असं त्यांना वाटतं. ते नातवंडांना सतत मदत करतात किंवा मग सूचना करतात. त्यामुळे या पालकांच्या पालकांशी संवाद साधताना, आम्ही आधी त्यांना त्यांचं बालपण आठवायला सांगतो. हे काही नवं नाही, तुमच्या लहानपणी होतंच, पण आताच्या बदललेल्या परिस्थितीत त्याचं महत्त्व काय आणि आपल्याला काय करता येईल ही चर्चा त्यांच्याशी होते. याचा सकारात्मक परिणाम होऊन काही आजी-आजोबा पालकांना चांगली साथ देतात. काही आजी-आजोबांना त्यांची हरवलेली सहज शिक्षणाची नाडी बरोबर मिळते आणि तणावरहित वातावरणात नातवंडाचं बालपण सकसपणे फुलतं.

 आणखी एक आव्हान म्हणजे तंत्रज्ञानाचं. स्मार्टफोन्स, टीव्ही, इंटरनेट. फोन किंवा टीव्हीचा वापर सर्रास मुलांना एका जागी शांत बसवण्याचं साधन म्हणून केला जातो. मुख्यत्वे जेवताना एका जागी बसवायला तर याचा चांगलाच उपयोग केला जातो. खरंतर गोष्टी ऐकत ऐकत जेवणं हा मुलांच्या जेवणाचा अविभाज्य भाग असायलाच हवा. त्यांच्या भाषाविकासाची, भावनिक विकासाची ती एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. मला आठवतं, माझी मुलं लहान असताना जेवताना आजीच्या लहानपणाच्या गोष्टी किंवा भरपूर वेगवेगळय़ा गोष्टी यात जेवण हा एक आनंददायी सोहळाच होत असे. त्या पार्श्वभूमीवर मोबाइलवर खिळलेली नजर आणि भरवला जाणारा घास यात काहीही भावनिक जोडणी नसते. एखादं मशीन भरवत आहे असे वाटतं. म्हणजे मुलांना जेवताना गोष्ट लागते आणि ती ऐकत जेवायला आवडतं यात जरी बदल नसला तरी ही पद्धत मात्र धोकादायक आणि घातक होत चालली आहे. याच्यावर घरातल्या सगळय़ांनीच  एकमेकांना बोल न लावता जाणीवपूर्वक व विचारपूर्वक उपाय शोधणं गरजेचं होऊन बसलं आहे. थोडक्यात, काळानुरूप पालकांच्या पालकांपुढची ‘पुन्हाच्या पालकत्वा’ची आव्हानं व जबाबदाऱ्या खूप आहेत. या पेलण्यासाठी आणि आपल्या या नातवंडांबरोबरचं नातं अबाधित ठेवण्यासाठी पालक आणि त्यांच्या पालकांचा वेगवेगळय़ा पातळय़ांवरचा सुसंवाद होणं मात्र खूप आवश्यक आहे, दुधावरच्या सायीसाठी!