आपल्याला वयाच्या पस्तिशीनंतर झालेलं एकुलतं एक मूल हे ‘प्रेशस चाइल्ड’ आहे असं रुकूचा पपा नेहमी म्हणायचा. ते रुकूच्या आजोबाला समजायचं नाही. आजोबाला तीन मुलं होती, त्यापैकी कोणीच काहीच वैभव बघत वाढलेलं नव्हतं. पण म्हणून ती ‘प्रेशस’ नव्हती असं काही कधी झालेलं नव्हतं.
त्याटुमदार फ्लॅटमध्ये चार प्रौढ माणसं राहत होती आणि एक मूल होतं. साहजिकच ते एकुलतं एक मूल म्हणजे रुक्मिणी नावाची मुलगी. ही घरातल्या सगळ्यांच्या सगळ्या अवधानांचं केंद्र बनलेली होती. तिला जन्म देणारे ममा-पपा, त्यातल्या पपाला जन्म देणारे आजी-आजोबा, तिला सांभाळायला येणाऱ्या मावशी या सगळ्यांना रुकूशिवाय दुसरा विषय नसे. रुकूचं खाणंपिणं, रुकूचा नट्टापट्टा, रुकूचं खेळणं, रुकूचा (आजीच्या मते शेंबडा) अभ्यास, रुकूचं वागणं बोलणं, रुकूच्या मॅनर्स आणि एटिकेट्स हे सगळं, सर्व काळ आदर्शच असायला हवं म्हणून सगळे जिवाचं रान करायचे. त्यातल्या त्यात अडचण म्हणावी तर एवढीच, की आदर्शाची प्रत्येकाची कल्पना अंमळ वेगळीवेगळी असायची. आदर्शाची आपलीच कल्पना आदर्श असं पक्कं मानण्यामुळे त्यावरून त्यांच्यात थोडय़ाफार कुरबुरी व्हायच्या. उदाहरणार्थ, आपल्याला वयाच्या पस्तिशीनंतर झालेलं आणि श्रीमंतीत लोळणारं आपलं एकुलतं एक मूल हे ‘प्रेशस चाइल्ड’ आहे असं रुकूचा पपा नेहमी म्हणायचा. ते रुकूच्या आजोबाला समजायचं नाही. आजोबाला तीन मुलं होती, त्याच्या वडिलांना सात मुलं होती, त्यापैकी कोणीच काहीच वैभव बघत वाढलेलं नव्हतं. पण म्हणून ती ‘प्रेशस’ नव्हती असं काही झालेलं नव्हतं. रुकूचे पणजोबा आपल्या मुलांना सतत ‘कार्टी’ म्हणायचे, निष्ठुरपणे बडवायचे, शिक्षा म्हणून उपाशीबिपाशी ठेवायचे, तरीही त्यातलं एखादंही ‘करट’ तापाने फणफणून पडलं, तर रात्रीच्या झोपेतूनही तासातासाने उठून त्याच्या अंगाला हात लावून बघायचे. कुठले कुठले अंगारे आणून लावायचे. अपत्यांच्या संख्येवरून आणि त्यांना वाढवण्याच्या सुबत्तेवरून ‘प्रेशसनेसपणा’ ठरल्याचं रुकूच्या आजोबांना जाणवलेलं नव्हतं. रुकूच्या ममाचा सारखा ‘क्वालिटी टाइम’चा जप चालायचा. तिला म्हणे तिच्या लेकीला ‘क्वालिटी टाइम’ द्यायचा असायचा. रुकूच्या आजीला हे क्वालिटी टाइम प्रकरण समजायचं नाही. तिच्या आयुष्यातला बहुतेक टाइम मुलांबरोबरच गेलेला होता. लाडाकोडाचा असेल, मारझोडीचा असेल, रडारडीचा असेल, आज तो आठवला की तिला तो ‘क्वालिटी टाइमच’ वाटायचा. पण हे किरकोळ मतभेद झाले. मुलांना धाक दाखवणं, धाकात ठेवणं याबाबतचा मतभेद गंभीर होता. रुकूला कोणतीही गोष्ट ‘मी सांगतो (किंवा सांगते) म्हणून कर’ हे सांगणं तिच्या ममा-पपाला अगदी अजिबातच मान्य नव्हतं. समजावून सांगणं, लाडीगोडीने गळी उतरवणं चालेल पण हुकूमशाही अजिबात नको. ‘गप्प बसा’ संस्कृती, ‘मी सांगतो म्हणून कर’ यातली हडेलहप्पी नको.
रुकूच्या पपाचं नेहमी म्हणणं असायचं. ‘‘आमच्या अगोदरच्या पिढय़ांनी दमदाटी करून करून पोरांना पुरतं लेचंपेचं, कणाहीन करून टाकलं. आत्मविश्वास, निर्णयक्षमता त्यांच्यात येऊच दिले नाहीत. मूल कसं, लोकशाही पद्धतीने वाढलं पाहिजे.’’
या लोकशाही पद्धतीचा पुरस्कार पुष्कळदा ऐकल्यावर रुकूच्या आजीनं एकदा रुकूच्या आजोबांना विचारलंसुद्धा,
‘‘मुलांना वाढवायची हल्लीची ही लोकशाही पद्धत म्हणजे काय असते हो?’’
‘‘सोपं आहे. आताचे शाही लोक जी पद्धत हिरिरीने राबवतील, तिला सर्वानी ‘लोकशाही पद्धत’ म्हणायचं.’’ आजोबांनी पापणीही न लववता उत्तर दिलं.
तर, जे हेत्ते कालाचे ठायी, चि. रुकू ही लोकशाही पद्धतीनं वाढत होती महाराजा! म्हणजे कशी? तर ती, तिचे ममा-पपा, हे सगळे एकमेकांना अरेतुरे संबोधत. रुकूसाठी काहीही विकत घेताना तिची पसंती विचारत. तिला आवडते म्हणून घरातल्या सगळ्यांना व्हॅनिला इसेन्स घातलेली कोल्ड कॉफी आवडून घ्यावी लागे. तिच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून तिच्या परीक्षेच्या काळात केबल कनेक्शन रद्द करत. बिचाऱ्या आजी-आजोबांची रोजच्या टीव्ही मालिकांची रसद तुटे पण, ‘आम्ही आमचे ठरलेले कार्यक्रम बघणारच. आम्ही सांगू तेव्हा तू अभ्यासाला बसायचंस,’ असं कोणीही, कधीही चुकूनही तिला म्हणू शकत नसे.
असेच त्या वर्षीच्या रुकूच्या परीक्षेचे दिवस येऊ घातले होते. रुकूचे ममा-पपा तिच्यावर अभ्यास लादत नसत, पण सकाळी ऑफिसला जाताना काहीबाही नेमून देत, संध्याकाळी आल्यावर तपासून घेत. ती बालसुलभ टाळाटाळ करे. तिचं अक्षर सुधारणं, सम्स-टेबल्स-एसे रायटिंग यांचा सराव करून घेणं, मॉरल लेसन्स घोटवून घेणं यावर ममा-पपा भर देत. रुकूच्या बाळजिवाला तो अभ्यास जास्तच होता. त्यावरून मग कुरबुरी होत. बहुतेकदा अभ्यासाचा शेवट दु:खांत असे. त्या दिवशी मात्र प्रकरण जास्तच पेटलं.ऑफिसमधून अचानक ब्रेक मिळाला म्हणून पपा लवकर घरी आला. रुकूचा अभ्यास घेऊन फावला वेळ सत्कारणी लावण्याच्या उत्साहात तो होता पण घरात शिरतोय तर रुकू पलंगावर अस्ताव्यस्त लोळत अभ्यासाचं एक पुस्तक वाचण्यात मग्न.
‘‘रुकू, काय चाललंय?’’
‘‘मॉरल लेसनचं बुक रीड करत्येय पपा.’’
‘‘असं लोळून?’’
‘‘आहे आमची मज्जा.’’
‘‘अभ्यासात मज्जाबिज्जा काही नसते. नीट उठून बस बरं वाचायला.’’
‘‘आँ ऽऽ मॉझी मॉन दुखत्ये नॉ ऽ..’’
‘‘नीट बसून वाचलंस की दुखणार नाही.’’ रुकू हातपाय आपटत बसली. पपाला एकदम आठवलं, ‘‘टेन लाइन्स लिहिल्या आहेस? बघू ऽ अक्षर कसं काढलंयस..’’ रुकूने शेपटीने मेलेला उंदीर उचलावा तशी स्कूलबॅगमधली एक वही उचलली आणि पपाच्या दिशेने भिरकावली. ती पानं गाळत खाली पडली. पपाचं डोकंच सटकलं.
‘‘किती वेळा सांगितलंय, वह्य़ा-पुस्तकं नीट हाताळावीत? नोटबुकमध्ये इतकं गलिच्छ का लिहून ठेवलंय? लक्ष कुठे होतं?’’
‘‘खातखात लिहीत होते.’’
‘‘का? एका वेळी एक गोष्ट करायला काय जातं? इतके वेळा सांगूनही?’’
‘‘घाई होती ना.. तुम्ही दोघांनी सम्स किती दिल्या होत्यात?’’
सम्स म्हणजे गणितं देताना ममा-पपांनी काही विचार केला होता. मुद्दाम सोप्यापासून अवघडापर्यंत क्रमाक्रमाने नेणारी गणितं घातली होती. त्यातही रुकूने आपलं डोकं लढवून उलटसुलट उद्योग करून ठेवला होता. सुरुवातीलाच कठीण गणित घेऊन ते चुकवून ठेवलं होतं. ते पाहून पपाचा ताबा सुटला. मोठय़ांदा किंचाळला.
‘‘हा आगाऊपणा करायची गरज होती तुला?’’
‘‘मी पपाचा पोपट केला. मिठू मिठू पपा पोपटू..’’ रुकूने अंमळ लडिवाळ पवित्रा घेतला. त्याने पपा विरघळेल असं वाटलं होतं तो उलट बिथरलाच. क्षणभर तिच्या अंगावर धावून जात खेकसला, ‘‘काय केलास? पोपट? बापाचा पोपट? लाज नाही वाटत असलं वाह्य़ात बोलायला? सगळा खेळ चाललाय का? अं? तू काहीही करावंस आणि आम्ही ऐकावं? ते काही नाही. आज सगळा अभ्यास पहिल्यापासून परत करायचा, री-डू..’’
‘‘पण मी केलॉय नॉ? मग री-डू कॉ?’’ भिजका प्रश्न आला.
‘‘मी सांगतो म्हणून,’’ पपाने घनगर्जना केली. ‘‘मी मोठा आहे मला जास्त कळतंय, या घरात माझं ऐकायचं म्हणून. इज दॅट क्लीअर?’’
घनगर्जनेनंतर पाऊस हवाच. रुकूच्या डोळ्यांनी ते काम सुरू केलं. भिजक्या पाखरासारखे आजी-आजोबा आवरून सावरून बसले आणीबाणीच्या प्रसंगी आजीवर्गानं गप्प बसायचं असतं इतपत शहाणपण रुकूच्या आजीजवळ होतंच. सगळा गोंधळ, रडारड, धुमसणं वगैरे साग्रसंगीत झाल्यावर हलकेच आपल्या मुलाला मात्र म्हटलं, ‘‘आज तुमची गाडी हळूच आमच्या जुन्या स्टेशनवर आणलीत की मिस्टर. का कर? तर, मी सांगतो म्हणून कर.’’
‘‘काय करणार आई? या कार्टीला अजून स्वत:ला कळत नाही. आम्ही सांगतो ते ऐकत नाही. शेवटी आमच्या वडीलकीचा, अनुभवाचा काही एक अधिकार आहे की नाही?’’
‘‘आहे तर. असणारच. जोवर मुलांना स्वत:चं भलंबुरं कळत नाही तोवर मोठय़ांनी ते सांगायलाच हवं. पण तुमच्या पिढीत तुम्ही मुलांचे मित्र कधी आणि पालक कधी हे त्यांना कसं बाबा कळणार? बाकी लोकशाहीचं म्हणशील तर अनेकदा मोठय़ांनासुद्धा ती पेलत नाही. पोराटोरांनी एवढय़ा सूक्ष्म रेषा कशा जाणाव्यात? म्हणून आम्ही आपले कायदे, नियम, शिस्त वगैरे सुरुवातीपासून लादत गेलो तुमच्यावर.’’
‘‘मला तिटकारा आहे सक्तीचा, लादण्याचा.’’
‘‘शक्य आहे पण शेवटी कधी तरी तुम्हालाही त्याच्यावर यावंच लागतं की. हात्तीच्या! म्हणजे हा सगळा प्रश्न फक्त क्रमाबाबतच होता होय? अहोऽ ऐकताय ना? आपण जे सुरुवातीला करत होतो ते आता शेवटी करायचं.’’
आजींनी आजोबांची साक्ष काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी गालातल्या गालात हसून बायकोकडे, मुलाकडे नजर टाकली आणि नातीचं रडवं तोंड ओल्या रुमालाने पुसायला घेतलं..
क्रम
आपल्याला वयाच्या पस्तिशीनंतर झालेलं एकुलतं एक मूल हे ‘प्रेशस चाइल्ड’ आहे असं रुकूचा पपा नेहमी म्हणायचा. ते रुकूच्या आजोबाला समजायचं नाही. आजोबाला तीन मुलं होती, त्यापैकी कोणीच काहीच वैभव बघत वाढलेलं नव्हतं. पण म्हणून ती ‘प्रेशस’ नव्हती असं काही कधी झालेलं नव्हतं.
आणखी वाचा
First published on: 11-05-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parents and the only child